गुरु-शिष्य नात्यातील वीण घट्ट करणारा कृतज्ञताभाव !

Article also available in :

‘पूर्वी एखाद्याने मला व्यवहारामध्ये साहाय्य केले किंवा माझ्यावर उपकार केले, तर मी केवळ औपचारिकता म्हणून ‘मी आपला आभारी आहे (‘थँक यू’), मी आपला ऋणी आहे किंवा मी आपले उपकार कसे फेडू ?’, असे वरवरचे बोलून तो विषय सोडून देत असे. कधी कधी माझ्या मनात ‘मी इतरांचे आभार मानले आहेत’ किंवा ‘मी दुसर्‍यासाठी काहीतरी केले आहे; म्हणून मीच दुसर्‍यावर उपकार केले आहेत’, असा अहंयुक्त विचार असायचा. त्यामुळे माझ्यातील कर्तेपणा, अपेक्षा करणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे इत्यादी अहंचे पैलू सतत उफाळून यायचे. परिणामी त्या प्रत्येक व्यक्तीशी माझा देवाण-घेवाण हिशोब (प्रारब्ध) वाढत रहायचा. त्यामुळे मी भवसागरातील सुख-दुःखाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात होतो. वर्ष १९८९ मध्ये माझ्या वयाच्या ४३ व्या वर्षी माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याशी भेट झाल्यावर हे गणित हळूहळू सुटू लागले. त्यांच्यामुळे मला ठाऊक नसलेल्या ‘कृतज्ञता’ (ग्रॅटिट्यूड) या शब्दातील भाव हळूहळू उलगडत गेले. त्याविषयी मी येथे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

 

१. ‘कृतज्ञतेची भावना माणसाच्या शारीरिक आणि
मानसिक संतुलनाला साहाय्य करणारी आहे’, हे प्रयोगांती सिद्ध होणे

‘ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यात मिळणार्‍या गोष्टी आणि आशीर्वाद यांची मनापासून अंतर्मनात नोंद ठेवतात अन् त्याविषयी कुठे तरी कुणापाशी त्या भावना व्यक्त करतात, त्या अधिक आशावादी, उत्साही, निश्चयी आणि श्रद्धावान असतात’, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. तसेच अशा व्यक्तींचे मानसिक आरोग्यही उच्च प्रतीचे असते. एका प्रयोगात दोन गटांना त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांविषयी काही नोंदी करायला सांगितल्या. एका गटाला ‘कृतज्ञता’ वाटू शकणार्‍या प्रसंगांचे स्मरण करायला सांगितले, तर दुसर्‍या गटाला ज्या प्रसंगांमुळे त्यांना निराशा आली होती, अशा प्रसंगांचे स्मरण करायला सांगितले गेले. त्या दोन्ही गटांतील सदस्यांच्या मेंदूतील लहरी (ई.सी.जी.) आणि हृदयाचे ठोके यंत्राच्या साहाय्याने तपासले. त्यात पहिल्या गटातील, म्हणजे कृतज्ञता वाटणारे लोक अधिक चांगले असल्याचे लक्षात आले. थोडक्यात ‘कृतज्ञतेची भावना आपल्या शारीरिक आणि मानसिक संतुलनालाही साहाय्य करते’, असे यातून दिसून आले.

पू. शिवाजी वटकर

 

२. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती असून त्यांना सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व असणे

कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती असू शकतात. काही पद्धती प्रत्यक्ष, तर काही अप्रत्यक्ष असतात. सनातन संस्कृतीत सहस्रो वर्षांपासून कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून अनेक विशेष परंपरा, संस्कार आणि विधी केले जातात. ‘तर्पण’ किंवा ‘श्राद्ध’ हे त्याचेच एक उदाहरण आहे. त्यात धर्माचरणाच्या समवेतच कृतज्ञतेचा भावही सामावलेला आहे; पण दुर्दैवाने भारतियांनी पाश्चिमात्य संस्कृती अंगीकारल्यामुळे त्याचा मूळ उद्देश नाहीसा होत आहे. काही ठिकाणी केवळ उपचारांचे कर्मकांड शिल्लक राहिले आहे. प्रत्यक्षात पूर्वजांची पुण्याई आणि आशीर्वाद यांमुळे त्यांच्या पुढच्या पिढीला जगण्यासाठी बळ मिळते. यासाठी त्यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. ‘पूर्वजांच्या अडकलेल्या लिंगदेहाला मुक्ती मिळावी’, यांसाठी काही विधी करणे, म्हणजे श्राद्धविधी !

समाजाला याविषयीचे शास्त्र सांगून श्राद्धविधी करायला प्रेरित करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

 

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेल्या
कृतज्ञतेच्या जाणिवेने जीवनात सकारात्मकता, सहजता आणि आनंद निर्माण होणे

‘कृतज्ञता’ ही चित्त शुद्ध आणि विशाल करणारी वृत्ती अन् कृती आहे’, असे मला वाटते. जेव्हा माझ्या मनात निराशेचे ढग दाटून येतात, ‘मी हरलो कि काय ?’, असे मला वाटते किंवा एकटे पडल्याची जाणीव माझे मन पोखरू लागते, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला आयुष्यभर कळत-नकळत दिलेले असंख्य आशीर्वाद, शिकवण, संधी आणि उपलब्धी यांचे स्मरण होते. ‘त्यांनी माझ्या झोळीत भरभरून घातले आहे आणि ते संपता संपत नाही’, या कृतज्ञतेच्या जाणिवेने माझ्या जीवनात सकारात्मकता, सहजता अन् आनंद निर्माण झाला आहे.

 

४. कृतज्ञताभाव हा मन आणि बुद्धी यांचा लय होऊन
आत्मानंद मिळण्यासाठी ईश्वराकडून मिळालेली एक महत्त्वाची देणगी असणे

‘कृतज्ञता’ हा शब्द म्हणजे कुणी माझ्यासाठी काहीतरी उपकार केल्यावर उत्स्फूर्तपणे व्यक्त करण्याची भावना आहे. प्रत्यक्षात ईश्वरच सर्वांसाठी सर्वकाही करत असतो. माझा ईश्वर आणि सर्वेसर्वा परात्पर गुरु डॉ. आठवले हेच आहेत. प्रत्येक प्रसंगात मी त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव व्यक्त केल्यामुळे माझे मन आणि बुद्धी यांचा लय होऊन मला आत्मानंद मिळत आहे. यामुळे ‘कृतज्ञताभाव म्हणजे मन आणि बुद्धी यांचा लय होऊन आत्मानंद मिळण्यासाठी ईश्वराकडून मिळालेली एक महत्त्वाची देणगी आहे’, असे मला जाणवते.

 

५. कृतज्ञताभाव हे केवळ जीवनमूल्य नसून
गुरु-शिष्य या अतूट नात्यांची वीण पक्की करणारे साधन असणे

कृतज्ञतेच्या जाणिवेने माझ्यातील कर्तेपणा, नकारात्मक विचार, भावना यांसह माझ्यातील असंख्य स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंवर मात करण्यास साहाय्य होते. कृतज्ञतेची जाणीव मला ‘मी’पणाच्या पुढे घेऊन जाणारे साधन आहे. त्यामुळे माझ्यातील नम्रता, निर्मळता आणि प्रीती या गुणांमध्ये भर पडत आहे. कृतज्ञतेची वृत्ती हे माझ्यासाठी केवळ जीवनमूल्य नाही, तर ती माझी आत्मशक्तीही आहे. कृतज्ञताभाव म्हणजे ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि साधक यांच्यातील गुरु-शिष्य या अतूट नात्यांची वीण पक्की करणारे अनमोल साधन आहे’, असे मला जाणवते.

 

६. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वकाही देऊन मला मोक्षाकडे
घेऊन जात आहेत’, या जाणिवेने सतत कृतज्ञताभावात रहाता येणे

‘कृतज्ञता’ या शब्दापासून निर्माण झालेला स्पर्श, रस, गंध आणि शक्ती मला आपोआपच लीन करतात. ती जाणीव मला दुसर्‍यांची कृती आणि विचार यांचा आदर करायला शिकवते. दैनंदिन जीवनात मला किती तरी गोष्टी इतरांकडून न मागता आणि सहजपणे मिळतात. मी नकळत त्या गृहित धरलेल्या असतात. त्यामुळे मला त्यांचे मूल्य कळत नाही. अगदी प्रतिदिन मिळणार्‍या सूर्यप्रकाशापासून ते माझ्या आयुष्याला अर्थ देणार्‍या असंख्य गोष्टी मला ओळखीच्या आणि अनोळखी असलेल्या असंख्य लोकांकडून अन् सृष्टीकडून मिळतात. परात्पर गुरु डॉ. आठवले मला माझ्या मागील अनंत जन्मांपासून आणि या जन्मातही सर्वकाही देत असून ते मला मोक्षाकडे नेत आहेत. जे कुणीही देऊ शकत नाही किंवा जे मिळण्याचा मी विचारही करू शकत नाही, ते सर्व मला परात्पर गुरु डॉक्टर भरभरून देत आहेत. या निरंतर जाणिवेने आणि त्यांच्याच कृपेने माझ्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना अखंड रहाते.

 

७. कृतज्ञता

व्यक्ती, देश, धर्म, कर्म आणि साधना यांसाठी मला परात्पर गुरु डॉक्टरांनी कृतज्ञताभावाचे महत्त्व शिकवले आणि तो कृतज्ञताभाव अनुभवण्यास अन् व्यक्त करण्यास पात्र केले. त्यासाठी मला म्हणावेसे वाटते,

‘जीवन जगण्या पावलोपावली नाम घेतो मी श्रीहरीचे ।
कृतज्ञतेने श्वासोच्छ्वासी सहज स्मरण होते गुरुमाऊलीचे ।।

वरील विवेचन म्हणजे मी अनुभवलेल्या अनेक प्रसंगांतून मला शिकायला मिळालेले अल्पसे सार आहे. शेवटी मला एवढेच सांगावेसे वाटते, ‘सांप्रतकाळी साधकांसाठी ‘कृतज्ञताभाव’ व्यक्त करण्याचे सर्वाेच्च श्रद्धास्थान म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले’, हेच आहेत. मी त्यांच्या चरणी सदैव नतमस्तक होऊन कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 

1 thought on “गुरु-शिष्य नात्यातील वीण घट्ट करणारा कृतज्ञताभाव !”

  1. सर्व गुरु कुपा आहे बाक़ी सर्व शुन्य आहे गूरू कुपा केवलम
    शिष्य परम मंगलम बस सर्व गूरु चया हातात आहे जय गुरुदेव धन्य हो

    Reply

Leave a Comment