शास्त्रानुसार श्राद्धकर्म न केल्यास होणारी हानी आणि श्राद्धाची मर्यादा

Article also available in :

हिंदु धर्मशास्त्रानुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीचे श्राद्धविधी प्रतिवर्षी करायला सांगितले आहेत. काही निरीश्वरवादी याला विरोध करतांना आढळतात. श्राद्ध-विधी न केल्यास काय होऊ शकते आणि साधनेचे जीवनातील महत्त्व या लेखातून जाणून घेऊ.

 

१. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्या त्या दिवशी ते ते श्राद्धविधी करणे आवश्यक असणे

संकलक : आताच्या काळात वर्षश्राद्ध करण्यापेक्षा बाराव्या दिवशीच सपिंडीकरण श्राद्ध करतात. हे योग्य आहे कि अयोग्य?

 

एक विद्वान :

१. बाराव्या दिवशी सपिंडीकरण श्राद्ध करणे, हे पुरेसे नसण्याची कारणे

अ. सर्वसामान्य जिवाकडून केल्या जाणार्‍या प्रत्येक विधीत भाव नसेल, तर फलप्राप्ती केवळ १० टक्के एवढीच असते.

 आ. लिंगदेह हे साधना करणारे नसल्याने त्यांच्या भोवती असणार्‍या वासनात्मक कोषांतून प्रक्षेपित होणार्‍या रज-तमात्मक लहरींचे प्रमाण त्यांच्या आसक्तीच्या प्रमाणात पालटणारे असते. यामुळे प्रत्येक वर्षी श्राद्ध करून साधना न करणार्‍या जिवाला पुढे जाण्यासाठी बळ उत्पन्न करून देणे, हे पितृऋण फेडणार्‍या जिवाचे प्रथम कर्तव्य ठरते.

 

२. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे श्राद्धविधी न केल्यास होणारी हानी

अ. लिंगदेह एकाच ठराविक कक्षेत कित्येक वर्षे अडकून पडतात.

 आ. अडकलेले लिंगदेह मांत्रिकांच्या नियंत्रणात जाऊन त्यांच्या सांगण्यावरून कुटुंबियांना त्रास देऊ शकतात. लिंगदेह पुढे न जाता एका ठराविक कक्षेत अडकल्याने त्यांच्या कोषातून प्रक्षेपित होणार्‍या कुटुंबियांशी निगडित आसक्तीदर्शक देवाणघेवाणयुक्त लहरींच्या प्रादुर्भावाखाली कुटुंबीय राहिल्याने त्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.९.२००५, सकाळी ११.५०)

 

२. आर्य समाजाच्या पद्धतीनुसार नव्हे, तर सनातन धर्मानुसार श्राद्ध केल्याने लिंगदेहाला त्या त्या वेळी लाभ होणे

संकलक : सनातन धर्मानुसार मृत व्यक्तीचे बाराव्या दिवशी श्राद्ध करतात. आर्य समाजात चौथ्या दिवशी श्राद्ध करतात आणि त्यानंतर श्राद्ध करत नाहीत. ते कितपत योग्य आहे ?

एक विद्वान : चौथ्या दिवशी श्राद्धाची फलप्राप्ती शून्य टक्के एवढी असते; कारण चौथ्या दिवशी मृतदेहावर तो जिवित असल्याचा संस्कार दृढ असल्याने त्याच्या भोवती असलेले वासनात्मक कोष १०० टक्के कार्यमान अवस्थेत असतात. अशा वेळी श्राद्धादी विधीकर्म केले असता, त्यातून निर्माण होणार्‍या मंत्रशक्तीच्या लहरी ग्रहण करण्यास लिंगदेह पूर्णतः असमर्थ अवस्थेत, म्हणजेच कर्मविधी कळण्याच्या जाणिवेच्या पलीकडे असल्याने त्याच्यासाठी श्राद्ध करून कोणताच लाभ होत नाही. याउलट १२ व्या दिवशी लिंगदेहाने पृथ्वीची वातावरणकक्षा भेदल्याने त्याची पृथ्वीतत्त्वाशी असलेली संलग्नता अल्प होऊन त्याचे जडत्वही अल्प होते आणि त्याच्या भोवती असणार्‍या कोषांची संवेदनक्षमता वाढते. त्यामुळे श्राद्धादी विधीकर्मातील स्पंदने ग्रहण करण्यात तो अग्रेसर बनल्याने त्या काळात विधी केल्याने तो जास्त फलदायी ठरतो.

हिंदु धर्माने प्रत्येक गोष्ट करण्यामागे किती सारासार विचार केला आहे हे कळते. प्रत्येक वर्षी श्राद्ध करून त्या त्या लिंगदेहांभोवती असलेले वासनात्मक कोषांचे आवरण अल्प करून त्यांना हलकेपणा प्राप्त करून देऊन मंत्रशक्तीच्या ऊर्जेवर त्यांना गती देणे, हे पितृऋण फेडण्याचे प्रमुख साधन आहे. सर्वच लिंगदेह साधना करणारे नसल्याने त्यांना बाह्यऊर्जेच्या बळावर श्राद्धादी कर्म करून पुढे ढकलावे लागते; म्हणून प्रत्येक वर्षी श्राद्ध करणे महत्त्वाचे ठरते. नामसाधना करणारा जीव हा स्वयं सात्त्विक ऊर्जेच्या बळावर पुढे पुढे जात रहातो; म्हणून साधना करण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ६.९.२००५, सायं. ६.१४)

 यांतून जिवंतपणी साधना करून मानवजीवनाचे कल्याण करून घेण्याचे महत्त्वही लक्षात येते.

 

३. श्राद्ध करण्यास असमर्थ असलेल्याने केवळ
अंतःस्थ तळमळीने, भावपूर्ण प्रार्थना केल्यासही त्याला श्राद्धाचे फळ मिळणे

संकलक : शास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारे श्राद्ध करण्यास असमर्थ असलेल्या श्राद्धकर्त्याने निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्यांदा म्हणावे, ‘मी निर्धन आणि अन्नविरहित आहे. मला पितृऋणातून मुक्त करा’, असे सांगितले आहे. केवळ असे केल्यास पितरांना श्राद्धाचे फळ कसे मिळते ?

एक विद्वान : वरील शब्द अंतःस्थ तळमळीने उच्चारले असता, विश्वेदेवांची कृपा होऊन पितर त्या त्या योनीतून मुक्त होऊन पुढच्या गतीला प्राप्त होतात. यावरूनच कळकळीने केलेल्या प्रार्थनेचे महत्त्व लक्षात येते. प्रत्यक्ष कर्मकांडापेक्षा भावपूर्ण प्रार्थनेला अधिक महत्त्व आहे. भावपूर्ण प्रार्थनेने पितरगण, कनिष्ठ देवगण, इतर देवता प्रसन्न होऊन प्रार्थना करणार्‍या जिवाकडे आकृष्ट झाल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होऊन पितरांना अल्प कालावधीत गती मिळून जिवाला श्राद्धादी कर्म केल्याचे फळ मिळते; म्हणून देवाच्या दारी अगतिक याचक होणे फार महत्त्वाचे असते. हात वर करून देवतांना आवाहन करून पितरांना उद्देशून प्रार्थना उच्चारणे, हे याचकाच्या अगतिक अवस्थेतून निर्माण झालेल्या भावाचे प्रतीक आहे. – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १३.८.२००६, दुपारी २.१९)

(कळकळीची म्हणजेच भावपूर्ण प्रार्थना होण्यासाठी व्यक्तीत भाव असणे आवश्यक असते. सर्वसाधारण व्यक्तीत इतका भाव नसतो; म्हणूनच शास्त्रात श्राद्ध-विधी करण्याची आवश्यकता प्रतिपादिली आहे. – संकलक)

 

४. श्राद्धाची मर्यादा

‘श्राद्ध केवळ मर्त्यलोकाची कक्षा भेदण्यासाठी उपयोगी पडते; परंतु त्यापुढे मात्र जीव साधनेनेच पुढच्या योनीत जाऊ शकतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.३.२००५, सायं. ६.४३) 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्त्र’

1 thought on “शास्त्रानुसार श्राद्धकर्म न केल्यास होणारी हानी आणि श्राद्धाची मर्यादा”

  1. सनातन संस्था यांच्या सहकार्याने शास्त्रानुसार विधी कसा करावा हे शास्त्र सोप्या भाषेत ऐप च्या माध्यमातून जीज्ञासु
    हिंदू पर्यंत हे ज्ञान घराघरात पोहोचले
    ईश्वर चरणी प्रार्थना करतो. हे भगवंता अशीच कृपा असु दे

    Reply

Leave a Comment