कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी, तसेच काही निर्बंध यांमुळे यंदा काही ठिकाणी नवरात्रोत्सव नेहमीप्रमाणे साजरा करण्यावर मर्यादा येणार आहेत. अशा वेळी ‘नवरात्रोत्सव कशा पद्धतीने साजरा करायला हवा ?’ असा प्रश्‍न अनेकांच्या मनात आहे. अशांसाठी काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.

(टीप : ही सूत्रे ज्या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करण्यास निर्बंध अथवा मर्यादा आहेत, अशांसाठीच आहेत. ज्या ठिकाणी प्रशासनाचे सर्व नियम पाळून नेहमीप्रमाणे उत्सव साजरा करता येणे शक्य आहे, त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे कुलाचार करावेत.)

श्री. चेतन राजहंस

प्रश्‍न : नवरात्रोत्सवात देवीच्या देवळात जाऊन ओटी भरणे शक्य नसल्यास काय करावे ?

उत्तर : नवरात्रोत्सवात देवीच्या देवळात जाऊन देवीची ओटी भरणे शक्य नसल्यास घरीच देवघरातील कुलदेवीची ओटी भरावी. ओटी म्हणून देवीला अर्पण केलेली साडी प्रसाद म्हणून वापरू शकतो.

प्रश्‍न : ललितापंचमी साजरी करणे शक्य नसल्यास काय करावे ?

उत्तर : घरातील देवीचीच ‘ललितादेवीची पूजा करत आहोत’, या भावाने पूजा करावी.

प्रश्‍न : धान्य, फुले किंवा पूजासाहित्य यांच्या अनुपलब्धतेमुळे घटस्थापना, तसेच मालाबंधन यांसारख्या धार्मिक कृती करता येणे शक्य नसल्यास काय करावे ?

उत्तर : घटस्थापनेसाठी वापरायची धान्ये किंवा नवरात्रोत्सवात केल्या जाणार्‍या धार्मिक कृती यांमध्ये प्रांतानुसार भेद आहे. नवरात्रोत्सव हा कुळपरंपरेचा किंवा कुलाचाराचा भाग आहे. आपत्कालीन मर्यादांमुळे घटस्थापना किंवा मालाबंधन या धार्मिक कृती नेहमीप्रमाणे करता येणे शक्य नसल्यास उपलब्ध साधनांचा उपयोग करून अधिकाधिक जेवढे करता येणे शक्य आहे, तेवढे करावे. उरलेले सर्व विधी मनाने (मानस उपचार) करावेत.

प्रश्‍न : कुमारिकापूजन कसे करावे ?

उत्तर : घरी कुणी कुमारिका असेल, तर तिचे पूजन करावे. निर्बंधांमुळे कुमारिकांना घरी बोलावून पूजन करता येणे शक्य नसेल, तर त्याऐवजी अर्पणाचा सदुपयोग होईल, अशा ठिकाणी किंवा धार्मिक कार्य करणार्‍या संस्थांना काही रक्कम अर्पण करावी.

प्रश्‍न : भोंडला, गरबा खेळणे किंवा घागरी फुंकणे शक्य नसल्यास काय करावे ?

उत्तर : भोंडला, गरबा खेळणे किंवा घागरी फुंकणे, या धार्मिक कृतींचा मुख्य उद्देश हा देवीची उपासना करत देवीचे जागरण करणे हा आहे. या धार्मिक कृती करता येणे शक्य नसल्यास कुलदेवीचे नामस्मरण किंवा पोथीवाचन, संकीर्तन (स्तुतीपर भजने) करून देवीची उपासना करावी.

कुलदेवीच्या नामस्मरणाची, तसेच नवरात्रोत्सवाविषयीची माहिती सनातनचे ग्रंथ ‘शक्ति’, ‘शक्तीची उपासना’ यांमध्ये दिलेली आहे. हे ग्रंथ www.sanatanshop.com या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ विक्रीसाठी उपलब्ध आहेत, तसेच www.sanatan.org या संकेतस्थळावर नवरात्रोत्सवाविषयीची माहिती उपलब्ध आहे.

प्रश्‍न : दसरा कसा साजरा करावा ?

उत्तर : घरात प्रतिवर्षी पूजा करत असलेली उपलब्ध शस्त्रे आणि उपजीविकेची साधने यांची पूजा करावी. आपट्याची पाने एकमेकांना देता येणे शक्य नसल्यास ही पाने केवळ देवाला अर्पण करावीत.

 

दृष्टीकोन

१. कर्मकांडाच्या साधनेनुसार आपत्काळामुळे एखाद्या वर्षी कुलाचाराप्रमाणे एखादे व्रत, उत्सव किंवा धार्मिक कृती पूर्ण करता आली नाही किंवा कर्मामध्ये काही न्यूनत्व राहिले, तर पुढच्या वर्षी किंवा पुढील काळात जेव्हा शक्य असेल, तेव्हा ते व्रत, उत्सव किंवा धार्मिक कृती अधिक उत्साहात करावेत.

२. कोरोना महामारीच्या निमित्ताने आपत्काळाला आरंभ झाला आहे. द्रष्टे संत आणि भविष्यवेत्ते यांनी सांगितल्यानुसार भीषण आपत्काळ अजून २-३ वर्षे चालूच रहाणार आहेत. या काळात नेहमीप्रमाणे धार्मिक कृती यथासांग करता येतील, असे नाही. अशा वेळी कर्मकांडाऐवजी नामस्मरण अधिकाधिक करावे. कोणतीही धार्मिक कृती किंवा उत्सव किंवा व्रत यांचा मुख्य उद्देश भगवंताचे स्मरण करून स्वतःतील सात्त्विकता वाढवणे, हा असतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःतील सत्त्वगुण वाढवण्यासाठी काळानुसार साधना करण्याचा प्रयत्न करावा. काळानुसार आवश्यक साधनेच्या संदर्भात सनातनच्या अध्यात्मविषयक ग्रंथांमध्ये सविस्तर माहिती दिली आहे, तसेच ती सनातन संस्थेच्या www.sanatan.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.’

– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था (५.१०.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment