काकबली (दशमदिन विधी)

दशमदिन श्राद्धाधी विधी नदीच्या काठी असलेल्या शिवाच्या मंदिरात करण्याची कारणे या लेखातून जाणून घेऊ.

दहाव्या दिवशी करावयाचे श्राद्ध

दहाव्या दिवशी लिंगदेहाला काकस्पर्शाच्या माध्यमातून मंत्रोच्चाराने भारित पिंडयुक्त हविर्भाग दिला जाऊन लिंगदेहातील अन्नदर्शक आसक्तीयुक्त रज-तमरूपी संस्कारात्मक बंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न करून पृथ्वीमंडल भेदण्यासाठी आवश्यक बळ पुरवले जाते.

व्यक्ती मृत झाल्यानंतर प्रतिदिन दहा दिवसांपर्यंत पिंडदान सांगितलेले आहे; पण कालपरत्वे ते सर्वसाधारणतः दहाव्या दिवशी एकदम केले जाते.

१. पिंडदान करण्याचे कर्म नदीकाठी किंवा घाटावर का केले जाते ?

‘पिंडदान साधारणतः तीर्थक्षेत्री, नदीच्या काठी, घाटावर, स्मशानात किंवा घराच्या बाहेर केले जाते. यांपैकी नदीच्या काठी किंवा घाटावर पिंडदान करण्यामागील अध्यात्मशास्त्र पुढे स्पष्ट केले आहे.

‘मृत्यूनंतर स्थूलदेह त्यागला गेल्यामुळे लिंगदेहाभोवती असलेल्या कोषातील पृथ्वीतत्त्वाचे, म्हणजेच जडत्वाचे प्रमाण अल्प होते आणि आपतत्त्वाचे प्रमाण वाढते. लिंगदेहाभोवती असलेल्या कोषामध्ये सूक्ष्म आर्द्रतेचे प्रमाण सर्वांत अधिक असते. पिंडदान कर्म हे लिंगदेहाशी संबंधित असल्याने असे विधी नदीकाठी किंवा घाटावर केल्याने लिंगदेहाला पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येतांना सोपे जाते. नदीच्या काठावरच्या किंवा घाटावरच्या वातावरणात आपतत्त्वाच्या कणांचे प्राबल्य असल्याने, तेथील वातावरण आर्द्रतादर्शक असते. असे वातावरण इतर जडत्वदर्शक वातावरणापेक्षा लिंगदेहांना जवळचे आणि परिचयाचे वाटते. अशा आर्द्रतादर्शक वातावरणाकडे लिंगदेह लगेच आकर्षिले जातात; म्हणून पिंडदानासारखे विधी प्रामुख्याने नदीकाठी किंवा घाटावर केले जातात.

२. पिंडदानाचे कर्म नदीकाठच्या किंवा घाटावरच्या शिवाच्या किंवा इतर कनिष्ठ देवतांच्या मंदिरांमध्ये देवळांच्या परिसरामध्ये का करतात ?

काही ठिकाणी नदीकाठी किंवा घाटावर देवळे असतात. ‘देवळांच्या परिसरामध्ये पिंडदान करावे’, असे धर्मशास्त्रात सांगितलेले नाही; मात्र नदीकाठी किंवा घाटावर देवळे असल्यास त्या देवळांच्या परिसरामध्ये पिंडदान करण्याचा प्रघात आहे. बहुतांशी वेळा शिवाच्या किंवा कनिष्ठ देवतांच्या देवळांचा यासाठी उपयोग केला जातो; कारण या देवतांनी त्या स्थानातील वाईट शक्तींना नियंत्रणात ठेवल्यामुळे पिंडदानात केलेल्या आवाहनानुसार पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणार्‍या लिंगदेहाच्या प्रवासात अडथळा निर्माण होत नाही. यासाठी पिंडदान कर्मापूर्वी त्या त्या देवळातील देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करून मग असे विधी केले जातात. देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे लिंगदेहांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते, नाहीतर कधी कधी पिंडदान विधीच्या वेळी वाईट शक्ती वातावरणकक्षेत येणार्‍या लिंगदेहावर आक्रमण करून त्याला नियंत्रणात ठेवू शकतात; म्हणून हे टाळण्यासाठी शक्यतो नदीकाठच्या किंवा घाटावरील शिवाच्या, इतर कनिष्ठ देवतांच्या किंवा स्थानदेवतेच्या मंदिरांच्या परिसरामध्ये असे विधी केले जातात.

 

१. ‘दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ?’

२. श्राद्धाचे अन्य प्रकार आणि त्यांचे लाभ जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

Leave a Comment