संभाव्य युद्धस्थिती आणि भारत !

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन

वर्ष १९९१ नंतर रशियाचेच एक अंग असलेला आणि फुटून बाहेर पडलेला युक्रेन अन् रशिया यांच्यातील संघर्ष इतक्या विकोपाला गेला आहे की, ‘हा संघर्ष तिसर्‍या महायुद्धाचे कारण बनेल’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. बलाढ्य रशियातून १५ प्रदेश वेगळे झाल्याने अजूनही रशियातील कित्येकांना ‘पूर्वीसारखे सर्वशक्तीमान रहाण्यासाठी फुटलेल्या देशांनी एकत्र यावे’, असे वाटते. ‘युक्रेनला ‘नाटो’मध्ये (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’मध्ये) प्रवेश देण्याचे सूत्र, हे या संघर्षाचे निमित्त झाल्याचे म्हटले जात असले, तरी संघर्षाचे मूळ जुनेच आहे. युक्रेनमध्येही अनेक रशियाधार्जिणे लोक आहेत. डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या युक्रेनमधील २ प्रांतांना स्वतंत्र व्हायचे आहे. त्यासाठी तेथे सशस्त्र संघटना लढा देत आहेत आणि युक्रेनला शह देण्यासाठी नेमका याचाच लाभ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी उठवून डॉनेत्स्क अन् लुहान्स्क हे २ सीमावर्ती प्रांत स्वतंत्र राष्ट्र असल्याची घोषणा केली. ही घोषणा केल्यावर येथील स्वातंत्र्याची मागणी करणार्‍या गटांनी जल्लोष केला; मात्र यानंतर अमेरिकेने तात्काळ ‘या दोन्ही प्रांतांशी व्यापार करणार नाही’, असे घोषितही केले. रशियाने त्याचे सैन्यतळ या प्रदेशात पाठवण्याची सिद्धता केली आहे. फ्रान्स आणि अमेरिका हे युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध घालण्याचेही घोषित केले आहे. कदाचित् हे युद्ध टळूही शकते; परंतु तसे झाले नाही, तर या युद्धाचे गंभीर परिणाम भारतावरही होणार आहेत. महामारीच्या दुष्परिणामांतून सावरत असतांना भारताला कोणतेही नवीन आर्थिक संकट अर्थातच परवडणारे नाही.

 

युद्धाचे भारतावर होणारे परिणाम !

सध्या युक्रेनमध्ये शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसह तेथे २० सहस्र भारतीय वास्तव्य करत आहेत. त्यांना सुखरूप आणण्याचे आव्हान भारतासमोर आहे. युक्रेन हा कच्च्या तेलाचा साठा असणारा देश असल्याने तेथे युद्ध झाल्यास त्याच्या किमती वाढून त्याचा परिणाम जागतिक स्तरावर महागाई वाढण्यात होणार आहे. आताचे १०० डॉलर (७ सहस्र ४८६ रुपये) प्रतिबॅरलच्या (१ बॅरलमध्ये ३०० लिटर कच्चे तेल असते.) आसपास गेलेले हे दर युद्ध झाले, तर अधिक वाढू शकतात. रशियातून नैसर्गिक वायूचा पुरवठा पश्चिम युरोपला होतो. युद्धामुळे युरोपमधील ऊर्जेच्या किमती वाढल्यानेही जागतिक महागाई वाढू शकते. त्याचा फटका भारतालाही बसेल. युद्ध चालू झाल्यास त्याचे गंभीर आर्थिक आणि पर्यायाने विविध क्षेत्रांवर परिणाम भारतात होणार आहेत. युक्रेनमधून भारतात अब्जावधी रुपयांचे खाद्य आणि कच्चे तेल खरेदी केले जाते. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने डिझेल, पेट्रोल, केरोसीन आणि नैसर्गिक वायू यांच्या किमती वाढणार आणि त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होईल. पर्यायाने भाजी, अन्नधान्य, दूध आदी पदार्थांच्या किमतीही वाढून सामान्य भारतियांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे. कच्च्या तेलाची किंमत आता आहे तेवढी राहिली, तरीही भारतासाठी ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे केंद्र सरकारला मोठ्या आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. युक्रेन भारताला अणूऊर्जेसाठी लागणारे बॉयलर आणि अणूभट्ट्या आदी साहित्य निर्यात करतो. येथील युद्धामुळे या व्यापारावर परिणाम होणार आहे. भारताकडून युक्रेनला निर्यात होणारी औषधे आणि विद्युत् साहित्य यांच्या व्यापारावर परिणाम होणार आहे. युद्ध झालेच, तर अर्थातच अमेरिका आणि अन्यही देश रशियावर आर्थिक निर्बंध टाकू शकतात. त्यामुळे रशियासमवेतच्या भारताच्या आर्थिक व्यापारावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

 

भारताची भूमिका आणि राष्ट्रवाद !

‘चर्चेने प्रश्न सोडवण्यात यावा’, असे भारताच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांच्या या संदर्भातील बैठकीत सांगितले. अशी भूमिका घेणे भारताला भागच आहे; कारण युद्ध हे जगाप्रमाणे भारतालाही अजिबात परवडणारे नाही. त्यातून युद्ध झालेच, तर रशिया किंवा युक्रेन यांपैकी कुणा एकाची बाजू घेणेही भारतासाठी अवघड काम असेल. रशियाकडून भारत शस्त्रास्त्रे खरेदी करत आहे आणि युक्रेनकडून अत्यावश्यक कच्चे तेल. याखेरीज युक्रेनला साथ देणार्‍या अमेरिकेशी वैर करणे भारताला परवडणारे नाहीच आणि समजा युद्ध झालेच, तर भविष्यात रशियाच्या बाजूने चीन उभा रहाण्याची शक्यता असल्याने रशियाची बाजू घेणेही भारतासाठी मोठा पेचप्रसंग निर्माण करणारे राहील. त्यामुळे होता होईल तो चर्चेचा पर्याय अगदी शेवटपर्यंत वापरण्यास सुचवणे, हेच भारत आता प्रामुख्याने करू शकतो.

रशिया आणि युक्रेन : भारताची तारेवरची कसरत

या प्रसंगातूनच भारताने महासत्ता होण्याची अनिवार्यताही लक्षात येते. भारताला अलिप्त रहाण्यासाठी किंवा त्याचे मत व्यक्त करण्यासाठी सध्या बंधने येतात. जर भारत महासत्ता असेल, तर भारताकडे मत व्यक्त करण्याचे वेगळेच अधिकार रहातील. तिसर्‍या महायुद्धाची स्थिती येईल, तेव्हा भारताला हवे किंवा नको काहीही असले, तरी तो अपरिहार्यपणे त्यात ओढला जाईल. जेव्हा युद्धजन्य स्थिती असते, तेव्हा देशातील सर्व घटकांनी राजा आणि सैन्य यांना पाठिंबा देणे आवश्यक असते. सध्या फुटीरतावाद्यांनी भारतात कधी नव्हता इतका कहर केला आहे. आतंकी, धर्मांध, नक्षली, बोडो, खलिस्तानी, ‘तुकडे गँग’, पुरोगामी आणि त्यांना साथ देणारे हिंदुविरोधी राजकीय पक्ष अन् प्रसारमाध्यमे यांच्यामुळे ‘युद्धकाळात अंतर्गत शांतता बिघडली’, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. युद्ध नसतांनाही आरक्षण, नागरिकत्व सुधारणा कायदा, कृषी कायदे आणि आता हिजाब यांसारखे निमित्त काढून फुटीरतावादी अंतर्गत बंडाळी किंवा दंगलसदृश स्थिती निर्माण करत आहेत. युद्धजन्य स्थितीत या अंतर्गत अशांततेकडे लक्ष देण्यासाठी वेळ, पैसा आणि सुरक्षा बळ देणे देशाला कठीण जाते. येणार्‍या युद्धकाळात भारताला एक सक्षम राष्ट्र म्हणून उभे रहाता येण्यासाठी भारतियांनी प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणे आवश्यक आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment