रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

१. श्री. अनिल पालकर, महाड, जिल्हा रायगड.

‘रायगड जिल्ह्यातील महाड हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे. महाड तालुक्यातील गावे आणि आजूबाजूच्या तालुक्यांसाठी महाड ही मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे ही बाजारपेठ नेहमीच गजबजलेली असते. महाडला जोडूनच औद्योगिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रातील कर्मचारी आणि अनेक आस्थापनांची वाहने यांची वर्दळ रात्री उशिरापर्यंत चालू असते. महाडमध्ये शासकीय ‘ट्रॉमा केअर सेंटर’ हे रुग्णालय आहे. त्याच समवेत सर्व प्रकारच्या रोगांवर उपचार करणारी खासगी रुग्णालये असल्याने आजूबाजूच्या तालुक्यातील लोक उपचार घेण्यासाठी महाड येथे येतात.

१ अ. मुसळधार पावसामुळे महाड येथे झालेली भयावह स्थिती

२१.७.२०२१ पासून महाड शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सावित्री, गांधारी अन् इतर नद्यांना महापूर येऊन पाणी महाड शहरामध्ये शिरले. त्यामुळे महाड शहरामध्ये जवळजवळ २० ते २५ फूट पाणी भरले आणि शहर दोन दिवस पाण्याखाली होते. आजूबाजूच्या सर्व गावांचा महाड शहराशी असलेला संपर्क तुटला होता. वीज गेल्यामुळे पाणीही मिळत नव्हते. महाडलगत असलेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे वायूगळती होऊन लोक भयभीत झाले होते. महाडच्या जवळील तळिये या गावातील एका वाडीवर दरड कोसळून ७० ते ८० लोक मृत्यूमुखी पडले. अशा प्रकारे भयानक स्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. त्या वेळी सनातनच्या साधकांनी श्री गुरूंची कृपा अनुभवली.

१ आ. साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

१ आ १. महाड आणि आसपासच्या गावात पुष्कळ पाऊस पडून नदीला महापूर येणे, शेजारच्या पोलादपूरमधील बाजारपेठेत आणि महाडमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरणे

२१.७.२०२१ या दिवशी महाड परिसरात चालू झालेला मुसळधार पाऊस रात्रभर पडत होता. दुसर्‍या दिवशी पहाटे साडेचार वाजल्यापासून वीजही गेली. पोलादपूर बाजारपेठेत पाणी भरले होते. सकाळी ९ वाजता महाड येथील बाजारपेठेत गेल्यावर ‘पहाटे ५ वाजता नदीच्या पात्रातील पाणी मार्गावर येऊन लोकांच्या घरांमध्ये शिरले’, असे समजले.

१ आ २. पनवेल येथील एका साधिकेने संपर्क करून सर्व साधकांची विचारपूस करून आवश्यक ती काळजी घेण्यास सांगणे

पनवेल येथून एका साधिकेचा भ्रमणभाषवर लघुसंदेश आला, ‘महाड येथील सर्व साधक सुखरूप आहेत ना ? पाणी किती भरले आहे ? सर्व जण काळजी घेत आहेत ना ?’ तो लघुसंदेश वाचून मी त्यांना कळवले, ‘पोलादपूरच्या बाजारपेठेत पाणी भरले आहे आणि महाडमधील साधकांशी संपर्क होत नाही.’

१ आ ३. पाण्याची वाढणारी पातळी बघून स्वतःचे मातीचे घर वाहून जाण्याची भीती वाटून गुरुदेवांचा धावा चालू होणे, तेव्हा वास्तूभोवती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संरक्षककवच असल्याचे जाणवणे आणि रात्री गुरुकृपेने पाणी ओसरल्यामुळे धोका टळणे

त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा पूर आला. त्याची तीव्रता वर्ष २००५ मध्ये आलेल्या पुरापेक्षाही अधिक होती. रात्री ८ वाजता ते पाणी मी रहात असलेल्या आनंदनगर भागातही शिरले. तेथील घरे पुष्कळ जुनी असून आमच्या घराच्या भिंती मातीच्या आहेत. तेथील ४ – ५ घरांत पाणी शिरलेही होते. तेव्हा रात्री झोपतांना ‘हे पाणी अजून ४ फूट वाढले, तर ते आपल्या घरातही येऊ शकते’, अशी मला भीती वाटत होती. ‘त्या पाण्यात आमच्या घराच्या भिंती पडून जातील आणि आमची मोठ्या प्रमाणात हानी होईल’, असे वाटून मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) आर्ततेने प्रार्थना करू लागलो. तेव्हा ‘वास्तूभोवती गुरुदेवांचे संरक्षककवच असून वास्तूभोवती सुदर्शनचक्र फिरत आहे आणि ते वास्तूचे रक्षण करत आहे’, असे मला जाणवत होते. गुरुकृपेने रात्री पाणी ओसरले आणि संभाव्य धोका टळला.

१ इ. सर्व वस्तूंचा तुटवडा निर्माण होणे

त्या दिवसापासून, म्हणजे २१.७.२०२१ पासून २९.७.२०२१ पर्यंत महाडमध्ये वीज नव्हती. आम्हाला एवढे दिवस अंधारात रहावे लागले. पेठेत १० रुपयांची मेणबत्ती २० रुपयांना मिळत होती आणि नंतर ती उपलब्धही नव्हती. पाण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. घराच्या पन्हाळीवरून पडणार्‍या पावसाच्या पाण्यावर लोकांना ८ दिवस रहावे लागले. आम्ही त्याच पाण्यात कपडे धुणे, भांडी घासणे आणि अंघोळीही करत होतो.

१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांच्या काळजीपोटी ‘आपत्काळाविषयी त्यांना किती जागृत करत आहेत ?’, याची प्रकर्षाने जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त होणे

मागील वर्षी गुरुदेवांनी ‘साधकांनी स्थलांतर करायला हवे. साधक सुरक्षित आहेत का ? त्यांची घरे सुरक्षित आहेत का ?’, याविषयी सांगितल्याची तीव्रतेने जाणीव झाली. माझे घर नदीपासून ३०० ते ४०० मीटर अंतरावर आहे, तसेच २ कि.मी. अंतरावर धरण आहे. त्यामुळे ‘देव (गुरुदेव) किती काळजी घेऊन सांगत आहेत ?’, याची प्रकर्षाने जाणीव झाली. ‘आम्ही साधनेत अत्यंत अल्प आहोत, तरी देव (गुरुदेव) आमची काळजी घेत आहे’, याची सातत्याने जाणीव होत होती. बाहेर सगळ्यांना इथे घडणार्‍या गोष्टींची माहिती समजत होती; पण आम्हाला काहीच कळत नव्हते. तेव्हा लक्षात आले, ‘माझ्याकडे छोटा ‘ट्रांझिस्टर’ (रेडिओ) असता, तर ‘आजूबाजूला काय घडत आहे ?’, हे मलाही समजले असते. तेव्हा ‘येणार्‍या आपत्काळासाठी आपण किती जागृत रहायला हवे ? किती सिद्धता करायला हवी ?’, याची मला जाणीव झाली.

सनातनचे साधक किती भाग्यवान आहेत; कारण आपल्या जीवनात विष्णुस्वरूप, परम दयाळू गुरुमाऊली आली आहे. ‘मागच्या अनेक जन्मांपासून गुरुमाऊली माझा सांभाळ करत आहे आणि या जन्मातही माझ्यावर कृपेचा वर्षाव करत आहे’, याची मला जाणीव झाली. यासाठी कृतज्ञता !’ (२५.९.२०२१)

Leave a Comment