अनुक्रमणिका
१ अ. अक्षय तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाणे
१ इ. धर्मकृत्यांचा आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभ
२. अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत
२ अ. उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान
२ इ. अक्षय तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व
३. आपत्काळात धर्माचरण कसे कराल ?
साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. यामागील अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया.
प्रस्तुत लेखात सांगितलेले हे अध्यात्मशास्त्र धर्माने सर्वसाधारण काळासाठी प्रतिपादले आहे. सर्वकाही अनुकूल असून धर्माप्रमाणे वागता येईल, हा ‘संपत्काल ’होय.
अक्षय तृतीयेशी संबंधित व्हिडिओ
१. महत्त्व

अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।
उद्दिश्य दैवतपितॄन्क्रियते मनुष्यैः
तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ।। – मदनरत्न
अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.
१ अ. अक्षय तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाणे
‘अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाते.
१ आ. अवतार होणे
अक्षय (अक्षय्य) तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. यावरून अक्षय तृतीया या तिथीचे महत्त्व लक्षात येते.’
१ इ. धर्मकृत्यांचा अधिक लाभ होणे
‘या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो’, असे मानले जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणार्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते.
श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा
२. अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत
‘कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.
२ अ. उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान
या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.

२ अ १. महत्त्व
उदककुंभालाच ‘सर्वसमावेशक स्तरावरील निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.
२ अ २. उद्देश
अ. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे
आ. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.
इ. देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.
२ अ ३. उदकुंभ दानाचा मंत्र
ब्राह्मणाला उदकुंभाचे दान देतांना पुढील मंत्र म्हणावा
एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।
अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ।।
गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम् ।
पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ।। – धर्मसिन्धु
अर्थ : ब्रह्मा, विष्णु आणि शिव ज्यात सामावले आहेत असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे. या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होवोत. गंध, उदक, तीळ, यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय्य (क्षय न पावणारा) ठरो.
२ अ ४. शास्त्र
अक्षय तृतीया या दिवशी ब्रह्मांडात अखंड रूपातील, तसेच एकसमान गतीजन्यता दर्शवणार्या सत्त्व-रज लहरींचा प्रभाव अधिक प्रमाणात असल्याने या लहरींच्या प्रवाहायोगे पितर आणि देव यांना उद्देशून ब्राह्मणाला केलेले दान पुण्यदायी आणि मागील जन्माच्या देवाणघेवाण हिशोबाला धरून कर्म-अकर्म करणारे ठरत असल्याने या कधीही क्षय न होणार्या लहरींच्या प्रभावाच्या साहाय्याने केलेले दान महत्त्वाचे ठरते.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’, सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, चैत्र कृष्ण १, कलियुग वर्ष ५११० (१०.४.२००९), सायं. ७.३४
२ अ ५.‘अक्षय्य तृतीये’च्या दिवशी पितरांचे पूजन केलेल्या उदककुंभाचे ब्राह्मणाला दान देणे’, या कृतीचा सूक्ष्मातील परिणाम दर्शवणारे चित्र
२ अ ५.१. सूक्ष्म ज्ञानासंदर्भातील चित्राविषयीची सत्यता आणि स्पंदने
२ अ ५.१ अ. ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता : ८० टक्के
२ अ ५.१ आ. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील चांगली स्पंदने : १० टक्के ’
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले
२ अ ५.२. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण
२ अ ५.२ अ. भाव
२ अ ५.२ अ १. पितरांसाठी ठेवण्यात आलेल्या उदककुंभाचे पूजन केल्यावर पूजन करणार्या व्यक्तीच्या अनाहत चक्रस्थानी भावाचे वलय निर्माण होणे
२ अ ५.२ आ. शक्ती
२ अ ५.२ आ १. ईश्वराकडून येणारा शक्तीचा प्रवाह व्यक्तीकडे आकृष्ट होणे
२ अ ५.२ आ १ आ. शक्तीचे वलय उदककुंभाचे पूजन करणार्या व्यक्तीमध्ये निर्माण होणे
२ अ ५.२ आ २. निर्माण झालेल्या शक्तीच्या वलयातून शक्तीचा प्रवाह दान स्वीकारणार्या ब्राह्मणाच्या दिशेने प्रक्षेपित होणे
२ अ ५.२ आ ३. उदककुंभात शक्तीचे वलय निर्माण होणे आणि ते कार्यरत रूपात फिरणे
या उदककुंभात असणारी सुपारी आणि जल यांमुळे देवतेकडून आकृष्ट झालेल्या लहरी उदककुंभात सामावून रहातात.
२ अ ५.२ आ ४. दान स्वीकारणार्या व्यक्तीमध्ये शक्तीचे वलय निर्माण होणे
२ अ ५.२ इ. चैतन्य
२ अ ५.२ इ १. उदककुंभात चैतन्याचे कार्यरत वलय निर्माण होणे आणि या वलयांतून वातावरणात चैतन्याचे प्रक्षेपण होणे
२ अ ५.२ इ २. ‘अक्षय्य तृतीया’ हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी वातावरणात चैतन्याचे कण कार्यरत असणे
२ अ ५.३ अ. पितृलोकातून येणारा कार्यरत पितर प्रवाह भूलोकापर्यंत उदककुंभात आकृष्ट होणे
उदककुंभाचे दान देण्याच्या या कृतीतून पितरांच्या अतृप्त इच्छांची पूर्ती होऊन त्यांच्यावरील अतृप्त इच्छांचे आवरण दूर होते. त्यांना गती प्राप्त होते आणि ते पुढील लोकांतील प्रवास करणे
२ अ ५.३ आ. पितरांचे लिंगदेह भूलोकाकडे उदककुंभामध्ये आकृष्ट होणे.
२ अ ५.३ इ. उदककुंभामध्ये तमोगुणी काळसर वलय कार्यरत होणे
२ अ ५.३ ई. दान देणार्या व्यक्तीच्या देहावरील काळे आवरण दूर होणे
२ अ ५.३ उ. व्यक्तीभोवती संरक्षक कवच निर्माण होणे.’
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.४.२०१९)
२ आ. तिलतर्पण करणे
२ आ १. अर्थ आणि भावार्थ
अ. ‘तिलतर्पण म्हणजे देवता आणि पूर्वज यांना तीळ अन् जल अर्पण करणे. तीळ हे सात्त्विकतेचे प्रतीक आहे, तर जल हे शुद्ध भावाचे प्रतीक आहे.
आ. देवाजवळ सर्वकाही आहे. त्यामुळे आपण त्याला काय अर्पण करणार ? तसेच ‘मी देवाला काहीतरी अर्पण करतो’, हा अहंही नको. यासाठी तीळ अर्पण करतांना ‘देवच माझ्याकडून सर्वकाही करवून घेत आहे’, असा भाव ठेवावा. यामुळे तिलतर्पण करतांना साधकाचा अहं न वाढता त्याचा भाव वाढण्यास मदत (साहाय्य) होते. तिलतर्पण करणे म्हणजे देवतेला तीळांच्या रूपाने कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव अर्पण करणे होय.

२ आ २. तिलतर्पण कोणाला करायचे ?
२ आ २ अ. देवता
२ आ २ अ १. पद्धत
प्रथम देवांचे आवाहन करावे. तांब्याचे किंवा कोणत्याही सात्त्विक धातूचे तबक किंवा ताट हातात घ्यावे. ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांचे किंवा त्यांच्या एकत्रित रूपाचे, म्हणजे दत्ताचे स्मरण करून त्यांना ताटात येण्याचे आवाहन करावे. त्यानंतर ‘देवता सूक्ष्मातून तेथे आलेल्या आहेत’, असा भाव ठेवावा. त्यानंतर ‘त्यांच्या चरणांवर तीळ अर्पण करीत आहोत’, असा भाव ठेवावा.
२ आ २ अ २. परिणाम
प्रथम (सूक्ष्मातून आलेल्या देवतांच्या चरणांवर) तीळ अर्पण केल्यामुळे तिळांत देवतांकडून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता अधिक प्रमाणावर ग्रहण होते आणि जल अर्पण केल्यावर अर्पण करणार्याचा भाव जागृत होतो. भाव जागृत झाल्यामुळे देवतांकडून तिळांत ग्रहण झालेली सात्त्विकता तिलतर्पण करणार्याला अधिक प्रमाणावर ग्रहण करता येते.
२ आ २ आ. पूर्वज
२ आ २ आ १. महत्त्व
अक्षय तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. मानवावर असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे. यासाठी अक्षय (अक्षय्य) तृतीयेला पूर्वजांना गती मिळण्यासाठी तिलतर्पण करायचे असते.
२ आ २ आ २. पद्धत
पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये श्रीविष्णु आणि ब्रह्मा यांची तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर ‘पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणांवर तीळ आणि जल अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवावा. त्यानंतर दोन मिनिटांनी देवतांच्या तत्त्वांनी भारीत झालेले तीळ आणि अक्षता पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्त्विक बनलेले तीळ हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये हळुवारपणे पाणी सोडावे. त्या वेळी दत्त किंवा ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांना पूर्वजांना गती देण्यासाठी प्रार्थना करावी.
२ आ २ आ ३. परिणाम
तिळांमध्ये सात्त्विकता ग्रहण करून रज-तम नष्ट करण्याची क्षमता अधिक आहे. साधकाच्या भावानुसार तिलतर्पण करतांना सूक्ष्मातून ताटामध्ये आलेल्या पूर्वजांच्या प्रतिकात्मक सूक्ष्म-देहावरील काळे आवरण दूर होऊन त्यांच्या सूक्ष्म-देहांतील सात्त्विकता वाढते आणि त्यांना पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यक अशी ऊर्जा मिळते.
२ इ. अक्षय तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व
अक्षय (अक्षय्य) तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते. पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जिवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो. एखाद्या जिवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो. यामुळे जिवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते; परंतु साधकांना पुण्य मिळवून स्वर्गप्राप्ती करायची नसते, तर त्यांना ईश्वरप्राप्ती करायची असते. यामुळे साधकांनी सत्पात्रे दान करणे आवश्यक असते. येथे सत्पात्रे दान, म्हणजे जेथे अध्यात्मप्रसारासमवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले जाते, अशा सत्च्या कार्यात दान करणे. सत्पात्रे दान केल्यामुळे दान करणार्याला पुण्य मिळणार नाही, तर दानाचे कर्म हे अकर्म कर्म होईल. त्यामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती होईल. आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे साधक स्वर्गलोकात न जाता उच्च लोकांत जाईल.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ११.५.२००५, सकाळी ११.२९)
धनाचे दान
वर उल्लेखिल्याप्रमाणे सत्पात्रे दान संत, धार्मिक कार्य करणार्या व्यक्ती, धर्मप्रसार करणार्या आध्यात्मिक संस्था, धर्माविषयीचे उपक्रम आदींना वस्तू वा द्रव्य रूपाने दान करावे.
तनाचे दान
धर्माविषयीच्या उपक्रमांत सहभागी होणे, हे तनाचे दान होय. यासाठी देवतांचे विडंबन, धार्मिक उत्सवांतील अपप्रकार इत्यादी रोखावे.
मनाचे दान
कुलदेवतेचा जप करणे, तिला प्रार्थना करणे यांद्वारे मन अर्पण (दान) करावे.
२ ई. मृत्तिका पूजन
२ ई १. महत्त्व
‘सदोदित कृपादृष्टी ठेवणार्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञता भाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
२ ई २. मातीत आळी घालणे आणि पेरणी

मातीत आळी घालणे व पेरणी
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय (अक्षय्य) तृतीया या दिवसापर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची स्वच्छता करून खतमिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृत्तिकेमध्ये आळी घालावीत आणि त्या आळ्यांमध्ये बियाणे पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास प्रारंभ केल्यास त्या बियाण्यांपासून विपुल धान्य पिकते आणि बियाण्याचा कधीही तुटवडा होत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वतःला आणि इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)
२ उ. वृक्षारोपण
अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात, तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.’
– सूक्ष्म जगतातील ‘ब्रह्मतत्त्व’, ८.५.२००५, सायंकाळी ४.४४
२ ऊ. हळदीकुंकू

हळदीकुंकू
‘स्त्रियांसाठी अक्षय तृतीया हा दिवस महत्त्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी त्यांना विसर्जन करायचे असते. त्यानिमित्त त्या हळदीकुंकूही करतात.’
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
३. आपत्काळात धर्माचरण कसे कराल ?
हिंदु धर्माने आपत्काळासाठी धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात. आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे आपदेत (आपत्तीत) आचरण्याचा धर्म. या काळात, संपत्कालात सांगितलेल्या काही धार्मिक कृती करता येत नाहीत. या दृष्टीने धर्माचरण म्हणून काय करता येऊ शकेल, याचा विचारही करण्यात आला आहे. येथे महत्त्वाचे सूत्र असे की, हिंदु धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे, हे शिकायला मिळते. यातून हिंदु धर्माचे एकमेवाद्वितियत्व अधोरेखित होते.
अक्षय्य तृतीया हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. या तिथीला हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते. या कालमाहात्म्यामुळे या तिथीस पवित्र स्नान, दान यांसारखी धर्मकृत्ये केल्यास त्यांच्यामुळे आध्यात्मिक लाभ होतो. या तिथीस देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते. (संदर्भ : मदनरत्न)
आपत्कालात आपण घराबाहेर जाऊ शकत नाही. त्या अनुषंगाने आपद्धर्माचा भाग म्हणून पुढील कृती करता येतील.
१. पवित्र स्नान : आपण घरातच गंगेचे स्मरण करून स्नान केल्यास गंगास्नानाचा आपल्याला लाभ होईल. यासाठी पुढील श्लोक म्हणून स्नान करावे.
गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती |
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु ||
२. सत्पात्रे दान : सध्या विविध ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहेत. तरी अध्यात्मप्रसार करणारे संत अथवा अशा संस्थांना आपण ऑनलाइन अर्पण करू शकतो. घरूनच अर्पण दिले जाऊ शकते.
३. उदकुंभाचे दान : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उदकुंभ दान करावे, असे शास्त्र आहे. या दिवशी हे दान करण्यासाठी बाहेर जाणे शक्य नसल्याने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दानाचा संकल्प करावा आणि शासकीय नियमांनुसार जेव्हा बाहेर जाणे शक्य असेल, तेव्हाच दान करावे.
४. पितृतर्पण : पितरांना प्रार्थना करून घरूनच पितृतर्पण करता येईल.
५. कुलाचारानुसार अक्षय्य तृतियेला करण्यात येणार्या धार्मिक कृती : वरील कृतींव्यतिरिक्त कुलाचारानुसार अक्षय्य तृतीयेला आपण अन्य काही धार्मिक कृती करत असाल, तर त्या आपत्कालातील शासकीय नियमांत बसणाऱ्या आहेत ना, हे पहावे.
All is very informative.
Thank you for giving opportunity to understand our rituals.
तीळ तर्पण स्त्रियांनी केले तर चालते का?
नमस्कार,
स्त्रियांनी तीळ तर्पण करू नये.
Great information for us…