आपत्कालीन स्थितीत अडकलेल्या संतोष गरुड यांना आलेले अनुभव आणि साधनेची झालेली जाणीव

१. वादळी पावसामुळे प.पू. दास
महाराजांनी जिथे आहेस, तिथेच थांब, असा निरोप देणे

६.५.२०१७ या दिवशी संध्याकाळी ७ वाजता पानवळ-बांदा येथील गौतमारण्य आश्रमात सेवेच्या निमित्ताने दुचाकीने निघालो होतो. पर्वरी (गोवा) येथून पानवळ हे गाव ३८ कि.मी अंतरावर आहे. साधारण ३० कि.मी. अंतर पार केल्यानंतर पत्नी सौ. समृद्धी हिचा आश्रमातून भ्रमणभाष आला. ती म्हणाली, प.पू. दास महाराजांनी आज्ञा केली आहे की, जेथे आहात तेथेच थांबा. पुढे येऊ नका. या ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस पडत आहे. असे सांगून तिने भ्रमणभाष बंद केला. या वेळी सायंकाळचे ७.४५ वाजले होते.

२. वातावरण चांगले असल्याने थोडे पुढे जावे, असा विचार
येणे; परंतु परात्पर गुरुदेवांनी सूचनेचे पालन करण्याचे सुचवणे

मी महाराष्ट्र्र-गोवा सीमेवरील तोरसे या गावात होतो. गोव्यातील हे शेवटचे गाव. त्यानंतर पुढे ५ कि.मी. अंतरापर्यंत पूर्ण निर्जन महामार्ग आहे. मनात विचार आला, इथे वातावरण चांगले आहे. वादळ आणि पाऊस यांचा मागमूसही नाही. काही अंतर पुढे जावे का ? नंतर परात्पर गुरुदेवांनी सुचवले, सूचना मिळाली, तिचे अगदी तसेच पालन कर. आणखी कोणताही विचार न करता दुचाकी बाजूला लावली आणि तिथल्या बसथांब्याच्या शेडमध्ये उभा राहिलो. इतर वाहने येत-जात होती. साधारण १० मिनिटांनी तिथे वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस चालू झाला. साधारण ९.३० वाजेपर्यंत पावसाने अक्षरश: थैमान घातले.

३. पाऊस थांबल्यानंतर पुढे जाऊ लागल्यावर आपत्कालीन स्थितीची जाणीव होणे

३ अ. महाकाय झाडे वादळाच्या तडाख्याने उन्मळून पडणे आणि
विजेचे खांब मोडून पडल्याने विजेच्या तारा रस्त्यावरच पडलेल्या असणे

रस्त्याच्या त्या बसथांब्याजवळ थांबलो नसतो, तर हमखास वादळात सापडलो असतो. पाऊस थांबल्यानंतर मी पुढे प्रस्थान केले. त्या वेळी मार्गातील दृश्ये पाहून वादळी पावसाची भीषणता दिसून आली. जागोजागी महाकाय झाडे वादळाच्या तडाख्याने उन्मळून पडली होती. विजेचे खांब मोडून पडले होते. वीजतारा रस्त्यावरच तुटून पडल्या होत्या. काही ठिकाणी त्या लोंबकळत होत्या. काही ठिकाणी फणसांची झाडे कोसळल्याने रस्त्यात सर्वत्र मोठेच्या मोठे फणस विखुरले होते. चारचाकी वाहने जागच्या जागीच थांबली होती. दुचाकीचालक रस्ते शोधत झाडाच्या फांद्या बाजूला करत हळूहळू पुढे सरकत होते. पानवळपर्यंत इतर दुचाकी चालकांसमवेत मी येऊन पोहोचलो.

३ आ. आश्रमाजवळील १ कि.मी. अंतरावर झाडे पडल्याने दुचाकीने जाता न येणे

आता कॅनॉलवरून आश्रमाच्या दिशेने १ किलोमीटर अंतर एकट्यालाच पार करायचे होते. मला वाटले पोहोचलो एकदाचा; पण त्या एक किलोमीटर अंतरात गडद काळोखात पडलेली झाडे पाहून अंगावर काटा आला. वाटले आज काही खरे नाही. शेवटी आश्रमापासून २०० मीटरपर्यंत तशीच वाट काढत पुढे सरकलो. त्या ठिकाणी फार मोठ्या वृक्षाच्या फांद्या आडव्या पडल्याने पूर्णपणे रस्ता बंदच झाला होता. या ठिकाणी नाइलाज झाला. भ्रमणभाषला रेंज नव्हती. तिथून मागे फिरून पुन्हा दुसर्‍या मार्गाने जावे, असा विचार करून दुचाकी वळवली. इतक्यात तीन दुचाकीस्वार त्या दिशेने आले. त्यांना वाटेतच थांबवले. त्यांना म्हटले, अहो, मोठ्या फांद्या आडव्या पडल्याने रस्ता पूर्णपणे बंद आहे. वाफोलीमार्गे आपल्याला जावे लागेल. ते दुचाकीस्वार म्हणाले, चुकूनसुद्धा त्या मार्गाने जाऊ नका. आम्ही तिथूनच परतलो आहोत. याच फांद्या बाजूला करता येतात का, ते बघूया.

३ इ. आश्रमात पायी जाऊन पाळ (कोयत्यासारखे
हत्यार) आणून फांद्या तोडून रस्ता मोकळा करणे

मी पुन्हा दुचाकी वळवली. त्यांच्यासमवेत झाडाकडे आलो. दुसर्‍या बाजूने आणखी दोन दुचाकीस्वार आले. ते विरुद्ध दिशेला अडकले होते. कोणालाही कुठेच जाता येईना. एकजण म्हणाले, फांद्या तोडण्यासाठी कोयता किंवा पाळ असता, तर बरे झाले असते. आपला आश्रम जवळच होता. मी झाडाच्या फांद्या ओलांडून पलीकडे उडी मारली आणि कोयता आणण्यासाठी एकाच्या दुचाकीवर बसून आश्रमात आलो. पू. माईंनी पाळ (कोयत्यासारखे हत्यार) काढून दिला. तो घेऊन परत येऊन फांद्या तोडल्या आणि रस्ता मोकळा केला. सर्व बाजूचे दुचाकीस्वार सुटले. नंतर रात्री ११ वाजता कसाबसा आश्रमात पोहोचलो.

४. संतांचे १०० टक्के आज्ञापालन केल्यासच
परात्पर गुरुदेव रक्षण करतील, याची जाणीव होणे

या सर्व प्रसंगावरून आपत्काळ म्हणजे काय ? त्यात कसे वागावे ? आणि संतांचे १०० टक्के आज्ञापालन केल्यासच त्यातून आपला बचाव कसा होऊ शकतो ? याचा चांगलाच धडा (शिकवण) गुरुदेवांनी दिली. प.पू. दास महाराजांनी अगदी अचूक वेळेत मला जिथे असशील, तिथे थांब असे सांगून मला मोठ्या संकटातून वाचवले. साधना नसतांनाही श्री श्री गुरुदेवांनी माझे रक्षण केले. कुठल्यातरी जन्माची साधना उपयोगी आली. जणू त्यांनी मला जीवदानच दिले. त्यांनी केलेले हे उपकार कितीही जन्म घेऊन त्यांच्या चरणांची सेवा केली, तरी फिटू शकणार नाहीत. यासाठी परात्पर गुरुदेव श्री श्री जयंत आठवले, प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

– श्री. संतोष गरुड, पर्वरी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment