गुढीपाडव्याच्या दिवशी सत्य संकल्प करून तो प्रत्यक्षात यावा; म्हणून कृतीशील भक्तीसाठी मूर्तस्वरूप अशा गुढीची मुहूर्तमेढ आनंदाने करा !

प.पू. पांडे महाराज

समानी व आकूतिः समाना हृदयानि वः ।
समानमस्तु वो मनो यथा वः सुसहासति ॥ – ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १९१, ऋचा ४

अर्थ : तुमचे संकल्प एक समान असोत, तुमची हृदये एक होवोत. तुमची मने एक समान होवोत, ज्यामुळे तुमचे परस्पर कार्य संघटितपणे होवो !

२८.३.२०१७ या दिवशी गुढीपाडवा आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे हेमलम्बीनाम संवत्सर, शालिवाहन शके १९३९ चा हा पहिला दिवस आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त म्हणून मानला जातो. उत्तरायण, वसंतऋतू, चैत्र मासातील शुक्ल पक्ष प्रतिपदेला शुभ संकल्पाची गुढी (ध्वजारोहण) उभारावयाची आहे. आमचे प्रत्येक पाऊल हे आजपासून प्रगतीपथावर, जीवनसमृद्धीसाठी पडावे; म्हणून आजच्या दिवशी आमच्या जीवनाला फलदायी होईल, असा शुभ संकल्प करावयाचा. त्याकरता सत्य संकल्परूपी गुढीची मुहूर्तमेढ रोवावी. तिला सजवायचे. तिच्यासाठी निंबाची पाने, आंब्याची पाने आणि मोहोर लावावयाचा. तिला साडी, खण नेसवायचा आणि वर तांब्याला डोक्याचे स्वरूप देऊन निर्गुणरूपी संकल्प प्रत्यक्ष सगुण स्वरूपात, मूर्त स्वरूपात आणण्यासाठी त्यात प्राणप्रतिष्ठा करायची. अशा चैतन्यमय प्राणज्योतीला आमच्या हृदयात धारण करून मोठ्या दैदीप्यतेने आता आम्ही कृतीशील भक्तीसाठी पाऊल पुढे टाकणार आहोत.

 

१. भारतातील सण, उत्सव आणि परंपरा यांमागील अर्थ जाणून घेणे आवश्यक !

भारतीय संस्कृती ही हृदय आणि बुद्धी यांची पूजा करणारी आहे. उदारभावना आणि निर्मळ ज्ञान यांच्या योगाने जीवन सुंदर करणारी अशी ही संस्कृती आहे. भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती आणि विशालता यांचे दर्शनच ! जगात जे जे सत्य दिसेल, ते ते घेऊन सत्य, शिव आणि सुंदरता यांना फुलवणारी अन् फळवणारी ही संस्कृती आहे. भारतात अनेक सण, उत्सव आणि परंपरा आहेत. या प्रत्येक गोष्टीत महान अर्थ दडलेला आहे; परंतु आम्ही आज तो जाणून न घेता केवळ रूढी म्हणून पार पाडत आहोत. गुढीपाडवा हे एक प्रकारचे प्रतीक आहे. प्रतीक, म्हणजे संस्कृतीची सूत्रेच आहेत. त्याचा अर्थ कळला नाही, तर त्या प्रतीकात सामर्थ्य निर्माण होत नाही आणि त्यापासून परिणामही होत नाही. भारतीय संस्कृतीत अशी शेकडो प्रतीके असून त्यांचा अर्थ आज जाणून घेणे अगत्याचे आहे.

 

२. निष्काम भावनेने ईश्‍वरीय कार्य
करण्याचे महत्त्व सांगणारी वृक्ष आणि नववधू यांची उदाहरणे

गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ संकल्पाची मुहूतर्र्मेढ, जेव्हा शिशिरऋतू संपून वसंतऋतू येतो, तेव्हा रोवली जाते. शिशिर, वसंत आणि ग्रीष्म ऋतू हे उत्तरायणातील त्या समय भाग दाखवतात. ऋतूचक्र हे जीवन मार्गदर्शक चक्रच आहे. शिशिरऋतूत माघ आणि फाल्गुन हे दोन मास (महिने) येतात. माघ म्हणजे मा + अघ. मा = नाही, अघ = पाप. (ज्या मासात पापच रहात नाही, तो माघ.)

२ अ. हेमंतऋतूत फळा-फुलांनी बहरलेल्या
वृक्षांनी शिशिरऋतूत सर्वस्वाचे अर्पण करून पर्णरहित होणे

वृक्षाचे जीवन हे सर्वस्वी भगवंतावर, प्रकृतीवर अवलंबून आहे; कारण तो एका जागी स्थिर समाधी अवस्थेत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी पाऊस पडतो. अथर्ववेदात याचा दाखला आहे. वृक्ष हे हेमंतऋतूत फळ, पुष्प आणि पर्ण यांनी सुशोभित असतात. ते समृद्ध असतात. फळा-फुलांचे आस्वादन आणि छाया सर्वांना देतात. त्यामुळे पशू-पक्षी त्यावर आनंदाने विहार करतात; परंतु शिशिरऋतूत ते आपल्या सर्वस्वाचे अर्पण करून पर्णरहित होतात. निष्काम भावनेने केवळ ईश्‍वरीय कार्य म्हणून ते सर्व करत असतात. मग अशा वृक्षाजवळ पाप राहील तरी का ? हा बोध त्यांच्यासाठी नसून तो आमच्यासाठी आहे.

२ आ. नववधूने पतीला सर्वस्व अर्पण करणे

लग्न झाल्यावर नववधू पतीला सर्वस्व अर्पण करते. दुसर्‍या दिवशी तो तिला घराची कुंजी (किल्ली) स्वाधीन करून गृहलक्ष्मीच करतो. हे केवळ शारीरिक समर्पण झाले. त्यामुळे ‘संस्कृती, म्हणजे हे वधू, तू पतीची परमेश्‍वर म्हणून सेवा कर. आता तू त्याला मानसिक आणि आत्मिक समर्पण करून त्यात सर्वस्वाने विलीन होऊन जा. त्याच्यातील नारायणाची सेवा करत राहिल्याने तू खरोखरच पतीव्रता होशील; कारण मानव देहात नारायण आहे; म्हणून त्याला मूल्य आहे.’ एकूण नारायण भावाने केलेली सेवा ही कुटुंबाला आनंददायक ठरेल.

लेखाच्या आरंभीच्या श्‍लोकाप्रमाणे जर आमची मने, हृदये आणि संकल्प एक झाले, तर कोणतेही कार्य पार पडण्यास कठीण जाणार नाही. घरात कायमस्वरूपी आनंद राहील. पतीनेही पत्नीत लक्ष्मीस्वरूपाचा मान ठेवून तिच्याशी व्यवहार करणे, कोणतेही कार्य एकजुटीने, सहकार्याने आणि समजुतीनेे करणे अगत्याचे आहे.

२ इ. सर्वस्वी एकरूप झालेले श्रीरामकृष्ण परमहंस आणि पू. शारदामातादेवी !

श्रीरामकृष्ण परमहंस आणि पू. शारदामातादेवी यांचे उदाहरण या संदर्भात उल्लेखनीय आहे. त्या दोघांची मने आणि हृदये एक झाली होती. श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या मनात भक्तासाठी काही आणण्याचा विचार येऊन तो पू. शारदादेवींना सांगायचा झाल्यास तो त्यांना लगेच कळून त्या त्याप्रमाणे निरोप मिळण्याअगोदर पूर्ण करत. इतके ते एकमेकांशी एकरूप झाले होते. पू. शारदामाता या परमहंस श्रीरामकृष्णांची भगवंत म्हणून सेवा करत. श्रीरामकृष्ण परमहंस यांनी तर पू. शारदामातेची षोडषोपचारे देवीस्वरूपात पूजा केली. तेव्हा ते समाधी अवस्थेत गेले होते. शिव-पार्वती, राम-सीता, राधा-कृष्ण यांची उदाहरणेही अशीच आहेत.

 

३. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्‍चित् दुःखमाप्नुयात् ॥

अर्थ : पृथ्वीवरील सर्व जीव सुखी आणि निरामय (रोगमुक्त) होवोत. सर्वांचे कल्याण होवो. सर्वांची एकमेकांकडे पहाण्याची दृष्टी शुभ आणि कल्याणमय असो आणि कोणाच्याही वाटेला दुःख न येवो.

तेव्हा वर वर्णन केल्याप्रमाणे या गुढीपाडव्याच्या दिवशी सत्य संकल्पाची, तो प्रत्यक्षात यावी; म्हणून कृतीशील भक्तीसाठी मूर्त स्वरूप अशा गुढीची मुहूर्तमेढ आनंदाने करून म्हणूया,

‘ॐ शांति: शांति: शांति: ।’

हे नवीन हेमलम्बीनाम संवत्सर शालीवाहन शके १९३९ आपणा सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि आनंदाचे जावो, ही प्रभुचरणी हार्दिक सदिच्छा !’

– प.पू. परशराम म. पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Leave a Comment