श्रद्धा आणि संत वचनावरील दृढ विश्वास यांमुळे भगवंताचे दर्शन होणे

‘एका जंगलात एक संत त्यांची कुटी बनवून रहात होते. एक किरात (शिकारी) जेव्हाही तेथून जायचा, त्या संतांना नेहमी नमस्कार करायचा. एक दिवस तो किरात संतांना म्हणाला, ‘‘बाबा, मी तर मृगाची (हरिणाची) शिकार करतो. तुम्ही कुणाची शिकार करण्यासाठी येथे बसले आहात ?’’ संत म्हणाले, ‘‘श्रीकृष्णाची !’’ आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. किरात म्हणाला, ‘‘बाबा, तुम्ही का रडत आहात ? मला सांगा तो दिसतो कसा ? मी त्याला पकडून आणतो.’’ संतांनी भगवान श्रीकृष्णाचे मनोहारी वर्णन करून किराताला सांगितले, ‘‘तो सावळा आहे, मस्तकावर मोरपीस लावतो, बासरी वाजवतो.’’

किरात म्हणाला, ‘‘बाबा, जोपर्यंत मी तुमची शिकार पकडून आणणार नाही, तोपर्यंत मी पाणीही पिणार नाही.’’ त्यानंतर तो एका ठिकाणी जाळे पसरवून बसला. प्रतीक्षा करता करता ३ दिवस निघून गेले. दयाघन भगवंताला किरातची दया आली. श्रीकृष्ण बासरी वाजवत आला आणि स्वत:च त्या जाळ्यात फसला. श्रीकृष्णाचे ते रूप पाहून किरात स्वत:च त्यांच्या मोहनी रूपात अडकला. एकटक श्यामसुंदराला न्याहाळता न्याहाळता त्याच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले, तो स्वत:चे अस्तित्व विसरला. त्याची चेतना जागृत झाली, तेव्हा तो जोरजोराने ओरडायला लागला, ‘शिकार मिळाली’, ‘शिकार मिळाली’, ‘शिकार मिळाली.’

श्रीकृष्ण त्याच्याकडे मंद स्मितहास्य करत पहात होता. किरात श्रीकृष्णाला शिकारीसारखे खांद्यावर घेऊन संतांकडे घेऊन आला. श्रीकृष्ण जाळ्यामध्ये स्मित हास्य करत असल्याचे दृश्य पाहून संतांचे भान हरपले. त्यांनी किरातच्या पाया पडून लोटांगण घातले. ते श्रीकृष्णाला कातर स्वरात म्हणाले, ‘‘हे नाथ, मी लहानपणापासून एवढे प्रयत्न केले. तुम्हाला प्राप्त करण्यासाठी घरदार सोडले, भजन केले. तुम्ही भेटले नाही आणि याला केवळ ३ दिवसांत भेटलात.’’ भगवंत म्हणाले, ‘‘याचे तुमच्या प्रती असलेले निस्सीम प्रेम आणि दिलेल्या वचनावरील दृढ विश्वास पाहून मला याच्या जवळ येण्यापासून रहावले नाही.’’ भगवंत तर भक्त अर्थात् संत यांच्या अधीन असतो. किरातला ‘भगवंत काय असतो ?’, हेही ठाऊक नव्हते; परंतु तो संतांना प्रतिदिन नमस्कार करायचा. संतांना नमस्कार करणे आणि संतदर्शन यांचे फळ आहे की, त्याला ३ दिवसांत भगवंताचे दर्शन झाले.

– प्रेषक : श्री. विजय अनंत आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment