श्री गणेशमूर्ती कशी असावी ?

१. ‘श्री गणपति अथर्वशीर्षा’त वर्णिलेले श्री गणेशाचे मूर्तीविज्ञान

श्री गणपति Ganpati

श्री गणेशमूर्ती

श्री गणपति अथर्वशीर्षा’त गणेशाचे रूप (मूर्तीविज्ञान) असे दिले आहे – ‘एकदन्तं चतुर्हस्तं…।’ म्हणजे ‘एकदंत, चतुर्भूज, पाश आणि अंकूश धारण करणारा, एका हाती (मोडलेला) दात धारण करणारा आणि दुसर्‍या हाताची वरदमुद्रा असलेला, ज्याचा ध्वज मूषकचिन्हांकित आहे, असा, रक्त (लाल) वर्ण, लंबोदर, सुपासारखे कान असलेला, रक्त (लाल) वस्त्र नेसलेला, अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप लावलेला आणि रक्त (लाल) पुष्पांनी पूजन केलेला.’

टीप – श्री गणेश हा एका हाती (मोडलेला) दात धारण करणारा आहे, असे त्याचे रूप अथर्वशीर्षात सांगितले आहे. श्री गणेश ही मुख्यत्वे ज्ञानाची (विद्येची) देवता आहे. ‘मोदक’ हे ज्ञानाचे प्रतीक आहे. या कारणामुळे श्री गणेशाच्या हातात मोडलेल्या दाताच्या स्थानी मोदक दाखवण्याची पद्धत पडली असावी.

 

२. देवतेची सात्त्विक मूर्ती आणि तिचे लाभ

स्वयंभू मूर्ती, संतांनी स्थापन केलेली मूर्ती आणि शास्त्रानुसार बनवलेली मूर्ती यांमध्ये देवतेचे तत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते; म्हणून अशा मूर्ती सात्त्विक असतात.

२ अ. शास्त्रानुसार बनवलेली मूर्ती सात्त्विक का असते ?

१. मूर्ती देवतेच्या मूळ रूपाशी जितकी साम्य असणारी असेल, तितके तिच्याकडे त्या देवतेचे तत्त्व जास्त प्रमाणात आकृष्ट होते. ऋषीमुनी आणि संत यांनी शास्त्रे लिहिली आहेत. त्यांना देवतांचा जसा साक्षात्कार झाला, तशी त्यांनी देवतांची वर्णने शास्त्रांत केली आहेत; म्हणून शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे मूर्ती बनवल्यास ती सात्त्विक होते.

२. अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या सिद्धांतानुसार मूर्ती विज्ञानाप्रमाणे मूर्ती बनवल्यासच त्या मूर्तीमध्ये त्या देवतेचे तत्त्व आकृष्ट होते.

२ आ. सात्त्विक मूर्तीचे लाभ

१. भावजागृती होणे

मूर्ती सात्त्विक असेल, तर ती पहाणार्‍याचा अन् पूजन करणार्‍याचा भाव जागृत होतो.

२. देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ आणि वातावरणशुद्धी

सात्त्विक मूर्तीतून देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात प्रक्षेपित होते. याचा पूजकाला लाभ होतो, तसेच त्यामुळे वायूमंडलाचीही शुद्धी होते.

 

३. गणपतीची मूर्ती शाडूमातीचीच का हवी ? याचे धर्मशास्त्रीय विवेचन

आक्षेप : धर्मसिंधूमध्ये गणेशचतुर्थीला गणपतीची मूर्ती कशी असावी, याविषयी पुढील नियम दिला आहे.

तत्र मृन्मयादिमूर्तौ प्राणप्रतिष्ठापूर्वकं विनायकं षोडशोपचारैः सम्पूज्य…। – धर्मसिन्धु, परिच्छेद २

अर्थ : या दिवशी (भाद्रपद शुद्ध चतुर्थीला) श्रीगणेशाच्या माती इत्यादीपासून बनविलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापना करून षोडशोपचार पूजा करून..

येथे मृन्मय इत्यादी असा शब्द असल्याने इत्यादी या शब्दाच्या आधारे कोणी नारळांपासून,
पैशांच्या नाण्यांपासून अथवा अन्य गोष्टींपासून मूर्ती बनवल्यास त्याला सनातनचा आक्षेप का ?

खंडण : धर्मसिंधु हा ग्रंथ विविध स्मृतिग्रंथांचे संकलन करून बनवलेला आहे. कोणत्याही ग्रंथामध्ये आदी, इत्यादी यांसारखे शब्द एखादी माहिती संक्षेपाने सांगण्यास वापरतात. या आदी, इत्यादी यांसारख्या शब्दांचा अर्थ योग्य संदर्भ पाहून लावावा लागतो. धर्मसिंधूच्या वरील उदाहरणातील आदी या शब्दाचा अर्थ नारळ, पैशांची नाणी इत्यादी होऊच शकत नाही. याचे कारण पुढीलप्रमाणे आहे.

स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धीविनायक व्रत करण्यास सांगितले आहे. या वेळी मूर्ती कशी असावी ? याचे सविस्तर वर्णन आले आहे.

स्वशक्त्या गणनाथस्य स्वर्णरौप्यमयाकृतिम् ।
अथवा मृन्मयी कार्या वित्तशाठ्यंं न कारयेत् ॥ – स्मृतिकौस्तुभ
(मूळ संदर्भ : स्कंदपुराण, सिद्धिविनायक कथा आणि पूजा)

अर्थ : या (सिद्धिविनायकाच्या) पूजेसाठी स्वतःच्या ऐपतीप्रमाणे सोने, रूपे (चांदी) अथवा माती यांची मूर्ती बनवावी. यामध्ये कंजूषपणा करू नये.

यामध्ये सोने, चांदी अथवा माती यांपासूनच मूर्ती बनवावी, असा स्पष्ट उल्लेख असल्याने यांव्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य आहे. धर्मसिंधूच्या वरील सूत्रात मृन्मयादि या शब्दावरून मृन्मय म्हणजे मातीच्या मूर्तीलाच प्राधान्य आहे, हे स्पष्ट होते; कारण व्याकरणाच्या नियमांनुसारही प्राधान्याच्या गोष्टींचा उल्लेख करून अन्य गौण गोष्टींसंदर्भात आदी, हा शब्द वापरला जातो.

– वेदमूर्ती केतन शहाणे, अध्यापक, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी !’

 

४. काही विविधता

१. गणपति कधी पद्मासनास्थित, तर कधी नृत्यमुद्रेतही आढळतो.

२. हिमालयात एक मुंडकटा श्री गणेश आहे. या मूर्तीला शिर नाही, हे नावावरूनच लक्षात येते. पार्वतीने अंगमळापासून बनविलेल्या पुत्राचा शंकराने शिरच्छेद केला, ती ही मूर्ती असल्याचे सांगतात.

३. इतर रंग : हरिद्रागणपति आणि ऊर्ध्वगणपति हे पिवळे असतात. पिंगलगणपति पिंगट वर्णाचा, तर श्री लक्ष्मीगणपति शुभ्र वर्णाचा असतो.

४. लिंग : शिवलिंगाप्रमाणेच गणपतीचेही लिंग असते. त्याला गाणपत्यलिंग म्हणतात. ते डाळिंब, लिंबू, कोहळा किंवा जांभळाच्या आकाराचे असते.

५. नग्न : तांत्रिक उपासनेतील श्री गणेशमूर्ती बहुधा नग्न असते आणि त्या मूर्तीबरोबर त्याची शक्तीही असते.

६. स्त्रीरूप : ‘शाक्त संप्रदायात श्री गणेश स्त्रीरूपात पुजिला जातो. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. गणेश्वरी : तामीळनाडू येथील सुचिंद्रम् देवळात अत्यंत मनोवेधक असे गणेश्वरी शिल्प आहे.

आ. अर्ध गणेश्वरी : तांत्रिक उपासनेत हे एक अत्यंत अर्थपूर्ण असे स्वरूप आहे.

इ. गणेशानी : अत्यंत दुर्मिळ अशा तांत्रिक-मांत्रिक आराधनेमध्ये ही देवी सापडते.’

७. सौम्यगणपति, बालगणपति, हेरंबगणपति, लक्ष्मीगणपति, हरिद्रागणपति, उच्छिष्टगणपति, सूर्यगणपति, वरदगणपति, द्विभुजगणपति, दशभुजगणपति, नर्तकगणपति, उत्तिष्ठितगणपति, उजव्या सोंडेचा गणपति वगैरे बरेच प्रकार आहेत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री गणपति – भाग १’

टीप : श्री गणेशाची विविध रूपे असली, तरी पूजनासाठी मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली मूर्तीच आवश्यक आहे.

2 thoughts on “श्री गणेशमूर्ती कशी असावी ?”

 1. माघी गणपती ची मुर्ती कशी असावी याची माहिती मिळू शकते का…

  Reply
  • नमस्कार,

   गणेश चतुर्थीला आणायची श्री गणेश मूर्ती कशी असावी याविषयी मार्गदर्शन पुढील लिंकवर उपलब्ध आहे – https://www.sanatan.org/mr/a/747.html

   Reply

Leave a Comment