संत सखुबाई

संत सखूबाई

संत सखूबाई यांचे जीवन

श्री विठ्ठलाप्रती निस्‍सीम भक्‍ती आणि पराकोटीचा भाव यांमुळे साक्षात् विठ्ठलालाच बोलावून बंधनमुक्‍त करण्‍यास भाग पाडणार्‍या संत सखुबाई वारकरी संप्रदायाच्‍या इतिहासात कायमच्‍या अजरामर झाल्‍या ! सखुबाईचा जन्म महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याची आई आणि वडील दोघेही मोठ्या धार्मिक प्रभावाचे होते. कृष्‍णा नदीच्‍या काठावर कर्‍हाड येथे रहाणार्‍या सखुबाई भगवद़्‍भक्‍तीत सदैव लीन असायच्‍या. विवाहास पात्र ठरल्यावर, त्यांचे लग्न ब्राह्मण कुटुंबात झाले. त्‍यांचे पती, सासू आणि सासरे यांना त्‍यांची भक्‍ती रुचत नव्‍हती, त्‍यामुळे ते तिघेही त्‍यांचा पुष्‍कळ छळ करत; मात्र त्‍या सर्व सहन करत. त्‍या एकदा कृष्‍णाकाठी पाणी भरण्‍यासाठी गेल्‍या असता त्‍यांना पंढरीकडे निघालेली दिंडी दिसली. विठ्ठलदर्शनाच्‍या ओढीने त्‍याही दिंडीत सहभागी झाल्‍या. याविषयी पतीला कळताच त्‍यांना मारहाण करत त्‍यांनी घरी आणले आणि घरात खुंटीला बांधून ठेवले. ‘पंढरपूर यात्रा संपेपर्यंत त्‍यांना बांधून ठेवायचे, २ सप्‍ताह काहीच खायला-प्‍यायला द्यायचे नाही’, असे ठरवले. सखुबाईंना बांधलेला दोर इतका घट्ट होता की, काही दिवसांनी त्‍यांच्‍या शरिराला खड्डे पडू लागले. याही परिस्‍थितीत त्‍यांनी आर्तभावाने श्री विठ्ठलाला साद घातली, ‘हे नाथा, या डोळ्‍यांनी तुझे एकदा जरी चरण पाहिले असते, तरी मी तात्‍काळ प्राण त्‍यागले असते. तूच मला या बंधनातून मुक्‍त कर.’ आर्तभावाने आळवलेली सखूची हाक थेट श्री विठ्ठलापर्यंत पोचली. क्षणार्धात सुंदर स्‍त्रीचे रूप घेऊन भगवंत सखुबाईंकडे आला.

संत सखूबाई यांची निस्सिम भक्ती

स्‍त्रीरूपातील भगवंत सखुबाईंना म्‍हणाला, ‘‘तुझ्‍या जागी मी उभी रहाते, माझ्‍याऐवजी तू पंढरपूरला जा.’’ असे म्‍हणून भगवंताने केवळ दोरखंडातूनच नाही, तर या भवसागरातून सखुबाईंना कायमचे मुक्‍त केले.

इकडे सखूबाई पंढरपुरास आल्या. पांडुरंगाचे रूप बघून धन्य धन्य झाल्या. त्यांना जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले आणि तिथेच त्यांनी आपले प्राण ठेवले. दिंडीस आलेल्या त्यांच्या गावकऱ्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले.

इकडे एकादशी झाल्यावर त्यांच्या पतीने सखूबाईंच्या खोलीचे दार उघडले. सखूबाईच्या रूपातील पांडुरंग सखूची सारी कामे करू लागला. तिच्या सासूने सांगितलेली सारी कामे पांडुरंग निमूटपणे करत असे.

आता रुक्मिणीला चिंता वाटू लागली की, सखूबाई पुन्हा गेलीच नाही, तर विठ्ठल तिच्या घरीच अडकून राहील. रुक्मिणीने सखूला जिवंत करून घरी पाठवून दिले.

ज्या गावकऱ्यांनी सखूबाईंचे अंत्यसंस्कार केले होते, ते सखूबाईंच्या घरी आले, तर सखूबाई त्यांना घरकाम करतांना दिसली. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी सखूबाईंच्या नवऱ्याला आणि सासूला सारा वृत्तांत सांगितला. तो ऐकून त्यांनी सखूला खरा प्रकार काय आहे, ते विचारले. सखूने सारी घटना कथन केली. ती ऐकून गावकरी स्तब्ध झाले. तिच्या नवऱ्याला आणि सासूला पश्चात्ताप झाला.

टाकीचे घाव सोसल्‍याविना जसे दगडाला देवपण येत नाही, तसे प्रतिकूल परिस्‍थितीला सामोरे गेल्‍याविना भक्‍ताच्‍या भक्‍तीची कसोटी लागत नाही ! सर्वच संतांनी जीवनात कितीही घनघोर संकट आले, तरी भगवंताची साथ सोडली नाही; उलट ‘मी भगवंताचा आणि भगवंत माझा’ याच उत्‍कट भावाने त्‍यांनी भगवंताला आळवले.

Leave a Comment