शक्तीस्वरूप आणि वात्सल्यमूर्ती देवीचे विविध प्रकार, तसेच नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे अन् त्यांची कार्यानुरूप वैशिष्ट्ये !

नवरात्रीच्या काळात भारतातील विविध प्रसिद्ध अन् प्राचीन देवी मंदिरांचा इतिहास, त्यांचे महत्त्व, छायाचित्रे, तसेच नवरात्रोत्सवामागील अध्यात्मशास्त्र इत्यादी माहिती या सदरातून आपण जाणून घेत आहोत. देवीशी संबंधित विविध धार्मिक कृतींसंदर्भात वैज्ञानिक संशोधनही या वैशिष्ट्यपूर्ण सदरातून प्रसिद्ध करत आहोत. या माध्यमातून वाचकांची देवीप्रती भक्ती वाढावी, अशी जगज्जननी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

‘हिंदु धर्मामध्ये ३३ कोटी देवता आहेत. यांमध्ये देव आणि देवी असे प्रमुख दोन प्रकार आहेत. देवी या ईश्‍वराच्या वात्सल्यरूपाचे साकार रूप असतात, तसेच त्या देवतांच्या निर्गुण शक्तीचे सगुण स्वरूप असतात. त्यामुळे देवी शक्तीस्वरूप आणि वात्सल्यमूर्ती असतात. ज्याप्रमाणे देवांची उपासना करणारे उपासक असतात, त्याप्रमाणे देवीची, म्हणजे शक्तीची उपासना करणारे उपासकही असतात. भारतात देवीची ५१ शक्तीपीठे आहेत. या शक्तीपिठांतून प्रक्षेपित होणारी दैवी ऊर्जा आणि चैतन्य यांमुळे भारतभूमीचे संरक्षण होते. या लेखामध्ये आपण देवीची विविध आध्यात्मिक वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

१. देवीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

१ अ. देवीचे प्रकार

१ अ १. क्षुद्रदेवी : ‘काही देवींचे कार्य एखाद्या विशिष्ट ठिकाणापुरते मर्यादित असून त्या विविध स्तरांवरील इच्छा (कामना) पूर्ण करणे आणि दु:खनिवारण करणे, असे कार्य करतात. अशा देवींना काही पशूंचा बळीही लागतो. या देवींमध्ये सर्वात गौण स्तरावरील शक्ती कार्यरत असल्याने त्यांची गणना क्षुद्रदेवींमध्ये केली जाते. त्यांना पाहिल्यावर कनिष्ठ स्तरावरील शक्तीची अनुभूती येते, उदा. भराडी देवी, मरियम्मा, यल्लाम्मा, सटवाई, जरा-जिवंतिका, सात-आसरा, निकुंबला देवी इत्यादी.

१ अ २. कनिष्ठ स्तरावरील देवी : या देवी उपासकाच्या सकाम इच्छांची पूर्ती करतात. त्यांच्यामध्ये मध्यम स्वरूपाची शक्ती कार्यरत असते. या देवी उत्पत्ती, स्थिती आणि लय या संदर्भातील कार्य करणार्‍या प्रमुख देवदेवतांना साहाय्यक असतात. त्या दु:खनिवारणासह सात्त्विक सुखाची प्राप्ती करून देतात. त्यांना पाहिल्यावर किंवा त्यांचे स्मरण केल्यावर कनिष्ठ स्तरावरील शक्तीची अनुभूती येऊन काही प्रमाणात भाव जागृत होतो, उदा. नर्मदानदी, गंगानदी, यमुनानदी, शचीदेवी, वारुणीदेवी, वाराही देवी, माहेश्‍वरी देवी इत्यादी.

१ अ ३. उच्च स्तरावरील देवी : या देवींमध्ये ईश्‍वराची श्रेष्ठ स्तरावरील शक्ती कार्यरत असते. विश्‍वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या कार्यात या सक्रीयपणे सहभागी असतात. या देवींमध्ये उपासकाला मोक्ष देण्याचे सामर्थ्य असते. त्यांना पाहिल्यावर किंवा त्यांचे स्मरण केल्यावर श्रेष्ठ प्रतीची निर्गुण शक्ती, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती येते, उदा. महालक्ष्मीदेवी, श्रीदुर्गादेवी, महासरस्वतीदेवी, वैष्णोदेवी, भुवनेश्‍वरीदेवी, गायत्रीदेवी इत्यादी.

१ आ. विविध देवांशी संबंधित देवी

श्रीदुर्गादेवी
महिषासुरमर्दिनी
१ इ. देवीचे अवतार

देवीने आवश्यकेनुसार विविध अवतार धारण केले, उदा. दुर्गमासुराला नष्ट करण्यासाठी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या देवींचे संयुक्त तत्त्व दुर्गादेवीच्या रूपाने अवतीर्ण झाले. पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या देवींच्या एकत्रित तत्त्वातून वैष्णोदेवीचा अवतार साकार झालेला आहे.’ (कु. मधुरा भोसले यांना ज्ञानातून मिळालेली माहिती) महालक्ष्मीदेवीने श्रीविष्णूच्या रामावताराच्या वेळी सीता आणि कृष्णावताराच्या वेळी रुक्मिणी यांचा अवतार धारण केला होता. महिषासुराला नष्ट करण्यासाठी पार्वतीने महिषासुरमर्दिनीचा अवतार धारण केला.

१ इ १. विविध असुरांचा नाश करण्यासाठी देवीने धारण केलेले अवतार

१ ई. देवीची विविध रूपे
१ ई १. नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे आणि त्यांची वैशिष्ट्ये

१ ई २. देवीची कार्यानुसार असणारी विविध रूपे

१ ई २ अ. अन्नपूर्णादेवी : पार्वतीमातेने शिव, गणेश, कार्तिकेय आणि शिवगण यांची भूक शमवण्यासाठी अन्नपूर्णादेवीचे रूप धारण करून पक्वाने बनवली. याच अन्नपूर्णादेवीचा वास प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाकघरात सूक्ष्मातून असतो.

अन्नपूर्णादेवी

१ ई २ आ. शताक्षी आणि शाकंभरीदेवी : ‘दुर्गमासुर’ नावाच्या असुराचा विनाश करण्यासाठी देवीने धारण केलेल्या श्रीदुर्गादेवीच्या रूपातून ‘शताक्षी आणि शाकंभरी’, या उपदेवींची निर्मिती झाली. दुर्गमासुराने वेदांना पाताळात नेऊन ठेवल्यामुळे सर्वत्र धर्मज्ञानाचा लोप होऊन अधर्म बळावला. त्यामुळे अनावृष्टी होऊन सर्वत्र दुष्काळ पडला. दुष्काळामुळे पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या जिवांना पिण्यासाठी पाणी देण्याकरता देवीचे ‘शताक्षी’ हे रूप कार्यरत झाले. या रूपात देवीच्या शंभर नेत्रांतून वहाणार्‍या अश्रुधारांमुळे पृथ्वीवर विविध नद्यांची निर्मिती झाली आणि दुष्काळाचे संंकट टळले. भक्तजनांची भूक शमवण्यासाठी त्यांना ‘शाक’, म्हणजे वनस्पती मिळाव्यात यासाठी देवीचे ‘शाकंभरी’ हे रूप कार्यरत झाले. अशाप्रकारे देवीच्या ‘शताक्षी आणि शाकंभरी’, या रूपांनी भक्तांवर आलेल्या अनिष्ट संकटाचे निवारण केले.

१ ई २ इ. गंगा इत्यादी विविध नद्यांच्या रूपातील देवी

हिंदु धर्मात जलाधिपती म्हणून वरुणदेवाचे वर्णन केले आहे. या जलाचे विराट रूप असणारा सागर समुद्रदेव म्हणून ओळखला जातो आणि विविध नद्या या देवीच्या रूपाने ओळखल्या जातात, उदा. गंगानदी, नर्मदानदी, यमुनानदी इत्यादी.

१ ई २ ई. गोमाता : हिंदु धर्मानुसार गायीला केवळ दूध देणारा प्राणी न मानता गोमाता मानले आहे. गायीच्या उदरात ३३ कोटी देवतांचा वास असतो. त्यामुळे हिंदूंसाठी गोमाता पूजनीय आहे.

१ ई २ उ. कुलदेवी : प्रत्येक मनुष्य ज्या कुळात जन्माला येतो, त्या कुळाची एक प्रमुख देवी किंवा देव असतो. कुलदेवीच्या कृपेमुळे कुळाला ऐहिक आणि पारमार्थिक लाभ होतो. ती कुळाचे रक्षण आणि कल्याण करते. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी तिच्या दर्शनाला जाणे, तिच्या वार्षिक उत्सवात सहभागी होणे आणि तिचे नामस्मरण करणे, अशी उपासना प्रत्येक हिंदूने करणे अपेक्षित आहे.

१ ई २ ऊ. भारतमाता : हिंदू भारतदेशाला, म्हणजे त्यांच्या जन्म आणि कर्म भूमीला मातेच्या स्वरूपात पाहून तिच्या रक्षणासाठी सदैव सिद्ध असतात. या भूमीतील क्रांतीकारकांनी भारतमातेसाठी स्वत:च्या प्राणांच्या आहुती दिल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेला ‘स्वातंत्र्यलक्ष्मी’च्या रूपाने गौरविले आहे.

भारतमाता

१ ई २ ए. धरणीमाता किंवा भूदेवी : ही धरणी म्हणजे केवळ ग्रह नसून ती ‘धरणीमाता’ आहे. तिला ‘भूदेवी’ असेही संबोधले जाते. श्रीविष्णूच्या श्रीदेवी आणि भूदेवी या दोन पत्नी आहेत.

१ ई ३. स्त्रिया आणि देवीतत्त्व यांचा परस्परांशी असणारा संबंध

हिंदु धर्मानुसार पुरुष हे शिवाचे आणि स्त्री दुर्गादेवीचे प्रतीक आहेत. कुमारिका आणि सुवासिनी यांमध्ये कार्यरत असणार्‍या देवीतत्त्वाच्या संदर्भातील भेद पुढीलप्रमाणे आहे.

१ ई ३ अ. कुमारिका आणि सुवासिनी

१ ई ३ आ. सनातनच्या स्त्री संत आणि त्यांच्यामध्ये कार्यरत असणारे देवीतत्त्व

१ उ. संबंधित लोक : ‘ब्रह्मांडातील तपोलोक ते सत्यलोक यांच्या मध्ये असणार्‍या विविध उच्च सगुण लोकांपैकी ‘देवीलोक’ हा एक प्रमुख लोक आहे. देवीचे उपासक आणि देवीचे भक्त मरणोपरांत देवीलोकात वास करतात.

१ ऊ. संबंधित पंचमहाभूत : पंचमहाभूतांपैकी पृथ्वीतत्त्व हे प्रामुख्याने देवीशी संबंधित आहे. त्यामुळे पृथ्वीला देवी मानले आहे.

१ ए. कुंडलिनीतील सप्तचक्रांशी संबंध : कुंडलिनीतील मूलाधारचक्र हे गणपती आणि देव यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे साधकाने कुलदेवीचे नामस्मरण चालू केल्यावर त्याचे मूलाधारचक्र जागृत होऊ लागते.

१ ऐ. संबंधित फुले आणि सुगंध : विविध देवींना विविध प्रकारची फुले प्रिय आहेत.

१ ऐ १. तारक रूपाच्या उपासनेसाठी पूरक गंध : गुलाब, मोगरा, केवडा, चंपा, चमेली, जाई, वाळा आणि रातराणी हे गंध देवीच्या तारक उपासनेसाठी उपयुक्त असतात.

१ ऐ २. मारक रूपाच्या उपासनेसाठी पूरक गंध : हीना आणि दरबार, हे गंध देवीच्या मारक उपासनेसाठी उपयुक्त असतात.

१ ओ. प्रदक्षिणांची संख्या : विषम संख्या ही शक्तीचे दर्शक असल्याने देवीच्या मंदिरात ३, ५, ७, ९, ११ अशा संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात.

१ औ. संबंधित धातू किंवा रत्न : पाचू आणि पोवळे यांमध्ये श्रीदुर्गादेवीच्या सत्त्वगुणी शक्तीलहरी अन् हिर्‍यामध्ये श्रीदुर्गादेवीच्या रजोगुणी शक्तीलहरी कार्यरत असतात.

१ अं. संबंधित वार : आठवड्यातील ‘मंगळवार आणि शुक्रवार’, हे वार देवीतत्त्वाशी संबंधित आहेत. या दिवशी इतर दिवसांच्या तुलनेत देवीतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते.

१ क. संबंधित तिथी : द्वितीया ब्राह्मीशी, तृतीया गौरीशी आणि अष्टमी अन् नवमी या तिथी दुर्गादेवीशी संबंधित आहेत.

१ ख. तत्त्वाचा रंग : देवीतत्त्वाचा रंग लाल असतो.

१ ग. प्रिय नैवेद्य : देवीला करंजी, पुरण पोळी, तांदळाची खीर (पायस) इत्यादी नैवेद्य प्रिय आहेत.

१ घ. संबंधित पूजासाहित्य : हळद आणि कुंकू यांमध्ये देवीतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे देवीला हळद आणि कुंकू वाहिले जाते. तसेच देवीच्या मूर्तीची पूजा करत असतांना तिच्यावर कुंकुमार्चन केले जाते.

१ च. संबंधित वाद्य : देवीला ढोल, ताशा, नगारे, वीणा, सतार, एकतारी इत्यादी वाद्यांचा नाद प्रिय आहे.

१ छ. शस्त्र आणि आयुध : देवी कार्यानुसार ढाल-तलवार, खड्ग, धनुष्य-बाण, परशु, पाश, त्रिशूळ, भाला इत्यादी शस्त्रांचा उपयोग करते.

१ ज. देवीचे वाहन : देवी कार्यानुसार विविध पशु आणि पक्षी यांचा वाहनाच्या रूपाने वापर करते.’

देवी वाहन
१. शैलपुत्री वृषभ (बैल)
२. चंद्रघंटा शार्दूल (सिंह)
३. कूष्मांडा व्याघ्र (वाघ)
४. स्कंदमाता शार्दूल (सिंह)
५. कात्यायनी शार्दूल (सिंह)
६. कालरात्री गाढव
७. महागौरी वृषभ (बैल)
८. चामुंडा शार्दूल (सिंह)
९. वाराही रेडा
१०. ऐंद्री ऐरावत हत्ती
११. ब्राह्मी राजहंस
१२. रुद्राणी वृषभ (बैल)
१३. वैष्णवी गरुड
१४. माहेश्वरी वृषभ (बैल)
१५. कौमारी मोर
१६. राजमातंगी पोपट
१७. सिंहवाहिनी सिंह
१८. शेरावाली वाघ
१९. दुर्गा वाघ
२०. कालिका व्याघ्र (वाघ)
२१. ईश्वरी वृषभ (बैल)
१ झ. देवी आणि संबंधित दिशा

संदर्भ : श्रीचंडीकवच

१ ट. संबंधित तीर्थक्षेत्र, शक्तीपीठ किंवा जागृत देवस्थाने

‘उत्तरेतील जम्मू येथील श्री वैष्णोदेवी आणि शारदादेवी, आसाम मधील कामाख्यादेवी, आंध्रप्रदेशमधील बोधन अन् बासर येथील श्री सरस्वतीदेवी, तमिळनाडूतील कांची येथील कामाक्षी, मदुराई येथील मीनाक्षी आणि कन्याकुमारी येथील कन्याकुमारीदेवी, कर्नाटकातील म्हैसुरू येथील चामुंडा, सौंदती येथील रेणुका, अल्लुक्का, मरिय्यम्मा, मुकांबिका, दुर्गापरमेश्‍वरी अन् महाराष्ट्रातील माहूरची रेणुका, तुळजापूरची भवानीमाता, कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगीदेवी, गोव्यातील शांतादुर्गा, गुजरात मधील अंबामाता, बंगालमधील कालीमाता आणि तारा, झारखंड राज्यातील छिन्नमस्तिका इत्यादी देवींची मंदिरे सुप्रसिद्ध आहेत.

१ ठ. देवीशी संबंधित ऋषि, भक्त आणि कलियुगातील संत

१ ठ १. संबंधित ऋषि : त्वष्टा ऋषि आणि मार्कंडेय ऋषि.

१ ठ २. संबंधित भक्त : रावणपुत्र मेघनाथ हा निकुंबला देवीचा भक्त होता. भक्त त्र्यंबकराज आणि भक्त सुदर्शन हे श्री दुर्गादेवीचे थोर भक्त होते. कवि कालिदास कालीमातेचे भक्त होते.

१ ठ ३. कलियुगातील संबंधित भक्त किंवा संत

आद्य शंकराचार्य हे मुकांबिका देवीचे, रामकृष्ण परमहंस हे महाकालीदेवीचे आणि छत्रपती शिवाजी महाराज भवानीमातेचे परमभक्त होते.

२. मूर्तीविज्ञान

नवदुर्गेची नऊ रूपे

बर्‍याच देवींच्या मूर्ती द्विभुज असतात. लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी यांच्या मूर्ती चतुर्भुज अन् दुर्गादेवीची मूर्ती अष्टभुज असते. विविध देवी कार्यानुसार विविध संख्येने हात धारण करतात. देवीने धारण केलेल्या हातांच्या संख्येवरून तिची कर्मेंद्रिये किती प्रमाणात कार्यरत असतात, हे आपल्याला लक्षात येते. देवीचा उजवा हात आशीर्वादाच्या म्हणजे वरद मुद्रेत, तर काही वेळा डावा हाता अभयमुद्रेत असतो किंवा तिच्या हातात पायसपात्र (पायस म्हणजे तांदळाची खीर), कमळ किंवा अग्नीकुंड असते.

३. विविध गुणवैशिष्ट्ये

ममत्व, वात्सल्य, प्रीती, प्रेरणा, मेधा, धारणा, कार्यशीलता, आवेश, सद्बुद्धी आणि क्षमा ही देवीची विविध गुणवैशिष्ट्ये आहेत.

४. उपासना

४ अ. देवीशी संबंधित ग्रंथ : दुर्गासप्तशती, देवीपुराण, देवीभागवत हे देवीशी संबंधित ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

४ आ. देवीशी संबंधित स्तोत्र, अष्टक आणि कवच : मंगल चंडिकास्तोत्र, श्री दुर्गास्तोत्र, श्री अन्नपूर्णास्तोत्र, श्री शताक्षीदेवीस्तोत्र, श्री लक्ष्मीस्तोत्र, श्री चंडिकवच (देवीकवच), श्री महालक्ष्मी अष्टक, श्री भवानी अष्टक, श्री सूक्त इत्यादी देवीशी संबंधित स्तोत्रे, अष्टक आणि कवच आहेत.

४ इ. देवीच्या संदर्भातील गीते : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मीस्वरूप भारतमातेवर ‘जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे…,’ आणि ‘ने मजसि ने परत राष्ट्रभूमीला, सागरा प्राण तळमळला…’ ही रचलेली गीते सुप्रसिद्ध आहेत. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वन्दे मातरम्’ या गीतात भारतमातेचे वर्णन दुर्गादेवीच्या रूपात केलेले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘शक्तीस्तवन’ या गीतात दिव्य शक्तीचे तिच्या आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांसह सुरेख वर्णन केले आहे.

४ ई. देवीच्या आरती : श्री गंगा, तुळशी, भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, दुर्गामाता, महाकाली, एकवीरादेवी, सरस्वतीदेवी, अन्नपूर्णादेवी, सप्तशृंगीदेवी, शांतादुर्गादेवी आणि नवरात्रीतील देवी यांच्या आरती प्रसिद्ध आहेत.

४ उ. देवीचे श्‍लोक

४ उ १. कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।

करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम् ॥

अर्थ : हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते. हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे अन् मूळ भागात गोविंद आहे; म्हणून सकाळी उठल्यावर आधी हाताचे दर्शन घ्यावे.

४ उ २. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

अर्थ : सर्व मंगल गोष्टींमधील मांगल्यस्वरूप, पवित्र, सर्व इच्छा साध्य करून देणार्‍या, सर्वांचे शरणस्थान असलेल्या, त्रिनेत्रधारिणी, हे गौरवर्णी नारायणीदेवी (पार्वती), मी तुला नमस्कार करतो.

४ उ ३. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम : ॥

अर्थ : हे देवी, तूच सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपाने स्थित आहेस. आम्ही तुला पुन:पुन्हा नमन करतो.

४ ऊ. देवीचे गायत्री मंत्र

४ ऊ १. सरस्वती गायत्री मंत्र

ॐ वाग्देव्यैच विद्महे । विरिंचिपत्न्यैच धीमहि ।

तन्नो सरस्वती प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही वाग्देवीला (सरस्वतीदेवीला) जाणतो. आम्ही सरस्वतीचे ध्यान करतो. ती सरस्वती आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

४ ऊ २. ब्रह्माणी गायत्री मंत्र

ॐ देव्यै ब्रह्मण्यै विद्महे । महाशक्त्यै च धीमहि ।

तन्नो देवी प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही ब्रह्माणीदेवीला जाणतो. (त्या) महाशक्तीचे आम्ही ध्यान करतो. ब्रह्माणी आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

४ ऊ ३. लक्ष्मी गायत्री मंत्र

ॐ महालक्ष्मीच विद्महे । विष्णुपत्नीच धीमहि ।

तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही महालक्ष्मीला जाणतो आणि विष्णुपत्नीचे (महालक्ष्मीचे) ध्यान करतो. ती लक्ष्मी आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

४ ऊ ४. दुर्गा गायत्री मंत्र

ॐ गिरिजायै विद्महे । शिवप्रियायै धीमहि । तन्नो दुर्गी: प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही गिरीजेला जाणतो आणि शिवप्रियेचे (दुर्गादेवीचे) ध्यान करतो. ती दुर्गा आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

४ ऊ ५. सीता गायत्री मंत्र

ॐ जनकात्मजायै विद्महे । भूमिपुत्र्यैच धीमहि ।

तन्नो जानकी प्रचोदयात्।

अर्थ : आम्ही जनककन्या सीतेला जाणतो. आम्ही भूमीपुत्री सीतेचे ध्यान करतो. ती जानकी आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

४ ऊ ६. राधा गायत्री मंत्र

ॐ वृषभानुजायै विद्महे । कृष्णप्रियायै धीमहि ।

तन्नो राधा: प्रचोदयात् ॥

अर्थ : आम्ही वृषभानूची कन्या (राधाराणीला) जाणतो आणि कृष्णप्रियेचे (राधेचे) ध्यान करतो. ती राधा आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

४ ए. संबंधित बीजमंत्र : ‘ऐं’ हे सरस्वतीबीज आहे, ‘क्रीं’ आणि ‘क्लीं’ ही कालीबीजे आहेत, ‘दूं’ हे दुर्गाबीज, ‘श्रीं’ हे लक्ष्मीबीज आणि ‘स्त्रीं’ हे धूम्रभैरवीबीज आहे. अशाप्रकारे विविध बीजमंत्र विविध देवींशी संबंधित आहेत.

४ ऐ . देवीचे प्रचलित नामजप : ‘ॐ श्री दुर्गादेव्यै नम: ।’,  ‘ॐ श्री महालक्ष्मीदेव्यै नम: ।’ आणि ‘ॐ श्री सरस्वतीदेव्यै नम: ।’ हे देवींचे नामजप प्रचलित आहेत.

४ ओ. यंत्र : देवीतत्त्व आकृष्ट करून त्यांचे प्रक्षेपण करणारी अनेक यंत्रे उपलब्ध आहेत. यांतील बरीच यंत्रे आद्य शंकराचार्य यांनी सिद्ध केलेली आहेत. नवार्णयंत्र, श्रीयंत्र, श्री महालक्ष्मी यंत्र, श्री सरस्वती यंत्र आणि श्री बगलामुखी यंत्र ही देवीशी संबंधित असणारी काही प्रमुख यंत्रांची नावे आहेत.

४ औ. संबंधित यज्ञ : चंडीयाग, शतचंडी, नवचंडी, सहस्रचंडी, गायत्रीयाग, सरस्वतीयाग, राजमातंगीयाग, बगलामुखीयाग इत्यादी यज्ञ हे देवीशी संबंधित आहेत.

४ अं. संबंधित व्रत : मंगळागौरी, जेष्ठागौरी, महालक्ष्मीचे व्रत, वैभवलक्ष्मीचे व्रत आणि सत्यंबा व्रत ही देवीशी संबंधित व्रते आहेत.

४ क. संबंधित सण : घटस्थापना, ललितापंचमी, सरस्वतीपूजन, महालक्ष्मीपूजन, दिवाळीतील लक्ष्मीपूजन, तुलसीविवाह हे देवीशी संबंधित सण आहेत.

४ ख. संबंधित उत्सव : चैत्रातील गौरी उत्सव, पौषातील शाकंभरी नवरात्र आणि शारदीय नवरात्रोत्सव हे देवीशी संबंधित उत्सव आहेत.’

देवीच्या चरणी कृतज्ञता आणि प्रार्थना !

‘हे माते, तुझ्याच कृपेमुळे आम्हाला धर्माचरण आणि साधना यांचा आनंद मिळून आमच्यात त्यांची गोडी निर्माण झाली आहे. तूच आम्हाला धर्माचरण आणि धर्मसेवा करण्यासाठी शक्ती अन् बुद्धी दे. तूच आमच्याकडून तुला अपेक्षित अशी व्यष्टी आणि समष्टी साधना करवून घे अन् आम्हाला मोक्षापर्यंत घेऊन चल’, अशी तुझ्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले,सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment