सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग ४

अनुक्रमणिका

भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –  सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग ३

पू. सदाशिव सामंत

 

९. सनातनशी संपर्क

९ अ. सेवानिवृत्त झाल्यावर आईचे निधन झाल्यामुळे मन अस्वस्थ असणे,
तेव्हा पत्नीने सनातन संस्थेच्या सत्संगात घेऊन जाणे, तो सत्संग आवडणे, नंतर पत्नी
साधकांच्या समवेत सेवेला जाऊ लागणे, घरात चैतन्य जाणवू लागणे आणि मनाची अस्वस्थता दूर होणे

वर्ष १९९३ मध्ये मी सेवानिवृत्त झालो. अशातच माझी आई गेली. त्यामुळे मला फार अस्वस्थ वाटत होते. मला आई नसल्याचे फार जाणवायला लागले. पत्नी अधूनमधून मला कृतीशील करण्याचा प्रयत्न करायची. ती एकदा मला म्हणाली, ‘‘ठाण्यामध्ये संध्याकाळी मनःशांतीसाठी एक सत्संग आहे. आपण त्याला जाऊया.’’ हा सत्संग ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होणार होता. संध्याकाळी आम्ही वेळेवर सत्संगाला गेलो. अशा रितीने आम्ही सनातन संस्थेशी जोडलो गेलो. आम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचकही झालो. आम्हाला दैनिक ‘सनातन प्रभात’ फारच आवडले. आम्हाला त्याचे निराळेपण जाणवले. ते वाचल्यावर आमच्या मनाला शांत वाटले. त्या समवेत आम्ही नामजप करायलाही आरंभ केला. आठवड्याभरातच आमची साधकांशी ओळख झाली. श्री. मालंडकरकाका, त्यांची मुलगी मनीषा आणि त्यांचा मुलगा शाम कोलशेतला रहायचे. तिथून ते अध्यात्म प्रसाराला जायचे. या साधकांच्या समवेत पत्नीही अध्यात्म प्रसाराला जायला लागली. घरातले वातावरणच पालटून गेले. घरात चैतन्य जाणवायला लागले. मला वाटणारी अशांती आणि अस्वस्थता निघून गेली.

९ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली प्रथम भेट !

९ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सभेच्या वेळी काही साधकांसह त्यांची भेट होणे आणि त्यांना भेटल्यावर आतून पुष्कळ आनंद अन् उत्साह जाणवणे : वर्ष १९९८ मध्ये एका रविवारी संध्याकाळी ५ वाजता ठाणे स्थानकाजवळ मारुति मंदिर आणि जरीमरी आईचे मंदिर असलेल्या पटांगणात परम पूज्यांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) मार्गदर्शन होते. आम्ही दुपारी ३ वाजताच पटांगणात गेलो. तिथे सनातनचे कितीतरी साधक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करत होते. तेथे मलाही ग्रंथ लावायची सेवा मिळाली. माझ्या समवेत मालंडकरकाका होते. आम्ही सर्व ग्रंथ व्यवस्थित लावून ठेवले. त्या वेळी मला आणि काही साधकांना परम पूज्यांना भेटण्याची संधी मिळाली. देवानेच आम्हाला ही संधी दिली. माझी परम पूज्यांशी ठाण्यामध्ये झालेली ही पहिली भेट ! परम पूज्यांना भेटल्यावर मला आतून पुष्कळ आनंद वाटला आणि उत्साहही जाणवला.

९ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गोव्यात झालेली भेट !

९ इ १. बहिणीकडे गोव्याला गेल्यावर तिथे सनातनच्या साधिकेची भेट होणे आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट घेण्याचे सुचवणे : एकदा आम्ही गाडी घेऊन ठाण्याहून परूळ्याला आदिनारायणाच्या दर्शनाला गेलो होतो. बहीण आणि बहिणीचे यजमान इंग्लंडला १० ते १२ वर्षे रहात होते. ते दोघेही आधुनिक वैद्य आहेत. आता ते गोव्यात वास्कोला रहातात. आम्ही त्यांच्याकडे राहिलो. तेथे आम्हाला सनातनच्या एक साधिका भेटल्या. त्यांचे घर माझ्या बहिणीच्या घराजवळ आहे. पत्नीची आणि त्यांची चांगलीच मैत्री झाली. त्यांनी विचारले, ‘‘परम पूज्यांना का भेटत नाही ? ते दोनापावला येथे डॉ. वेरेकर यांच्या बंगल्यात रहातात.’’

९ इ २. बहीण आणि तिचे यजमान यांच्यासह परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटायला दोनापावला येथील सेवाकेंद्रात जाणे अन् त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या समवेत महाप्रसाद घेणे : आमच्या मनातही तो विचार होता. आम्ही बहीण आणि तिचे यजमान यांना सांगितले, ‘‘आम्ही परम पूज्यांना भेटायला जाणार आहोत. तुम्हीही या.’’ तेही सिद्ध झाले. रविवारचा दिवस होता. आम्ही सर्व जण परम पूज्यांना भेटायला दोनापावला येथील सेवाकेंद्रात गेलो. परम पूज्यांनी दुपारी ‘महाप्रसाद घ्या’, असे आम्हाला सांगितले. आम्ही परम पूज्यांच्या समवेतच महाप्रसाद घेतला. त्या वेळीही परम पूज्य अल्प आहार घ्यायचे.

९ इ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोलणे सत्यात उतरल्याची आलेली प्रचीती ! : आम्ही त्यांना आमच्या साधनेतील अडचणी सांगितल्या. मी म्हणालो, ‘‘१० ते १२ घरांत गेलो, तर एखादाच अर्पण देतो किंवा एखादाच दैनिक ‘सनातन प्रभात’ घेतो.’’ परम पूज्य सर्व शांतपणे ऐकत होते. ते म्हणाले, ‘‘आता एखादाच अर्पण देतो किंवा साहित्य घेतो. नंतर पुढे लोक त्यासाठी तुमच्याकडे येतील. तुम्ही थोड्या दिवसांनी हे अनुभवाल.’’ प्रत्यक्षातही तसे आतापर्यंत अनुभवायला मिळाले आहे.

 

१०. हृदयाचे शस्त्रकर्म

१० अ. काम करत असतांना अस्वस्थता जाणवणे, रात्री
पुष्कळ घाम येणे, तेव्हा पत्नीने विभूती लावणे आणि त्यानंतर सकाळी बरे वाटणे

आमचा सनातन संस्थेशी संपर्क झाला. त्याच सुमारास मला एके ठिकाणी कामासाठी बोलावले. मी तिथे कामाला जात होतो. एकदा काम करतांना मला अस्वस्थ वाटू लागले. एकदा चक्करही आली. रात्री झोपेत असतांना मला पुष्कळ घाम आला; म्हणून मी पत्नीला उठवले आणि म्हणालो, ‘‘मला वाटते, ‘मला हृदयविकाराचा झटका येत आहे.’ कुणालाही बोलावू नकोस.’’ नंतर मी चटई घातली आणि झोपलो. मी सकाळी उठलो. पत्नी मला म्हणाली, ‘‘मी तुमच्या उशीखाली दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवले आणि उदी (विभूती) लावली. समोर रिकामे खोके ठेवले.’’ सकाळी मला बरे वाटत होते.

१० आ. हृदयात ९५ टक्के ‘ब्लॉकेज’ असल्याचे निदान झाल्याने
त्वरित शस्त्रकर्म करायचा निर्णय घेणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने
शस्त्रकर्म यशस्वी होणे आणि विम्याचे पैसे मिळवण्यासाठी सनातनच्या साधिकेने साहाय्य करणे

नंतर आम्ही रुग्णालयात गेलो. तिथे ‘इ.सी.जी.’ काढला. आधुनिक वैद्यांनी ‘इ.सी.जी.’ बघून ‘सर्व व्यवस्थित (नॉर्मल) आहे’, असे आम्हाला सांगितले. माझी मुलगी आणि जावई पवईला रहायचे. त्यांनी आम्हाला दादरला ‘ग्लेनमार्क हार्ट क्लिनिक’मध्ये नेले. आधुनिक वैद्य भरत दळवी हृदयविकार तज्ञ होते. त्यांनी मला तपासले. ते म्हणाले, ‘‘हृदयविकाराचा झटका आला होता. पहिल्या रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी चुकीचे सांगितले आहे. ‘अँजिओग्राफी’ आणि ‘अँजिओेप्लास्टी’ करायला पाहिजे, म्हणजे ‘किती ‘ब्लॉकेज’ आहेत ?’, ते कळेल. आधुनिक वैद्य भरत दळवी चांगले हुशार वैद्य होते. त्यांनी लगेच आम्हाला सांताक्रूझला नेले आणि तेथील रुग्णालयात माझी ‘अँजिओग्राफी’ केली. ते म्हणाले, ‘‘हे जरासे काळजी करण्यासारखे आहे; कारण ९५ टक्के ‘ब्लॉकेज’ आहे. लवकर हृदयाचे शस्त्रकर्म केले पाहिजे.’’ नंतर ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात माझे शस्त्रकर्म झाले.

शस्त्रकर्मानंतर परम पूज्यांनी माझी सर्व व्यवस्था करून माझ्यावर कृपा केली. कसलीही अडचण न येता माझे एवढे मोठे शस्त्रकर्म झाले. नंतर शस्त्रकर्माचे विम्याचे पैसे मिळण्यासाठी सनातनच्या साधिकेने आम्हाला साहाय्य केले.

 

११. ठाणे सेवाकेंद्रात सेवेला आरंभ होणे

११ अ. श्री. मालंडकरकाकांनी ठाणे सेवाकेंद्रात सेवेसाठी नेणे

मालंडकरकाका मला घरी भेटायला यायचे. वर्ष २००० मध्ये ते मला म्हणाले, ‘‘चला. आपण ठाणे सेवाकेंद्रात सेवेला जाऊया.’’ तेव्हापासून मी सकाळी सेवाकेंद्रात सेवेला जायचो आणि दुपारी घरी परत यायचो. नंतर ग्रंथांच्या वितरणाची सेवा करायचो.

११ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून दर्शन दिल्याची आलेली अनुभूती

ठाणे सेवाकेंद्रात श्री. मनोज पाडावे भावपूर्ण आरती करायचे. आरतीला माझ्यासह ८ ते १० जण उपस्थित असायचे. आरती झाल्यावर मी थोडा वेळ तिथेच बसायचो. एकदा मनात परम पूज्यांविषयीचे विचार आले. मी सूक्ष्मातून त्यांना म्हणालो, ‘परम पूज्य, तुम्ही मला दर्शन द्या’ आणि डोळे बंद करून भावाच्या स्थितीत बसलो. मी डोळे उघडले, तेव्हा परम पूज्य सर्व जागा व्यापून उभे होते. मी मान वर करून बघितले, तर ते मला उंच उंच होतांना दिसले. त्यांनी पांढरे शुभ्र कपडे घातले होते. मी लगेचच त्यांना साष्टांग नमस्कार घातला. नंतर मी त्यांची क्षमा मागितली, ‘मी तुम्हाला ‘दर्शन द्या’, असे म्हणालो; म्हणून तुम्हाला येथे यावे लागले. तुम्ही सर्वशक्तीमान आहात. तुम्ही सर्व जाणतही आहात. तुम्ही मला क्षमा करा आणि माझ्यावर कृपा करा.’ मला साधारण १ मिनिटभर त्यांचे दर्शन झाले. ते माझ्याकडे पाहून हसले आणि नंतर अदृश्य झाले. ही मला फार मोठी अनुभूती आली. मी हे केवळ श्री. मालंडकरांना सांगितले. ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही फार भाग्यवान आहात. परम पूज्यांनी तुम्हाला छान अनुभूती दिली.’’

 

१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ठाणे सेवाकेंद्रात झालेले मार्गदर्शन !

१२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या जवळच्या बाकावर
बसण्यासाठी सांगणे आणि तिथे बसायला जाण्यापूर्वी त्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी पाठीला स्पर्श करणे

‘वर्ष २००६ मध्ये एकदा सकाळी नलिनीताई (कु. नलिनी राऊत) मला म्हणाल्या, ‘‘आज दुपारी ३ वाजता सेवाकेंद्रात परम पूज्यांचे मार्गदर्शन होणार आहे. त्यासाठी तुम्ही यायचे.’’ परम पूज्यांचे मार्गदर्शन वेळेवर चालू झाले. मी भूमीवर हात जोडून बसलो होतो. परम पूज्यांनी माझ्याकडे बघितले आणि मला म्हणाले, ‘‘तुम्ही इकडे या. तुम्ही माझ्या बाजूला बसा.’’ मी थोडासा अवघडलो. ते आसंदीवर बसले होते. त्यांच्या बाजूला एक बाक होता. मी त्याच्यावर जाऊन बसलो. बसायच्या अगोदर मी त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी हळूच माझ्या पाठीला हात लावला आणि म्हणाले, ‘‘बसा.’’ परम पूज्यांचे इतक्या जवळून मार्गदर्शन मला पहिल्यांदाच ऐकायला मिळाले.

१२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी  नामजप आणि शरणागतभाव वाढवण्यास सांगणे

काही साधकांनी त्यांना प्रश्‍न विचारले. त्यांनी त्या शंकांचे निरसन केले. मी त्यांना माझ्या सेवेची माहिती दिली. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुमचा नामजप आणि शरणागतभाव वाढवा. त्याचा तुम्हाला लाभ होईल.’’ मी म्हणालो, ‘‘परम पूज्य, तुमच्याच कृपेने हे होईल.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘हळूहळू नामजप आणि भाव वाढणार. तुम्ही प्रयत्न करा.’’ ते माझ्याकडे बघून हसले. मला फार आनंद झाला. मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. हा सर्व प्रसंग आठवला की, माझी भावजागृती होते.

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचा लाभलेला अमूल्य सत्संग

​‘वर्ष २००० मध्ये एकदा ठाणे सेवाकेंद्रात प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. (सौ.) माई) आल्या होत्या. मी दुपारी घरी जायला निघालो. तेव्हा मला पू. माई म्हणाल्या, ‘‘आज तुम्ही इथेच महाप्रसाद घ्या आणि प.पू. दास महाराज यांच्या समवेत जेवायला बसा.’’ मी थांबलो आणि प.पू. दास महाराज यांच्या समवेत पंगतीला बसलो. त्यांच्या मनात परम पूज्यांविषयी केवढा कृतज्ञताभाव आहे ! मी त्यांना नमस्कार करून प्रार्थना केली, ‘‘मलाही थोडा कृतज्ञताभाव द्या.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘कर्ते आणि करविते परम पूज्य आहेत.’’ त्या वेळी मला त्यांच्या डोळ्यांत पाणी दिसले !’ – (पू.) श्री. सदाशिव सामंत

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment