अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !

नवी देहली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट येथील संशोधकांचा अहवाल

नवी देहली – येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट येथील संशोधक अक्षित संगोमला यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, टेक्सास, ओरेगॉन, नेवाडा, उटाह आणि न्यू मेक्सिको या राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुष्काळाचा अमेरिकेच्या कृषी आणि पशूधनावर विपरीत परिणाम होणार आहे. दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेमुळे गवतांच्या कुरणांची हानी झाल्यामुळे पशूधनाचे उत्पादन अल्प होऊ शकते. अन्न प्रक्रिया आणि कृषी सेवा क्षेत्र यांवर नकारात्मक परिणाम होऊन प्रादेशिक अन् राष्ट्रीय स्तरावर अन्नाच्या किमती वाढू शकतात. येथील २५ दशलक्ष लोकांना पाण्याचा पुरवठा करणार्‍या ‘लेक मीड’ या जलाशयाने तळ गाठला आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ आणि अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ने (नासा) ही माहिती दिली आहे.

युरोपात अतीथंडी आणि अतीउष्णता असल्यामुळे स्थानिक आणि पर्यायाने जागतिक वातावरणात पालट होत आहे. युरोपातील प्रमुख नद्यांसह अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत.  पिण्याचे आणि शेतीसाठीचे पाणी, तसेच जलविद्युत् क्षेत्र यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. संपूर्ण युरोपात आगामी वर्षांत अन्नधान्यांची टंचाई निर्माण झाल्यामुळे अन्य उत्पादनांवरही मोठा परिणाम होणार आहे. युरोपीय कमिशनने या संदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. आफ्रिका खंडातील २२ दशलक्ष लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागण्याच्या भीतीसह २०२२-२३ मध्ये जगात अन्नधान्यांची दरवाढ, टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये नदीकाठावरील भात, मक्याचे पीक अडचणीत आले आहे. नदीवरील जलविद्युत् प्रकल्प बंद झाले आहेत. अनेक प्रांतांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शांघायसह अन्य प्रमुख शहरातील दिवे रात्री बंद केले जातात. बहुराष्ट्रीय आस्थापनांनी विजेअभावी प्रकल्प बंद केले आहेत.

संपादकीय भूमिका

अमेरिका, युरोप आणि चीन येथील दुष्काळ ही येणार्‍या आपत्काळाची पूर्वसूचना समजून साधना वाढवणे आवश्यक ! 

Leave a Comment