श्राद्धकर्त्याने पाळावयाचे काही विधीनिषेध

‘ज्यांचे वडील जिवंत नाहीत, त्यांनी त्रिपिंडी श्राद्ध, नारायण-नागबली हे विधी करतांना केस काढणे आवश्यक का ?’, यामागील धर्मशास्रीय कारण या लेखातून आपण समजून घेऊ.

यांतून हिंदु धर्माचा प्रत्येक कृतीमागील सखोल विचार आपल्याला लक्षात येईल आणि धर्माविषयीचा आपला अभिमान वृद्धींगत होण्यास साहाय्य होईल. 

 

१. नागबलीसारख्या विशिष्ट श्राद्धांनाच लागू पडणारा विधी-निषेध

श्राद्धविधीपूर्वी आणि विधी करतांना अशौच पाळणे

घराण्यातील व्यक्तीने साप मारला असल्यास त्या सापाला गती देण्यासाठी केले जाणारे श्राद्ध म्हणजे ‘नागबलीश्राद्ध.’ नागबलीसारख्या विशिष्ट श्राद्धांच्या आधी एक किंवा तीन दिवस यजमान आणि त्याची पत्नी अशौच पाळतात. दहावा करून श्राद्ध करतात. विधीपूर्वी तीन दिवस, तसेच प्रत्यक्ष विधी करतांनाही अशौच पाळले जाते. प्रत्यक्ष कर्तेपद ज्याच्याकडे असते, तो त्या त्या विधीशी संलग्न असल्याने त्याची शुद्धी होणे अधिक महत्त्वाचे असते. अशौच पाळल्याने पुढील लाभ होतात.

अ. देहशुद्धी होते.

आ. मनाची श्राद्धकर्मविषयक गंभीरता वाढल्याने मन त्या त्या विधीत एकाग्र होण्यास साहाय्य होऊन कर्माची फलप्राप्ती २ टक्क्यांनी वाढते. सर्वसामान्यतः विधीतून होणारी फलप्राप्ती १० टक्के एवढी असते.

इ. देहात संक्रमित होणार्‍या रज-तमात्मक लहरींना प्रतिबंध होण्यास साहाय्य होते.

ई. कर्मात उत्पन्न होणार्‍या रज-तमात्मक लहरींना प्रतिबंध करण्याची क्षमता जिवाला प्राप्त झाल्यामुळे विधीतून होणार्‍या त्रासाचे प्रमाणही अल्प होते.’

 – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.१२.२००५, दुपारी ४.१२) 

२. श्राद्धाच्या दिवशीच्या विधीतील मंत्रांमुळे देहात कार्यरत होणारे तेजतत्त्व पाण्यामुळे अल्प होऊ नये म्हणून श्राद्धाच्या दिवशी जेवल्यानंतरही चूळ भरू नये

‘श्राद्धाच्या दिवशी पूर्वजांचे लिंगदेह पृथ्वीच्या कक्षेत येऊन, त्या त्या संबंधित वास्तूत भ्रमण करत असतात. यामुळे वातावरणातील रज-तमात्मक लहरींचे प्रमाण वाढलेले असते. श्राद्धाच्या दिवशी केल्या जाणार्‍या आवाहनात्मक मंत्रोच्चाराच्या नादाचा परिणाम प्रत्यक्ष श्राद्धविधीत सहभागी असणार्‍या जिवावर होऊन, त्याचे पंचप्राण जागृत होऊन, त्याच्या देहात तेजलहरींचे संक्रमण चालू होऊन, जिवाचे रज-तमात्मक वातावरणापासून रक्षण होत असते. या तेजतत्त्वात्मक लहरींची तीव्रता अल्प न होण्यासाठी श्राद्धाच्या दिवशी जेवल्यानंतरही चूळ भरत नाहीत. यामध्ये पाण्याचा संपर्क न्यूनतम येऊन देहातील आंतरिक अग्नीची तीव्रता टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. 

मंत्रोच्चाराने भारित पाणी चालते; कारण या पाण्यात मंत्रामुळे आधीच तेजलहरींचे संवर्धन झालेले असते. म्हणून पूर्वीच्या काळी तेजाचे संवर्धन करणार्‍या कडुलिंबाची पाने पाण्यात घालून या पाण्याने आंघोळ करून, तसेच कडुलिंबाच्या काडीने दात घासून, चूळ न भरता त्याची काडी चावून तो रस गिळून, शरिरातील तेजतत्त्व टिकवले जात होते आणि त्यानंतरच श्राद्धादी किंवा उपवास कर्म केले जात होते.’ 

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.७.२००५, दुपारी १२.२१) 

३. पितरांचा पाच प्रकारचा देवाणघेवाण संबंध पूर्ण करण्यासाठी श्राद्धाला पाच ब्राह्मणांना बोलवावे

‘श्राद्धासाठी पाच ब्राह्मण बोलावणे, हे लिंगदेहाभोवती असलेल्या पाच स्तरांच्या वासनात्मक कोषांचे उच्चाटन करण्यासाठी करण्यात येणार्‍या दानात्मक विधीचे दर्शक समजले जाते. मृतदेहाभोवती असलेले पाच आवरणात्मक वासनामयकोष, हे त्याच्या पाच प्रकारच्या मायेतील देवाण-घेवाणीशी संबंधित असतात. पाच ब्राह्मणांना बोलावून त्यांना श्राद्धविधीत सहभागी करून संकल्प करून, त्यांच्या माध्यमातून मृतदेहाभोवतीची पाच वासनात्मक काळी आवरणे भेदणे, हे पितृऋण फेडण्याचे एक महत्त्वाचे साधन समजले जाते. हे पाच प्रकारचे देवाणघेवाण, म्हणजे

१. चांगल्या उद्देशाने केलेले कर्म
२. वाईट उद्देशाने केलेले कर्म
३. मुद्दाम केलेले कर्म
४. नकळत घडलेले कर्म
५. ठरवलेले कर्म 

अशा प्रकारचे विविध स्तरांवरील आसक्तीविषयक देवाणघेवाण कर्म घेऊन लिंगदेह मर्त्यलोकात संचार करत असतात. पाच ब्राह्मणांना दान दिल्याने देवाणघेवाणीचे हे पाचही स्तर फिटतात; म्हणून पाच ब्राह्मणांना बोलावणे महत्त्वाचे ठरते.’ 

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १४.८.२००५, सायं. ५.१५) 

संकलक : श्राद्धाला केवळ दोन किंवा चार ब्राह्मणांना न बोलवता पाच ब्राह्मणांनाच का बोलवावे ? 

एक विद्वान : दोन हे प्रत्यक्ष देवाणघेवाण साधण्यासाठी निर्माण झालेल्या स्थूल द्वैताचे, तर चार हे त्यातून निर्माण होणार्‍या प्रत्यक्ष स्थूल आणि सूक्ष्म परिणामांशी संबंधित दर्शक आहे. थोडक्यात चार हे प्रत्यक्ष देवाणघेवाणीतून निर्माण होणार्‍या स्थूल आणि सूक्ष्म स्तरावरील बाह्य परिणामात्मक परिस्थितीचे द्योतक समजले जाते. 

या स्थितीत प्रत्यक्ष कर्माशी संबंधित स्थूल आणि सूक्ष्म स्तर फिटतो; परंतु ठरवलेल्या कर्माच्या विचाराची देवाणघेवाण पाचाचा आधार घेऊन फेडावी लागते; म्हणून दोनचार यांच्यापेक्षा पाचांना जास्त महत्त्व दिले आहे. 

साधना न करणारा जीव त्या त्या स्तरावर तो तो भाव ठेवून ते ते कर्म करत नसल्याने त्याच्याकडून पाचांच्या माध्यमातून प्रत्यक्ष दानविधी कर्म घडवावे लागते, तरच पितरांना थोड्याफार प्रमाणात खोल कोषांच्या स्तरावर लाभ मिळण्यास साहाय्य होते. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ४.८.२००५, सायं. ७.१७) 

४. वडील जिवंत असणार्‍यांनी श्राद्धादी विधींत केस काढण्याची आवश्यकता नसणे

संकलक : ज्यांचे वडील जिवंत नाहीत, त्यांनी त्रिपिंडी श्राद्ध, नारायण-नागबली हे विधी करतांना केस काढणे अपरिहार्य असते; मात्र वडील जिवंत आहेत त्यांनी केस काढण्याची आवश्यकता नसते, असे का ? 

एक विद्वान : मुलाचे वडिलांशी असलेले त्रिगुणात्मक अनुवांशिकतेचे संस्कारात्मक बंध ७० टक्के एवढ्या प्रमाणात त्यांच्याशी साधर्म्य दर्शवणारे असतात. केसाकडे आकृष्ट होणार्‍या वाईट शक्तींच्या प्रवाही लहरींमुळे श्राद्धविधी कर्म करणार्‍या यजमानपुत्राच्या देहातून विसर्जनात्मक प्रक्रियेशी (लिंगदेहाला पुत्राच्या माध्यमातून त्या त्या लहरी मिळणे) संबंधित असणार्‍या लहरींचे उत्सर्जन होण्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे वाईट शक्तींच्या आक्रमणाचा परिणाम यजमानासह त्रिगुणात्मक अनुवांशिकतेच्या संस्कारात्मक साधर्म्यामुळे वडिलांच्या लिंगदेहावरही होण्याची शक्यता असल्याने विधीतून मिळणारी फलप्राप्ती अल्प होते; कारण वडिलांचा लिंगदेह वातावरणाच्या कक्षेत येतांना ज्या वेळी वाईट शक्तींच्या प्रवाही आक्रमणाला बळी पडतो, त्याच वेळी श्राद्धातील आवाहनात्मक प्रक्रियेमुळे श्राद्धस्थळी आकृष्ट झालेले मागच्या दोन पिढ्यांतील पितरही या आक्रमणात भरडले जाण्याची शक्यता असते. म्हणून विधीवत मंत्रोच्चारातून अपेक्षित असे लिंगदेहांच्या गतीस आवश्यक असलेले शक्तीसामथ्र्य न्यून होऊन विधी करूनही लाभाचे प्रमाण अल्प होते.

परंतु वडील जिवंत असतांना मुलाने केस काढण्याची आवश्यकता नसते; कारण त्याचे त्याच्या अन्य पितरांशी असलेले अनुवांशिक त्रिगुणात्मक संधान त्यामानाने अत्यल्प असल्याने त्याच्यावर झालेल्या आक्रमणाच्या प्रत्यक्ष आघातात्मक परिणामाला पितरांना बळी पडावे लागत नाही; म्हणून केस काढणे किंवा न काढणे ही कृती प्रधान न ठरता गौण ठरते; म्हणूनच ‘केस काढण्याची आवश्यकता नसते’, असे म्हटले आहे. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.८.२००६, सायं. ६.५९)

 

४ अ. ५० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे असलेल्या मुलाने
कोणत्याही श्राद्धविधीत केशवपन केले नाही, तरी विधीचा लाभ होणे

‘५० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे असलेल्या मुलाने कोणत्याही श्राद्धविधीत केशवपन केले नाही, तरी ती कृती त्याला आणि पितरांना लाभदायकच ठरते; कारण त्याच्या साधनेमुळे केसांच्या टोकाटोकांतून तेजोमय लहरींचे वायूमंडलात प्रक्षेपण झाल्याने अन् साधनेमुळे त्याच्याभोवती सुरक्षामंडल निर्माण झाले असल्याने त्याच्यावरील प्रत्यक्ष वाईट शक्तींच्या आक्रमणांचे प्रमाण अल्प होऊन केसांच्या माध्यमातून बाह्य वायूमंडलातील वाईट शक्ती दूर फेकल्या जाण्यास साहाय्य होते. 

कर्मकांडात प्रत्येक विधीतील कृती करण्यात पातळीच्या प्रमाणात योग्य-अयोग्याचे निष्कर्षयुक्त प्रमाण पालटते; परंतु भक्तीयोगात अशा दुतोंडी वादाला स्थान नसल्याने आणि त्यामध्ये ‘भाव तसा देव’ अशी एकच ‘एकात्म संकल्पना’ असल्याने ‘प्रधान अन् गौण’ अशा द्वयात्मक शब्दार्थक विधानांना आणि कृतींना स्थान नाही. म्हणूनच कर्मयोग हा बंधनकारक आहे, तर भावरूपी भक्तीयोग हा बंधनमुक्त असल्याने श्रेष्ठ आहे.’ 

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.८.२००६, सायं. ६.५९) 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

1 thought on “श्राद्धकर्त्याने पाळावयाचे काही विधीनिषेध”

  1. नमस्कार उमेशजी,

    साधारणतः केळीची पाने अखंड कापून घरात आणत नाही कारण ती तिरडीवर घालण्यासाठी वापरतात. काही भागांमध्ये अशा प्रकारे केळीचे पूर्ण पान कापून तिरडीवर अंथरण्याची प्रथा आहे, त्यामुळे त्या भागांत ते अशुभ मानले जाते. म्हणून एरव्ही पण केळीची पाने अशा पद्धतीने कोणी आणत नाही.

    Reply

Leave a Comment