पावसाळा आणि दूध

१. दूध पौष्टिक असले, तरी पचले नाही, तर त्रासदायक ठरणे

‘दूध’ हा पृथ्वी आणि आप या महाभूतांचे प्राधान्य असलेला एक पौष्टिक आहार आहे. ही दोन्ही महाभूते अग्नीच्या विरुद्ध गुणधर्माची, म्हणजेच अग्नी मंद करणारी आहेत. पावसाळ्यात शरिरातील अग्नी (पचनशक्ती) मंद असतो. असा अग्नी काही वेळा दूध पचवण्यास असमर्थ ठरतो. दूध कितीही चांगले असले, तरी ते पचले नाही, तर शरिराला त्रासदायकच ठरते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत सकाळी उठल्या उठल्या दूध किंवा दूध घातलेला चहा किंवा कशाय पिणे टाळावे. पालक आपल्या पाल्यांना सकाळी शाळेत जायच्या वेळेस दूध देतात. तेही टाळायला हवे. काही जण वैद्यांनी दुधातून औषध घेण्यास सांगितले आहे, म्हणून सकाळी उठल्या उठल्या दूध घेतात. अशांनी ‘पावसाळ्याच्या दिवसांत ते चालू ठेवायचे कि नाही’, हे आपल्या वैद्यांना विचारून घ्यायला हवे.

 

२. दूध कधी प्यावे ?

वैद्य मेघराज पराडकर

‘सकाळी लवकर उठून शौचाला साफ झालेले आहे. व्यायाम झालेला आहे. अंघोळ करून शरीर हलके वाटत आहे. आकाश निरभ्र आहे आणि चांगली भूक लागलेली आहे’, अशी स्थिती निर्माण झाल्यावर दूध प्यावे. या वेळी १ – २ कप दुधामध्ये २ चमचे तूप घालून प्यायल्यास ते शरिराला अमृताप्रमाणे उपकारक ठरते. वयोवृद्धांसाठी तर हे सर्वश्रेष्ठ औषध आहे; परंतु अशी शरीरस्थिती पावसाळ्यामध्ये फार अल्प जणांमध्ये आढळते. त्यामुळे पावसाळ्यात अशी स्थिती नसल्यास दूध पिणे टाळावे. हिवाळ्यात अग्नी (पचनशक्ती) प्रबळ असल्याने अशी शरीरस्थिती सहज निर्माण होते. त्या वेळी दूध प्यावे. दुधासह मीठ असलेले पदार्थ खाऊ नयेत. बहुतेक सर्वच पदार्थांमध्ये मीठ असतेच. त्यामुळे दूध प्यायल्यावर निदान एक घंटा काही खाऊपिऊ नये.

 

३. पावसाळ्यात दुधाला पर्याय

पावसाळ्यात पौष्टिक आहार म्हणून दुधाऐवजी सुकामेवा, शेंगदाणे किंवा फुटाणे खावेत. हे जेवणानंतर लगेच अल्प प्रमाणात खावेत. तूप, दही आणि ताक हे दुग्धजन्य पदार्थ जेवतांना भुकेच्या प्रमाणात सेवन करावेत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.७.२०२२)

Leave a Comment