गणेशभक्तांनो, भावभक्ती आणि धर्मपालन यांना जीवनात प्रथम अन् प्रमुख स्थान हवे !

Article also available in :

‘महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ऑगस्ट मासात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पूरग्रस्तांना नव्याने त्यांचे संसार उभारण्यासाठी बराच कालावधी लागणार, अशी स्थिती आहे. आता गणेशोत्सव जवळ आल्यामुळे, ‘पूरग्रस्त हिंदूंच्या गाठीला पैसा नसतांना, तसेच घरदार नसतांना श्रीगणेशमूर्तीची स्थापना कशी करावी ?’, असा प्रश्‍न विचारला जात आहे. राज्यात काही ठिकाणी मात्र दुष्काळजन्य स्थिती आहे. या ठिकाणी नियमित वापरासाठी पाणी उपलब्ध नसतांना ‘श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कुठे करायचे ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

हिंदूंच्या या स्थितीचा अपलाभ उठवत पुरो(अधो)गाम्यांकडून ‘पैसे नसतांना गणेशोत्सव कशाला ?’, तसेच ‘प्रदूषित नद्यांमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार का ?’, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

अशा परिस्थितीत येथे गणेशभक्त आणि भाविक यांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

 

१. पूरग्रस्त भागातील हिंदूंनी भावभक्तीने श्रीगणेशाची उपासना करावी !

पूरग्रस्त भागात ज्या हिंदूंना आर्थिक अडचणींमुळे श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे शक्य नाही, त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात भावभक्तीने श्रीगणेशाची उपासना करावी. स्वतःच्या घरात श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करणे शक्य नसल्यास त्या काळात ज्या ठिकाणी श्रीगणेशमूर्ती स्थापित केली असेल, त्या ठिकाणी जाऊन पूजाअर्चा करावी. असे करणे शक्य नसल्यास मानसपूजा करावी. परिस्थिती कितीही वाईट असली, तरी गणेशोपासना सोडायची नाही. ‘ईश्‍वराच्या कृपेमुळेच या संकटातूनही आपण तरून जाऊ’, याची सर्वांनी खात्री बाळगून या काळात गणरायाला अधिकाधिक प्रार्थना करावी, तसेच नामजप करावा.

 

२. दुष्काळग्रस्त भागातील हिंदूंनी
वहात्या पाण्यात श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे !

२ अ. एखाद्या ठिकाणी वहाते पाणी नसेल, तर श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी जेथे कुठे वहाते पाणी असेल, त्या ठिकाणी आपल्या भागातील अनेकांनी एकत्रित येऊन सर्वत्रच्या मूर्ती एकत्रित करून मूर्तीचे विसर्जन करायला हवे.

 

३. दुष्काळासारख्या आपत्काळात वहात्या
जलस्रोतात मूर्ती विसर्जित करता येणार नसल्यास काय करावे ?

३ अ. दुष्काळी परिस्थितीत विसर्जनासाठी सुसंगत होईल, अशा लहान आकाराची म्हणजे ६ – ७ इंच उंच अशा मूर्तीची स्थापना करावी. उत्तरपूजेनंतर ही मूर्ती घराबाहेर न्यावी. तुळशी वृंदावनाच्या जवळ किंवा अंगणात मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मूर्ती विसर्जित करावी. शहरांत सदनिकांमध्ये म्हणजे ‘फ्लॅट’मध्ये रहाणार्‍यांना तुळशी वृंदावन अथवा अंगण उपलब्ध नसल्यास घरातच मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मूर्तीचे विसर्जन करावे. मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळल्यानंतर ते पाणी आणि माती पायदळी येणार नाही, अशा रीतीने आपटा, वड, पिंपळ यांसारख्या सात्त्विक वृक्षांना घालावे.

३ आ. मोठी मूर्ती कालांतराने विसर्जित करणे मोठी मूर्ती बसवण्याचा पर्याय स्वीकारल्यास त्या मूर्तीची उत्तरपूजा झाल्यावर ती घरातच सात्त्विक ठिकाणी (उदा. देवघराच्या शेजारी) ठेवावी. या मूर्तीची पूजा करण्याची आवश्यकता नाही. धूळ बसू नये, यासाठी ती एखाद्या खोक्यात झाकून ठेवावी. पुढे वहाते पाणी उपलब्ध झाल्यानंतर ही मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करावी. वरील प्रकारचे विसर्जन केवळ अनावृष्टीसारख्या काळासाठी आपत्धर्म म्हणून संमत आहे.’

Leave a Comment