सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणा-या, त्यागी आणि सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणा-या पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी

७.२.२०१७ या दिवशी श्रीमती शेऊबाई मारुति लोखंडे यांनी संतपद प्राप्त केले. त्यांच्या कुटुंबियांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

 

१. पूर्वायुष्य खडतर असणे

पू. लोखंडेआजी

आजींचा विवाह लहान वयातच झाला होता. त्यांना लहानपणापासूनच पुष्कळ कष्ट करावे लागले. त्यांच्या सवतीनेही त्यांचा पुष्कळ छळ केला. तो सहन करत त्यांनी दिवस काढले. त्यांना जीवनात पुष्कळ दुःख पचवावे लागले. त्यांची दोन मुले दोन वर्षांची असतांनाच मृत्यू पावली. त्याचे दुःख त्यांनी जड अंतःकरणाने सहन केले. स्वत: हालअपेष्टा सहन करून आणि इतरांच्या घरची कामे करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलींचा सांभाळ केला. त्या फार कष्टाळू आहेत.

– सौ. उर्मिला रामेश्वर भुकन (पू. आजींची नातसून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

२. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. वडिलांच्या निधनानंतर आजीने प्रेमाने सांभाळ करणे

श्रीमती शेऊबाई मारुति लोखंडेआजी मागील १८ वर्षांपासून आम्हा भुकन कुटुंबियांसमवेत रहाते. ७.६.१९९९ या दिवशी आमचे वडील श्रीधर सोनबा भुकन यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्या वेळी आम्ही ५ भावंडे अगदी लहान होतो. तेव्हापासून आजी आमच्यासमवेत आहे. आजी आमच्या घराचा मुख्य आधारस्तंभ आहे. आजीने आम्हा सर्वांना प्रेमाने सांभाळले. आईला ती सर्व कामांत (शेती, घरकाम) साहाय्य करायची. तिने कुणालाही कशाचीही उणीव भासू दिली नाही.

– श्री. रामेश्वर भुकन (पू. आजींचा नातू), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ आ. वेळेचे पालन करणे आणि सतत सेवारत रहाणे

वर्ष १९९९ पासून शेतात नांगरणे, पेरणे इत्यादी कामे मला करावी लागत. त्या वेळी आजी पहाटे उठून गरम पाणी करून देत असत. चहा आणि अल्पाहार वेळेत बनवून देत. तेव्हापासूनच त्यांच्यात वेळेचे पालन करणे, हा गुण होता. आम्ही आजींना ओळखायला अल्प पडलो.

– श्री. दामोदर गायकवाड (आजींचा नातजावई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ इ. उत्तम आरोग्य

या १८ वर्षांत आजीला रुग्णालयात नेण्याची आवश्यकता केवळ २ – ३ वेळाच आली. ती सतत सेवारत असल्यामुळे तिचे आरोग्य उत्तम आहे. तिची रोग प्रतिकारशक्तीही पुष्कळ चांगली आहे.

– श्री. रामेश्वर भुकन

२ ई. तत्परता

आजी प्रत्येक कृती पुष्कळ तत्परतेने करते. दिलेली सेवा संपवून कधी एकदा दुसरी सेवा करते, असे तिला सतत वाटत असते. घरी काही पदार्थ बनवायचा असल्यास ती तो लगेच बनवून देते.

२ उ. सहनशीलता

आमच्या वडिलांच्या निधनानंतर आजी आमच्याकडे (तिच्या मुलीकडे) रहात होती. आमच्या शेजारचे काही लोक तिला नावे ठेवायचे आणि लागेल असे बोलायचे; पण आजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची आणि म्हणायची, निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे आपली प्रगती होत असते. शेजारी आमच्या कुटुंबालाही नावे ठेवायचे; पण आजीने आम्हाला त्यांच्याविषयी कधीच चुकीचे शिकवले नाही. मी तिला म्हणायचो, शेजारी आपल्याला किती त्रास देतात ! मी त्यांच्याशी भांडण करतो. तेव्हा ती समजावून सांगायची, समाजाला आता नाही कळणार. पुढे कळेल. आपण सतत चांगले करत रहायचे. मी घरी गेल्यावर आता सर्व लोक मला आवर्जून भेटायला येतात.

– श्री. वाल्मीक भुकन

२ ऊ. त्यागी वृत्ती

मला डी.एड्. ला प्रवेश मिळाल्यावर माझ्या शिक्षणासाठी आजीने ५ सहस्र रुपये दिले. तिला शासनाकडून निराधार योजनेअंर्तगत मिळत असलेल्या अल्प मानधनातून साठवलेले हे पैसे होते. ती तिला मिळणारे मानधन आम्हा कुटुंबियांसाठीच व्यय करत असे.

– श्री. रामेश्वर भुकन

२ ए. आज्ञाधारकपणा

आजींना कुणीही काही सांगितले की, आजी लगेच ते ऐकून तशी कृती करतात. तेव्हा त्या आपल्या वयाचाही विचार करत नाहीत किंवा माझ्या प्रकृतीला ते पेलवेल का ? याचाही त्या कधीच विचार करत नाहीत.

– श्री. रामेश्वर भुकन, श्री. वाल्मीक भुकन आणि सौ. उर्मिला रामेश्वर भुकन

२ ऐ. प्रेमभाव

२ ऐ १. प्रेमाने आदरातिथ्य करणे

अ. घरी आलेल्या पाहुण्यांचे आदराने स्वागत करणे, हे आम्ही आजीकडून शिकलो.

– श्री. वाल्मीक भुकन

आ. वाटेचा वाटसरूही चतकोरभर भाकरी आणि तांब्याभर पाणी पिऊन शांत झाला पाहिजे, या म्हणीप्रमाणे त्यांच्या घरून कुणी उपाशी जात नसे. त्या प्रत्येकाची विचारपूस करत आणि जेवू घालत.

– श्री. दामोदर गायकवाड

२ ऐ २. नातसूनेलाही पुष्कळ प्रेम देणे

आजी पुष्कळ प्रेमळ आहेत. मी त्यांची नातसून असूनही त्यांनी मला पुष्कळ प्रेम दिले. आता त्या प्रेम नव्हे, तर प्रीती देतात, असे वाटते. त्या प्रत्येकावर प्रीतीचा वर्षाव करतात.

२ ऐ ३. पणतीची प्रेमाने काळजी घेणे

वेदश्रीसमवेत (पणतीसमवेत) त्या अगदी लहान होऊन भातुकलीचा खेळ खेळतात. तिला गोष्टी सांगतात. तिची प्रत्येक कृती मनापासून स्वीकारतात. वेदश्रीलाही आजी पुष्कळ आवडतात. वेदश्री आणि आजी पुष्कळ एकरूप झाल्या आहेत, असे वाटते.

– सौ. उर्मिला रामेश्वर भुकन

२ ऐ ४. साधकांशी प्रेमाने बोलणे

आजीला इतर साधकांना भेटायला आणि त्यांच्याशी बोलायला पुष्कळ आवडते. त्यांच्याशी ती प्रेमाने बोलते. ती कधीच कुणावर रागावत नाही.

– श्री. रामेश्वर भुकन

२ ऐ ५. मकरसंक्रांतीला भावी नातसुनेच्या घरी तीळगुळाचे लाडू पाठवणे

मकरसंक्रांतीला आजींनी तीळगुळाचे लाडू माझ्या घरी पाठवले होते. आई-बाबा, आजी आणि भाऊ यांची नावे घेऊन ते लाडू दे, असे मला सांगितले.

२ ऐ ६. पहिल्या भेटीतच आपलेसे करणे

माझी भेट आजींशी पहिल्यांदा होणार होती. मला पुष्कळ भीती वाटली होती. आजींनी पहिल्या भेटीतच त्यांनी मला मिठीत घेऊन डोक्यावरून हात फिरवला. माझ्या मनातील विचारच निघून गेले. आजी आपल्याच आहेत, असे वाटले.

– कु. रोहिणी गुरव (आजींची भावी नातसून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ ओ. निरागस

त्या लहान बाळाप्रमाणे निरागस आहेत.

– कु. रोहिणी गुरव

२ औ. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला लागल्यावर दिवसातून ५ – ६ घंटे नामजप करणे

आमचे पूर्ण कुटुंब वर्ष २०११ मध्ये सनातन संस्थेच्या अंतर्गत साधनेत आले. आजी घरी असतांना अंदाजे ५ – ६ घंटे ती नामजप करायची. ती कृष्ण, कृष्ण आणि श्री गुरुदेव दत्त हे दोन नामजप करायची. मी आजीला म्हणायचो, कृष्णाचा ॐ नमो भगवते वासुदेवाय हा नामजप का करत नाहीस ? त्यावर ती म्हणायची, तो नामजप पुष्कळ मोठा आहे आणि तो माझ्या लक्षात रहात नाही. त्यामुळे मी केवळ कृष्ण, कृष्ण म्हणते. तेव्हा माझ्या लक्षात आले की, तो नामजपही कृष्णाचा आहे.

– श्री. वाल्मीक भुकन

२ अं. आजींनी नामजप करतांना बाळकृष्ण खेळत असल्याचे सांगणे

मी त्यांना विचारले, आजी तुम्ही नामजप कोणता करता ? आजी म्हणाल्या, मी केवळ कृष्ण कृष्ण म्हणते. मग बाळकृष्ण माझ्याशी खेळतो.

– कु. रोहिणी गुरव

२ क. दैनिक सनातन प्रभातविषयीची आत्मीयता

दैनिक सनातन प्रभात न वाचता ती तो आतुरतेने पहाते. त्यामधील साधक आणि संत यांची छायाचित्रे पहाते अन् त्याविषयी विचारून घेते. तिला वाचता येत नाही; पण दैनिक सनातन प्रभात पहात असतांना ती वाचन करत आहे, असे वाटते.

२ ख. पूर्ण कुटुंबाने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय आनंदाने स्वीकारणे

घरी सर्व काही सुरळीत चालू असतांनाही कुटुंबाने साधनेत पूर्णवेळ होण्याचा निर्णय आजीने मनापासून आणि आनंदाने स्वीकारला. तिने कधीही विरोध केला नाही. तिला आश्रमाची पुष्कळ ओढ वाटत होती.

२ ज. परेच्छेने वागणे

‘आजी नेहमी परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागतात’, असे वाटते.

– सौ. उर्मिला रामेश्वर भुकन

२ झ. आजीकडे ‘संत होऊनच देवाघरी जा’,
असा हट्ट करणे आणि आजीने ‘देवच सर्वकाही करील’, असे सांगणे

‘आजीला मी नेहमी म्हणायचो, ‘‘आता तुझे थोडे दिवस राहिलेत ना, तर तू संत होऊनच देवाघरी जा.’’ त्या वेळी ती म्हणायची, ‘‘हे काही आपल्या हातात नाही. देवच सर्वकाही करील.’’ तरी मी हट्ट करायचो, तर ती म्हणायची, ‘‘बरं, करू प्रयत्न !’’

– श्री. वाल्मीक भुकन

२ ट. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

‘आजींची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. परात्पर गुरूंना पाहिल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होतो. त्या सांगायच्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर, म्हणजे साक्षात् देवच आहेत.’’ त्यांना रामनाथी आश्रमात आल्यावर पुष्कळ आनंद झाला.’

– सौ. उर्मिला रामेश्वर भुकन

 

३. संतपद प्राप्त होण्यापूर्वी आजींमध्ये जाणवलेले पालट

३ अ. मुलींविषयीची आसक्ती न्यून झाल्याचे जाणवणे

‘पूर्वी आजीला त्यांच्या दोन मुलींची पुष्कळ काळजी वाटायची, ‘त्यांची मुले त्यांचा सांभाळ करतील कि नाही ?’ कारण आमची मावशी तिच्या मुलांपासून वेगळी रहाते. आता आजीला विचारले, ‘‘काळजी वाटते का ?’’ तर ती सांगते, ‘‘देव बघून घेईल.’’ ‘देवाला अपेक्षित असेच होणार’, असा तिचा भाव असतो.

– श्री. वाल्मीक भुकन

३ आ. आजींची त्वचा कांतीमय होणे

‘या दोन मासांत (महिन्यांत) आजींची त्वचा पिवळसर आणि कांतीमय झाली आहे.’

– श्री. दामोदर गायकवाड (आजींचे नातजावई)

३ इ. आजींचा आवाज सतत ऐकत रहावा असे वाटणे

‘२ – ३ मासांपासून (महिन्यांपासून) ‘आजीशी दूरभाषवर पुष्कळ बोलावे, तिचा आवाज सतत ऐकत रहावा’, असे वाटायचे.

३ ई. आजींना पाहिल्यावर मनाला चांगले वाटून त्यांची साधना आतून चालू असल्याचे वाटणे

१ मासापूर्वी आजी रामनाथीला आली, तेव्हा तिला पाहिल्यावर माझ्या मनाला पुष्कळ चांगले वाटत होते. ‘तिची साधना आतून चालू आहे’, असे वाटत होते.

३ उ. ‘आजींना नमस्कार करावा’, असे वाटणे

तिच्या खोलीत गेल्यावर ‘आपण देवाला नमस्कार करतो, तसा तिला नमस्कार करावा’, असे मला वाटत होते.’

– श्री. वाल्मीक भुकन

३ ऊ. ईश्वराच्या सतत अनुसंधानात असणे

‘आजी दिवसभर देवाच्या अनुसंधानात असतात आणि ‘कृष्ण, कृष्ण’, असा नामजप अखंड करत असतात.’

– सौ. उर्मिला रामेश्वर भुकन

 

४. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि केलेली प्रार्थना !

‘भगवान श्रीकृष्ण, प.पू. गुरुदेव, ‘कोणत्या शब्दांत तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी ?’ हे कळत नाही. तुमच्या कृपेने आज आम्ही एका संत आजीची नातवंडे झालो आहोत आणि तो वारसा पुढे चालवण्याचे ध्येय तुम्ही आम्हाला दिले आहे, तरी तो वारसा चालवण्यासाठी तुम्हीच आम्हाला ते चैतन्य द्या, अशी तुमच्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. रामेश्वर आणि श्री. वाल्मीक भुकन

(‘वरील गुणवैशिष्ट्ये श्रीमती लोखंडेआजी संत होण्यापूर्वीची आहेत. त्यामुळे त्यात त्यांचा उल्लेख ‘पू. लोखंडेआजी’ असा केलेला नाही.– संकलक)

नात्यातील व्यक्तींनी संतपद गाठणे आणि
जन्म-मृत्यूच्या फे-यांतून मुक्त होणे, हा जीवनातील पहिला आनंदाचा क्षण !

‘७.२.२०१७ या दिवशी श्रीमती शेऊबाई लोखंडे संतपदी विराजमान झाल्या आणि श्रीमती इंदुबाई भुकन यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. परात्पर गुरुडॉ. आठवले यांना ‘अवघे विश्वची माझे घर’, हे हिंदु राष्ट्रासाठी अपेक्षित आहे. ‘माझ्या रक्ताच्या नात्यातील लोखंडेआजी यांनी गाठलेले संतपद आणि श्रीमती इंदुबाई भुकन यांची जन्म-मृत्यूच्या फे-यांतून झालेली मुक्तता’, हा माझ्या ४३ वर्षांच्या आयुष्यातील आनंदाचा पहिला दिवस आहे.’

– श्री. दामोदर गायकवाड (आजींचे नातजावई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘श्रीमती लोखंडे
आजींकडे पाहून काय जाणवते ?’ हा प्रयोग करायला सांगितल्यावर जाणवलेली सूत्रे

१. ‘लोखंडेआजींकडे पाहून मला शांत वाटले.
२. माझे मन निर्विचार झाले.
३. त्या निरागस असल्याचे जाणवून त्यांच्याविषयी जवळीक वाटली.
४. ‘त्या संतच आहेत’, असे वाटले.’

– कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.