थिऑसॉफिस्टांच्या हिंदुविरोधी प्रवृत्तीविषयी पोटतिडकीने बोलणारे स्वामी विवेकानंद !

हा लेख म्हणजे १८९७ या वर्षी चेन्नई येथील व्हिक्टोरिया सभागृहात ‘माझ्या मोहिमेची योजना’ (My plan of campaign) या विषयावर स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या व्याख्यानाचा संपादित भाग आहे. या व्याख्यानात ‘स्वामी विवेकानंदांनी धर्मविध्वंसक सुधारकांवर कडव्या भाषेत टीका केली होती. सुधारकी (पुरोगामी), ख्रिस्ती मिशनरी आणि थिऑसॉफिस्ट (ब्रह्मविद्या प्रचारक) यांनी हिंदु धर्माचा प्रचार करणार्‍या स्वामी विवेकानंदांचा कसा छळ केला’, याचे दाखले आहेत. थिऑसॉफिस्टांच्या हिंदुविरोधी वृत्तीविषयी त्यांनी मांडलेले विचार पुढिलप्रमाणे आहेत.

 

१. स्वामी विवेकानंदांची ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ विषयीची भूमिका !

‘भारतामध्ये ‘थिऑसॉफिकल (ब्रह्मविद्या) सोसायटी’ने काही चांगले कार्य केले आहे, हे सर्वांना ठाऊकच आहे; म्हणून प्रत्येक हिंदू या संस्थेविषयी, विशेषतः श्रीमती अ‍ॅनी बेझंट यांच्याविषयी कृतज्ञ आहे; पण त्यांच्याविषयी कृतज्ञ असणे वेगळे आणि ‘थिऑसॉफिकल सोसायटी’चे अनुयायी होणे वेगळे. एखाद्याविषयी आदर, श्रद्धा, प्रेम असणे वेगळे आणि बुद्धीच्या कसोटीवर घासून न पहाता, काहीच विचार न करता किंवा विश्‍लेषण न करता एखाद्याचे म्हणणे सर्वस्वी ग्रहण करणे अगदी वेगळे.

१ अ. स्वामी विवेकानंदांना ‘थिऑसॉफिस्ट’ लोकांनी साहाय्य केले, हा अपप्रचार !

इंग्लंडमधील आणि अमेरिकेतील माझ्या अल्पशा कार्यास ‘थिऑसॉफिस्ट’ लोकांनी साहाय्य केले, असे वृत्त सगळीकडे पसरवण्यात येत आहे. तुम्हाला हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, ही बातमी सर्वस्वी असत्य आहे, पूर्णपणे चुकीची आहे. परस्थ अमेरिका देशांत माझ्या ओळखी नव्हत्या किंवा माझ्याजवळ परिचयपत्रेही नव्हती; म्हणून मी ‘थिऑसॉफिकल सोसायटी’च्या एका पुढार्‍यास भेटलो. सहजच मला वाटले की, एक भारतप्रेमी अमेरिकन म्हणून सदर गृहस्थ तेथील कोणाच्या तरी नावाने ओळखपत्र देतील. त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्ही माझ्या संस्थेचे सदस्य व्हाल काय ?’’ मी उत्तर दिले, ‘‘नाही. या सोसायटीची मते मान्य नसतांना मी तिचा अनुयायी कसा होऊ ?’’ त्यावर ते गृहस्थ म्हणाले, ‘‘मग क्षमा करा, मी आपणाकरिता काहीही करू शकणार नाही.’’ हे काय माझा मार्ग मोकळा करणे झाले ? सर्वधर्मपरिषद चालू होण्याच्या कित्येक मास आधी मी अमेरिकेत जाऊन पोहोचलो होतो. माझ्याजवळ फारच थोडे धन (द्रव्य) होते आणि ते लवकर खर्च होऊन गेले. हिवाळा आला आणि माझ्याजवळ तर उन्हाळ्यांत उपयुक्त असेच पातळ कपडे होते. त्या कडक थंडीच्या दिवसांत काय करावे ते सुचेना; कारण रस्त्यांतून भिक्षा मागावी, तर कारागृहाचा रस्ता धरावा लागला असता. त्या वेळी अखेरचे थोडे डॉलर माझ्याजवळ शिल्लक होते. मी मद्रासमधील (चेन्नईमधील) माझ्या मित्रांना तार पाठवली. हे थिऑसॉफिस्टांना समजले, तेव्हा त्यांच्यापैकी एकाने लिहिले, ‘आता हा सैतान मरणार आहे. ईश्‍वराने आमचे रक्षण केले.’ हे काय माझा मार्ग मोकळा करणे झाले ? सर्वधर्मपरिषदेत काही थिऑसॉफिस्ट मला भेटले, त्यांच्यात मिसळण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न केला. त्यांच्या चेहर्‍यावरील तिरस्काराची भावना मला आठवते. ‘हा क्षुद्र प्राणी देवतांच्या या मेळाव्यांत कशाला आला आहे ?’, असे जणू त्यांना म्हणायचे होते.

१ आ. स्वामी विवेकानंदांनी ‘थिऑसॉफिस्ट’ न होण्यामागील केलेली कारणमीमांसा !

सर्वधर्मपरिषदेत माझा नावलौकिक झाल्यावर माझ्यापुढे मोठेच कार्यक्षेत्र निर्माण झाले; पण प्रत्येक कार्याच्या वेळी थिऑसॉफिस्ट लोकांनी माझे पाय ओढण्याचा प्रयत्न केला. माझ्या व्याख्यानांना थिऑसॉफिस्टांनी उपस्थित राहू नये, असा आदेश देण्यात आला; कारण त्यामुळे त्यांना सोसायटीची सहानुभूती गमवावी लागली असती. त्यांच्या गुप्त (Esoteric) विभागाच्या नियमानुसार जो मनुष्य या विभागाचे अनुयायित्व पत्करतो, त्याने कुथुमी आणि मोरिया यांच्याकडूनच उपदेश घेतला पाहिजे. अर्थात् हा उपदेश त्यांचे पृथ्वीवरील प्रतिनिधी श्री. जज् आणि श्रीमती बेझंट यांच्याकडूनच घेतला पाहिजे; म्हणून या गुप्तविभागाचे अनुयायित्व स्वीकारणे म्हणजे आपले स्वातंत्र्य गमावण्यासारखेच आहे. अर्थातच मी हे मान्य करणे शक्य नव्हते, एवढेच नव्हे, तर जो मनुष्य हे मान्य करील, त्याला मी काही हिंदु म्हणणार नाही.

– स्वामी विवेकानंद (वर्ष १८९७)

  •  ‘ईश्‍वराने गुण आणि कर्म यांप्रमाणे वर्ण निर्माण केले; पण माणसाने जन्मावरून जाती निर्माण केल्या !’
     
  • ‘जो स्वदेशावर प्रेम करू शकत नाही, तो विश्‍व कसे कवेत घेणार ? आधी देशप्रेम आणि मग विश्‍व बंधुत्व !’

– स्वामी विवेकानंद

Leave a Comment