धर्मांतर शुद्धीकरणाविषयी स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केलेले विचार !

स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद

धर्मांतर झालेले हिंदू आणि मूलतः अहिंदु असलेले यांचे शुद्धीकरण या विषयावर प्रबुद्ध भारत या नियतकालिकाने वर्ष १८९९ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्याशी वार्तालाप केला. त्या वेळी प्रबुद्ध भारतच्या प्रतिनिधीने विचारलेल्या शंकांचे स्वामी विवेकानंदांनी केलेले निरसन पुढे साररूपात दिले आहे.

 

 

 

 

 

अ. धर्मांतर झालेल्या हिंदूंचे शुद्धीकरण करणे आवश्यक !

प्रतिनिधी : धर्मांतरितांना शुद्धीकरणाद्वारे हिंदु धर्मात परत घ्यावे का ?

स्वामी विवेकानंद : निःसंशय धर्मांतर झालेल्या हिंदूंचे शुद्धीकरण केलेच पाहिजे. तसे केले नाही, तर हिंदूंची संख्या दिवसेंदिवस घटत जाईल. फरिश्ता हा प्राचीन मुसलमान इतिहासकार सांगतो की, मुसलमान या देशात प्रथम आले, त्या वेळी हिंदूंची संख्या साठ कोटी एवढी होती. आज (वर्ष १८९९ मध्ये) ती अवघी वीस कोटी एवढी झाली आहे. बहुतांशी धर्मांतर हे मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मियांकडून तलवारीच्या सामर्थ्यावर झाले. आजचे परधर्मात असलेले हिंदू हे त्या काळात बाटवल्या गेलेल्या हिंदूंचेच वंशज आहेत. अशांना दूर लोटणे हिताचे नाही. स्वेच्छेने परधर्मात गेलेल्यांना परत स्वधर्मात येण्याची इच्छा असेल, तर त्यांनाही शुद्ध करायला हवे. अत्याचारांमुळे धर्मांतर करावे लागलेल्या मूळच्या हिंदूंना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश देतांना कोणतेही प्रायश्चित्त असू नये.

 

आ. अहिंदूंना हिंदु धर्माने स्वीकारले होते, हा इतिहास आहे !

प्रतिनिधी : मूलतः अहिंदु असलेल्यांचे शुद्धीकरण अर्थात हिंदुकरण करावे का ?

स्वामी विवेकानंद : भूतकाळात असे कित्येक परवंशीय आपल्या हिंदु धर्मात स्वीकारले गेले आहेत. आतापर्यंत राष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अनेक रानटी टोळ्यांना हिंदु धर्माने आत्मसात केले. मुसलमानांपूर्वीचे शक, हूण, कुशाण इत्यादी सर्व परकीय आक्रमकांनाही हिंदु धर्माने स्वीकारले आहे. अशा रक्ताने परधर्मीय असलेल्यांना हिंदु धर्मात प्रवेश करतांना कोणतेही प्रायश्चित्त असू नये.

 

इ. धर्मांतर झालेल्या हिंदूंनी शुद्धीकरणानंतर पूर्वीची जात
स्वीकारावी, तर अहिंदूंनी हिंदु धर्म स्वीकारल्यावर वैष्णव पंथीय व्हावे !

प्रतिनिधी : शुद्धीकरण झालेले कोणत्या जातीत असावेत ?

स्वामी विवेकानंद : बळाने धर्मांतरित झालेले पुनरपि स्वधर्मात येतील, तेव्हा त्यांना त्यांची पूर्वीची जात मिळेल. हिंदु धर्मात जे नव्याने प्रवेश करतील, त्या सर्वांची मिळून एक नवीनच जात घडवावी लागेल. ही जात वैष्णव पंथीय ही असेल. (वर्णसंकर टाळण्यासाठी) त्यांनी त्यांचे विवाह परस्परांत करावेत. त्यांनी त्यांची नावे हिंदु ठेवावीत; कारण त्यात हिंदु ओळख आणि चैतन्य आहे.

– प्रबुद्ध भारत (एप्रिल १८९९)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment