संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत !

कृष्णा नदीची पाणी पातळी ५२ फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज,सांगली जिल्ह्याला पुन्हा महापुराचा धोका !

सांगली – संततधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कृष्णा नदीचे पाणी शहरातील सखल भागात शिरले. येथील आयर्विन पुलाच्या ठिकाणी ४० फूट ही चेतावणी पातळी ओलांडली असून पाण्याची धोका पातळीकडे वाटचाल चालू आहे. संततधार पाऊस आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी १० ते १२ फुटांनी वाढून ५० ते ५२ फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीला पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना अती सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

१. वाढत्या पाणी पातळीमुळे वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर-ताकरी आणि पलूस तालुक्यातील अमणापूर पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे, तर कृष्णा नदीवरील अंकलखोप, मौजे डिग्रज, म्हैसाळ येथील बंधारे आधीच पाण्याखाली गेले आहेत.

२. जुना नांद्रे-कर्नाळ रस्ता पाण्याखाली गेला असून सूर्यवंशी प्लॉट येथे पाणी शिरले आहे. २२ जुलैच्या रात्रीपासून भिलवडीच्या मौला नगरसह सांगली शहरातील पूरस्थितीतील १५० हून अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. पूरपट्ट्यातील नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर करण्यास प्रारंभ केला आहे.

 

वारणा नदीला पूर

वारणा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असून चांदोली धरणातून चालू असलेला विसर्ग आणि संततधार पाऊस यांमुळे वारणा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील जवळपास तीन पूल आणि ९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा जवळचा संपर्क तुटला आहे.

सांगलीत अनेक ठिकाणी पाणी आल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद !

सांगली  २३ जुलै या दिवशी ‘एन्.डी.आर्.एफ्’ची २ पथके सांगली जिल्ह्यात दाखल झाली आहेत. एक पथक आष्टा आणि शिरगाव (तालुका वाळवा) येथे कार्यरत असून दुसरे पथक सांगलीत दाखल झाले आहे. नागरिकांना बोटींद्वारे बाहेर काढण्याची वेळ येऊ नये, तसेच त्यांनी वेळीच सुरक्षास्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

सध्या स्थलांतरीत झालेल्या नागरिकांसाठी २ निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. जसजशी स्थलांतरीत कुटुंबांची संख्या वाढेल, त्या प्रमाणात निवारा केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. २३ जुलै या दिवशी आयर्विन पूल येथे पाणीपातळी ४२ फुटांहून अधिक असून पाणीपातळी लवकरच ५२ फुटांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यवसायिकांना आवाहन केले आहे की, पाणीपातळी ५० फुटांपर्यंत वाढल्यास बाजारपेठेत पाणी येऊ शकते. त्यामुळे ज्यांना साहित्याची हलवाहलव करायची असेल, तर त्यांनाही मुभा देण्यात आली आहे.

ईश्वरपूरनजीक ताकारी येथील बोरगाव-ताकारी पुलावर २२ जुलैच्या रात्री पाणी आल्याने तेथील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तसेच मांगले-काखे पूल (तालुका शिराळा), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर आणि अनेक ठिकाणी पाणी आल्याने एकूण ९ ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

सांगली जिल्हा

१. २३ जुलै या दिवशी कृष्णा नदीची पातळी ४९ फूट झाल्याने शहरातील मारुति चौक येथे २३ जुलै या दिवशी रात्री पाणी आले. याचसमवेत टिळक चौक आणि अन्य काही उपनगरांत पाणी आले आहे.

२. कृष्णा-कोयना नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे, तसेच कोयना आणि वारणा धरणातून विसर्ग अल्प करण्यात आला आहे. २४ जुलै या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी ५० फूट ४ इंच इतकी आहे. ही पातळी सायंकाळपर्यंत ५१ ते ५२ फुटांपर्यंत वाढत जाऊन स्थिर होईल. त्यानंतर पाणी पातळी अल्प होण्यास प्रारंभ होईल, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली आहे. या संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्‍वासू ठेवू नये, वेळोवेळी अद्यावत् माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील दूरभाष क्रमांक ०२३३, २३०१८२०, २३०२९२५ यांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

३. सांगली महापालिकेकडून सांगली-मिरज येथे १८ ठिकाणी तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

परभणी जिल्ह्यात ३२ तालुक्यांमध्ये अतीवृष्टी !

परभणी – जिल्ह्यात पुन्हा एकदा अतीवृष्टी झाल्याने नदी-नाले यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गोदावरी आणि दुधना या मुख्य नद्यांसह अन्य नद्याही दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या पिकांची हानी झाली आहे. येथील ३२ तालुक्यांमध्ये अतीवृष्टी झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला.

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पिकांवरही संकट ओढावले आहे. शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्याने आणि जिल्ह्यातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे. पहिल्या अतीवृष्टीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असतांना दुसर्‍यांदा अतीवृष्टी झाल्याने प्रशासनासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेच्या पाण्याने पूरस्थिती गंभीर : अनेक रस्ते बंद, अनेक उपनगरांना पाण्याचा वेढा

कोल्हापूर – पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रात्री ८ वाजता राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ५५.५ फूट नोंदवली गेली. जिल्ह्यातील एकूण ११६ बंधारे पाण्याखाली असून शहरातील अनेक उपनगरांत पाणी घुसले आहे. अनेक उपनगररांमध्ये सकाळपासून वीज गेल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. शहरातील पाणीपुरवठा करणारे पंप पाण्याखाली गेले असून उद्यापासून परिस्थिती सुधारेपर्यंत शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळवले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यासाठी ‘एन्.डी.आर्.एफ्.’च्या पथकासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन काम करत आहे. शहरातील अनेक छोटे नाले, ओढे यांतील पाणी पात्राबाहेर पडल्याने शहरात सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली होती.

महापुराच्या पाण्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर २ सहस्र वाहने अडकली !

शिरोली पुलाची (जिल्हा कोल्हापूर) – सांगली फाटा येथे महापुराचे पाणी आल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे महामार्गावर २ सहस्र वाहने अडकून पडली आहेत. या पाण्याच्या प्रवाहातून १ चारचाकी वाहन, तर १० दुचाकी वाहने वाहून गेली आहेत. स्थानिक मच्छीमाराच्या साहाय्याने ३ घंट्यांनंतर चारचाकी वाहनचालकाला वाचवण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. पुण्याच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर ५ फूट पाणी असून कोल्हापूरच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर ४ फूट पाणी आहे.

५ ऑगस्ट २०१९ मध्ये महामार्गावर पाणी आले होते, तेव्हा ८ दिवस महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या वेळी वर्ष २०१९ च्या तुलनेत वेगाने पाणी वहात असून महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महामार्गावरील वाहतूक बॅरिकेट्सच्या साहाय्याने बंद करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा

१. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अजूनही पाणी असल्याने या मार्गासह अद्यापही अनेक मार्ग बंद आहेत.

२. नदीवरील पाणी उपसा केंद्र पुराच्या पाण्यात गेल्याने शहराचा पाणीपुरवठा अनिश्‍चित काळासाठी खंडित करण्यात आला आहे. याच समवेत शहरात बहुतांश ठिकाणी वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. यामुळे शहर आणि उपनगर यांतील अनेक वॉटर ए.टी.एम्.वर नागरिकांनी गर्दी केली होती. महापालिकेने टँकर पुरवठा चालू केला आहे; मात्र तो अत्यंत तोकडा पडल्याचे दिसून आले. दोन दिवस काही जणांनी पावसाचे पाणी साठवून ते पिण्यासाठी, तसेच अन्य कारणांसाठी वापरले; मात्र २४ जुलैपासून पाऊस नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

३. नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर पूर्णत: पाण्याखाली गेले असून नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथील नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

४. शहरात कालपासून इंधन केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच देण्यात येत असून सामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्यात आले आहे. यामुळे कोणतीही वस्तू आणण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

५. राधानगरी धरण ९३ टक्के भरले असून अद्यापही ११६ बंधारे पाण्याखाली आहेत.  काल दिवसभरात ४० सहस्रांपेक्षा अधिक जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

६. पुराचा फटका ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बसला असून सहस्रो एकर शेतीची हानी झाली आहे.

नागपूर – नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्याला अतीवृष्टीचा फटका बसला. चंद्रभागा नदीला पूर आल्याने धापेवाड्यातील विठ्ठल मंदिराच्या पायथ्यापर्यंत पाणी आले. कळमेश्वर तालुक्यात खडकनाल्याला पूर आल्याने वाहतूक खोळंबली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला आलेल्या पुरात रंभाबाई मेश्राम (वय ७० वर्षे) ही महिला वाहून गेली, तर तास येथील संतोष शंभरकर हे बैलजोडीसह वाहून गेले. पुरामुळे २० गावांचा संपर्क तुटला आहे.

अमरावती – जिल्ह्यात काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सिपना नदीही धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे.

यवतमाळ – जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्यालगतच्या गावांचा संपर्क तुटला होता; मात्र काही कालावधीनंतर तो पूर्ववत् झाला. एक तरुण पुरात वाहून गेला; पण आश्चर्यकारकरित्या तो वाचला. अतीवृष्टीमुळे येथील ४० घरांची पडझड झाली.

चंद्रपूर – पावसाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गावाला बसला आहे. येथील एक शेतकरी वाहून गेला, तर राजुरा-गडचांदूर आणि राजुरा-गोवरी हे मार्ग बंद झाले. राजुरा येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून शहरातही अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. चंद्रपूर शहरातही रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. शहरातील जवळपास सर्वच मुख्य मार्गांवर पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढणे कठीण झाले. अनेक घरांमध्ये नाल्यांचे पाणी शिरले आहे.

अकोल्यातील पूरजन्य स्थिती,अकोला जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हाहाकार !

अकोला – जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अतीवृष्टीमुळे ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील नदीकाठच्या भागात पुष्कळ पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. मध्यरात्रीपासूनच असंख्य नागरिकांना सुरक्षास्थळी हालवले जात आहे. शहरातील सखल भागांतील घरांत पाणी शिरले आहे. घरांमध्ये कमरेइतके पाणी साचल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.

सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन !

सातारा – कोयना धरण परिसर, पाटण, वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस पडला असून काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. कोयना धरणामध्ये ५७.७ टी.एम्.सी. एवढा पाणीसाठा झाला असून कराड येथील प्रीतीसंगम घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. हे पाणी आता यशवंतराव चव्हाण उद्यानामध्ये शिरले असून कराडला पाण्याचा वेढा पडला आहे. कराड शहरातील

१५० हून अधिक कुटुंबियांचे नगरपालिकेच्या वतीने स्थलांतर करण्यात आले आहे. वाई येथील गणपति घाट पूर्णत: पाण्याखाली गेला असून श्री महागणपति मंदिरामध्ये पाणी शिरले आहे. महाबळेश्वर येथे कास-जुंगटी या मार्गावरील पूल खचल्यामुळे जुंगटी, जळकेवाडी या ठिकाणी जाणारी वाहतूक ठप्प झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

पाटण तालुक्यातील किल्ले मोरगिरीजवळील मिसाळवाडी, जोतिबाची वाडी, येराड, मीरगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. वाई तालुक्यातील कोंढवलीजवळील देवरूखवाडी येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. या ठिकाणी ४-५ घरे ढिगार्‍याखाली गेली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घेरादातेगड या गावाजवळ दरडी कोसळल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवजा रस्ता येथील कामरगाव येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. ढोकावळे गावात २ दिवसांच्या अतीवृष्टीमुळे दरडी कोसळत आहेत. काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे. मीरगाव-कामरगाव या ठिकाणी धरणग्रस्त गावावर दरड कोसळी असून १० ते १२ जण दगावले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे शहरातील मुठा नदीतील विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नागरिकांना सतर्कतेची चेतावणी !

पुणे – खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे खडकवासला धरण २३ जुलै या दिवशी १०० टक्के भरले. या धरणातून मुठा नदीपात्रात १० सहस्र ९६ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मुसळधार पाऊस चालू राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीतील विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

लोणावळा, खंडाळा आणि मावळ भागात अतिवृष्टी !

लोणावळा (पुणे) – अतिवृष्टीमुळे लोणावळा, खंडाळा आणि मावळ हे परिसर जलमय झाले असून या परिसरात ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे लोणावळा खंडाळ्यासह मावळातील ओढे, नाले आणि नदीकाठच्या अनेक गावांतील घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती : २९० कुटुंबांचे स्थलांतर

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ दिवस अतिवृष्टीमुळे हाहा:कार माजला आहे. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी डोंगर खचले, तर काही ठिकाणी छोटे पूल वाहून गेले. घरे आणि गोठे यांची हानी झाली आहे. पूरस्थितीने अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला आहे, तर भातशेती पाण्याखाली गेली आहे. कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णत: कोलमडली आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना पुढील ५ दिवस सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी कणकवली, वैभववाडी आदी पूरग्रस्त भागांना भेट देऊन पहाणी केली.

वागदे येथे पुलावर गडनदीचे पाणी आल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद

कणकवली – कणकवली तालुक्यात नाटळ, जाधववाडी येथे ५ घरांना पुराचा वेढा पडला आहे. निम्मेवाडी, गवळदेव येथे रहात असलेल्या कातकरी कुटुंबियांच्या झोपड्यांमध्ये जानवली नदीच्या पुराचे पाणी घुसले. अचानक पाणी आल्याने घरातील व्यक्तींनी स्वतःचा जीव वाचवला; मात्र घरातील साहित्य वाहून गेले. कणकवली-कनेडी-नरडवे मार्गावरील नाटळ येथील मल्हार नदीवरील पूल २२ जुलैला रात्री अतीवृष्टीमुळे कोसळला. मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे पुलावर गडनदीचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. गडनदीचा उगम असलेल्या दिगवळे गावातील रांजणवाडीत मातीच्या घरावर दरड कोसळून १ महिला ठार झाली, तर घरातील अन्य घायाळ झाले आहेत.

जैनवाडी, खारेपाटण येथील सुमारे १५ घरांत पुराचे पाणी

खारेपाटण गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून खारेपाटण जैनवाडी येथील सुमारे १५ घरे पुराच्या पाण्यात आहेत. प्रशासनाने या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.

बांदा, माडखोल, धवडकी, ओटवण आणि इन्सुली या गावांत हानी

सावंतवाडी – तालुक्यात बांदा, माडखोल, धवडकी, ओटवण आणि इन्सुली या गावांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. अनेकांची घरे आणि दुकाने यांमध्ये पाणी शिरले. झाराप-पत्रादेवी मार्गावर इन्सुली, खामदेव येथे घरे पाण्याखाली गेली आहेत. इन्सुली, बिलेवाडी येथे ग्रामस्थ घरात अडकले आहेत. शिरशिंगे-गोठवेवाडी येथील डोंगराचा काही भाग खचला आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंतींची पडझड झाली, तर पोल्ट्री व्यावसायिकांच्या कोंबड्या वाहून गेल्याने हानी झाली आहे.

सांगेली परिसरात नदीच्या पुराचे पाणी धवडकी बाजारपेठेतील दुकाने आणि घरे यांमध्ये घुसले. आंबोली घाटात ढगफुटी झाल्यामुळे गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच एवढा मोठा पूर आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये गुडघाभर पाणी घुसल्याने संपूर्ण संगणकप्रणाली बंद पडली असून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, तसेच काही रिक्शा वाहून गेल्या आहेत.

आंबोली घाटात २२ जुलैला दरड कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. २३ जुलैला प्रशासनाने दरड हटवून वाहतूक पूर्ववत् केली आहे.

वैभववाडी – भुईबावडा घाटातील धोका अधिकच वाढला आहे. घाटमार्गात तब्बल १०० मीटर अंतरात असलेली भेग अतीवृष्टीमुळे पुष्कळ रुंद झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हा घाट खचण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

कुडाळ – तालुक्यातील पणदूर गावाला लागून असलेल्या हातेरी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकिनारी असलेल्या सिद्धार्थनगर, साईलवाडी, सावंतवाडा आदी वाड्यांना पुराच्या पाण्यापासून धोका निर्माण झाल्याने सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. साईलवाडी येथील ग्रामदेवता श्री सातेरीदेवीच्या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. पाण्याची पातळी न्यून न झाल्यास ३० ते ३५ कुटुंबांना स्थलांतर करण्याची सिद्धता ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे.

जिल्ह्यातील एकूण २९० कुटुंबांतील १ सहस्र २७१ व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या चेतावणीनुसार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे. जिल्ह्यामध्ये सावंतवाडी आणि दोडामार्ग या २ ठिकाणी ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे (राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे) पथक साधनसामग्रीसह येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment