वसंत ऋतूत चांगले आरोग्य कसे राखाल ?

Article also available in :

प्रत्यक्ष ईश्‍वराने सृष्टीच्या रचनेच्या वेळी आयुर्वेदाची निर्मिती केली; म्हणून आयुर्वेदाचे सिद्धांत विश्‍वाच्या आरंभापासून अबाधित आहेत. युगानुयुगे प्रतिवर्षी तेच ऋतू येत आहेत आणि आयुर्वेदाने सांगितलेली ऋतूचर्याही तीच आहे. यावरूनच सतत पालटणार्‍या अ‍ॅलोपॅथीपेक्षा चिरतरुण आयुर्वेद किती महान आहे, हे लक्षात येईल. आजच्या लेखातून आपण वसंत ऋतूत पाळायचे आरोग्यनियम समजून घेऊ. 

 

१. वैद्यांचा ‘पिता’ वसंत !

‘दक्षिणायनामध्ये भारतापासून दूर गेलेला सूर्य हिवाळ्याच्या शेवटी भारताच्या जवळ येऊ लागल्यावर हिमालयावरील बर्फ हळू हळू पातळ होऊ लागतो. त्याप्रमाणेच थंडीच्या दिवसांत शरिरात साठलेला कफ सूर्याच्या किरणांमुळे पातळ होऊ लागतो. थंडी संपल्यापासून प्रखर उन्हाळा चालू होण्यापर्यंतचा काळ म्हणजे वसंत ऋतू. ‘चैत्र – वैशाख वसंत ऋतू’, असे आपण शाळेत शिकलो असलो, तरी ‘आजच्या प्रदूषणामुळे साधारण १५ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंतच वसंत ऋतू असतो’, असे म्हणावे लागेल. या दिवसांत वाढलेल्या कफामुळे सर्दी, खोकला, ताप, दमा यांसारखे विकार बळावतात. या दिवसांत रोगांचे प्रमाण थंडीच्या दिवसांपेक्षा जास्त असते; म्हणून ‘वैद्यानां शारदी माता पिता च कुसुमाकरः ।’ म्हणजे ‘शरद ऋतू ही वैद्यांची आई, तर वसंत ऋतू हे वैद्यांचे वडील होत’, असे गंमतीत म्हटले जाते.

 

२. कफ संतुलित ठेवण्यासाठी वसंत ऋतुचर्या !

कफ हा स्निग्ध (चिकटसर), थंड आणि गुरु (जड) या गुणांचा असल्याने वसंत ऋतूमध्ये आपल्या आहारातून, तसेच आचरणातून हे गुण न वाढता ते संतुलित रहातील अशी व्यवस्था, म्हणजे वसंत ऋतूचर्या.

 

३. कफाचा ‘निर्माता’ पाणी !

कफ या शब्दाची व्याख्याच मुळी ‘केन फलति इति कफः ।’ अशी आहे. ‘क’ म्हणजे ‘पाणी’. पाण्याने फलित म्हणजे निर्माण होतो, तो कफ. यासाठी या दिवसांत पिण्याच्या पाण्यामध्ये प्रतिलिटर पाव चमचा सुंठ किंवा नागरमोथा यांचे चूर्ण घालून प्यायल्यास कफ वाढत नाही. उष्णतेचा त्रास असणार्‍यांनी सुंठीपेक्षा नागरमोथ्याचे चूर्ण वापरावे.

 

४. गोड नको, कडू… !

गोड आणि आंबट पदार्थ जास्त खाऊ नयेत. या ऋतूच्या आरंभीचे १५ दिवस प्रतिदिन कडुनिंबाची ४ – ५ कोवळी पाने खावीत, म्हणजे उत्तम आरोग्यरक्षण होते. गुढीपाडव्याला गुढी उभारतांना कडुनिंबाची पाने वापरतात, त्याला हेही एक कारण आहे.

 

५. कफनाशक कडधान्ये

कडधान्याला आयुर्वेदात ‘शिंबी धान्य’ असे म्हटले आहे. याचे गुण सांगतांना आचार्य म्हणतात, ‘मेदःश्‍लेष्मास्रपित्तेषु हितं लेपोपसेकयोः ।’ म्हणजे ‘कडधान्य हे अनावश्यक मेद आणि कफ न्यून करण्यासाठी, तसेच रक्त अन् पित्त यांना लाभदायक आहे. कडधान्याच्या पिठाचा वापर उटण्यासारखा करणेही हिताचे आहे.’ ज्यांना कडधान्ये पचत नाहीत त्यांनी मूग आणि मसूर ही कडधान्ये आहारात ठेवावीत; कारण ही कडधान्ये पचण्यास हलकी आहेत.

 

६. तेलकट नको !

स्निग्ध (तेलकट) पदार्थांमुळे कफ वाढत असल्याने, असे पदार्थ अल्प प्रमाणात खावेत.

 

७. धान्य जुने किंवा भाजलेले असावे

‘नवं धान्यमभिष्यन्दि लघु संवत्सरोषितम् ।’ म्हणजे ‘नवीन धान्य शरिरातील स्राव (कफ) वाढवणारे आणि पचण्यास जड असते, तर एक वर्ष जुने धान्य त्याच्या विरुद्ध धर्माचे म्हणजे पचण्यास हलके असते’, असे आयुर्वेदात सांगितले आहे. कफ वाढू नये आणि वाढलेला कफ न्यून व्हावा, यासाठी असे धान्य खावे. जुने धान्य न मिळाल्यास नवीन धान्य भाजून वापरल्यासही तोच लाभ होतो.

 

८. व्यायाम करा !

व्यायामामुळे कफ न्यून होतो. यासाठी वसंत ऋतूमध्ये अर्धशक्तीने व्यायाम करावा, असे शास्त्रात सांगितले आहे. व्यायाम करतांना तोंडाने श्‍वास घेण्याची आवश्यकता भासू लागली, म्हणजे अर्धी शक्ती वापरली गेली, असे समजावे. थांबून थांबून अर्धा किंवा १ घंटा प्रतिदिन व्यायाम करावा.

 

९. दिवसा झोपणे वर्ज्य !

‘रात्रौ जागरणं रूक्षं स्निग्धं प्रस्वपनं दिवा ।’ म्हणजे ‘रात्री जागरण केल्याने शरिरामध्ये रूक्षता, तर दिवसा झोपल्याने स्निग्धता वाढते.’ दिवसा झोपल्याने शरिरात अनावश्यक स्राव निर्माण होतात आणि त्यामुळे घशाकडे कफ येणे, अंग जड होणे, बुद्धी मंदावणे यांसारखे विकार होतात. वसंत ऋतूमध्ये दुपारी झोपणे टाळावे. वयस्क, रुग्णाइत आणि पुष्कळ थकवा असलेल्या व्यक्तींनी दुपारी झोपले, तरी चालते.

 

१०. कफावरील सर्वश्रेष्ठ औषध – मध !

मध हे कफावरील सर्वश्रेष्ठ औषध आहे. या ऋतूत होणार्‍या सर्दी-खोकल्यावर थोड्या थोड्या वेळाने मध चाटावा. दिवसभरात ५ – ६ चमच्यांपर्यंतच मध खावा.

 

११. आनंदी रहा !

वसंत ऋतू हा आनंदात वाढ करणारा ऋतू आहे. या ऋतूत कोकीळ आपल्या गायनाला आरंभ करतो. झाडे नव्या पालवीने बहरलेली असतात. गुढीपाडवा, रामनवमी यांसारखे सण, उत्सव याच ऋतूत येतात. आनंदी रहाण्याने आरोग्य लाभते आणि आरोग्यलाभाने आनंद होतो, म्हणून नेहमी आनंदी रहावे.

या ऋतूत सांगितलेले नियम पाळून सर्वांना साधनेसाठी चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांच्या आनंदात वाढ व्हावी, ही भगवान धन्वंतरीच्या चरणी प्रार्थना !’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment