अनेक आध्यात्मिक गुणांचा समुच्चय असलेले सनातनचे ७२ वे संत पू. नीलेश सिंगबाळ !

पू. श्री. सदाशिव परब

‘वर्ष २००० ते २००८ या काळात मी श्री. नीलेश सिंगबाळ यांना जवळून अनुभवले. तेव्हा मी प्रसारात सेवा करायचो. त्या वेळी त्यांनी मला साधनेत पुष्कळ साहाय्य केले. त्यांनी मला योग्य दृष्टीकोन देऊन माझे शंकानिरसन केले. त्यांनी मला साधनेतील अडथळ्यांवर मात करायला शिकवून माझी साधनेत प्रगती करवून घेतली. यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.

श्री. नीलेश सिंगबाळ सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. त्यांच्यात चिकाटी, वात्सल्यभाव, इतरांना समजून घेणे, शांत वृत्ती, स्थिरता, ध्येयनिष्ठता, तत्त्वनिष्ठता, सेवेतील परिपूर्णता, त्याग आणि निरपेक्ष प्रेम (प्रीती), अशा अनेक आध्यात्मिक गुणांचा समुच्चय आहे.’

श्री. नीलेश सिंगबाळ संत होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना

दोन मासांपासून (महिन्यांपासून) श्री. नीलेश सिंगबाळ यांची आठवण येऊन ‘त्यांची संतपदाकडे शीघ्रतेने वाटचाल होत आहे’, असे वाटणे आणि त्यानंतर ते संत झाल्याचे समजणे

गेल्या दोन मासांपासून (महिन्यांपासून) मला श्री. नीलेश सिंगबाळ यांची आठवण येऊन त्यांच्याविषयी सकारात्मक संवेदना जाणवत होत्या. ‘त्यांची संतपदाकडे शीघ्रतेने वाटचाल होत आहे’, असे मला वाटत होते. मी त्यांना म्हणालो, ‘‘आता परात्पर गुरुमाऊली आम्हाला तुमच्याविषयी आनंदाचे वृत्त देणार आहे. ते ऐकण्यासाठी आम्ही अधीर झालो आहोत.’’ तो सोनियाचा दिन उगवला. १८.१२.२०१७ या दिवशी श्री. नीलेश सिंगबाळ हे ‘पू. नीलेश सिंगबाळ’ झाले. हे वृत्त ऐकताच मला पुष्कळ आनंद झाला.

‘पू. नीलेश यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभून त्यांची साधनेत पुढील प्रगती करून घ्यावी’, अशी मी ईश्‍वर आणि परात्पर गुरुमाऊली यांच्या कोमल चरणी कोटी-कोटी वेळा प्रार्थना करतो.’

– (पू.) श्री. सदाशिव (भाऊ) परब, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१२.२०१७)

 

‘आश्रमाप्रतीचा कृतज्ञताभाव कसा असावा ?’, याविषयी
पू. नीलेश सिंगबाळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

पू. नीलेश सिंगबाळ

(‘हे लिखाण पू. निलेश सिंगबाळ हे संत म्हणून घोषित होण्यापूर्वीचे असल्याने त्यांचा उल्लेख येथे ‘श्री. नीलेश सिंगबाळ’ असा केला आहे.’ – संकलक)

‘श्री. नीलेश सिंगबाळ हे जवळजवळ १२ वर्षे वाराणसी सेवाकेंद्राच्या सेवेचे दायित्व सांभाळत होते. (सध्या ते पूर्व उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशा या राज्यांचे प्रसारसेवक आहेत.) २९.९.२०१७ या दिवशी श्री. नीलेश सिंगबाळ यांनी आम्हाला आश्रमसेवेच्या संदर्भातील काही सूत्रे सांगितली. त्यातून आम्हाला ‘आश्रमाप्रती कसा भाव ठेवला पाहिजे ?’, हे लक्षात आले. ‘त्यांच्यातील या भावामुळेच त्यांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होत आहे’, याचाही आम्हाला बोध झाला. त्या वेळी आम्हाला श्री. नीलेशदादांकडून पुढील सूत्रे शिकायला मिळाली.

१. आश्रम सेवेचे दायित्व म्हणजे शिष्यभावात रहाण्याची सर्वांत चांगली संधी आहे. सर्वकाही आपलेच आहे; पण तरीही आपण कुणाकडून कशाचीही अपेक्षा ठेवायची नाही.

२. गुरुदेवांनी निर्मिलेले आश्रम शक्ती, ऊर्जा आणि चैतन्य यांचे स्रोत आहेत.

३. आश्रमातील सगळ्या वस्तू गुरूंच्या आहेत. गुरुदेवांच्या या संपत्तीचे रक्षण करणे, ही गुरुसेवाच आहे.

४. आश्रमातील प्रत्येक वस्तूचा गुरुदेवांशी संबंध आहे. आश्रमातील वस्तू आश्रम सेवकच आहेत. या सर्व वस्तू सजीवच आहेत. त्यामुळे या सर्वांप्रती कृतज्ञताभाव असला पाहिजे.

५. आपण आश्रमाविषयी वात्सल्यभाव ठेवायला हवा. लहान मूल आईला काही सांगू शकत नाही. त्याच्या आईलाच त्याच्याकडे लक्ष द्यावे लागते. ‘तो दूध प्यायला आहे ना ? त्याला पांघरूण घातले आहे ना ?’ इत्यादी गोष्टींकडे आई सतत लक्ष देते. त्याचप्रकारे आश्रमही आपल्याला काही सांगू शकत नाही. आपणच ‘आश्रमाची सगळी दारे बंद केली आहेत कि नाहीत ? आसंद्या जागेवर ठेवल्या आहेत कि नाहीत ? आश्रमातील दिवे किंवा संगणक बंद केले आहेत कि नाहीत ?’, यांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे आपोआपच आपल्या मनात आश्रमाविषयी प्रेम निर्माण होईल.

६. प्रत्येक सूत्राकडे तत्परता, सतर्कता आणि गांभीर्य, या दृष्टीने पहाणे आवश्यक आहे.

७. ‘दिसेल ते कर्तव्य’, हाच खरा शिष्यभाव आहे.

८. ईश्‍वर आपण स्थुलातून केलेली कृती पहात नाही, तर त्या कृतीमागील आपला भाव पहातो.

९. काही वेळा सेवा होत नसल्यास ‘गुरूंचे कार्य होत नाही’, या विचाराने खंत वाटून प्रयत्न चालू होतात.

१०. गुरुदेव ‘कुणाच्या मनात कोणते विचार आहेत ?’, हे जाणतात. त्यामुळे आपणच ‘आपल्या मनात कोणते विचार येऊ द्यायचे ?’, हे ठरवले पाहिजे.

११. आश्रम म्हणजे केवळ ४ भिंती असलेली वास्तू नव्हे, तर आश्रम म्हणजे आश्रमात सेवा करणारे साधक होय. ‘या सर्वांची आणि त्यासह स्वतःचीही साधना होणे’, हेच गुरुदेवांना अपेक्षित आहे.

‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेनेच श्री. नीलेशदादांकडून आम्हाला ही सूत्रे शिकायला मिळाली. केवळ तुम्हीच आमच्यामध्ये आश्रमाप्रती वात्सल्यभाव आणि शिष्यभाव निर्माण करू शकता. आता तुम्हीच आमच्याकडून वृत्ती आणि कृती यांच्या स्तरांवर प्रयत्न करवून घ्या’, अशी तुमच्या चरणी आर्ततेने प्रार्थना आहे.’

– गुरुदेवांच्या चरणांचे रजकण होण्यासाठी आतुर असलेल्या,

सौ. श्रेया प्रभु आणि सौ. सानिका सिंह, सनातन सेवाकेंद्र, वाराणसी. (१.१०.२०१७)

Leave a Comment