उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी कशी घ्याल ?

Article also available in :

वैद्य मेघराज पराडकर

१. सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे २-२ थेंब नाकात घालावेत. याला नस्य असे म्हणतात. यामुळे डोके आणि डोळ्यांतील उष्णतेचे शमन होते.

२. खमंग, कोरडे, शिळे, खारट, अती तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, तसेच आमचूर, लोणचे, चिंच इत्यादी आंबट, कडू आणि तुरट रसाचे पदार्थ खाणे टाळावे.

३. शीतपेये (कोल्डड्रिंक्स), आईस्क्रीम, टिकण्यासाठी रसायने वापरलेले फळांचे डबाबंद रस यांचे सेवन करू नये. हे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात. यांच्या अतीसेवनामुळे रक्तधातू दूषित होऊन त्वचारोग होतात.

४. कैरी उकडून बनवलेले गोड पन्हे, पाण्यात लिंबाचा रस आणि साखर घालून बनवलेले सरबत, जिर्‍याचे सरबत, शहाळ्याचे पाणी, फळांचा ताजा रस, दूध घालून केलेली तांदुळाची खीर, गुलकंद इत्यादी थंड आणि द्रव पदार्थांपैकी जे शक्य आणि उपलब्ध होईल ते आहारात असावे. यामुळे सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून शरिराचे रक्षण होण्यास साहाय्य होते.

५. या दिवसांत तहान खूप लागत असल्यामुळे तहान भागेल एवढे पाणी प्यावे.

६. या दिवसांत सैलसर सुती कपडे वापरावेत आणि केसांची स्वच्छता राखावी. प्लास्टिकची पादत्राणे वापरू नयेत.

७. कडक उन्हात जायचे असेल, तर पाणी पिऊन जावे. डोके आणि डोळे यांचे उन्हापासून रक्षण होण्यासाठी टोपी आणि गॉगल यांचा वापर करावा.

८. उष्ण वातावरणातून थंड वातावरणात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. १०-१५ मिनिटांनंतरच पाणी प्यावे.

९. या दिवसांत शीतकपाट किंवा कूलर यांमधील थंड पाणी प्यायल्याने घसा, दात आणि आतडे यांवर दुष्परिणाम होतो; म्हणून साधे अथवा माठातील पाणी प्यावे.

१०. वाळ्याच्या मुळांच्या दोन जुड्या समवेत ठेवाव्यात. एक जुडी पिण्याच्या पाण्यामध्ये घालावी आणि दुसरी उन्हात वाळत ठेवावी. दुसर्‍या दिवशी उन्हात वाळवलेली जुडी पिण्याच्या पाण्यात आणि पाण्यातील जुडी उन्हात ठेवावी. याप्रमाणे प्रतिदिन करावे. हे वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकार दूर करणारे आहे.

११. अधिक व्यायाम, अधिक परिश्रम, अधिक उपवास, उन्हात फिरणे आणि तहान-भूक रोखून धरणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात.

१२. जळवात (पायांना भेगा पडणे) आणि उष्णता यांचा त्रास होत असल्यास हातापायांना मेंदी लावावी.

१३. मैथुन करणे टाळावे. करायचे झाल्यास १५ दिवसांतून एकदा करावे.

१४. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी सूर्योदयानंतरही झोपून रहाणे टाळावे.

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(८.४.२०१४)

 उन्हाळ्यात उद्भवणार्‍या आरोग्यासंबंधीच्या समस्या आणि त्यांवरील उपाय

१. अशक्तपणा

अ. सातूच्या (जवांच्या) पिठात तूप आणि खडीसाखर किंवा आमरसात तूप अन् वेलची मिसळून    प्यायल्याने अशक्तपणा येत नाही.

आ. रात्री दुधात तूप मिसळून पिणेसुद्धा लाभदायी आहे.

इ. एकसारखा थकवा येत असल्यास दूधभात जेवावा.

२. जास्त तहान लागणे आणि अस्वस्थपणा

अ. धने, बडिशेप आणि खडीसाखर यांची समभाग पूड करून ठेवावी. यातील १ चमचा मिश्रण १ पेला पाण्यात घंटाभर भिजत ठेवावे आणि त्यानंतर ढवळून प्यावे. यामुळे उष्णतेच्या विकारांमध्येही लाभ होतो.

आ. शहाळ्याचे पाणी, सरबत, उसाचा रस, पन्हे, बेलफळाचे सरबत इत्यादींनी लगेच लाभ होतो. यामुळे उन्हामुळे होणारी जळजळ शांत होते. कृत्रिम शीतपेये प्यायल्याने क्षणिक सुख मिळाले, तरी त्यांच्यामुळे शरिरातील उष्णता वाढते आणि इतर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात.

३. अतीसार (जुलाब होणे)

दह्याच्या वरचे पाणी २ चमचे प्यायल्याने लगेच आराम मिळतो.

४. उन्हाच्या झळा लागणे

अ. शरिराला कांद्याचा रस लावावा.

आ. कैरीचे पन्हे प्यावे.

५. चक्कर येणे

डोक्यावर आणि तोंडवळ्यावर लगेच थंड पाण्याचे हबके मारावेत, तसेच थंड आणि पातळ पदार्थ प्यायला द्यावेत.

६. उकडणे

अ. कपभर दुधात चमचाभर गुलकंद घालून ते प्यावे.

आ. मोरावळा, सातू (जवांचे पीठ), लोणी – खडीसाखर, साखर घालून कोहळ्याचा रस, हे पदार्थ लाभदायी आहेत.

७. लघवीच्या वेळी जळजळ होणे

अ. उष्णतेमुळे लघवीच्या वेळी जळजळ होत असल्यास कापलेल्या काकडीवर खडीसाखरेचे चूर्ण पेरून वरून लिंबू पिळून ती खावी.

आ. १ पेला काकडीच्या रसात पाव लिंबू पिळून त्यात अर्धा चमचा जिर्‍याची पूड घालून प्यावे.

उन्हाळ्यात काय करावे ? आणि काय करू नये ?

उन्हाळ्यातील आहारात गोड, पचायला हलके, स्निग्ध, शीत आणि पातळ पदार्थ असावेत. खरबूज, टरबूज, मोसंबी, संत्री, केळी, गोड आंबे, गोड द्राक्षे, बेलफळे, ऊस, ताजे नारळ किंवा शहाळी, लिंबू यांसारखी फळे खावीत. पडवळ, कोहळा, पुदिना, कोथिंबीर या भाज्या आहारात असाव्यात. गायीचे दूध आणि तूप घ्यावे. सरबत, पन्हे, सातू (जवांचे पीठ) इत्यादींचे सेवन हितकर आहे. रणरणत्या उन्हात फिरणे, रात्री उशिरा आणि अधिक भोजन करणे टाळावे.

(संदर्भ : मासिक ऋषी प्रसाद, एप्रिल २०१५)

Leave a Comment