श्री गणेशजन्माची कथा आणि त्याचा वास्तविक आध्यात्मिक अर्थ !

हिंदुद्वेष्ट्यांकडून हिंदूंचा नानाप्रकारे बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘पार्वतीच्या मळापासून गणपतीचा जन्म होऊ शकतो का ?’, ‘शिव सर्वज्ञ आहे, तर त्याने स्वत:च्याच मुलाचे शिर का उडवले ?’, ‘एका असुराचे शिर असलेला गणपती हा देव कसा ?’ आदी प्रश्‍न विचारून हिंदूंची दिशाभूल करण्याचे प्रयत्न चालवले जात आहेत. या अनुषंगाने गणेशजन्माची कथा आणि त्याचा धर्मशास्त्रीयदृष्ट्या अर्थ येथे प्रसिद्ध करत आहोत. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र असे की, धर्मविरोधी पुरोगामी, धर्मांध आदींकडून होत असलेल्या हिंदु धर्माच्या टीकेच्या विरोधात हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन त्यांचा योग्य शब्दात परिणामकारक प्रतिवाद करणे आवश्यक आहे.

 

१. श्री गणेशजन्माची कथा

१ अ. पार्वतीने आपल्या मळापासून श्री गणेशाची निर्मिती करणे

एकदा शिव काही कार्यास्तव पुष्कळ कालावधीसाठी बाहेर जातात. त्या वेळी एकट्या असलेल्या पार्वतीला लक्ष्मी तिच्या मळापासून पुत्र बनवण्यास सांगते. ‘त्यामुळे तिचे एकटेपणही दूर होईल आणि जगताचा उद्धारही त्या पुत्रामुळे होईल’, असे ती सांगते. तिच्या आग्रहास्तव पार्वती आपल्या मळापासून एका मुलाची मूर्ती बनवून त्यात प्राणप्रतिष्ठा करते. तोच हा सर्वांचे कल्याण करणारा शुभकारी गणेश होय. या गणेशाला स्वतःच्या पित्याचे दर्शन घडलेले नसते. एकदा शिव येणार म्हणून पार्वती मंगलस्नानाला गेलेली असते. स्नानात सतत व्यत्यय येत असल्याने ती गणेशाला द्वाराजवळ उभा राहून कोणालाही आत न सोडण्याविषयी सांगते. गौरीनंदन गणेश मातेची आज्ञा शिरसावंद्य मानून कोणालाही आत सोडत नाही.

१ आ. शिवाने गणेशाचे शिर धडावेगळे करणे

श्रीमती रजनी साळुंके

त्याच वेळी शंकर तेथे येतात. पार्वतीला भेटण्यासाठी ते आत जात असतांना गणेश त्यांना अडवतो. त्याला वारंवार सांगूनही तो त्यांना आत प्रवेश करू देत नाही. शिवभक्त, अनेक ऋषी, तसेच स्वर्गातील देवही त्याला शिवाला आत जाऊ देण्याची विनंती करतात; परंतु तो मुळीच विचलित होत नाही. उलट स्वतःच्या सामर्थ्याच्या अहंकारामुळे तो त्यांना तुच्छ लेखून युद्धासाठी आव्हान करतो. त्यांना युद्धास भाग पाडतो. देवतांना बांधून टाकतो. ऋषीमुनींना त्रास देतो. कोणाचेही तो ऐकत नाही. त्यामुळे शिव पुन्हा तिथे येतात. त्याला समजावतात; परंतु तो त्यांचाही अपमान करतो. त्यांना हीन लेखतो आणि त्यांच्यावर आपले शस्त्र सोडतो. शिवाचा नाइलाज होतो आणि शिव त्याच्यावर त्रिशूळ सोडून त्याचे शिर उडवतात. झालेल्या प्रकाराने सर्वच भयभीत होतात. पार्वतीला हा प्रकार कळल्यावर ती पुत्राला पुनर्जीवित करण्याचा शिवाजवळ हट्ट करते आणि ते शक्य नसल्याचे कळल्यावर ती रूद्र आणि प्रलयंकारी रूप धारण करते. देवदेवता सृष्टीच्या हितासाठी गणेशाला जिवंत करण्याची शिवाला विनवणी करतात. त्याला मूळ स्थितीत पुनर्जीवित करणे शक्य नसल्याने शिव त्याला दुसर्‍या कोणाचे तरी शिर लावण्यास सांगतात. ‘तसे शिर सूर्यास्तापूर्वी जो प्रथम प्राणी दिसेल आणि जो स्वखुशीने शिर अर्पण करण्यास सिद्ध असेल त्याचेच असावे’, असेही ते सांगतात.

१ इ. गजाचे शिर गणेशाच्या धडाला लावण्यात येणे

त्यानुसार एक गज स्वप्राण अर्पित करण्यास सिद्ध असल्याने त्याचे शिर आणून गणेशाला लावण्यात येते. हा गज म्हणजे गजासुर असतो. अनेक वर्षे शिवाचे तप करून तोे त्याला प्रसन्न करून घेतो. त्या वेळी तो शिवाला त्याच्या उदरात रहाण्यास सांगतो; परंतु ब्रह्मा आणि विष्णु त्याला तसे करण्यापासून परावृत्त करतात आणि त्याला ‘कालांतराने तू शिवाजवळ कायमस्वरूपी रहाशील’, असे वरदान देतात. या महाज्ञानी गजासुराला ते वरदान सफल होण्याची ही संधी मिळाल्याने तो अतिशय आनंदाने समर्पणास सिद्ध होतो.

 

२. शंकानिरसन न झाल्याने कथा कल्पित वाटणे

लहानपणापासून आपण ‘पार्वतीने मळापासून बनवलेल्या गणेशाचा शंकर वध करतो आणि नंतर त्याला हत्तीचे म्हणजे गजाचे शिर लावून त्याला जिवंत करतो’, अशी गणेशजन्माची कथा ऐकली असते. त्या वेळी अनेक प्रश्‍न पडायचे. ‘मळापासून सजीव मूर्ती कशी बनते ? क्षुल्लक कारणावरून पिता पुत्राचा वध का करतो ? पुन्हा त्याला जिवंत का करतो ? तेही पूर्वीचे शिर न जोडता हत्तीचे शिर का जोडतो ? हे सर्व कसे शक्य आहे ?’, असे वाटून ‘या सर्व कथा कपोलकल्पित असाव्यात’, असे वाटायचे. त्यानंतर वेळोवेळी वाचनात आलेल्या कथा, मुलाने विचारलेल्या प्रश्‍नांनी जागृत झालेली जिज्ञासा, काहींनी केलेले शंकानिरसन यातून त्यातील गर्भितार्थ लक्षात येत होता; परंतु प्रत्यक्षात शास्त्रार्थ मात्र साधनेत आल्यावरच कळत गेला. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता आहे. त्यांनीच जिज्ञासूपणे या प्रश्‍नांची उत्तरे शोधायला शिकवली.

 

३. कथेचा भावार्थ

३ अ. मळापासून शक्तीशाली पुत्र बनवणारी आदिशक्ती

आदिशक्ती पार्वती ही जगज्जननी आहे. तिच्यापासून समस्त प्रकृतीची उत्पत्ती होते. तिच्यातील प्रचंड शक्तीमुळेच ती शिवाची शक्तीदायिनी आहे. तिच्याविना शिव ‘शव’ आहे, हे सर्वज्ञात आहे. पंचमहाभूतांनी बनलेल्या देहाला मर्यादा असतात; परंतु साधनेच्या बळावर पार्वती पंचमहाभूतांनी युक्त देहाच्या मर्यादा ओलांडून गेलेली असते; म्हणूनच ती देवाशी एकरूप होऊ शकते. अशा आदिशक्तीला अशक्य ते काय आहे ? त्यामुळेच ती तिच्या मळापासून तिच्या चैेतन्याच्या अंशाला, पुत्राला सिद्ध करू शकली.

दुसर्‍या शब्दात सांगायचे, तर कल्पांतापूर्वी दैत्यासुरमर्दिनी आदिशक्ती पार्वतीच्या मळातून महाशक्तीशाली पुत्राची निर्मिती सहज संभव आहे.

३ आ. जगत् कल्याणासाठी अहंकारी पुत्राला देहदंड देणारा जगत्पिता शिव !

गणेश महापराक्रमी होता. सामर्थ्याला म्हणजेच शक्तीला सात्त्विकतेची, म्हणजेच शिवाची जोड नसेल, तर सामर्थ्याचा अहंकार वाढतो. तो सर्वदा विनाशकारी असतो. त्याव्यतिरिक्त हा पुत्र आपली आज्ञा मानणारा असावा, असाही त्याच्या जन्माच्या वेळी पार्वतीचा एक स्वार्थी विचार असतो. स्वार्थी वृत्तीने केलेली कलाकृती सात्त्विकतेपासून दूर जाते. त्यामुळे मातेचे आज्ञापालन करतांना गणेश सारासार विवेकाच्या मर्यादा उल्लंघतो. करुणा, दया, क्षमा यांचे भान उरत नाही. रज-तम गुणांकडे झुकणारी ही शक्ती तमोगुणी अधिक होते. गणेशाच्या संदर्भातही असेच झाले होते. आदिशक्तीच्या मळापासून बनलेल्या गणेशाची शक्ती अफाट होती; परंतु बुद्धी मात्र मलिन, रज-तमोगुणी होती. वास्तविक हा पार्वतीनंदन विश्‍वाच्या कल्याणासाठी, ते मंगलमय करण्यासाठी अवतीर्ण झाला होता; परंतु ‘अशी मलिन बुद्धी जगाचे कल्याण नव्हे, तर अकल्याणच करणार’, हे त्रिकालज्ञानी शिवाने जाणले होते. आपल्या सामर्थ्याच्या अहंकाराने अन्याय करणार्‍या पुत्रामुळे जगाचे भवितव्य अंधकारमय होऊ नये, यासाठी त्याची मलिन बुद्धी जाणे आवश्यकच होते आणि ती घालवण्यासाठीच मलिन बुद्धी असलेले त्याचे शिर धडावेगळे करण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागतो. धन्य तो पिता, जो जगत्कल्याणासाठी पुत्राचे शिर उडवतो.

भारतीय संस्कृतीने आपल्यासमोर केवढा मोठा आदर्श ठेवला आहे ! असाच आदर्श संभाजीराजांच्या अपराधासाठी त्यांना दंड देणार्‍या शिवाजी महाराजांनी आपल्या समोर ठेवला आहे. पुत्राच्या मोहबंधनातून मुक्त होऊन असा कठोर निर्णय छत्रपती शिवाजी महाराज घेऊ शकले, ते केवळ हिंदु संस्कृतीतील अशा महान आदर्शांचा त्यांच्यावर सुसंस्कार करणार्‍या राजमाता जिजाबाईंमुळेच. केवढी महान आहे आपली हिंदु संस्कृती ! आज दुर्दैवाने भारतात पुत्रांचे कुकर्म लपवण्यासाठी त्याला पाठीशी घालणारे गर्वोन्मत्त राजकारणी आपण गल्लोगल्ली पहात आहोत. त्याचे राष्ट्रविघातक परिणामही भोगत आहोत.

३ इ. महाज्ञानी गजासुराचे शिर लावून शिवाने गणेशाची मलिनबुद्धी ‘शिव’बुद्धी करणे

गजासुराचे शिर लावल्याने मलिनबुद्धी असलेल्या गणेशाची बुद्धी पुन्हा शिवमय होते. गजासुराने केलेल्या शिवाच्या कठोर तपस्येमुळे तो महाज्ञानी बनतो. त्यामुळे गजाननाला, म्हणजे गणेशाला उपजतच सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त होते. ‘शक्ती’च्या मळापासून बनलेली मलिन बुद्धी ‘शिव’, म्हणजे पवित्र, सात्त्विक होते.

– श्रीमती रजनी साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 सार्वजनिक गणेशोत्सव आदर्शरित्या कसा साजरा करावा, हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !  

Leave a Comment