शुंभ आणि निशुंभ या अजेय असुरांशी युद्ध करून त्यांचा नाश करणारी आणि त्रैलोकात शांती प्रस्थापित करणारी पार्वतीसुता कौशिकीदेवी !

Article also available in :

कु. मधुरा भोसले
‘माझ्या बालपणी प्रत्येक सोमवारी रात्री ९.३० ते १०.३० या कालावधीत दूरदर्शन वाहिनीवर ‘ॐ नम: शिवाय’, ही धार्मिक मालिका लागायची. या मालिकेत शिवाचे आध्यात्मिक महत्त्व विशद करण्यासह देवीचे माहात्म्यही सांगितले होते. त्यामध्ये देवीने विविध असुरांचा वध करण्यासाठी धारण केलेल्या अवतारांची कथा सविस्तर दाखवली होती. सदर लेखात आपण पार्वतीपासून निर्माण झालेली कौशिकीदेवीची कथा आणि पार्वती देवीने धारण केलेली विविध रूपे यांची माहिती पहाणार आहोत.

 

१. शुभं आणि निशुंभ यांनी ब्रह्मदेवाकडून अजेय होण्याचा
अन् दिव्य स्त्री शक्तीकडून मृत्यू प्राप्त करण्याचा वरदान प्राप्त करणे

शुभं आणि निशुंभ या असुर भावांनी अनेक वर्षे ब्रह्मदेवाची कठोर आराधना केली. त्यांच्या तपश्‍चर्येने प्रसन्न झालेला ब्रह्मदेव हंसावर स्वार होऊन त्यांच्यापुढे प्रगट झाला. दोन्ही असुरांनी ब्रह्मदेवाकडे अमर होण्याचे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने ‘ते वरदान देणे अशक्य आहे’, असे सांगितले. त्यानंतर दोघांनी शक्ती, सैन्य आणि शस्त्रसंपन्न होऊन अजेय होण्याचा अन् त्रैलोकात विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले. यासमवेतच ‘कोणत्याही देवाकडून त्यांचा वध होऊ नये, तर अयोनिजा (मातेच्या गर्भातून जन्माला न आलेल्या) अशा दिव्य स्त्री शक्तीविषयी त्यांच्या मनात कामवासना जागृत झाल्यावर तिच्याद्वारे त्यांचा वध होऊ दे’, असे वरदान त्यांनी मागितले. ब्रह्मदेवाने ‘तथाऽस्तु’ म्हटले आणि ते अंतर्धान झाले.

 

२. शुंभ-निशुंभ यांच्या त्रासाने त्रैलोकातील जिवांनी जगदंबेला
प्रार्थना करणे आणि तिने त्यांचे दु:खनिवारण करण्याचा आशीर्वाद देणे

अतुलित बलसंपन्न झालेल्या या दोन्ही असुरांनी पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग या तिन्ही लोकांवर स्वत:चे अधिपत्य स्थापित केले. त्यांनी तिन्ही लोकांमध्ये हाहाःकार माजवला. मनुष्य, देवता, नाग, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध आणि विद्याधर यांचा ते छळ करू लागले. या असुरांना वाटले की, स्त्री दुर्बळ असल्यामुळे कोणतीही स्त्रीशक्ती त्यांचा वध करू शकत नाही. त्यामुळे ते अहंकारी झाले आणि उन्मत्त होऊन सर्वांवर अत्याचार करू लागले. त्यांच्या अत्याचाराने ग्रासित झालेल्या देवता आणि ऋषिमुनी यांनी ब्रह्मदेवाला या संकटातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले की, केवळ स्त्रीशक्तीच सर्वांचे दु:खनिवारण करू शकते. त्यामुळे सर्वजण पार्वतीमातेला शरण गेले आणि तिला त्यांची शुंभ-निशुंभ यांच्या जाचातून मुक्तता करण्यासाठी प्रार्थना करू लागले. जगदंबेने आदीशक्तीचे रूप धारण करून ‘सर्वांच्या त्रासाचे निवारण लवकरच केले जाईल’, असा आशीर्वाद दिला.

 

३. शिवाच्या कृपेने मंथराचलाच्या देहात
भिनलेले हलाहल विष बाहेर पडून त्याच्या वेदना शांत होणे

समुद्रमंथनात मेरु पर्वताचा एक भाग ‘मंथराचल’ याच्या भोवती वासुकी नाग दोरीप्रमाणे गुंडाळून देवासुरांनी समुद्रमंथन केले होते. समुद्रातून प्रगट झालेल्या हलाहल विषाचा कुंभ नीलकंठ भगवान शिवाने प्राशन केले. शिवाने विष प्राशन करेपर्यंत विषाचा अंशात्मक परिणाम समुद्रात बुडालेल्या मंथराचलाच्या काही भागावर झाला होता. समुद्रमंथनानंतर या पर्वताला त्याच्या मूळ जागी ठेवण्यात आले; परंतु या विषाच्या प्रभावामुळे त्याला असह्य वेदना होत असल्याने तो वेदनेने विव्हळत होता. तेथून भ्रमण करणार्‍या नारदमुनींना त्याची व्यथा समजली आणि त्यांनी तात्काळ कैलासावर जाऊन शिवशंकरापुढे त्याची व्यथा मांडून त्याचा उद्धार करण्याची प्रार्थना केली. त्याप्रमाणे शिवशंकर पार्वतीसमवेत मंथराचलाकडे गेले. त्यांनी आशीर्वादाची मुद्रा केल्यावर त्यांच्या उजव्या हाताच्या तळव्यातून मंथराचलावर चैतन्यकिरणांचा वर्षाव झाला आणि त्याच्या देहात भिनलेले हलाहल विष काळ्या धुराच्या रूपाने वातावरणात पसरू लागले.

 

४. हलाहल विषाच्या धुराच्या प्रभावाने गौरवर्ण असणारी
पार्वतीदेवी काळी होणे, आणि तिने ब्रह्मदेवाची आराधना केल्यावर,
तिच्यापासून श्यामवर्ण कौशिकीदेवीची निर्मिती होऊन पार्वती पुन्हा गोरी होणे

या विषारी धुराचा शिवशंकरावर काहीच परिणाम झाला नाही; परंतु त्यांच्याजवळ उभ्या असणार्‍या गौरीवर (पार्वतीवर) या विषारी धुराचा परिणाम होऊन तिच्या गौर वर्णाचे (गोर्‍या रंगाचे) रूपांतर श्याम वर्णात (काळ्या रंगात) झाले.

त्यामुळे ती सावळी दिसू लागली. शिवाने सांगितले की, पार्वती सावळ्या रूपातही सुंदर दिसते, तरीही पार्वतीला ती सावळी झाल्यामुळे अतिशय दु:ख झाले. हलाहल विषाच्या प्रभावामुळे मिळालेल्या श्याम वर्णाचे रूपांतर पुन्हा गौर वर्णात होण्यासाठी पार्वतीमातेने हिमालयातील पर्वतावर ब्रह्मदेवाची कठोर आराधना आरंभ केली. पार्वतीदेवीच्या कठोर आराधनेने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ते पार्वतीपुढे प्रगट झाले. ‘पार्वतीपासून श्याम वर्णधारी एका देवीची निर्मिती होऊ दे आणि पार्वतीला गौरवर्ण पुन्हा प्राप्त होऊ दे’, असे ब्रह्माने वरदान दिले. त्याप्रमाणे पार्वतीपासून श्याम वर्णधारी कौशिकीदेवीची निर्मिती झाली आणि पार्वती पुन्हा गोरी झाली.

 

५. कौशिकीदेवीने हिमालयातील पर्वतरांगांमध्ये निर्मिलेल्या महालात वास करणे

कौशिकीदेवीने पार्वतीला पहाताच तिला हात जोडून विनम्रपणे अभिवादन केले. पार्वतीमातेला कन्या मिळाल्याने अत्यधिक आनंद झाला. तेव्हा तिने कौशिकीसाठी हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये एका सुंदर महालाची रचना करून कौशिकीदेवीला तिथे रहाण्यासाठी सांगितले. ‘काही संकट आले, तर शंखनाद करून माझे आवाहन कर’, असे तिला सांगून पार्वती लुप्त झाली. कौशिकीदेवी तिच्या महालात तिच्या सखींसमवेत राहू लागली आणि महालातील शिवलिंगाची पूजा करून शिवाराधनेत मग्न झाली. कौशिकीदेवी शिवाची आराधना करतांना वीणावादन करत असे आणि सुमधुर आवाजात शिवस्तुती गात असे.

 

६. शुंभ-निशुंभ यांच्या आसुरी सैन्याने हिमालयाच्या पायथ्याशी रहाणार्‍या
ऋषिमुनींवर आक्रमण करणे आणि कौशिकीदेवीने मूर्तीतून साकार होऊन त्यांचे रक्षण करणे

हिमालयाच्या पायथ्याशी रहाणारे ऋषिमुनी कौशिकीदेवीची आराधना करत होते आणि त्यांनी आश्रमात तिच्या मूर्तीची स्थापना केली होती. एकदा स्वर्गावर राज्य करणार्‍या शुंभ-निशुंभ यांच्या आसुरी सैनिकांनी हिमालयाच्या पायथ्याशी रहाणार्‍या ऋषिमुनींच्या आश्रमावर आक्रमण केले. तेव्हा त्यांच्या साहाय्यासाठी मूर्तीतून प्रत्यक्ष कौशिकीदेवी प्रगट झाली आणि तिने अनेक असुरांवर शस्त्रांचा मारा करून त्यांचा नाश केला. यांतील काही असुर वाचले आणि ते शुंभ-निशुंभ यांच्याकडे धावत गेले. त्यांनी कौशिकीदेवीचे अनुपम सौंदर्य, गुणकौशल्य, शौर्य आणि पराक्रम यांचे वर्णन केल्यावर शुंभ-निशुंभ तिच्यावर मोहित झाले. त्यांनी तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडण्यासाठी एका असुराला दूत बनवून तिच्याकडे पाठवले. तेव्हा कौशिकीदेवीने सांगितले, ‘मी प्रतिज्ञा केलेली आहे की, जो महावीर योद्धा माझ्याशी युद्ध करून मला युद्धात परास्त करेल, त्याच्याशीच मी विवाह करीन.’ असुर दुताने कौशिकीदेवीची प्रतिज्ञा शुंभ-निशुंभ यांना सांगितली.

 

७. शुंभ-निशुंभ यांनी पाठवलेल्या धूम्रलोचनाचा वध
कालिकादेवीने आणि चंड-मुंड यांचा वध चामुंडादेवीने करणे

कोमलांगी आणि सुमधुरा अशा कौशिकीशी युद्ध न करता तिचे मन विवाह करण्यासाठी वळवण्याकरता शुंभ-निशुंभ यांनी त्यांचा सेनापती धूम्रलोचन याला पाठवले. तेव्हा कौशिकीदेवीने शंखनाद करून पार्वतीमातेचे आवाहन केले. पार्वतीने कालिकादेवीचे रूप धारण केले. तिने धूम्रलोचन आणि त्याचे आसुरी सैन्य यांच्याशी युद्ध करून त्यांचा नाश केला.

त्यानंतर कौशिकीला बळाने प्राप्त करण्यासाठी शुंभ-निशुंभ यांनी पाताळातील महावीर योद्धे चंड-मुंड यांना प्रचंड सैन्यासह पाठवले. या योद्ध्यांशी युद्ध करण्यासाठी पार्वतीने चामुंडादेवीचे रूप धारण केले आणि त्यांच्याशी युद्ध करून त्यांचा संहार केला.

 

८. पार्वतीने रक्तबीज या महाबली असुराशी युद्ध करून त्याचा नाश करणे

त्यानंतर शक्ती आणि बुद्धी या दोन्हीच्या साहाय्याने कौशिकीवर विजय प्राप्त करण्यासाठी शुंभ-निशुंभ यांनी रक्तबिजाला कौशिकीकडे पाठवले. कौशिकीचे रक्षण करण्यासाठी पार्वतीदेवी तिच्या महालात सूक्ष्मातून उपस्थित होती. तिने तलवारीचे वार करून रक्तबिजाचे शिर धडावेगळे केले. तेव्हा त्याच्या कापलेल्या मानेतून भूमीवर गळणार्‍या रक्ताच्या थेंबातून अनेक रक्तबीज निर्माण झाले. या रक्तबिजांचा नाश करण्यासाठी पार्वतीने धनुष्य धारण करून बाण सोडले. पुन्हा रक्तबिजांचे शिर धडावेगळे झाल्यावर त्यांतून असंख्य रक्तबिजांची निर्मिती झाली आणि तो मोठ्याने हसून अट्टाहास करू लागला. तेव्हा पार्वतीने तिच्या हातातील अग्नीकुंडातील ज्वाळा फुंकून रक्तबिजावर अग्नीज्वाळा सोडल्या आणि रक्तबिजाची असंख्य रूपे जळून गेली. त्याचे एक शिर जळत असतांना त्यातून पडलेल्या एका थेंबातून पुन्हा रक्तबीज प्रकट झाला. तेव्हा पार्वतीदेवीने त्याच्यावर पाश फेकून त्याचा गळा आवळला आणि त्याचा वध केला.

 

९. शुंभ-निशुंभ यांनी कौशिकीदेवीशी युद्ध करणे आणि युद्धात दोघेही मारले जाणे

शुंभ आणि निशुंभ या असुरांचा वध करतांना कौशिकीदेवी ! (सौजन्य : ‘मां वैष्णोदेवी डॉट ऑर्ग’ संकेतस्थळ)

रक्तबीज मारला गेला, हे ऐकताच शुंभ-निशुंभ यांची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि ते कौशिकीशी युद्ध करण्यासाठी सैन्यासमवेत सरसावले. कौशिकीदेवी सिंहावर आरूढ झाली आणि तिने अष्टभुजारूप धारण केले. तिच्या प्रत्येक हातामध्ये विविध शस्त्रे होती. तिघांची भेट आकाशमंडलात झाली. कौशिकीचे लावण्य पाहून शुंभ-निशुंभ स्तंभित झाले आणि ते तिला विवाह करण्याची गळ घालू लागले. तेव्हा कौशिकीने पुन्हा त्यांना तिच्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली. त्यामुळे शुंभ तिच्याशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाला आणि तो कौशिकीवर आक्रमण करू लागला. हे युद्ध पहाण्यासाठी आकाशात समस्त देवगण जमले. कौशिकीदेवीने तिच्यावर केलेले प्रत्येक आक्रमण परतून लावले आणि तिने प्रतिआक्रमण चालू केले. तिने केलेल्या प्रहाराने शुंभ घायाळ झाला आणि अखेर युद्धात मारला गेला. कौशिकीदेवीने निशुंभला स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी पाताळात निघून जाण्यास सांगितले; पण निशुंभ शुंभच्या हत्येचा प्रतिशोध घेण्यासाठी इरेला पेटला. तेव्हा देवीचे निशुंभशी घनघोर युद्ध चालू झाले. अखेर या युद्धात निशुंभही मारला गेला.

 

१०. कार्य समाप्तीनंतर कौशिकीदेवी पार्वतीमातेशी एकरूप होणे

शुंभ आणि निशुंभ यांच्या वधानंतर सर्व देवतांनी कौशिकीदेवी, माता पार्वती आणि भोलेनाथ भगवान शिव यांचा जयजयकार केला. इतक्यात तेथे शिवशंकर पार्वतीसह प्रगट झाले. सर्व देवदेवतांनी कौशिकीदेवी, शिव आणि पार्वती यांच्यावर पुष्पवृष्टी केली अन् ते कौशिकीदेवीचे यशोगान गाऊ लागले. माता-पित्यांना पाहून कौशिकीदेवीला अतिशय आनंद झाला आणि तिने त्यांना नम्रपणे वंदन केले. शिवाने सांगितले की, कौशिकीदेवीचे कार्य संपले आणि आता तिने पुन्हा पार्वतीमध्ये एकरूप झाले पाहिजे. पिता महादेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून कौशिकीदेवीचे सगुण रूप प्रकाशाच्या गोळ्यात रूपांतरित झाले आणि हा प्रकाशाचा तेजस्वी गोळा माता पार्वतीच्या सगुण रूपाशी एकरूप झाला.

अशाप्रकारे कौशिकीदेवीने महाबलशाली आणि अजेय योद्धे शुंभ अन् निशुंभ यांचा नाश करून त्रैलोक्यात सुख आणि शांती यांची स्थापना केली. यासाठी भोलेनाथ शिव, माता पार्वती आणि कौशिकीदेवी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !’

(संदर्भ : दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेल्या ‘ॐ नम: शिवाय’ मालिकेतून.)

Leave a Comment