हिंदु संस्कृतीचा प्राण असणार्‍या भगवान सूर्यनारायणाची विविध फलदायी सूर्योपासना !

रथसप्तमीच्या निमित्ताने…

सूर्योपासना हा भारतवर्षाचा प्राण आहे. आपल्या ऋषीमुनींनी साधना करून सूर्योपासनेचे लाभ मिळवलेले आहेत. रथसप्तमीच्या पावन पर्वावर भगवान सूर्यनारायणाविषयीची सखोल, शास्त्रशुद्ध आणि आध्यात्मिक माहिती पुढे देत आहे.

१. भगवान सूर्यनारायण धर्मपरायण असल्याने त्याचा आदर्श घेणे आवश्यक !

पृथ्वीवरील मनुष्यप्राण्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारा देव, म्हणजेच भगवान सूर्यनारायण होय. पृथ्वीवरील सर्व जिवांचा एकमेव आधार असणार्‍या सूर्यनारायणाच्या निवासस्थानास सूर्यलोक असे म्हणतात. आपण सर्वांनीच सूर्याचा आदर्श घेण्यासारखा आहे; कारण सूर्यदेव आपले नित्यक्रम (धर्माचरण) कधीच पालटत नाही.

सूर्यनारायण या विशेषणाने त्याचा सन्मान धर्मलोकातूनही केला जातो. सूर्य जसा नारायण आहे तसाच तो धर्मपरायणही आहे; म्हणूनच आदर्श असावा, तर केवळ या सूर्याचाच ! सूर्यदेव हा आपल्या हिंदु संस्कृतीचा प्राण आहे. इतरत्रची कुठलीही संस्कृती आणि आपली सनातन संस्कृती यांत हाच एक फार मोठा भेद आहे. सूर्यदेव हा पंचांगाचा आधारात्मा आहे.

रथसप्तमी व्रत (video)

२. सूर्य हा ब्रह्मांडाचा नियंत्रक असल्याने भारतवर्षातील ऋषीमुनी,
सिद्ध महात्मे आणि संत यांनी सूर्योपासनेचा दंडक घालून दिलेला असणे

सूर्य हा सर्वांत तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तीवान, बुद्धीवान आणि सर्वज्ञ असा सृष्टीचा जगत्चालक असून, तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. त्याच्या उगवण्याने संपूर्ण सृष्टी आपोआपच जागृत होऊन पिवळ्या चैतन्याने न्हाऊन निघते; म्हणूनच सूर्यास्तानंतर घराघरातून तुळशीपाशी दिवे लावले जातात. सूर्य आपले तेज आणि शक्ती सायंकाळी देवाजवळच्या दिव्याला देऊन जातो; म्हणून देवापाशी दिवा लावावा.

सर्व हिंदूंचा दिवस सूर्योदयापासून चालू होतो आणि संपतोही सूर्यास्तानंतरच; म्हणून आपल्या भारतवर्षातील ऋषीमुनी, सिद्ध महात्मे अन् संत यांनी सूर्योपासनेचा दंडक घालून दिलेला आहे.

३. सर्वांचा उद्धार कसा करावा ?
याचे शिक्षण देणारा आदर्श शिक्षक – सूर्यनारायण !

पृथ्वीवरील हवा, पाणी, अग्नी, तेज, उष्णता, शुद्धता, स्वच्छता आणि पवित्रता यांचा उगमस्रोत सूर्यच आहे. त्यामुळे प्रतिदिन या सर्व घटकांच्या संयुक्त प्रक्रियेद्वारे वातावरण सूर्यकिरणांतून शुद्ध होत जाऊन जीवसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी साहाय्य होत आहे. हे कार्य घडवून आणण्याचे अखंडत्व सूर्यदेवाने जोपासून ठेवले आहे; म्हणूनच जोपासना कशी करावी ? हे मर्म सूर्योपासनेतूनच शिकून पृथ्वीवर आम्हा सर्वांचाच उद्धार कसा करावा ? याचे शिक्षण देणारा खरा आदर्श शिक्षक सूर्यनारायण ठरतो.

४. सूर्याची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

४ अ. कर्तव्यपरायणता

सूर्य मानवी शरिराला अंतर्यामी प्रेरणा देत असल्याने सर्वांनाच जागे होण्याचा संदेश देऊन आपली कर्तव्यपरायणता सिद्ध करत असल्याने सूर्यदेव म्हणून त्याची अतिशय आदराने पूजा केली जाते.

४ आ. आत्मशक्तीचा आध्यात्मिक प्रेरक

विज्ञानवादी सूर्याला जरी एक तप्त गोळा समजत असले, तरी खर्‍या अर्थाने सूर्य आत्मशक्तीचा आध्यात्मिक प्रेरक आहे.

४ इ. नम्रता

१. सूर्याचे किरण सर्वांनाच नमस्काराची प्रेरणा देतात. त्यामुळे एकमेकांना राम, राम, नमस्कार, अशा शब्दांच्या भावफुलांनी सकाळ गजबजून गेलेली दिसून येते.

२. सूर्यदेव महान असूनही त्याचे किरण पृथ्वीवरील क्षुद्र जीवजंतू आणि मनुष्याचे चरण यांना स्पर्श करून आपल्या सर्वांनाच नम्रतेची शिकवण देत प्रेरित करत असतात.

४ ई. आज्ञापालन, शरणागती आणि तत्परता

सूर्यनारायण प्रारंभ केलेले आणि अपूर्ण राहिलेले कर्म जसेच्या तसे मागे टाकून अस्ताचलास जातो. त्याच्या या कृतीतून आज्ञापालन आणि शरणागती कशी असावी ? वर्तमानकाळात कसे सतत रहावे, हे शिकावयास मिळते. तसेच यातून तत्परता हा गुण मानवाने घ्यावा, असेच तो सुचवत असतो.

४ उ. निरपेक्षता आणि अनासक्ती

सूर्य कर्मपूर्तीची अपेक्षा किंवा प्रतीक्षा कधीच करत नाही. त्याला कर्मासक्ती आणि फलासक्ती उरत नाही. सूर्य आपले सर्व किरण क्षणात आवरून टाकतो. मोठ्यामोठ्यांनाही हे कधीही जमणे शक्य नाही. हीच सूर्यनारायणाची असामान्यता होय.

सूर्याद्भवन्ति भूतानि सूर्येण पालितानि तु ।
सूर्ये लयं प्राप्नुवन्ति यः सूर्यः सोऽहमेव च ॥ – सूर्योपनिषद्

अर्थ : सूर्यापासून प्राणीमात्रांची निर्मिती होते, त्याच्या कृपेमुळेच त्यांचे पालनपोषण होते आणि त्याच्यातच सर्वांचा लय होतो. असा सूर्य मीच आहे, असे ईश्‍वर म्हणतो.

४ ऊ. सर्वदेवमय

संपूर्ण भुवनातील प्रकाशमान, तेजस्वी देवता म्हणून सूर्याची ओळख असली, तरी सूर्य हा सर्वदेवमय असाच आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश, स्कंद, प्रजापति, महेंद्र, वरुण, काल, यम, सोम आदी तोच आहे.

सूर्याच्या मित्र या नावातील देवता ही दिवसभराची, तर वरुणनामक देवता ही रात्रीची आहे; म्हणूनच सूर्यास्त होऊन रात्र चालू होताच तमोगुणरूपी झोप अनावर होते. अहंकाराची देवता हीसुद्धा रात्रच असल्यामुळे रात्रीला पृथ्वीवर भयंकर असे उत्पात घडून येतात. देवतास्वरूप सूर्यनारायण भगवान शंकराच्या आज्ञेने प्रतिदिन भ्रमण करत असतात.

४ ए. सूर्याचे स्थूल, सूक्ष्म आणि आध्यात्मिक स्वरूप

सूर्याचे स्थूल रूप म्हणजे सूर्यमंडळ. सूक्ष्म रूप, म्हणजे तदन्तर्यामीपुरुष, तर आध्यात्मिक स्वरूप म्हणजे आपल्या डोळ्यांतील ज्योती (नेत्रज्योती) होय.

४ ऐ. आयुर्दान करणे

संपूर्ण भुवनातील सर्वांनाच सूर्यदेव आयुर्दान करतात; म्हणूनही सूर्याला आदित्य सूर्यनारायण असे म्हणतात.

४ ओ. ब्रह्मांडातील सर्व ज्ञान सूर्याकडे असणे

ब्रह्मांडातील सर्वच्या सर्व ज्ञान एकट्या सूर्याजवळच उपलब्ध आहे. हनुमंतानेही हे संपूर्ण ज्ञान सूर्यदेवाकडूनच प्राप्त करून घेतले होते; म्हणून बालपणी हनुमंताने सूर्याकडे झेप घेतल्याचा प्रसंग आला.

४ औ. कर्मठ आणि कर्मकुशल

सूर्य अखंड कार्यरत असून तो फारच कर्मठ आणि कर्मकुशल असल्याने त्याच्याकडून योगः कर्मसु कौशलम् । म्हणजे समत्वरूपी योग साधणे, हेच कर्मातील कौशल्य आहे, हे तत्त्व उदयास आले आहे. सूर्याची हीच शिकवण मानवासाठी आहे.

४ अं. तेजोमय

सूर्यदेव धर्माच्या आणि कर्तव्याच्या मार्गाने सतत चालत असल्याने त्याचे तेज कधीच लोप पावत नाही. त्याची कांती (शरीर) तप्त सुवर्णाप्रमाणे आहे; म्हणूनच त्याच्या किरणांना सोनेरी किरण असे म्हटले जाते.

४ क. विश्‍वाचा साक्षीदेव

हाच सूर्य १४ भुवनांचा पालक आहे, तसेच तो विश्‍वाचा साक्षीदेव म्हणून कार्यरत आहे.

४ ख. सर्व देवांचा नियामक

सूर्याचा सर्वांत मोठा गुण म्हणजे त्याला आळस कधीच स्पर्श करू शकत नाही. सूर्यदेव इतर सर्व देवांचा नियामक आहे.

४ ग. चराचर सृष्टीचा आत्मा

सृष्टीतील सर्व आकार आणि रंग सूर्यामुळेच निर्माण झाले आहेत. सूर्यासारखी जीवनशक्ती विश्‍वात अन्य दुसरी कोणतीच नाही. सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्‍च । म्हणजे सूर्य हा चराचर सृष्टीचा आत्मा आहे, असे त्याचे वर्णन आहे.

४ घ. विराट पुरुषाचा नेत्र

जगातील सर्व कर्मे, व्यवहार सूर्याच्या दृष्टीतून सुटूच शकत नाहीत. सूर्यदेव विराट पुरुषाचा नेत्र असून अंतराळाचा अलंकार आहे. सूर्याचा प्रकाश जणूकाही अमूर्त अशा अग्निदेवतेचे मुख आहे.

४ च. दुपारी १२ वाजता अहंकाराची आठवण होणे

सूर्यदेवाला दुपारी १२ वाजता आपल्या अहंकाराची आठवण होतेच; पण त्याचा अहंकार काही क्षणातच नष्ट होऊन त्याची खाली वाटचाल चालू होते.

४ छ. सूर्याचे चरण नेहमीच झाकलेले असतात. सूर्याच्या तेजापासूनच विश्‍वकर्म्याने सुदर्शनचक्र निर्माण केले आहे.

४ ज. सूर्यदेवाला कान असल्याने तो आपली प्रार्थना ऐकू शकतो.

५. सूर्यदेवाचे १२ अवतार

सूर्यदेवाचे १२ अवतार आहेत. इंद्र, धाता, त्वष्टा, पूषा, अर्यमा, भग, विवस्वान, विष्णु, अंशुमान, वरुण, मित्र आणि पर्जन्य अशी बारा रूपे आपल्याला दिसतात.

६. सूर्याची उपासना

सूर्याला लाल कण्हेरीचे फूल वाहावे. सूर्यपूजनात जाईचे फूल श्रेष्ठ आहे. सूर्याला मोदकांचा नैवेद्य दाखवावा.

७. सूर्योपासनेमुळे होणारे लाभ

७ अ. आरोग्य उत्तम रहाणे

आरोग्यं भास्करात् इच्छेत् । म्हणजे सूर्याकडून आरोग्याची इच्छा करावी, म्हणजेच सूर्योपासना करून आरोग्य मिळवावे, असे वचन आहे. अन्य देवांच्या उपासनेचा आधार केवळ सूर्योपासना हाच आहे; म्हणूनच ज्याला चांगले आरोग्य पाहिजे, त्याने सूर्योदयापूर्वीच उठून अंघोळ करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन प्रतिदिन नमस्कार करण्याचा निर्धार केल्यास त्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम रहाते.

७ आ. विजय प्राप्त होणे

सूर्योपासनेमुळे सर्व विषयांत, व्यापारात, उद्योगधंद्यात जयप्राप्ती होते. अन्य उपासनांपेक्षा सूर्योपासना जलद फलप्राप्ती करून देणारी आहे. सूर्योपासनेमुळे सर्वज्ञता प्राप्त करून घेता येते. प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीही रावणासमवेतचे युद्ध जिंकण्यासाठी अगस्तिऋषींच्या सांगण्यावरून आदित्यहृदय स्तोत्राचे पठण केल्यानंतरच विजय मिळवला.

७ इ. सूर्योपासना केल्यास मनुष्य आपत्तीतून मुक्त होतो, असे अगस्तिऋषींनी सांगणे

सूर्योपासनेविषयी अगस्तिऋषी सांगतात, भीषण संकटात, भयंकर परिस्थितीत, निर्जन अरण्यात, घोर प्रसंगात, महासागरात सूर्याचे नामस्मरण (श्री आदित्याय नमः।), कीर्तन, प्रार्थना, पूजन, अर्चन करून मानव आपत्तीतून सहज मुक्त होऊ शकतो; म्हणूनच प्रतिदिन सूर्यदर्शन करावे. सूर्यदर्शनाने अपवित्र मानवही पवित्र होतो. प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणार्‍या या देवाची ही शक्ती ओळखा !

७ ई. विकारांचे दास्यत्व नष्ट होऊन मनुष्याने संतपदापर्यंत वाटचाल करणे

असा हा सूर्यदेव वेदांचाही परमात्मा आहे. सूर्योपासना हा वैदिक संस्कृतीचा मूलाधारच आहे; म्हणूनच हिंदु धर्मीय विकारांचे दास्यत्व नष्ट करू शकत असून पृथ्वीवर संतपदापर्यंत वाटचाल करत आहेत.

७ उ. रोगराईचे निवारण होणे

सूर्योपासनेमुळेच प्रतिदिन वायूमंडल, वातावरण शुद्ध होत जाऊन रोगराईचे निवारण होत आहे. हा सूर्य पृथ्वीपासून ९ कोटी मैल दूर आहे, तरीसुद्धा सूर्याचा प्रभाव या पृथ्वीवर सतत आहे. सूर्योपासनेमुळे कर्करोगासारखा भयंकर रोगही बरा होतो.

७ ऊ. बलाची प्राप्ती होणे आणि अनिष्ट शक्तींचा त्रास दूर होणे

सूर्याच्या उपासनेमुळे बल, शक्ती, स्मरण, तेज, ज्ञान, शूरत्व आणि आरोग्य यांची प्राप्ती होते. या उपासनेमुळे वाईट स्वप्ने पडत नाहीत आणि अनिष्ट ग्रहांची पीडा दूर होते. कोणत्याही व्रताला हानी पोहोचवणार्‍या अनिष्ट शक्तींचा नाश याच उपासनेने होऊ शकतो.

७ ए. भविष्यकाळ जाणून घेण्याची सिद्धी प्राप्त होणे

सूर्याच्या सविता नावाच्या शक्तीचा लाभ साधकाला मिळतो. सूर्योपासनेमुळे जगातील सर्वांचाच भविष्यकाळ (भविष्य) जाणून घेण्याची सिद्धी प्राप्त होते.

७ ऐ. यज्ञ केल्याचे फळ मिळणे

सूर्याची ज्या घरात, कुटुंबात प्रतिदिन आराधना केली जाते, तेथे प्रतिदिन एक यज्ञ होत असतो. सूर्याची प्रतिदिन दूर्वा वाहून पूजा केल्यास यज्ञ केल्याचे फळ मिळते. सूर्याला दुग्धाभिषेक केल्यास विलक्षण अशा सुखाची प्राप्ती होते. सूर्योपासनेमुळेच ऋषी तेजस्वी होऊ शकले.

७ ओ. सूर्य सकाळी ब्रह्मदेव, दुपारी विष्णु, तर दोन प्रहरांनंतर रुद्र (शंकर) असतो.

सूर्य सकाळी ब्रह्मदेव, दुपारी विष्णु, तर दोन प्रहरांनंतर रुद्र (शंकर) असतो.

७ औ. कुळातील सात पुरुष सूर्यलोकी जाणे

सूर्याचे देवालय बांधणार्‍या व्यक्ती आपल्या कुळातील सात पुरुषांना सूर्यलोकी घेऊन जातात.

७ अं. अंध मनुष्यास उत्तम नेत्र प्राप्त होणे

भाव-भक्तीपूर्ण केलेला एकच नमस्कार सूर्याची कृपा संपादन करण्यास पुरेसा आहे. सूर्यास धूप-दीप त्रिकाल दाखवल्यास अंध मनुष्यासही उत्तम नेत्र लाभतात.

७ क. उपासनेमुळे होणार्‍या लाभांची उदाहरणे

सूर्यापासूनच कुंतीला सुवर्णकवच कुंडलधारी कर्ण मिळाला; तर द्रौपदीला अन्नथाळी मिळाली आणि सांबाचा कृष्ठरोग बरा झाला.

८. इच्छित फल देणारे रथसप्तमीचे व्रत !

रथसप्तमीला रविवारी उत्तरा-फाल्गुनी नक्षत्रावर आदित्यदेव (सूर्यदेव) प्रकटले; म्हणून रथसप्तमी ही श्रेष्ठ तिथी म्हणून गणली जाते. या दिवशी सूर्य पुष्कळ आनंदी असतो. जे मागाल, ते तुम्हाला देतोच ! रथसप्तमीचा उपवास करणार्‍याला स्वप्नात सूर्याचे दर्शन होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

असे हे रथसप्तमी आणि सूर्य यांचे माहात्म्य आहे. सूर्यदेवाच्या चरणी कोटी कोटी साष्टांग नमस्कार !

– प्रा. श्रीकांत भट, अकोला (४.२.२०१४)

 

सृष्टीच्या पालन-पोषणाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका असणार्‍या सूर्यदेवाची गुणवैशिष्ट्ये !

१. रथसप्तमी तिथीचे महत्त्व

‘माघ शुक्ल पक्ष सप्तमी’ या दिवशी श्‍वसुर विश्‍वकर्म्याने जावयाला, म्हणजे सूर्याला अश्‍वासहित दिव्य रथ दिला. त्यामुळे सूर्याच्या कार्याचा शुभारंभ झाला. म्हणून ही तिथी ‘रथसप्तमी’ या नावाने ओळखली जाते.

२. सूर्याची विविध नावे

मित्र, रवि, सूर्य, भानु, खग, पूषन, हिरण्यगर्भ, मरिची, आदित्य, सवितृ, अर्क आणि भास्कर ही सूर्याची बारा नावे प्रसिद्ध आहेत. सूर्यनमस्कार घालतांना या १२ नावांचा उच्चार करतात.

८. मूर्तीविज्ञान

७ अश्‍व जुंपलेल्या रथात सूर्यदेव पद्मासनात बसलेला असतो. काही वेळा त्याच्या वामभागी, म्हणजे डाव्या मांडीवर त्याची पत्नी संध्या विराजमान असते. अरुण या रथाचा सारथी असतो. एका विचारसरणीनुसार या रथाला एक चाक असते, तर दुसर्‍या विचारसरणीनुसार याला बारा चाके असतात.

८ अ. मूर्तीविज्ञान, विश्‍लेषण आणि आध्यात्मिक कारण

९. सूर्यकिरणांची वैशिष्ट्ये

सूर्यापासून निघणार्‍या ७ प्रकारच्या सूर्यकिरणांतील ऊर्जांमुळे सृष्टीच्या पालन-पोषणाचे कार्य सुरळीतपणे चालू रहाते.

९ अ. सात प्रकारच्या ऊर्जांचे रंग, कार्यरत शक्ती आणि कार्य अन् वैशिष्ट्ये

* या ७ ऊर्जा मिळून ‘सविता’ ही महाऊर्जा निर्माण होते. तिचा रंग पांढरा (श्‍वेत) असतो. सवितृ देवतेत सूर्याची धर्मसूर्य, ज्ञानसूर्य, भक्तीसूर्य, सूर्यनारायण इत्यादी कार्यानुमेय असणारी रूपे समाविष्ट झाली आहेत.

१०. बारा आदित्यांची नावे, त्यांची कार्यरत शक्ती, कार्य आणि वैशिष्ट्ये

संपूर्ण ब्रह्मांडांत १२ आदित्य कार्यरत असून ते विविध सूर्यमालिकेतील सूर्यांना तेज प्रदान करतात.

टीप १ : वैवस्वत मन्वंतरात अदिती आणि कश्यपऋषी यांना १२ पुत्र झाले होते. त्यांना ‘द्वादश आदित्य’ म्हणतात.

टीप २ : १२ आदित्यांची मराठीतील नावे – संदर्भ सनातनचा ग्रंथ ‘परमेश्‍वर, ईश्‍वर, अवतार आणि देव’.

११. सूर्याशी संबंधित विविध घटक

कु. मधुरा भोसले

११ अ. लोक : सूर्यलोक

११ आ. सूर्याची शक्ती : प्रचलित माहितीनुसार संध्या आणि छाया या सूर्याच्या पत्नी आहेत. ऋग्वेदानुसार उषा, प्रत्युषा, संज्ञा आणि छाया या सूर्याच्या पत्नी आहेत. सूर्याला तेज सवितृ देवता देत असून गायत्री देवी ही सूर्याचे निर्गुण तेज वहन करणारी शक्ती आहे.

११ इ. पंचमहाभूत : प्रामुख्याने तेजतत्त्वाशी संबंधित

११ ई. कुंडलिनीतील सप्तचक्र : मणिपूरचक्र हे तेजतत्त्वाशी संबंधित असल्याने अग्नीदेव आणि सूर्यदेव त्याचे अधिपति आहेत. एका विचारसरणीनुसार मणिपुरचक्राला सूर्यचक्रही म्हटले जाते.

११ उ. सूक्ष्म रंग : सूर्याचा रंग तांबडा आहे. यासाठी सूर्यपूजनात लाल रंगाची फुले, रक्तचंदन, कुंकुममिश्रित लाल रंगाच्या लक्षता, लाल वस्त्रे इत्यादींचा वापर केला जातो.

११ ऊ. सुगंध : सूर्याच्या तारक उपासनेसाठी चंदन आणि त्याच्या मारक उपासनेसाठी हिना अन् दरबार हे गंध पूरक आहेत.

११ ए. पूजासाहित्य : कुंकवामध्ये देवी आणि सूर्य ही दोन्ही तत्त्वे असतात. कुंकुममिश्रित अक्षतांचा वापर सूर्यपूजेत केला जातो.

११ ऐ. प्रिय पुष्प : सूर्याला ‘सूर्यफूल’ प्रिय आहे.

११ ओ. नदी : पवित्र असणार्‍या सप्तनद्यांपैकी यमुनानदी ही सूर्यपुत्री आहे आणि तिच्यामध्ये सूर्याचे तेज अन् कृष्णतत्त्व कार्यरत आहेत.

११ औ. प्रदक्षिणांची संख्या : ७ किंवा ७ च्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात.

११ अं. रत्न आणि धातू : ‘माणिक’ हे रत्न आणि ‘तांबे’ हा धातू यांमध्ये सूर्याचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट अन् प्रक्षेपित करण्याची क्षमता असते.

११ क. वार : रविवार

११ ख. तिथी : सप्तमी

११ ग. अंक : ७ अंक सूर्याशी संबंधित आहे.

११ घ. रास : सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे.

११ च. नैवेद्य : पायसम् (तांदळाची खीर)

११ छ. शस्त्र किंवा आयुध : सुदर्शनचक्र

११ ज. वाद्य : सूर्यनारायणाला ‘शंख’ हे वाद्य प्रिय आहे.

११ झ. तीर्थक्षेत्रे, शक्तीपीठ किंवा जागृत देवस्थान : कोणार्कचे प्रसिद्ध सूर्यमंदिर

११ ट. सूर्य-उपासक ऋषि, भक्त राजे आणि अन् कलियुगातील संत

११ ट १. ऋषी : हिरण्यगर्भमुनी, और्वऋषि

११ ट २. भक्त राजे : अंगद देशाचा राजा कर्ण

११ ट ३. कलियुगातील संत : संत एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे कलियुगातील सूर्याची उपासना करणारे महाराष्ट्रातील थोर संत होते.

११ ठ. स्तोत्र किंवा कवच : सूर्यस्तुती, सूर्याष्टकम्, आदित्यहृदय स्तोत्र, सूर्यमंडल स्तोत्र इत्यादी.

११ ड. आरती : त्या त्या भाषांतील प्रसिद्ध आहेत.

११ ढ. यज्ञ : ‘सवितृकाठचयन यज्ञ’ आणि सूर्ययज्ञ

११ ण. सूर्य गायत्री : ‘ॐ भास्कराय विद्महे । महद्द्युतिकराय धीमहि । तन्नो सूर्य: प्रचोदयात् ॥’

अर्थ : आम्ही भास्कराला (सूर्याचे एक नाव) जाणतो. आम्ही सूर्याचे ध्यान करतो. तो सूर्य आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

११ य. बीजमंत्र आणि बीजाक्षर : ‘रं’ हे बीजमंत्र तेजाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे ‘भ’ हे अक्षरही तेजाशी संबंधित आहे.

११ र. नामजप : ‘ॐ सूर्याय नम: ।’ हा नामजप प्रचलित आहे. ‘ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नम: ।’ हाही सूर्याचा एक जप आहे.

११ ल. सण : रथसप्तमी आणि मकरसंक्रांत

१२. सूर्याची काही गुणवैशिष्ट्ये

अ. सूर्याचा लिंग पुरुष असून त्याचा वर्ण क्षत्रिय आहे.

आ. सूर्य पूर्व दिशेचा ग्रहस्वामी आहे.

इ. सूर्याशी संबंधित तत्त्व आणि देवता अग्नी आहे.

ई. सूर्याशी संबंधित रस तिखट आहे.

उ. दिवस आणि अयन हे काळाचे मापदंड सूर्याशी संबंधित आहेत.

ऊ. सूर्याचा संबंध मनुष्याच्या अस्थी आणि डोळे यांच्याशी असतो. डोळ्यांना तेज प्रदान करणारी देवता ‘अर्यमा’ हे सूर्याचेच एक रूप आहे.

ए. सूर्य सत्त्वप्रधान असून तो शुभ फळ देणारा ग्रह आहे.

 

प्रार्थना !

‘हे सूर्यदेव, तूच आम्हाला धर्मज्ञान देऊन आमच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधार दूर कर आणि आमच्या गुरुस्थानी राहून आमचा उद्धार कर. ईश्‍वरी राज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करण्यासाठी तूच आम्हाला शक्ती, बुद्धी आणि प्रेरणा दे’, अशी तुझ्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०१८, रात्री ११.०३)

Leave a Comment