युरोपात युद्धाचे ढग गडद !

  • युक्रेनमधील १० शहरांवर रशियाचे आक्रमण !
  • बेलारूसकडून रशियाला उघडपणे लष्करी बळ !
  • रशियाविरुद्ध युद्धसज्ज असल्याची ‘नाटो’ची घोषणा !

कीव (युक्रेन) – युक्रेनने क्रिमियातील कर्च पूल पाडल्याचा सूड उगवण्यासाठी रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह तेथील १० शहरांवर आक्रमण केले, अशी माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली. रशियाने कीववर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे सहस्रो नागरिकांना छावण्या आणि भूमीगत मेट्रोस्थानके येथे आश्रय घ्यावा लागला. रशियाच्या आक्रमणात विविध शहरांत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ६५ जण घायाळ झाले आहेत.

आतापर्यंत केवळ रशिया आणि युक्रेन यांच्यापुरताच सीमित असलेल्या संघर्षात आता बेलारूसनेही उडी घेतली असून त्याने रशियाला उघडपणे लष्करी बळ पुरवले आहे. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको म्हणाले, ‘‘रशियाला लष्करी तळ सिद्ध करण्यासाठी आमचा देश भूमी उपलब्ध करून देईल. रशिया तेथे तळ उभारेल.’’

दुसरीकडे ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) देशांनीही रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनची बाजू घेत युद्धसज्ज असल्याची घोषणा केली. ‘नाटो’चे सरचिटणीस स्टॉल्टेन बर्ग म्हणाले, ‘‘आम्ही युक्रेनला साहाय्य करत राहू. मागे हटणार नाही.’’ या परिस्थितीमुळे युरोपात युद्धाचे ढग गडद झाले आहेत.

Leave a Comment