नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

Article also available in :

प्रस्तूत लेखात ‘नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने या विधींसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना, विधींचे उद्देश, योग्य काल, योग्य स्थान, विधी करण्याची पद्धत आणि या विधींमुळे आलेल्या अनुभूती इत्यादींचा समावेश आहे.

 

१. नारायणबली, नागबली आणि
त्रिपिंडी श्राद्ध या विधींसंबंधी महत्त्वाच्या सूचना

१ अ. शास्त्र

हे विधी आपल्या पितरांना गती मिळावी, या उद्देशाने केले जातात. त्यासाठी ‘प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १/१० (एक दशांश) खर्च करावा’, असे शास्त्र सांगते. आपल्या शक्तीनुसार खर्च केला तरी चालतो.

 

१ आ. हे विधी कोण करू शकतो ?

१. हे काम्यविधी आहेत. ते कोणालाही करता येतात. ज्यांचे आई-वडील हयात आहेत, त्यांनाही करता येतात.

२. अविवाहित असणार्‍यांनाही एकट्याने हे विधी करता येतात. विवाहित असल्यास पती-पत्नीनी बसून हा विधी करावा.

 

१ इ. निषेध

१. स्त्रियांनी मासिक पाळीचे दिवस पाळणे अत्यंत जरुरीचे आहे.
२. स्त्री गरोदर असल्यास ५ महिन्यांनंतर करू नये.
३. घरात शुभकार्य म्हणजे लग्न, मौजीबंधन वगैरे काही झाले असल्यास अथवा घरात कोणी व्यक्ती मृत झाली असल्यास सदर विधी एक वर्षापर्यंत करू नयेत.

 

१ ई. पद्धत

विधी करण्याकरिता पुरुषांसाठी धोतर, उपरणे, बनियन तर महिलांकरिता साडी, झंपर (पोलके) व परकर इत्यादी नवीन वस्त्रे (काळा किंवा हिरवा रंग नसावा) लागतात. ही नवीन वस्त्रे नेसून विधी करावयाचा असतो. नंतर ती वस्त्रे दान करावी लागतात. तिसर्‍या दिवशी सुवर्ण नागाच्या (सव्वा ग्रॅम) एका प्रतिमेची पूजा करून दान करतात.

 

१ उ. विधीसाठी लागणारा कालावधी

वरील तीनही विधी वेगवेगळे आहेत. नारायण-नागबली हा विधी तीन दिवसांचा असतो, तर त्रिपिंडी श्राद्ध विधी एक दिवसाचा असतो. वरील तिन्ही विधी करावयाचे असल्यास तीन दिवसांत करता येतात. स्वतंत्र एक दिवसाचा विधी करावयाचा असल्यासही करता येतो.

 

२. नारायणबली

२ अ. उद्देश

‘दुर्मरणाने मेलेल्या किंवा आत्महत्या केलेल्या माणसाचे क्रियाकर्मांतर न झाल्यामुळे त्याची प्रेतत्वनिवृत्ती झाली नसेल, तर त्याच्या लिंगदेहाला गती न मिळाल्यामुळे तो भटकत रहातो. असा लिंगदेह कुलाच्या संततीला प्रतिबंध करतो. तसेच कोणत्याही प्रकारे वंशजांना त्रास देतो. अशा लिंगदेहाला गती देण्यासाठी नारायणबली करावा लागतो.

 

२ आ. विधी

१. विधी करण्यास योग्य काल

नारायणबली हा विधी करण्यासाठी कोणत्याही महिन्याची शुद्ध एकादशी व द्वादशी योग्य असते. एकादशीला अधिवास (देवतास्थापना) करून द्वादशीला श्राद्ध करावे. (हल्ली बहुतेक जण एकाच दिवशी विधी करतात.) संततीप्राप्तीसाठी हा विधी करावयाचा असल्यास दांपत्याने स्वतः हा विधी करावा. संतती प्राप्तीसाठी हा विधी करावयाचा असल्यास श्रवण नक्षत्र, पंचमी किंवा पुत्रदा एकादशी यांपैकी एका तिथीला केल्यास अधिक फायदा होतो.

 

२. विधी करण्यास योग्य स्थान

नदीतीरासारख्या पवित्र जागी हा विधी करावा.

 

३. पद्धत

पहिला दिवस : प्रथम तीर्थात स्नान करून नारायणबलीचा संकल्प करावा. दोन कलशांवर श्रीविष्णु व वैवस्वत यम यांच्या सुवर्णप्रतिमा स्थापून त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर त्या कलशांच्या पूर्वेस दर्भाने एक रेघ ओढून दक्षिणाग्र कुश पसरावे. त्यावर ‘शुन्धन्तां विष्णुरूपी प्रेतः’ या मंत्राने दहा वेळा उदक घ्यावे.

नंतर दक्षिणेस तोंड करून अपसव्याने विष्णुरूपी प्रेताचे ध्यान करावे. त्या पसरलेल्या कुशांवर मध, तूप व तीळ यांनी युक्त असे दहा पिंड ‘काश्यपगोत्र अमुकप्रेत विष्णुदैवत अयं ते पिण्डः’ असे म्हणून द्यावे. पिंडांची गंधादी उपचारांनी पूजा करून त्यांचे नदीत किंवा जलाशयात विसर्जन करावे. पूर्व दिवसाचा हा विधी झाला.

 

दुसरा दिवस : माध्यान्हकाली श्रीविष्णूची पूजा करावी. नंतर १, ३ किंवा ५ अशा विषम संख्येने ब्राह्मणांस बोलावून एकोदि्दष्ट विधीने त्या विष्णुरूपी प्रेताचे श्राद्ध करावे. हे श्राद्ध ब्राह्मणांच्या पादप्रक्षालनापासून तृप्तीप्रश्नापर्यंत मंत्ररहित करावे. श्रीविष्णु, ब्रह्मा, शिव व सपरिवार यम यांना नाममंत्रानी चार पिंड द्यावे. विष्णुरूपी प्रेतासाठी पाचवा पिंड द्यावा. पिंडपूजा करून त्यांचे विसर्जन झाल्यावर ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.

एका ब्राह्मणाला वस्त्रालंकार, गाय व सुवर्ण या वस्तू द्याव्यात. मग प्रेताला तिलांजली देण्याबद्दल ब्राह्मणांची प्रार्थना करावी. ब्राह्मणांनी कुश, तीळ व तुलसीपत्र यांनी युक्त असे उदक ओंजळीत घेऊन ते प्रेताला द्यावे. मग श्राद्धकर्त्याने स्नान करून भोजन करावे. या विधीने प्रेतात्म्याला स्वर्गप्राप्ती होते, असे सांगितले आहे.

 

स्मृतिग्रंथांमध्ये नारायणबली व नागबली हे एकाच कामनेसाठी सांगितले असल्याने दोन्ही विधी बरोबर करण्याची प्रथा आहे. नारायण-नागबली असे या विधीचे जोडनाव यामुळेच रूढ झाले आहे.

 

३. नागबली

३ अ. उद्देश

घराण्यात पूर्वी कोणत्याही पूर्वजाकडून नागाची हत्या झाली असल्यास त्या नागाला गती न मिळाल्यामुळे तो कुलाच्या संततीला प्रतिबंध करतो. तसेच अन्य प्रकारे वंशजांना त्रास देतो. या दोषाच्या निवारणासाठी हा विधी करतात.

 

३ आ. विधी

संततीप्राप्तीसाठी हा विधी करावयाचा असल्यास त्या दांपत्याने स्वतः हा विधी करावा. श्रवण नक्षत्र, पंचमी किंवा पुत्रदा एकादशी यांपैकी एका तिथीला केल्यास अधिक फायदा होतो.’

 

३ इ. नारायण-नागबली हा विधी करतांना आलेली अनुभूती

१. नारायण-नागबली हा विधी करतांना खर्‍या प्रेतावर अभिषेक करत असल्याचे व कापूर लावल्यावर प्रेतातून प्राणज्योत बाहेर पडत असल्याचे दिसणे

‘नारायण-नागबली हा विधी करतांना नारायणाच्या प्रतिमेची पूजा करतांना ‘या विधीतून खरोखरच पूर्वजांना गती मिळणार आहे’, असे मला जाणवले. तसेच कणकेच्या प्रेतप्रतिमेवर अभिषेक करतांना मी खर्‍या प्रेतावर विधी करत असल्याचे मला जाणवत होते. शेवटी प्रतिमेच्या छातीवर कापूर लावल्यावर ‘प्रेतातील प्राणज्योत बाहेर पडत आहे’, असे दिसून माझ्या अंगावर शहारे आले. तेव्हा मला सातत्याने प.पू. डॉक्टरांची आठवण होत होती.’ – श्री. श्रीकांत पाध्ये, नागपूर (१.१२.२००६)

 

४. त्रिपिंडी श्राद्ध

४ अ. व्याख्या

तीर्थाच्या ठिकाणी पितरांना उद्देशून जे श्राद्ध करतात, त्याला त्रिपिंडी श्राद्ध असे म्हणतात.

 

४ आ. उद्देश

आपल्याला माहीत नसलेल्या, आपल्याच वंशातील सद्गती न मिळालेल्या किंवा दुर्गतीला गेलेल्या व कुळातील लोकांना पीडा देणार्‍या पितरांना, त्यांचे प्रेतत्व दूर होऊन सद्गती मिळण्यासाठी, म्हणजेच भूमी, अंतरिक्ष व आकाश या तीन ठिकाणी असलेल्या आत्म्यांना मुक्ती देण्यासाठी, त्रिपिंडी करण्याची पद्धत आहे. एरव्ही केली जाणारी श्राद्धे ही एकाला उद्देशून किंवा वसु-रुद्र-आदित्य या श्राद्धदेवतांच्या पितृगणांतील पिता-पितामह-प्रपितामह या त्रयींना उद्देशून म्हणजेच तीन पिढ्यांपुरतीच मर्यादित असतात, पण त्रिपिंडी श्राद्धाने त्यापूर्वीच्या पिढ्यांतील पितरांनादेखील तृप्ती मिळते. प्रत्येक कुटुंबात हा विधी दर बारा वर्षांनी करावा, मात्र ज्या कुटुंबात पितृदोष अथवा पितरांमुळे होणारे त्रास असतात त्यांनी हा विधी दोष निवारणासाठी करावा.

 

४ इ. विधी

४ इ १. विधी करण्यास योग्य काल

अ. त्रिपिंडी श्राद्धासाठी अष्टमी, एकादशी, चतुर्दशी, अमावास्या, पौर्णिमा या तिथी व पूर्ण पितृपक्ष योग्य असतो.

आ. गुरु शुक्रास्त, गणेशोत्सव व शारदीय नवरात्र या कालावधीत हा विधी करू नये. तसेच कुटुंबात मंगलकार्य झाल्यावर वा अशुभ घटना घडल्यावर एक वर्षापर्यंत त्रिपिंडी श्राद्ध करू नये. अगदीच अपरिहार्य असेल, उदा. एक मंगलकार्य झाल्यावर पुन्हा काही महिन्यांच्या अंतराने दुसरे मंगलकार्य होणार असेल, तर त्या दोन कार्यांच्या मध्यंतरी त्रिपिंडी श्राद्ध करावे.

 

४ इ २. विधी करण्यास योग्य स्थाने

त्र्यंबकेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर, गरुडेश्वर, हरिहरेश्वर (दक्षिण काशी), काशी (बनारस) ही स्थाने त्रिपिंडी श्राद्ध करण्यासाठी योग्य आहेत.

 

४ इ ३. पद्धत

‘प्रथम तीर्थात स्नान करून श्राद्धाचा संकल्प करावा. नंतर महाविष्णूची व श्राद्धासाठी बोलावलेल्या ब्राह्मणांची श्राद्धविधीप्रमाणे पूजा करावी. त्यानंतर यव, व्रीही आणि तीळ यांच्या पिठाचा प्रत्येकी एकेक पिंड तयार करावा. दर्भ पसरून त्यावर तिलोदक शिंपडून पिंडदान करावे.

 

अ. यवपिंड (धर्मपिंड) : पितृवंशातील व मातृवंशातील ज्या मृतांची उत्तरक्रिया झाली नाही, संतती नसल्याने ज्यांचे पिंडदान केले गेले नाही किंवा जन्मतःच जे आंधळे-पांगळे होते (आंधळे-पांगळे असल्याने लग्न न झाल्याने संततीरहित), अशा पितरांचे प्रेतत्व नष्ट होऊन त्यांना सद्गती मिळण्यासाठी यवपिंड देतात. याला धर्मपिंड असे नाव आहे.

आ. मधुरत्रययुक्त व्रीहीपिंड : पिंडावर साखर, मध व तूप एकत्र मिसळून घालतात, त्याला मधुरत्रय असे नाव आहे. हा दिल्याने अंतरिक्षात असलेल्या पितरांना सद्गती मिळते.

इ. तीलपिंड : पृथ्वीवर क्षुद्रयोनीत राहून इतरांना पीडा देणार्‍या पितरांना तीलपिंडाने सद्गती प्राप्त होते.

या तिन्ही पिंडांवर तिलोदक द्यावे. त्यानंतर पिंडांची पूजा करून अर्घ्य द्यावे. श्रीविष्णूसाठी तर्पण करावे. ब्राह्मणभोजन घालून त्यांना दक्षिणा म्हणून वस्त्र, पात्र, पंखा, पादत्राण इत्यादी वस्तू द्याव्यात.’

४ ई. पितृदोष असल्यास आई-वडील जिवंत असतांनाही मुलाने विधी करणे योग्य असणे

श्राद्धकर्त्याच्या पत्रिकेत पितृदोष असेल, तर तो दोष घालवण्याच्या उद्देशाने त्याने आई-वडील जिवंत असतांनाही हा विधी करावा.

४ उ. विधीच्या वेळेस केस काढण्याची आवश्यकता

श्राद्धकर्त्याचे वडील जिवंत नसतील, तर त्याने विधी करतांना केस काढावेत. वडील जिवंत असणार्‍या श्राद्धकर्त्याने केस काढण्याची आवश्यकता नाही.

 

४ ऊ. घरातील एखादी व्यक्ती विधी करत असतांना घरातील इतरांनी पूजा वगैरे करणे योग्य असणे

त्रिपिंडी श्राद्धात श्राद्धकर्त्यालाच अशौच असते, घरातील इतरांना नाही. त्यामुळे घरातील एखादी व्यक्ती विधी करत असतांना इतरांनी पूजा वगैरे करणे बंद करण्याची आवश्यकता नाही.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)’

14 thoughts on “नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध”

 1. माझी व माझ्या मुलाची एक रास धनु व नक्षत्र मूळ हे एकच आहे.
  आर्थिक व राजकीय प्रचंड अडचणी व सध्या चालु असलेली साडेसाती बद्दल काय उपाय करावेत.

  Reply
  • नमस्कार,

   साडेसाती असलेल्यांनी करावयाच्या उपायांची माहिती पुढील २ लिंक्स वर दिली आहे. तुम्ही त्यात दिलेले उपाय करून बघू शकता.

   १. साडेसाती असलेल्यांनी करावयाचे उपाय – https://www.sanatan.org/mr/a/77264.html
   २. शनीची साडेसाती आणि मारुतीची पूजा – https://www.sanatan.org/mr/a/546.html

   Reply
 2. नारायण नागबळी विधी केल्यानंतर लग्नादी मंगलकार्य केव्हा करावे?

  Reply
  • नमस्कार,

   विधी पासून तीन दिवसानंतर कधीही करू शकता.

   Reply
   • नमस्कार,

    धर्मशास्त्रानुसार घरात शुभकार्य म्हणजे लग्न, मौजीबंधन वगैरे काही झाले असल्यास अथवा घरात कोणी व्यक्ती मृत झाली असल्यास सदर विधी एक वर्षापर्यंत करू नयेत. त्यामुळे लग्नानंतर करायचा झाल्यास तो १ वर्षानंतर करावा लागेल.

    Reply
   • नमस्कार,

    विधी पासून तीन दिवसानंतर विवाह कधीही करू शकता.

    Reply
 3. विधिनंतर पुढे काय पत्त्य पाळावीत

  Reply
  • नमस्कार,

   ही आपण कुठे विधी केला, कोणकोणते विधी केले, आपण विवाहित आहात का यावर नियम बदलत असतात. त्यामुळे जिथे विधी केला त्यांनाच विचारणे योग्य होईल.

   Reply
 4. माझ्या मुलीचे लग्न 30/3/21 ला रजिस्टर पद्धतीने केले. विधिवत लग्न 26/12/21ला झाले.
  तरी सप्टेंबर 2022च्या पितृ पंधरवड्यात त्रिपिंडी श्राद्ध करून चालेल का?

  Reply
  • नमस्कार,

   धर्मशास्त्रानुसार घरात शुभकार्य म्हणजे लग्न, मौजीबंधन वगैरे काही झाले असल्यास अथवा घरात कोणी व्यक्ती मृत झाली असल्यास त्रिपिंडी श्राद्ध एक वर्षापर्यंत करू नयेत. त्यामुळे लग्नानंतर करायचा झाल्यास तो १ वर्षानंतर करावा लागेल. विधिवत लग्न ग्राह्य धरून 1 वर्ष पूर्ण झाल्यावर मग त्रिपिंडी श्राद्ध करू शकता.

   Reply
 5. पत्रिके (पितृदोष )नारायण नागबळी करण्यास सांगितल्यास, परंतु ती व्यक्ति विवाहिता असून ती एक स्त्री असल्यास ,ती व्यक्ति एकटीने नारायण नागबळी ची पूजा करु सकते का?

  Reply
  • नमस्कार,

   याविषयी वेगवेगळी मत मतांतरे असल्याने आपण ज्या ठिकाणी ज्या पुरोहितांद्वारे हे विधी करणार त्यांना विचारावे.

   Reply

Leave a Comment