‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र

‘श्रीविष्णूच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता. तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद-सुरांमध्ये आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदु धर्मात गोंधळाची परंपरा चालू झाली. महाराष्ट्रामध्ये गोंधळाची मोठी परंपरा आहे. मुख्यत्वे श्री तुळजाभवानी आणि श्री रेणुकामाता या देवींचा गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या संदर्भातही गोंधळ घालण्याची प्रथा चालू झाली.

गोंधळ
गोंधळ

१. उद्देश

‘कुटुंबातील इतर जिवांना झालेला वाईट शक्तींचा त्रास अल्प करण्यासाठी आघातात्मक नादाने देवीतत्त्वाला जागृत करून तिला मारक कार्य करण्याचे आवाहन केले जाते. पूर्वापार वास्तूदोषामुळे होणार्‍या त्रासांवर उपाय म्हणून, तसेच पिढीजात संक्रमित होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्त्वरूपी आवाहनात्मक ‘गोंधळ’ घातला जातो.

२. परिणाम

या वेळी आघातात्मक तेजरूपी नादाची निर्मिती होऊन या नादाकडे शक्तीतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. याचा परिणाम म्हणून वास्तूतील वाईट शक्तींच्या संचारावर बंधन घालून त्याद्वारे वास्तूतील अनेक वाईट शक्तींचे अल्प कालावधीत उच्चाटन होते. तसेच शक्तीतत्त्वात्मक लहरींचा दीर्घकाळ लाभ मिळण्यास साहाय्य होते. नवरात्रीमध्ये ब्रह्मांडात तेजरूपी शक्तीतत्त्व कार्यमान असते. त्यामुळे या काळात देवीचा गोंधळ घातल्याने नेहमीच्या तुलनेत जास्त लाभ होतो.

३. ‘गोंधळी’ (देवीचे उपासक)

या जिवांमध्ये पिढ्यानपिढ्या देवीतत्त्वाची उपासना वसा म्हणून चालत आलेली असल्याने ते ‘देवीचे उपासक’ म्हणून गणले जातात. यांना ‘शक्तीरूपी गण’ किंवा ‘दास’ अशीही संज्ञा दिली जाते. ते त्यांच्या तेजोमय शक्तीरूपी वाणीतून देवीला आवाहन करून तिचे मारक तत्त्व जागृत करू शकतात. देवीचा गोंधळ घालणार्‍या जिवांचा ईश्वराप्रती असणारा भाव ३० प्रतिशत असेल, तर त्यांना आध्यात्मिक स्तरावर ३० प्रतिशत एवढ्या प्रमाणात चैतन्य प्राप्ती होते. भाव जास्त आणि अहंचे प्रमाणही अल्प असेल, तर ५० प्रतिशत एवढ्या प्रमाणात फलप्राप्ती होते. भावरहित कृतीमुळे लाभाचे प्रमाण १० प्रतिशत एवढेच असते.

४. देवीचा गोंधळ घालण्यापेक्षा स्वतः साधना करणे महत्त्वाचे

कुलाचार पाळण्यासाठी गोंधळ घालणे, या कृतीला कर्तव्यपालन म्हणून १० प्रतिशत महत्त्व आहे, तर भावपूर्ण कृतीच्या स्तरावर कर्तव्यपालनाच्याही पुढे जाऊन धर्मपालनयुक्त कृती, म्हणजेच कुलदेवीचा नामजप करून स्वतः साधना करणे, याला ३० प्रतिशत महत्त्व आहे.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र’

 

५. ‘संबळ गोंधळ’ आणि ‘काकड गोंधळ’

अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवीची प्रतिमा आणि कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आलेल्या व्यक्तीला ‘गोंधळी’ म्हणतात. देवीचे गुणगान करणार्‍या व्यक्तीलाही ‘गोंधळी’ म्हणतात. अंबामातेचा जयजयकार करत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींची गाणी सादर करते. संबळाच्या तालावर केलेल्या नृत्याला ‘संबळ गोंधळ’, असे म्हणतात. काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. त्याला ‘काकड गोंधळ’, असे म्हटले जाते.

देवीचा गोंधळ घालतांनाचे संग्रहित छायाचित्र

 

६. घरातील शुभकार्याच्या प्रसंगी देवीचा गोंधळ घालण्याची परंपरा असणे

आजही जवळजवळ सर्व समाजात कोणत्याही शुभकार्याच्या प्रसंगी कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. शुभकार्याच्या वेळी गोंधळी निरनिराळ्या देवतांना गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. जिथे गोंधळ घालावयाचा आहे, तिथे पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून अष्टदल काढले जाते किंवा धान्याच्या राशीवर श्रीफळासह कलश मांडतात. त्यावर उसाच्या किंवा ज्वारीच्या पाच ताटांचा मांडव सिद्ध केला जातो आणि त्याला फुलांच्या माळा बांधल्या जातात. याला ‘गोंधळाचा चौक’ असे म्हणतात. दिवटे पेटवतात आणि ते हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत अन् नृत्य सादर करतात. हे ऐकतांना विशेष आनंद होतो.

तुळजापूरची भवानीआई गोंधळाला यावं ।
कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाला यावं ।
गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावं ।।

कुलदेवी, ग्रामदेवी, आराध्यदेवता अशा सर्व देवतांना गोंधळाला येण्याचे आवाहन केल्यानंतर देवीचे स्तवन करण्याची पदे म्हटली जातात. त्यानंतर देवीचा जोगवा मागितला जातो.

अनादि निर्गुण प्रकटली भवानी ।
मोह महिषासुरमर्दना लागुनी ।
त्रिविध तापांची करावया झाडणी ।
भक्ता लागोनि पावसि निर्वाणी ।
आईचा जोगवा जोगवा मागेन ।। – संत एकनाथ महाराज

अर्थ : संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘जिला आदि (प्रारंभ) नाही, अशी निर्गुण भवानीमाता प्रकटली आहे. ती मोहरूपी महिषासुराचे मर्दन करणार असून मनुष्याचे त्रिविध ताप दूर करणार आहे. ती भक्तांवर प्रसन्न झाली आहे. अशा या आईचा मी जोगवा मागेन. (म्हणजे तिच्या कृपेची याचना करीन.)’’

गोंधळ्याकडे विविध वाद्ये असतात. त्यापैकी संबळ हे अधिक महत्त्वाचे वाद्य असून त्याच्या समवेत तुणतुणे आणि टाळ वाजवतात. पूर्वीसारखा वेष परिधान करणारे अत्यंत अल्पच गोंधळी शेष राहिले आहेत. आता काळानुसार त्यांचाही वेषही पालटला आहे.’

(साभार : मासिक ‘श्रीमत् पूर्णानंदाय नम:’, दिवाळी विशेषांक २०१३)

Leave a Comment