स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !

भयंकर दोष निर्माण करणार्‍या आजच्या शिक्षणपद्धतीच्या तुलनेत मनुष्याचे चारित्र्य घडवणारे शिक्षण देणे का आवश्यक आहे याविषयी स्वामी विवेकानंद यांचे अमूल्य विचार आपण प्रस्तुत लेखात पाहूया.

स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद

‘खरे शिक्षण कसे हवे ?’

१. `माणूस’ निर्माण करणारे आणि चारित्र्य घडवणारे शिक्षण हवे !

‘आयुष्यभर आत्मसात न झालेला आणि मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला ज्ञानाचा भारा म्हणजे शिक्षण नव्हे ! आपले जीवन घडवणारे, `माणूस’ निर्माण करणारे, चारित्र्य घडवणारे आणि चांगले विचार आत्मसात करण्यास शिकवणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही ४ – ५ चांगले विचार आत्मसात करून ते आपले जीवन आणि आचरण यांत उतरवलेत, तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणार्‍यापेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरेल !

२. `मनुष्य’ निर्माण करण्यास सर्वथा अयशस्वी ठरलेले आणि भयंकर दोष निर्माण झालेले आजचे शिक्षण !

आपल्या देशाच्या आध्यात्मिक आणि भौतिक शिक्षणाचा भार आपण घेतला पाहिजे, हे तुमच्या ध्यानात येते का ? आज तुम्हाला मिळत असलेल्या शिक्षणात काही चांगल्या गोष्टी आहेत; पण त्यात एवढे भयंकर दोष आहेत की, त्यांच्यामुळे चांगल्या गोष्टी निरुपयोगी ठरत आहेत. पहिली गोष्ट अशी की, हे शिक्षण `मनुष्य’ निर्माण करणारे नाही, ते सर्वस्वी अकरणात्मक आहे. अकरणात्मक शिक्षण वा निषेधप्रधान शिक्षण हे मृत्यूहून वाईट होय.’

 

मनुष्याने त्याच्यातील दुबळेपणा झटकून
देण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी मांडलेले स्फूर्तीदायी विचार

१. जगातले पाप आणि दुष्टपणा यांविषयी हाकाटी पिटून जगाला आणखी दुबळे बनवू नका !

‘जगातले पाप आणि दुष्टपणा यांविषयी उगाच हाकाटी करू नका. उलट आपल्याला अजूनही जगात पाप दिसत आहे, याविषयी खंत वाटू द्या. आपल्याला चोहीकडे पापच दिसत आहे, याविषयी मनापासून वाईट वाटू द्या आणि तुम्ही जर या जगाला साहाय्य करू इच्छित असाल, तर त्याच्या नावाने बोटे मोडून त्याला दोष देत बसू नका. त्याला आणखी जास्त दुबळे करू नका; कारण पाप म्हणा कि दुःख म्हणा, सारे दुबळेपणामुळेच आहे. ‘आपण दुबळे आहोत, पापी आहोत’, असेच लहानपणापासून आपल्या कानी-कपाळी ओरडण्यात आले आहे. या असल्या शिकवणुकीमुळे जग दिवसेंदिवस अधिकाधिक दुबळे होत आहे.

२. माणसाला त्याच्या ठायी असलेल्या शक्तीचे स्मरण करून द्या !

कपाळावर हात ठेवून आपल्या दुर्बलतेविषयी सुस्कारे टाकत बसणे, हा काही दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही. दुर्बलता दूर करण्याचा उपाय आहे बळ आणि शक्ती. माणसात आधीचीच वसत असलेली शक्ती जागृत होईल, असे काहीतरी करा. त्याला तिचे स्मरण द्या, तिचे ज्ञान द्या.’

संदर्भ : शक्तीदायी विचार, स्वामी विवेकानंद (सहावी आवृत्ती), रामकृष्ण मठ, नागपूर

 

अमूल्य विचारधन

स्वामी विवेकानंद यांनी हिंदु धर्माचा जगभर प्रसार केला. हिंदु धर्माविषयीचा अपप्रचार खोडून काढून स्वामीजींनी हिंदूंमध्ये धर्माभिमान जागवला.  हिंदूंनो, स्वामीजींचे हे विचार कृतीत आणणे, हीच खर्‍या अर्थाने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासारखी होईल, हे लक्षात घ्या !

१. भारतीय युवकांनो, सर्वंकष क्रांतीसाठी संघटित व्हा !

भारतमातेला तिच्या सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्कृष्ट संतानांच्या बलिदानाची आवश्यकता आहे. या पृथ्वीवरील सर्वांत पराक्रमी आणि सर्वश्रेष्ठ लोकांना ‘बहुजनहिताय बहुजनसुखाय’ यासाठी आत्मबलीदान करावेच लागते. उत्साही, श्रद्धावान आणि निष्कपट अशी तरुण माणसे मिळाली, तर सर्व जगात सर्वंकष क्रांती घडवता येईल. हिंदुस्थानासाठी आपले तन, मन आणि प्राण अर्पण करण्यास सिद्ध असलेल्या तरुणांना संघटित करा ! – स्वामी विवेकानंद

२. युवकांनो, असा जाज्वल्य धर्माभिमान स्वत:मध्ये बाणवा !

एकदा प्रवासात जहाजावर असतांना स्वामी विवेकानंद यांची अन्य पंथांतील दोन व्यक्तींसमवेत धर्मचर्चा चालू होती. त्या व्यक्तींनी विनाकारण हिंदु धर्माविरुद्ध शिव्यांची गरळ ओकायला आरंभ केला. त्या क्षणीच स्वामीजींनी त्यांपैकी एका व्यक्तीची मान पकडली आणि ते गरजले, ‘‘यापुढे एक अक्षर उच्चारलेस, तर उचलून समुद्रात फेकून देईन !’’ (असे धर्माभिमानी स्वामीजी कुठे, तर नाटके, विज्ञापने, भाषणे आदींद्वारे हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींचा आज अवमान होत असतांना त्याकडे दुर्लक्ष करणारे हिंदू कुठे ! – संपादक)

मातृभूमीसाठी त्याग करण्यास सिद्ध व्हा !

स्वामी विवेकानंद यांंना लोखंडाचे बाहू, पोलादाच्या नसा आणि आत वसणारे वज्राचे मन असणारे हिंदू घडवायचे होते. ते म्हणत, ‘बाहू बलदंड झाल्याने भगवद्गीता अधिक चांगली समजतेे. तुमच्या धमन्यांमधील रक्त तेजीने उसळू लागले की, मग तुम्हाला भगवान श्रीकृष्णासारख्या महापुरुषाची विराट प्रज्ञा आणि अपूर्व सामर्थ्य यांचे आकलन होते. आज भारतमातेला तिच्या सर्वश्रेष्ठ संतानांच्या बलीदानाची आवश्यकता आहे.

ख्रिस्ती धर्मप्रसारक हिंदु धर्माविरुद्ध गरळ ओकतात; पण इस्लामविरुद्ध बोलण्यास त्यांना धाडस होत नाही !

‘स्वामी विवेकानंदांनी एकदा ख्रिस्ती धर्मप्रसारकांविषयी म्हटले होते, ‘ख्रिस्ती धर्मप्रसारक आपल्या धर्माचा प्रचार करतांना नेहमी हिंदु धर्माविरुद्ध गरळ ओकतात; परंतु ‘इस्लाम’विषयी काही बोलण्याचे त्यांना धाडस होत नाही; कारण त्यांना ठाऊक असते की, असे केल्यास लगेच तलवारी उपसल्या जातील.’ (मासिक अभय भारत, १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०१०)

उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ।

‘कठोपनिषदातील ‘उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत’, हेे स्वामी विवेकानंद यांचे अत्यंत प्रिय वाक्य होते. ‘उठा, जागे व्हा ! आणि लक्ष्य गाठेपर्यंत थांबू नका’, असा याचा अर्थ आहे. काही जण विचारतात की, उठा आणि जागे व्हा, असे दोन वेळा एकच गोष्ट का सांगितली आहे. जागा झालेला प्रत्येक जण उठतोच असे नाही आणि उठलेला प्रत्येक जण त्या वेळी जागा असतोच असे नाही, असे त्याचे उत्तर आहे. सांप्रत काळात ही गोष्ट हिंदु समाजाला किती लागू आहे, नाही ?’ – डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार (राष्ट्रजागर)

योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद यांचे अन्य जाज्वल्य विचार

खरे हिंदू ! : ‘हिंदु’ हा शब्द उच्चारताच अपूर्व चैतन्याची लहर तुमच्यात सळसळत असेल, तर आणि तरच तुम्ही ‘हिंदू’ आहात !’

सनातन वैदिक हिंदु धर्माचे महत्त्व : ‘सनातन वैदिक हिंदु धर्मामुळे पशूचे मनुष्यात आणि मनुष्याचे ईश्‍वरात रूपांतर होते !’

‘हिंदु धर्म जर नष्ट झाला, तर सत्य, न्याय, मानवता आणि शांती सर्वकाही संपून जाईल.’ (मासिक अभय भारत, १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०१०)

हिंदूंच्या धर्मांतरणामुळे होणारी हानी ! : ‘एक हिंदु परधर्मात गेला, तर हिंदु धर्मातील एक हिंदू कमी होतो इतकेच नव्हे, तर हिंदूंच्या शत्रूंमध्ये एकाची वाढ होते !’

हिंदूंना आवाहन ! : सर्व जगाच्या कल्याणासाठी दीपस्तंभ असलेल्या हिंदु धर्माचे तेज संपूर्ण विश्‍वात प्रस्थापित केल्याविना शांत बसू नका !

साधनेचे महत्त्व ! : हिंदुस्थान ईश्‍वराच्या शोधात मग्न झाला, तर अमर होईल; पण राजकारणाच्या चिखलात लोळत राहिला,
तर त्याचा विनाश होईल !

धर्मासाठी आयुष्य वेचणार्‍या महापुरुषांचा आदर्श ठेवून तुम्हीही धर्मासाठी कार्य करा ! : तरुणांनो, जर हे राष्ट्र जिवंत रहावे, अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले असले पाहिजे !

Leave a Comment