श्री गणपतीची आरती !

श्री गणपति Ganpati
श्री गणपति

श्री गणपतीची ही आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन’च्या भाव असलेल्या, म्हणजे ईश्‍वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल. तर ऐकूया, सनातनच्या साधकांच्या आवाजातील श्री गणपतीची आरती …….

श्री गणपतीची आरती एेका !

 

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।।

रत्‍नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ।। २ ।।

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।। – समर्थ रामदासस्वामी

 

आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ !

आता आपण श्री गणेशाची ‘सुखकर्ता, दुःखहर्ता … ‘ ही आरती ऐकली. आता या आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ समजून घेऊया. अर्थ समजल्याने देवतेचे श्रेष्ठत्व समजण्यास आणि तिची भक्ती वाढण्यास साहाय्य होते. • ‘नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।’ या ओळीतील ‘नुरवी’ म्हणजे न उरवी. ‘श्री गणेश आपल्या जीवनात कुठलेही विघ्न उरू देत नाही’, असा याचा अर्थ आहे. • ‘रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ।’ या ओळीतील ‘नूपुरे’ म्हणजे पायातील वाळे अन् ‘घागरिया’ म्हणजे वाळ्यांतील घुंगरू. • ‘लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।’ यातील ‘फणिवरबंधना’ याचा अर्थ कमरेला नागाचा करगोटा, म्हणजेच कडदोरा असलेला. ‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आरतीसंग्रह’

 

श्री गणेशाच्या आरतीचे असे होणारे विडंबन थांबवा !

सामाजिक संकेतस्थळावर श्री गणेशाची आरती आणि अन्य श्‍लोक यांचे विडंबन !

हिंदूंचा पवित्र गणेशोत्सव तोंडावर आला असतांना काही हिंदुद्वेष्ट्यांकडून सामाजिक संकेतस्थळावर श्रीगणेशाची आरती, तसेच अन्य श्‍लोक यांची विनोदी आणि उपहासात्मक मांडणी करून अशलाघ्य विडंबन करण्यात येत आहे. सध्या पुढील शब्द सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. या अयोग्य शब्दांस काही धर्माभिमानी हिंदूंनी स्वत:हून योग्य शब्द काय आहेत ते सांगून जागृती करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. ही आरती आणि श्‍लोक यांतील चुकीचे शब्द अन् त्यापुढे धर्माभिमानी हिंदूंनी सांगितलेले योग्य शब्द येथे देत आहोत. वाचकांच्या लक्षात येण्यासाठी चुकीचे आणि योग्य अशा दोन्ही शब्दांना अधोरेखित केले आहे. हिंदूंनी जागरूक राहून स्वत:च्या श्रद्धास्थानांचे विडंबन रोखून धर्मकर्तव्य बजवावे, ही अपेक्षा.

अ.क्र. चुकीचे शब्द योग्य शब्द
१. आेटी शेंदुराची उटी शेंदुराची
२. वक्रतुंड त्रिनेमा वक्रतुंडत्रिनयना
३. दास रामाचा वाट पाहे सजणा दास रामाचा वाट पाहे सदना
४. लवलवती विक्राळा लवथवती विक्राळा
५. आेवाळू आरत्या सुरवंट्या येति आेवाळू आरत्या कुर्वंड्या येति
६. लंबोदर पितांबर फळीवर वंदना लंबोदर पितांबर फणिवरबंधना
७. दिपक जोशी नमोस्तुते दिपज्योतिर्नमोऽस्तुते

श्री गणेशाची आरती, तसेच श्‍लोक यांचे विडंबन करणारे हिंदुद्वेष्टेच होत ! असे विडंबन अन्य पंथियांच्या बाबतीत झाले असते, तर आतापर्यंत सरकार, पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून त्याची त्वरित दखल घेऊन ते सामाजिक संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आले असते. तथापि बहुतांश हिंदू निद्रिस्त आणि धर्माभिमानशून्य असल्याने त्यांच्या श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन आवडीने वाचतात ! यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

Leave a Comment