गणपति : विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता !

अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही हिंदुस्थानची नव्हे, तर विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती. इस्लामी राष्ट्रांतही पूर्वी तेथे गणपति पुजला जात असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. काबूलपासून थेट कॅस्पियन समुद्रापर्यंत भारतीय संस्कृती पसरली असल्याने त्या ठिकाणी हिंदु मंदिरांचे अस्तित्व स्वाभाविक आहे. हिंदु देवतांमध्ये शिव आणि श्री गणेश यांचे स्थान उच्च असल्यामुळे या दोन देवतांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. जगातील ६६ देशांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात श्री गणेश मंदिरे आणि त्यातील श्री गणेशमूर्ती विद्यमान आहेत. त्याची काही उदाहरणे –

बँक ऑफ इंडोनेशियाच्या नोटेवरील<br />गणपतीचे चित्र गोलाकार केलेल्या जागी दिसत आहे.
बँक ऑफ इंडोनेशियाच्या नोटेवरील गणपतीचे चित्र गोलाकार केलेल्या जागी दिसत आहे.

 

१. अफगाणिस्तान

येथे हिंदू राजांनी अनेक वर्षे राज्य केले. या कालखंडात केवळ मोठी मंदिरेच निर्माण करण्यात आली नाहीत, तर अनेक सार्वजनिक ठिकाणी हिंदु देवतांच्या मूर्तींचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यात श्री गणेशमूर्तींची संख्या सर्वाधिक होती. काबूलमधील प्रख्यात संग्रहालयामध्ये श्री गणेशाशी संबंधित मूर्तींची संख्या ६० होती.

१ अ. तालिबानच्या राजवटीत
चोरीला गेलेली श्री गणेशाची गुप्तकालीन सुंदर मूर्ती !

तालिबानने अफगाणिस्तानात मूर्तींचा विद्ध्वंस आरंभला, तेव्हा तेथे श्री गणेशाच्या गुप्तकालीन दोन मूर्ती अस्तित्वात होत्या. त्यातील एक मूर्ती चोरली जाऊन विकण्यात आली. त्या मूर्तीतील श्री गणेश उंच आणि चार हात असलेला होता. त्याच्या चार हातांपैकी एका हातात कमळ, तर दुसर्‍या हातात मोदक होता. जगात श्री गणेशाच्या अनेक सुंदर मूर्ती आहेत; पण या मूर्तीची सौंदर्य छटा काही वेगळीच होती, असे सांगितले जाते. श्री गणेश प्रत्येक स्थितीत आणि शैलीत सुंदरच असतो, असे सांगितले गेले असले, तरी वर उल्लेख केलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीसारखी सुंदरता अन्य कोठेही पहायला मिळत नाही. जो कोणी ही मूर्ती पाही, तो तिच्याकडे पहातच राही’, असे या मूर्तीविषयी सांगितले जाते.

१ आ. वर्ष २००१ मध्ये तालिबानकडून पीररतननाथ येथे ‘महाविनायक’ नावाच्या श्री गणेशमूर्तींचा विध्वंस !

पीररतननाथ येथे ‘महाविनायक’ या नावाची दुसरी श्री गणेशमूर्ती आहे. हा श्री गणेश दि्वभूज आणि उजव्या सोंडेचा आहे. या ऐतिहासिक मूर्तीचे छायाचित्र पुण्याच्या बुधवारपेठेत रहाणारे प्रसिद्ध इतिहास संशोधक श्री. संजय गोडबोले यांच्याकडून मिळाले आहे. त्या मूर्तीचे दोन्ही हात तोडण्यात आल्याचे छायाचित्रात स्पष्टपणे दिसून येते. श्री गणेशमूर्तीचे दोन हात तोडून तालिबानचे समाधान झाले नाही, म्हणूनच कि काय, वर्ष २००१ मध्ये तालिबान नेता मुल्ला ओमर याच्या आदेशावरून त्या मूर्तीसह सर्वच मूर्ती तोडून टाकण्यात आल्या !

 

२. इंडोनेशिया

हा एकमेव इस्लामी देश आहे की, जेथे श्री गणेशमूर्तीची विटंबना झालेली नाही. इंडोनेशियातील जनता हिंदु देवतांना राष्ट्रीय सांस्कृतिक ठेव्याचे प्रतीक मानतात. ती त्यांची श्रद्धेय दैवते आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य समजले जाते. इंडोनेशिया येथील चलनी नोटांवर गणपतीचे चित्र दिसते. इस्लामपंथीय इंडोनेशिया नोटेवर गणपतीचे चित्र छापते, तर हिंदु देवता पुजल्या जाणार्‍या भारतात तसे का होऊ शकत नाही ?

 

३. बलुचिस्थान (पाकिस्तान
अन् इराण यांत विभाजित झालेला भाग)

येथे मिळालेली गणेशमूर्ती बलुची पेहरावात आहे. श्री गणेशमूर्तीच्या मस्तकावर बलुची पगडी आहे आणि त्यांच्या आसपासच्या स्त्रिया पारंपरिक बलुची घागरे नेसून गणेशाची आरती करतांना दिसत आहेत.

 

४. तुर्कस्थान

केवळ अफगाणिस्तानातच नव्हे, तर इतर मुसलमान राष्ट्रांतही उत्खननाच्या वेळी श्री गणेशमूर्ती सापडतात. तुर्कस्तानच्या अंकारा शहरानजीक झालेल्या उत्खननात सापडलेल्या मूर्तींतील श्री गणेशमूर्ती लुंगी लावून बसलेली आणि डोक्यावर गोंडेदार तुर्की टोपी असलेल्या तुर्की पेहरावात आहे.

 

५. रशिया

ताश्कंद आणि बाकू येथील मंदिरात आजही श्री गणेशमूर्तींचे अवशेष आढळतात. येथे शिव मंदिरे मोठ्या प्रमाणावर असली, तरी तेथे शिव-पार्वतीसह श्री गणेशमूर्तीही दिसतात.

 

६. आशियातील अन्य राष्ट्रे

आशियातील काही राष्टांत श्री गणेश तेथील पारंपरिक कुर्ते आणि टोपी या वेशभूषेत विराजमान झालेले दिसतात. व्हिएतनाम, चीन, जपान, मलेशिया आणि कोरिया या देशांमध्ये आजही श्री गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. चिनी सदरा घातलेली श्री गणेशमूर्ती अत्यंत मनमोहक असते.

‘मध्य आशिया’ येथे झालेल्या संशोधनात संशोधकांना एक मोठे तैलचित्र मिळाले. त्याच्या चित्रांकनाची शैली मनीचिअन आहे. हे चित्र श्री गणेशाचे असून ते अशा प्रकारचे एकमेव उपलब्ध चित्र आहे. ते सध्या बर्लिन (जर्मनी) मधील एका संग्रहालयामध्ये ठेवले आहे.

– मुझफ्फर हुसैन (दै. लोकसत्ता (१९.८.२००१))

Leave a Comment