धर्मकार्यासाठी तुमची निवड होणे ही भाग्याची गोष्ट ! – स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती

भूमीपूजनाच्या वेळी स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती आणि नमस्कार करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हरिद्वार – आपण स्वत: काही करत नसतो, देवच आपल्याकडून करवून घेत असतो. धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी तुमची निवड होणे, ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. हे धर्मरक्षणाचे कार्य आहे, असे मार्गदर्शन कर्नाटक येथील स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथे धर्मजागृती प्रदर्शन गंगानदी समोरील बडे हनुमान मंदिर प्रतिष्ठानच्या आवारात लावण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या जागेचे भूमीपूजन आणि धर्मध्वज पूजन प्रसंगी स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते.

स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती पुढे म्हणाले की, मागील जन्मी तुम्ही प्रभु श्रीरामचंद्र यांची सेवा केल्याने आता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धर्मप्रसाराची संधी मिळाली आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही पृथ्वीवर जन्म घेणार नाही. तुम्ही श्रेष्ठ देवदूत बनणार आहात. आवश्यकता भासल्यास जन्म घेतल्यास तुम्ही आमच्यासारख्या संतांच्या रूपात जन्माला याल. तुम्ही पुष्कळ भाग्यशाली आहात. सध्याची युवा पिढी एकीकडे वाया जात असतांना तुम्हा युवकांकडे पाहून पुष्कळ समाधान वाटते. ज्यांची क्षमता असेल, तेच या कार्यात जोडले जाणार आहेत. देवाच्या कृपेने मीही तुमच्या समवेत आहे. गुरु आज्ञेचे पालन करत चला. भारताचे नवनिर्माण तुमच्या माध्यमातून होणार आहे. प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेनेच होत असते. सुख-दु:ख हा देवाचाच प्रसाद आहे, असाच भाव ठेवावा. हे राष्ट्रच नाही, तर स्वर्ग आणि ग्रह यांठिकाणी जेथे धर्माचे पालन होत नसेल, तेथेही आपण धर्मपालन करण्यासाठी प्रयत्न कराल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

 स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती यांनी साधकांना दिलेला आशीर्वाद

या वेळी स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती साधकांना आशीर्वाद देतांना म्हणाले, ‘‘तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही सदैव निरोगी रहाल. तुमच्यामध्ये आनंद आहे, तुम्ही सर्व सेवा अत्यंत भावपूर्ण करत आहात. तुमच्यासारख्या पवित्र आत्म्यांना भेटून मला आनंद झाला. येथे लोक मागण्यासाठी येतात. तुम्ही देण्यासाठी आला आहात.’’

Leave a Comment