देवीचे माहात्म्य !

Article also available in :

देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तीपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते. हिंदु संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे, तितकेच देवीलाही आहे, हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते. भारतात अन्य संप्रदायांप्रमाणेच शाक्त संप्रदायही कार्यरत आहे. पंचायतन पूजेमध्ये शिव, विष्णु, गणपति आणि सूर्य यांसमवेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतीवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो.

 

१. शाक्त संप्रदाय

भारतामध्ये विविध संप्रदाय कार्यरत आहेत. या संप्रदायांनुसार संबंधित देवतेची उपासना प्रचलित आहे. गाणपत्य, शैव, वैष्णव, सौर्य, दत्त आदी संप्रदायांप्रमाणे शाक्त संप्रदायाचे अस्तित्वही पुष्कळ प्राचीन काळापासून भारतामध्ये आहे. शाक्त संप्रदायाने सांगितल्याप्रमाणे शक्ती उपासना करणारे अनेक शाक्त भारतात सर्वत्र आढळतात.

 

२. पंचायतन पूजेतील प्रमुख देवता

आद्य शंकराचार्य यांनी पंचायतन पूजेची प्रथा भारतात चालू केली. त्यामध्ये देवीचे स्थान महत्त्वाचे आहे. भारतात ज्या उपास्यदेवतांची उपासना केली जाते, त्या प्रमुख पाच देवतांपैकी एक शक्ती, म्हणजे देवी आहे.

 

३. तंत्रशास्त्राची आराध्य देवता

तंत्रशास्त्राचे पालन करणारे तांत्रिक तंत्रशास्त्राचे जनक सदाशिवाची उपासना करतात, त्याप्रमाणे त्रिपुरसुंदरी, मातंगी, उग्रतारा आदी तांत्रिक शक्तींचीही उपासना करतात. शिवाप्रमाणेच शक्तीही तंत्रशास्त्राची आराध्य देवता असल्याचे सुस्पष्ट होते.

 

४. पुराणातील कथांमधून देवीची लक्षात आलेली विविध गुणवैशिष्ट्ये

अ. जिज्ञासू आणि मुमुक्षू यांचे प्रतीक असलेली पार्वतीदेवी

पार्वतीमाता ही शिवाची अर्धांगिनी असली, तरीही शिवाकडून गूढ ज्ञान प्राप्त करतांना पार्वतीची भूमिका एखाद्या जिज्ञासूची असल्याचे जाणवते. तीव्र जिज्ञासेपोटी तिला तहान-भूक आणि झोप यांचेही भान रहात नाही. ज्ञानप्राप्तीच्या लालसेने ती शिवाला अनेक प्रश्‍न विचारते. यांतूनच प्रसिद्ध शिव-पार्वती यांचा वार्तालाप किंवा त्यांचे संभाषण यांचा उल्लेख पुराणांमध्ये झालेला आढळतो. पार्वती स्वतः आदिशक्ती असली, तरी गुरुसमान असणार्‍या शिवाकडून ज्ञानार्जन करण्यासाठी ती जिज्ञासू आणि मुमुक्षु यांचे मूर्तीमंत स्वरूप बनते. त्यामुळेच शिवाने पार्वतीला तंत्रशास्त्राचे गूढ ज्ञान दिले.

आ. कठोर तपश्‍चर्या करणारी पार्वती महान तपस्विनी
असल्याने तिला अपर्णा आणि ब्रह्मचारिणी या नावानेही संबोधले जाणे

ऋषिमुनी ज्याप्रमाणे कठोर तप करून भगवंताला प्रसन्न करून घेतात, तसेच कठोर तप पार्वतीने शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी केले होते. केवळ झाडाची पाने खाऊन राहिल्यामुळे पार्वतीला अपर्णा हे नाव प्राप्त झाले. पार्वती हिमालयराजाची कन्या आणि राजकुमारी होती. ती सुंदर आणि सुकोमल होती, तरीही शिवाला प्रसन्न करण्याचा तिचा दृढ निश्‍चय असल्यामुळे तिने देहाची तमा न बाळगता बर्फाने आच्छादलेल्या प्रांतात विशिष्ट मुद्रा धारण करून प्रदीर्घकाळ तप केले. तिच्या तपाची उग्रता इतकी होती की, त्यातून निर्माण झालेल्या ज्वाळा संपूर्ण ब्रह्मांडात पसरत होत्या आणि स्वर्गावर अधिपत्य मिळवलेल्या तारकासुरालाही भयभीत करून टाकणार्‍या होत्या. पार्वतीच्या वधासाठी जवळ आलेल्या तारकासुराच्या सैनिकांना तिची शक्ती सहन न झाल्यामुळे ते भस्मसात झाले. नवदुर्गांपैकी ब्रह्मचारिणी हे रूप हातात जपमाळ घेऊन तापसी वेश धारण केलेल्या तपस्यारत पार्वतीचेच प्रतीक आहे. पार्वतीला अपर्णा आणि ब्रह्मचारिणी या नावांनीही संबोधले जाते.

इ. समस्यांवर स्वत: उपाय शोधून काढणारी स्वयंपूर्ण पार्वतीदेवी

कैलासावर निवास करत असतांना स्नानाच्या वेळी कक्षाच्या पहार्‍याची सेवा करण्यासाठी पार्वतीने अंतःप्रेरणेने स्वतःच्या मळापासून गणपतीची निर्मिती केली. सुरक्षेच्या वैयक्तिक कारणास्तव जरी गणपतीची निर्मिती केलेली असली, तरी पार्वतीमुळे जगताला आराध्य दैवत श्री गणेश लाभले आहेत, हे त्रिवार सत्य आहे. देवी कौशिकीची निर्मितीही अशाच भावातून झालेली आहे. समुद्रमंथनाच्या वेळी मंदराचल पर्वताने स्वतःमध्ये शोषून घेतलेल्या विषाच्या प्रभावापासून त्याची मुक्तता करण्यासाठी शिवासमवेत गेलेल्या पार्वतीने त्याच्यावर करुणामय दृष्टीने कृपा केली. तेव्हा मंदराचलातून बाहेर पडणारा विषारी वायू शिवशंकर स्वतः शोषून घेत असतांना काही अंशाचा परिणाम पार्वतीवर होऊन ती काळी झाली. उमेला तिचा गौरवर्ण अतिशय प्रिय असल्याने पुन्हा गौर वर्ण प्राप्त करण्यासाठी तिने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपाला आरंभ केला. तिच्या तपश्‍चर्येने प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी तिला गौर वर्ण पुन्हा प्रदान केला आणि त्याच वेळी तिच्या श्यामवर्णातून कौशिकी नावाच्या एका देवीची निर्मिती केली. या देवीने पुढे शुंभ-निशुंभ या दैत्यांचा वध केला. यावरून स्वतःच्या श्यामवर्णाचे निमित्त साधून पार्वतीने संपूर्ण जगाला त्रस्त करणार्‍या शुंभ-निशुंभ या दैत्यांचा संहार करणार्‍या देवीची निर्मिती केली.

ई. अतीसंदवेनशील आणि अतीकठोर हे विरुद्ध गुण जोपासणारी पार्वती

श्री गणेशाचा शिरच्छेद केल्याचे समजल्यावर पार्वती विव्हल होऊन रुदन करू लागते आणि पुढच्याच क्षणी नवदुर्गेचे उग्र रूप धारण करून देवतांना कठोर वचन सुनावते. गणपतीला हत्तीचे मस्तक लावल्यानंतर पार्वतीचे उग्र रूप शांत होऊन ती उमेचे रूप धारण करते. देवी कौशिकीवर प्रहार करण्यासाठी आलेल्या असुरांना दंड देण्यासाठी पार्वती चंडी, चामुंडा, असे उग्र रूप धारण करून असुरांचा संहार करते आणि दुसर्‍याच क्षणी पुत्रीसमान असणार्‍या कौशिकीच्या प्रेमापोटी काळजीने व्याकुळ होते. पार्वतीमध्ये अतीसंवेदनशील आणि अतीकठोर हे विरुद्ध गुण एकाच वेळी प्रबळ असल्याचे जाणवते.

उ. आदिशक्तीचे स्वरूप प्रकट करून सर्वांना
छळणार्‍या दुर्गमासुर आणि महिषासुर या दैत्यांचा संहार करणे

नेहमी तपस्वी जीवन व्यतीत करणारे सौम्य रूप धारण करणार्‍या पार्वतीदेवीने प्रसंगी देवता आणि ब्रह्मांड यांचे अनिष्ट शक्तींच्या त्रासापासून संरक्षण व्हावे, यासाठी उग्र रूप धारण केल्याची अनेक उदाहरणे पुराणांत मिळतात. ब्रह्मदेवाकडून अजेय होण्यासमवेत चारही वेद प्राप्त करणार्‍या दुर्गमासुरामुळे धर्माला अवकळा प्राप्त झाली होती आणि सर्वत्र अधर्म बळावला होता. अशा परिस्थितीत देवतांचे बळ क्षीण झाले होते. तेव्हा दुर्गमासुराला केवळ स्त्री शक्तीच नष्ट करू शकत होती; कारण अन्य देवतांकडून अवध्य असण्याचे वरदान दुर्गमासुराला प्राप्त झालेले होते. तेव्हा पार्वतीने आदिशक्तीचे स्वरूप प्रगट करत श्री दुर्गादेवीचे रूप धारण केले आणि दुर्गमासुराशी घनघोर युद्ध करून त्याचा वध केला. अशाच प्रकारे अपराजित योद्धा आणि बलाढ्य अनिष्ट शक्ती यांनी युक्त असणार्‍या महिषासुराचा वध करण्यासाठी पार्वती, लक्ष्मी अन् सरस्वती या तिन्ही देवींची शक्ती एकत्रित होऊन त्यातून महिषासुरमर्दिनी देवीची निर्मिती झाली. मायावी शक्तीच्या साहाय्याने युद्ध करणार्‍या महिषासुराला पराभूत करून देवीने त्याचा शिरच्छेद केला. तशाच प्रकारे पार्वतीने चामुंडा रूप धारण करून चंड-मुंड या दैत्यांचा संहार केला आणि कालीचे रूप धारण करून असंख्य असुरांचा वध करून देवतांना अभयदान दिले.

ऊ. करुणामय देवीने पृथ्वीवरील जिवांसाठी शताक्षी आणि शाकंभरी रूप धारण करून कृपा करणे

दुर्गमासुराने वेदांना पाताळात नेऊन बंदीवान केल्यामुळे धर्माचा लोप झाला. यज्ञयाग आणि उपासना यांत खंड पडल्यामुळे देवतांना त्यांचा हविर्भाग मिळेनासा झाला. त्यामुळे देवतांचीही शक्ती क्षीण झाली. देवतांचा पृथ्वीवरील कृपावर्षाव थांबल्यामुळे पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला. नदी, झरे, पाणवठे आटून गेले. तेव्हा पृथ्वीवरील मरणोन्मुख स्थितीला सामोरे जाणार्‍या जिवांची दुर्दशा पाहून महिषासुरमर्दिनी मातेच्या डोळ्यांत पाणी तरळले आणि तिच्यातून शताक्षीदेवीची निर्मिती झाली. शंभर लोचन असणार्‍या या देवीच्या डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूधारा पृथ्वीवर आल्या आणि त्यांनी नद्यांचे रूप धारण केले. अशा प्रकारे सर्वत्र पाणी उपलब्ध झाले. नंतर देवीच्या अंशातून शाकंभरीदेवीची निर्मिती झाली, जिने तिच्या कृपेने पृथ्वीवर सर्वत्र शाक, म्हणजे पालेभाज्या आणि फळभाज्या निर्माण केल्या. अशा प्रकारे पृथ्वीवरील जिवांसाठी पाणी आणि शाक उपलब्ध होऊन पृथ्वीवरील दुष्काळाच्या संकटाचे निवारण झाले.

 

५. माता सरस्वतीने देवतांना साहाय्य करणे

अ. ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करतांना कुंभकर्णाला इंद्रासन मागायचे होते; परंतु देवतांच्या प्रार्थनेवरून महासरस्वती कुंभकर्णाच्या जिभेवर विराजमान झाली होती. त्यामुळे कुंभकर्णाने इंद्रासनाऐवजी निद्रासनाचे वरदान मागून घेतले.

आ. तारकासुराच्या तीन तारक पुत्रांचा पाडाव कसा करावा ?, असा प्रश्‍न समस्त देवतांपुढे पडल्यावर श्रीहरि विष्णूने त्यांना धर्मविमुख होण्यास प्रवृत्त करण्याचा उपाय सांगितला. धर्मविमुख करण्याचा उपाय कशा प्रकारे साध्य करायचा ?, याचे मार्गदर्शन माता सरस्वतीने नारदाला देऊन देवतांना साहाय्य केले.

 

६. माता लक्ष्मीने देवतांना साहाय्य करणे

शिवाच्या अंशातून आणि समुद्रातून उत्पन्न झालेला जालंधर हा दैत्य देवतांना ग्रासू लागला. लक्ष्मीचा जन्मही समुद्रमंथनातून झाल्यामुळे नात्याने जालंधर लक्ष्मीदेवीचा धाकटा भाऊच लागत होता; परंतु तो देवतांना त्रस्त करत असून त्याच्या मनामध्ये पार्वतीविषयी कामवासनेचे अधर्मी विचार असल्याने त्याचा नाश व्हावा, ही कामना लक्ष्मीने श्रीहरि विष्णूकडे केली. यावरून लक्ष्मीदेवी तत्त्वनिष्ठ असून तिने अधर्माने वागणार्‍या स्वतःच्या भावाची पाठराखण न करता देवतांच्या पक्षात निर्णय दिला आणि स्वतःचे धर्मकर्तव्य पूर्ण करून आदर्श उदाहरण जगापुढे मांडले.

 

७. दुर्गामातेने देवतांना केलेले साहाय्य

त्रेतायुगामध्ये श्रीरामाने नवरात्रीच्या कालावधीत देवीची उपासना केली आणि देवीच्या कृपाशीर्वादानेच विजयादशमीला रावणाचा वध केला. द्वापरयुगातही श्रीकृष्णाच्या प्रेरणेने अर्जुनाने महाभारताच्या युद्धाला आरंभ करण्याआधी श्री दुर्गादेवीला शरण जाऊन प्रार्थना केली. श्री दुर्गादेवीने प्रसन्न होऊन अर्जुनाला विजयश्रीचा आशीर्वाद दिला. श्री दुर्गादेवीच्या कृपेचे कवच धारण करूनच अर्जुनाने महाभारताचे युद्ध करून त्यात विजय प्राप्त केला.

देवीशी संबंधित ऋषि आणि राजे : त्वष्टा ऋषि, मार्कंडेय ऋषि हे देवीचे उपासक ऋषि होते, तर भक्त सुदर्शन हा शक्तीउपासक राजा होता. सर्वसामान्य जनांपैकी त्र्यंबकराज, नवीनचंद्र हे देवीचे परम भक्त होते.- (संदर्भ : भक्तमाल)

 

८. देवींच्या कवड्यांविषयी माहिती मिळणे

सद्गुरु गाडगीळकाकूंनी देवीच्या कवड्यांविषयी पुजार्‍यांना माहिती विचारली. तेव्हा आम्हाला समजले, ‘तुळजाभवानी देवीच्या कवड्यांना ‘अंबिका कवडी’ असे म्हणतात. ही पांढर्‍या रंगाची असते. माहुरगडावरील श्री रेणुकादेवीच्या कवड्यांवर ठिपके असतात. त्या कवडीला ‘रेणुका कवडी’ असे म्हणतात, तर कोल्हापूर येथील महालक्ष्मीदेवीच्या कवडीला ‘करडी कवडी’ असे म्हणतात.’ ही करड्या रंगाची असते. देवीने आम्हाला कवडीच्या माध्यमातून हे ज्ञानही दिले.

 

९. कलियुगात विविध संतांनी केलेली देवीची उपासना

९ अ. आद्य शंकराचार्य यांनी केलेली देवीची उपासना

आद्य शंकराचार्य यांनी त्रिपुरसुंदरीदेवीची उपासना केली होती, तसेच त्यांच्यावर मुकांबिकादेवी आणि सरस्वतीदेवी यांचा वरदहस्त होता. त्यांनी वयाच्या तिसर्‍या वर्षी देवी भुजंगस्तोत्र रचून देवीचे विविध प्रकारे वर्णन केले. त्यांनी ब्रह्मसूत्रादी विपुल लेखन करून देवीच्या उपासनेवर आधारित असणार्‍या सौंदर्यलहरी या ग्रंथाची रचना केली. काश्मीरस्थित शारदापिठावर स्थानापन्न होण्याचा आदेश माता सरस्वतीने आद्य शंकराचार्यांना दिला होता. संपूर्ण भारतभ्रमण करत असतांना आद्य शंकराचार्य यांची क्षुधा अन्नपूर्णादेवी भागवत असे. अशा प्रकारे आद्य शंकराचार्य यांच्यावर देवीची भरभरून कृपा असल्याचे दाखले त्यांच्या चरित्रातून मिळतात.

९ आ. शत्रूच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडता यावे, यासाठी
छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री बगलामुखीदेवीचा याग करणे

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुळजापूरची श्री भवानीदेवी ही कुलस्वामिनी होती. जय भवानी आणि हर हर महादेव अशी घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे शत्रूशी युद्ध करत होते. शत्रूशी लढण्यासाठीच श्री भवानीमातेने प्रसन्न होऊन शिवरायांना भवानी तलवार बहाल केली होती. याच तलवारीच्या बळावर त्यांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती आणि अनेक शत्रूंना मराठी तलवारीचे पाणी पाजले होते. छत्रपती शिवाजी महाराज जीर्ण देवळांचा जीर्णोद्धार करत आणि मंदिरांची सुव्यवस्था राखण्यासाठी निधी देत असत. देवतांच्या उपासनेअंतर्गत त्यांनी विविध समयी विविध प्रकारचे यज्ञयागही केले होते. मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांचा पाडाव करून त्यांना बंदिस्त करण्यासाठी सहस्र चंडी याग केले. शिवरायांना बंदीवान करण्यासाठी एवढे तरी पुण्य आपल्या पदरी पडावे, असा हेतू यामागे होता. बहिर्जी नाईक या गुप्तहेर प्रमुखाकडून सदर माहिती मिळाल्यावर त्यावर तोडगा काढण्यासाठी छत्रपतींनी श्री बगलामुखीदेवीचा याग लगेच केला. त्यानंतर शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे यांची प्रत्यक्ष भेट होऊन तह झाला. त्यानंतर औरंगजेबाच्या भेटीला गेल्यावर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना फसवून आग्रा येथे बंदीवान केले. त्यानंतर फळे आणि मिठाई यांच्या पेटीतून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे लपून किल्ल्याच्या बाहेर पडले आणि शत्रूच्या तावडीतून निसटले. श्री बगलामुखीदेवीच्या कृपेने छत्रपतींची बंदीवासातून सुखरूपपणे मुक्तता होऊ शकली. (ही कथा सनातनचे संत पू. विनय भावे यांनी सांगितली आहे.)

९ इ. सनातन संस्थेने काळानुसार आवश्यक असणारी सांगितलेली शक्ती उपासना

सनातन संस्थाही काळानुसार आवश्यक असणारी देवीची उपासना करण्यास शिकवते. येथे श्री दुर्गादेवीचा नामजप करण्यास सांगण्यात येतो. श्री दुर्गादेवी आणि श्री लक्ष्मीदेवी यांचे सिद्ध केलेले सात्त्विक चित्र आणि नामपट्ट्या यांचा उपासनेत उपयोग करण्यास सांगितला जातो. देवीतत्त्वाने युक्त असणारे कुंकूही उत्पादनांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. देवीतत्त्वाची अधिक माहिती होण्यासाठी देवीच्या उपासनेशी संबंधित शक्ती ग्रंथही उपलब्ध आहे. काळानुसार आवश्यक असणार्‍या श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करण्यात येत आहे. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सनातनच्या आश्रमात दिवसातून दोन वेळा देवीकवच लावण्यात येते.

९ ई. प.पू. डॉक्टरांनी काळानुसार देवीची उपासना करणे 

प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील देवघरामध्ये एका थोर संतांनी दिलेले देवीचे श्रीयंत्र आणि महर्षींनी पाठवलेले श्री वाराहीदेवीचे चित्र स्थापन करण्यात आले आहे. प.पू. डॉक्टर त्यांचे नियमितपणे पूजन करतात.

९ उ. संत आणि महर्षि यांनी सांगितलेली शक्ती उपासना

सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात श्री भवानीदेवीची पाषाणाची रेखीव मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. एका संतांनी पाठवलेली पंचधातूची सिंहवाहिनी श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि देवीची यंत्रे यांची स्थापना ध्यानमंदिरात झालेली असून त्यांचे नियमितपणे पूजन केले जाते. श्री बगलामुखीदेवीच्या प्रतिमेची आश्रमाच्या प्रवेशद्वारावर स्थापना करण्यात आली आहे आणि महर्षींनी सांगितल्याप्रमाणे आश्रमात आतापर्यंत ३ वेळा श्री बगलामुखी याग झालेला आहे.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment