संत वेणाबाई

संत वेणाबाई यांचा जन्म इ.स. १६२७ मध्ये एका ब्राम्हण कुटुंबात झाला. त्या मुळच्या कोल्हापूर येथील राधिकाबाई आणि गोपजीपंत गोसावी यांच्या कन्या होत्या. विवाहानंतर मिरज येथील देशपांडे यांच्या घरी गेल्या व काही काळातच, वयाच्या दहाव्या वर्षी विधवा झाल्या. तेथेच त्यांनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारले. समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची अनुमती दिली होती. त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच होती. वेणाबाईंना तर खूप त्रास सहन करावा लागला. त्यांचे समर्पण म्हणजे एक कसोटीच होती. समर्थ मिरजेला आणि कोल्हापूरला नेहमी जात. तिथे त्यांची नेहमी कीर्तने होत. वेणाबाई त्यांच्या कीर्तनांना आवर्जून जात. सासू-सासरे एकनाथ महाराजांचे अनुगृहीत होते. त्यामुळे घरातून कोणताच विरोध नव्हता.

कान्होपात्रेनं विठ्ठलाच्या पायी प्राणत्याग केला. पण ते तर देवच होते. तरीही समाजाकडून त्यांना काय काय सहन करावे लागले. त्याचप्रमाणे वेणाबाई रामनाम तर जपतच होत्या. पण तरुण, तेजस्वी, विवाहवेदीवरून सावधान होऊन निघून गेलेल्या ब्रह्मचार्याचा आदर करत होत्या. प्रत्येक कीर्तनाला जात होत्या. अनुग्रह मागत होत्या. एखाद्या बालविधवेनं समर्थ दर्शनासाठी उत्सुक असणं, कीर्तन, प्रवचनाला जाणं यानं टवाळांचं चांगलंच फावलं. आई-वडिलांना लोकनिंदेला तोंड द्यावं लागलं. ते पाहून वेणाबाईही आर्तपणे म्हणाल्या,

तुझी तुझी तुझी तुझी पावना रामा।।
भावे, अभावे, कुभावे, परि तुझी, पावना रामा।। १।।
सुष्ट हो, दुष्ट हो, नष्ट हो, परि तुझी, पावना रामा।। २।।
हीन दीन अपराधी, वेणी म्हणे, परि तुझी, पावना रामा।। ३।।

आर्तपणे श्रीरामरायाला विनवताना वेणाबाईंनी श्रीसमर्थानाही अनुग्रहासाठी साकडे घातले. पण ‘अजून ती वेळ आली नाही’ असं म्हणत समर्थ देशाटनाला निघून गेले.
वेणाबाईविषयी जननिंदा असह्य होऊन घरच्यांनी तिला विष पाजले असं म्हणतात. त्यातून समर्थानीच वेणाबाईंना वाचवले अशीही आख्यायिका आहे. घरच्यांनी वेणाबाईला मठात जाण्यास परवानगी दिली. मठात उपाहाराचे नित्यकर्म आटोपले की, वेणाबाई वाचन, मनन आणि आपली प्रगती साधत गेल्या.

समर्थ प्रत्येक रामनवमी उत्सवाच्या आधी निवडक शिष्य घेऊन भिक्षेसाठी जात असत. त्या काळात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला चाफळात ठेऊन उत्सवाची सर्व जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात असे. एक वर्ष ही जबाबदारी वेणास्वामींच्यावर सोपविण्यात आली. रामरायाची ही सेवा वेणाबाई मनापासून करीत असत. त्यांना त्यांच्या सेवेची पावती द्यावी, असे रामचंद्रांच्या मनात येऊन गेले. ऐन उत्सवाच्या १५ दिवस आधी वेणाबाई आजारी पडल्या. त्या तापाने एवढ्या फणफणल्या की, त्यांना चालताही येईना. ज्याप्रमाणे नाना रूपे धारण करून संत जनाबाई, संत एकनाथ या संतांची सेवा केली त्याप्रमाणे रामचंद्रांनी रामाबाईंच्या रूपात येऊन उत्सवाची सर्व तयारी केली. मी बत्तीस शिराळ्याची असून रामदास स्वामींनी मला तुमच्या मदतीसाठी पाठविले आहे, असे रामाबाईंनी वेणाबाईंना खोटेच सांगितले. समर्थ भिक्षेहून परतल्यावर सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि रामाबाई ही गुप्त झाल्या.

वेणाबाईंची समाधी सज्जनगड येथे आहे. रामदासस्वामींनी इ.स.१६५६ मध्ये बांधलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे. वेणाबाईंना आदराने वेणास्वामी असे म्हटले जाते.

संदर्भ : संकेतस्थळ

1 thought on “संत वेणाबाई”

  1. Endrakshi स्तोत्रं चैतन्य वाणी app मध्ये येईल का
    Swayam सुचना satra sanatan app मध्ये ऊपलब्ध होतील का
    गायत्री मंत्र स्त्रियांनी बोलला तर चालतो का V त्याचे नियम काय आहेत

    Reply

Leave a Comment