भोळ्याभावाच्या माध्यमातून भक्तीचे रहस्य अनुभवणारे ईश्वरपूर (सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

सावत्या माळ्याने प्रेमभक्तीने लाविला विठ्ठलभक्तीचा मळा ।
पू. नरुटेकाका यांनी भोळ्याभावाने लाविला विठ्ठलाला लळा ।।

डावीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, पू. राजाराम भाऊ नरुटे, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. पृथ्वीराज हजारे

 

भावसोहळ्यात अशी झाली आनंददायी घोषणा !

पू. राजाराम नरुटे यांचा सन्मान करतांना पू. पृथ्वीराज हजारे

१. आरंभी सनातनच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी ‘गुरुदेव आपल्यावर किती कृपा करत आहेत’, हे एका भावप्रयोगातून सर्वांना अनुभवण्यास सांगितले.

२. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना व्यासपिठावर येण्याची प्रार्थना केली, तसेच श्री. राजाराम भाऊ नरुटे यांनाही व्यासपिठावर आसन ग्रहण करण्याची विनंती केली.

३. यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री. नरुटेकाका यांना ‘तुम्ही कशा प्रकारे साधना केली ?’, ‘आश्रमात आल्यानंतर तुम्हाला कोणत्या अनुभूती आल्या ?’ आदी प्रश्न विचारले. श्री. नरुटेकाका यांच्या ज्ञान अन् भक्ती यांनी ओतप्रोत भरलेल्या उत्स्फूर्त उत्तरांतून त्यांच्यातील एकेका दैवी गुणाचा अलौकिक भावसुगंध सर्वत्र दरवळू लागला.

४. या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री. नरुटेकाका यांच्यातील उत्स्फूर्त बोलण्याच्या संदर्भात सांगितले, ‘साधना ही अंतरात्म्यातून होत असते. काकांची आध्यात्मिक वाटचाल योग्य दिशेने चालू असल्यानेच ते सांगत असलेले ज्ञान त्यांनी कुठेही वाचलेले नसतांनाही ते सांगू शकत आहेत.’

५. त्यानंतर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि काही साधक यांनी त्यांना श्री. नरुटेकाका यांच्या बोलण्याच्या संदर्भात लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे सांगितली.

६. या प्रसंगी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री. नरुटेकाका यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद प्राप्त केल्याची भावपूर्ण घोषणा केली. भोळ्या भावाने भक्तीचे रहस्य उलगडून ती अनुभवणारे नरुटेकाका संतपदी विराजमान झाले. या वेळी उपस्थित साधकांची पुष्कळ भावजागृती झाली. पू. नरुटेकाका मात्र स्थिर होते. त्यांचे डोळे पाणावले होते.

७. यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. नरुटेकाका यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेला संदेश वाचून दाखवला.

८. त्यानंतर सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी पू. नरुटेकाका यांना पुष्पहार घालून अन् शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा भावपूर्ण सन्मान केला. या वेळी पू. हजारेकाका, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. नरुटेकाका यांच्या चरणी भावपूर्ण नमस्कार केला.

 

पू. राजाराम भाऊ नरुटे यांनी व्यक्त केले ज्ञानमय अन् भक्तीमय मनोगत !

पू. राजाराम भाऊ नरुटे

‘आपले (भक्ताचे) रूप आणि त्यांचे (गुरु अथवा भगवंत यांचे) रूप यांत काहीच भेद नाही. संत काय अन् भक्त काय ! ‘तुज आहे तुजपाशी । परि तू जागा चुकलासी ।।’, हे संत ज्ञानेश्वर यांचे वचन आहे. आत्मा हाच परमेश्वर आहे. भक्ती हीच आत्मशांती आहे.’

 

आनंदी, हसतमुख आणि भोळ्या भावाने
विठ्ठलभक्तीत रममाण झालेले ईश्वरपूर येथील
श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान !

परात्पर गुरु डॉ. आठवले

ईश्वरपूर येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) हे सनातनचे साधक श्री. शंकर नरुटे यांचे वडील असून ते ‘कलंकी केशव संप्रदाय’ आणि ‘वारकरी संप्रदाय’ या संप्रदायांनुसार साधना करतात. पहिल्यापासूनच त्यांना अध्यात्माची आवड आणि देवाची ओढ आहे. ते इतरांच्या शेतात पडेल ते कष्ट करायचे. शेतातील कामे करतांना जणू संत सावता माळी यांच्याप्रमाणेच ते विठ्ठलभक्तीत रंगून जायचे.

‘प्रपंचात राहून परमार्थ कसा साधायचा ?’ हे नरुटेकाकांच्या उदाहरणातून लक्षात येते. काकांची आंतरिक साधना अत्यंत चांगल्याप्रकारे चालू आहे. काका सहज जे बोलतात, ते अध्यात्माविषयीचे ज्ञानच असते. ईश्वराप्रती असलेल्या भोळ्या भावामुळे ते सर्वांना अध्यात्म आणि हिंदु धर्म यांच्याविषयी सांगत असतात.

स्वतः भक्तीमार्गानुसार आचरण करतांना त्यांनी सर्व मुलांवरही चांगले संस्कार केले. मुलांच्या मनात साधनेची आवड निर्माण केली. त्यांचा मुलगा शंकर पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात रहायला आल्यावर घरी अनेक अडचणी आल्या, तरीही त्यांनी मुलाला साधना सोडून घरी येण्यास कधी सांगितले नाही. उलट मुलाची साधना चांगली व्हावी, यासाठी सतत प्रोत्साहन दिले. श्री. शंकर नरुटे यांची आध्यात्मिक पातळी आता ६४ टक्के आहे, यामागे नरुटेकाकांचा वाटा पुष्कळ मोठा आहे. त्यांच्या पत्नी कै. (सौ.) शालन नरुटे यांची आध्यात्मिक पातळीही ६१ टक्के आहे.

खरेतर भगवंत केवळ भावाचाच भुकेला आहे. नरुटेकाकांचा भोळा भाव, निरपेक्ष प्रीती आणि ईश्वराशी असलेले अनुसंधान या सार्‍या गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती शीघ्र गतीने होत असून ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते आता संतपदी विराजमान झाले आहेत. पू. राजाराम भाऊ नरुटे यांची पुढील आध्यात्मिक प्रगती शीघ्र गतीने होईल, याची मला खात्री आहे.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

पू. नरुटेकाका यांचे ज्ञान आणि भक्ती यांचा सुरेख संगम दर्शवणारे उत्स्फूर्त कथन !

१. ‘शरीर नाशवंत आहे. मनुष्याच्या माध्यमातून आत्मा बोलतो’, याची जाणीव झाली की, आपली आध्यात्मिक उन्नती होते. आत्मा अमर आहे.

२. साधकांनी ‘प.पू. डॉक्टर पाठीशी आहेत. आत्म्या, पुढे चल’, असे म्हणत साधना केली पाहिजे. ‘भगवंता, तूच करतोस, मी नाही’, ही जाणीव हवी. आजपर्यंत मी कधीच व्यासपिठावरून बोलू शकलो नव्हतो. गुरुदेवांनी मला ज्ञान आणि शक्ती दिल्यानेच मला बोलण्याचे धैर्य प्राप्त झाले. गुरुविण सर्व व्यर्थ आहे.

३. प्रपंच, राजकारण आणि धर्मकार्य सर्व समान आहे. सर्वत्र भगवंताचे स्मरण असणे आवश्यक आहे.

 

सद्गुरु आणि संत यांनी पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्याविषयी व्यक्त केले मनोगत !

‘भक्ती, ज्ञान आणि त्याला कर्माची जोड’, असा सुरेख
त्रिवेणी संगम पू. काकांमध्ये पहावयास मिळतो ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘पू. नरुटेकाकांचे बोलणे ऐकतच रहावे, असे वाटते. त्यांच्या तोंडवळ्यावर वेगळेच तेज जाणवते. व्यावहारिक शिक्षण घेतलेले नसले, तरी त्यांच्या आत्मचैतन्यातून हे ओघवते चैतन्यदायी ज्ञान त्यांना येते. हेही त्यांच्यातील संतत्वच दर्शवते. ‘भक्ती, ज्ञान आणि त्याला कर्माची जोड’, असा सुरेख त्रिवेणी संगम पू. काकांमध्ये पहावयास मिळतो.

विठ्ठलाची अखंड भक्ती करणार्‍या पू. नरुटेकाकांना विठ्ठलाने स्वत:च या रामनाथीरूपी ‘भूवैकुंठी’ म्हणजेच पंढरपुरी आणले आणि येथे प.पू. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) त्यांच्यातील संतत्व उलगडले.’

पू. नरुटेकाका यांच्या माध्यमातून चैतन्यच बोलत आहे, असे जाणवले ! – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘पू. नरुटेकाका यांच्या माध्यमातून चैतन्यच बोलत आहे, असे जाणवले. आपण स्वत:ही ते अनुभवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्याने आपली आध्यात्मिक प्रगतीही सहजरित्या होऊ शकते. ही अनुभूती घेण्याची गोष्ट आहे. यात असत्य असे काहीच नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे.’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नरुटेकाकांना संत घोषित करतांना केलेले मार्गदर्शन

१. ‘मायेच्या शिक्षणातील ‘डिग्री’ (पदवी) मिळवण्यापेक्षा अध्यात्मातील सर्वोच्च ‘डिग्री’ म्हणजे ‘संतत्व’ गाठणे, हीच खरी ‘डिग्री’ आहे’, असे परात्पर गुरुदेवांनी आपल्याला सांगितले आहे. त्याप्रमाणेच काकांना व्यावहारिक शिक्षण नाही; परंतु अध्यात्माविषयी ते भरभरून बोलू शकतात. ‘खरे आत्मज्ञान हे साधनेनेच होऊ शकते’, हे काकांच्या बोलण्यातून आपल्याला शिकायला मिळते.

२. ‘ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतांनाच काया, वाचा आणि मनाने ईश्वरभक्ती करता येते’, हे अनेक संतांनी त्यांच्या उदाहरणांतून आपल्याला शिकवले आहे. आता श्री. राजाराम नरुटे यांच्या बोलण्यातूनही त्याचीच अनुभूती आली. काकांच्या अनुभवांतून ते काया, वाचा आणि मन यांद्वारे अखंड ईश्वराच्या अनुसंधानात असतात, हे आपल्याला शिकायला मिळाले.

३. त्यांचे हे सर्व ऐकतांना संत सावता माळी यांची आठवण झाली. संत सावता माळी हेही प्रपंचात राहून विठ्ठलभक्तीत रममाण असायचे. त्यांचे सर्व जीवन पूर्णपणे विठ्ठलमयच होते. विठ्ठलभक्तीने ओतप्रोत असलेला त्यांचा एक अभंगही आपल्याला ज्ञात आहे.

आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत ।
कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी ।
लसूण, मिरची, कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरि ।

संत सावता माळी प्रत्येक भाजीमध्ये विठ्ठलालाच अनुभवायचे आणि सतत भावावस्थेत असायचे. अनासक्त वृत्तीने त्यांनी त्यांची बुद्धीही ईश्वराला अर्पण केली होती. त्यामुळे त्यांचा प्रपंच परमार्थमय झाला होता.

त्यांचा आणखी एक अभंग आहे –

स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात ।
सावत्याने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ।

या अभंगातूनही त्यांची जीवननिष्ठा स्पष्ट होते. आपण जे काही कर्म करतो, त्याच्याशी पूर्णपणे एकरूप झालो की, मोक्षसुद्धा अगदी सहजतेने प्राप्त होतो.

४. प.पू. गुरुदेवांनी आपल्याला जी साधना शिकवली, त्या साधनेतही असेच सामर्थ्य आहे आणि सहस्रो साधक त्याची अनुभूती घेत आहेत. आता आपण सर्वांनी संत सावता माळी यांची जी अवस्था ऐकली, तीच अवस्था नरुटेकाकाही जगत आहेत. प्रपंच करतांना ईश्वराचे ज्ञान करून घेऊन त्याच्या भक्तीत लीन रहाणे, हेच तर त्यांच्या साधनेचे गमक आहे, असे लक्षात येते. त्यातूनच सिद्ध होते की, तेही संतच आहेत.

जीवनभर विठ्ठलभक्ती करणारे पू. नरुटेकाका यांनी ‘एकादशी’च्या तिथीलाच गाठले संतपद !

या मंगल सोहळ्यात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या की, आज आणखी एक दैवसंयोग म्हणजे आज पांडुरंगाची ‘एकादशी’ ही तिथी आहे आणि आजच्याच दिवशी विठ्ठलाने नरुटेकाकांना संतपदी विराजमान केले. यातून सर्वकाही कसे ईश्वरनियोजित असते, हे लक्षात येते.

अलौकिक नि आध्यात्मिक क्षणचित्रे !

पू. नरुटेकाका यांची सोहळ्याच्या आदल्या दिवशीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर पू. काकांमध्ये आमूलाग्र पालट झाल्याचे लक्षात आले. ते प्रथमच इतक्या उत्स्फूर्तपणे बोलले. ‘आत्मज्योती’, ‘अंतरात्मा’, ‘आत्मतत्त्व’ आदी शब्द त्यांनी प्रथमच उच्चारले.  या मंगलसमयी श्री. शंकर नरुटे यांनी सांगितले, ‘बाबा लहानपणापासून एकादशी पाळतात. आज सकाळीच त्यांनी एकादशी सोडली. ‘यातून त्यांचा आध्यात्मिक स्तरावरील पुढील प्रवास चालू झाला असावा’, असे वाटले. आता भावसोहळा झाल्यावर त्याचा उलगडा झाला.’

 

पू. नरुटेकाका यांच्या कुटुंबियांचे मनोगत

बसलेले पू. राजाराम भाऊ नरुटे; उभे असलेले डावीकडून कु. हर्षद बाबर, सौ. शोभा थोरात, सौ. सुनिता बाबर, सौ. मंगल काजारे, कु. प्रतीक्षा काजारे, श्री. शंकर नरुटे आणि श्री. संजय मगदूम

१. पू. बाबा यांच्या बोलण्यात सहजता आणि चैतन्य जाणवते ! – श्री. शंकर नरुटे (मुलगा)

‘माझ्या लहानपणापासून मी पहात आलो आहे की, बाबा हे अध्यात्मावरच बोलत आले आहेत. ते हिंदु धर्माचे माहात्म्य उलगडून सांगतात. त्या माध्यमातून ते समोरच्या व्यक्तीला प्रोत्साहित करतात, तिला साधना करण्यास उद्युक्त करतात. त्यांच्या बोलण्यात सहजता आणि चैतन्य जाणवते. त्यांनी नेहमीच पडेल ते काम केले आहे. त्यामुळे लोक त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकून त्यांना शेतीची कामे देत असत. त्यांचा स्वभाव शांत असून ते सहजतेने स्वयंपाकघरातील कामेही करतात. त्यांच्या आईने त्यांच्या वयाच्या १२ व्या वर्षी त्यांच्या गळ्यात वारकरी संप्रदायाची माळ घातली अन् तेव्हापासून त्यांनी विठ्ठलभक्ती आणि पंढरपूरच्या वारीला जाणे आरंभले. ते मला नेहमी म्हणतात, ‘समर्थ रामदासस्वामी यांच्यासारखा तूही साधनेत लवकर पुढे जा !’ परात्पर गुरुदेवांनीही बाबांना भेटल्यावर मला म्हटले, ‘‘तुझी साधना केवळ तुझ्या वडिलांमुळे चांगल्या प्रकारे चालू आहे.’’

२. सौ. शोभा विठ्ठल थोरात (मोठी मुलगी)

‘बाबांमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे.ते सर्वांना पुष्कळ साहाय्य करतात.’

३. ‘प्रत्येक व्यक्तीला साहाय्य म्हणून काहीतरी द्यायचेच’,
असा पू. बाबांचा स्वभाव आहे ! – सौ. मंगल शंकर काजारे (लहान मुलगी)

‘बाबांना इतरांची सेवा करायला आवडते. ‘प्रत्येक व्यक्तीला साहाय्य म्हणून काहीतरी द्यायचेच’, असा त्यांचा स्वभाव आहे. आज बाबा संत झाले आहेत, हे कळल्यावर मला ‘बोलताही येत नाही’, एवढा आनंद झाला आहे.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment