श्रीरामजन्मभूमी हिंदूंना परत मिळवण्याच्या यशामध्ये जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे योगदान

अयोध्येत ५ ऑगस्ट २०२० या दिवशी भव्य श्रीराममंदिराचे भूमीपूजन झाले आणि बांधकामालाही प्रारंभ झाला आहे. श्रीराममंदिरासाठी न्यायालयामध्ये प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वापासून ते श्रीरामजन्मभूमीच्या अस्तित्वापर्यंत अनेक पुरावे देण्यात आले. त्यानंतर हिंदूंना हा ऐतिहासिक विजय मिळाला. यात अनेकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये श्रीरामजन्मभूमीची सुनावणी चालू होती. त्या वेळी हिंदूंच्या बाजूचे पक्षकार म्हणून धर्मचक्रवर्ती, तुलसीपिठाचे संस्थापक, पद्मविभूषण जगद्गुरु रामभद्राचार्य उपस्थित होते. जे वादग्रस्त भूमीवर श्रीरामजन्मभूमी असल्याच्या बाजूने धर्मशास्त्रांमधून एका पाठोपाठ एक पुरावे देत होते. तेव्हा ५ न्यायाधिशांच्या घटनापिठामध्ये सहभागी असलेल्या न्यायाधिशांनी खोचकपणे हिंदु बाजूच्या अधिवक्त्यांना विचारले की, ‘‘तुम्ही लोक प्रत्येक विषयामध्ये वेदांमधूनच प्रमाण मागता, तर तुम्ही वेदांमधूनच पुरावा देऊ शकता की, श्रीरामाचा जन्म अयोध्येत त्याच ठिकाणी झाला होता ? यावर प्रज्ञाचक्षु जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी थोडाही वेळ न घालवता सांगितले, ‘‘हो देऊ शकतो, महोदय !’’ आणि त्यांनी ऋग्वेदातील जैमिनीय संहितेचे उदाहरणे देणे चालू केले. ज्यात शरयू नदीपासून जन्मस्थळाची दिशा आणि अंतर यांची अचूक माहिती देत श्रीरामजन्मभूमीची स्थिती सांगितली आहे, जी तंतोतंत बरोबर होती.

 

जगद्गुरु रामभद्राचार्य यांचा परिचय

जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे मूळ नाव गिरिधर मिश्रा असून त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५० या दिवशी जौनपूर जिल्ह्यातील (उत्तरप्रदेश) सांडीखुर्द गावात झाला. ते प्रज्ञाचक्षु आहेत. ते केवळ दोन मासांचे असतांनाच त्यांची दृष्टी गेली. ते वाचू अथवा लिहू शकत नाहीत, तसेच ते ब्रेल लिपीचाही वापर करत नाहीत. ते केवळ ऐकून शिकतात आणि ते त्यांच्या रचना अन्यांच्या साहाय्याने बोलून लिहून घेतात. त्यांना २२ भाषा येत असून त्यांनी ८० ग्रंथांची रचना केली आहे. ज्यामध्ये महाकाव्यांचा (संस्कृत आणि हिंदी) समावेश आहे. तुलसीदास यांच्या संदर्भातील सर्वश्रेष्ठ अभ्यासकांमध्ये त्यांची गणना होते.

जगद्गुरु रामभद्राचार्य यांचा चित्रकूट (मध्यप्रदेश) येथे प्रसिद्ध आश्रम आहे. ते एक प्रसिद्ध विद्वान, शिक्षणतज्ञ, बहुभाषिक, रचनाकार, प्रवचनकार, दार्शनिक आणि हिंदु धर्मगुरु आहेत. ते संन्यासी असून रामानंद संप्रदायाच्या सध्याच्या ४ जगद्गुरु रामानंदाचार्यांपैकी एक आहेत, तसेच वर्ष १९८८ पासून या पदावर विराजमान आहेत. या समवेतच ते चित्रकूट येथील तुलसीपीठ नावाने धार्मिक आणि सामाजिक कार्याशी निगडित ‘जगद्गुरु रामभद्राचार्य विकलांग विश्‍वविद्यालया’चे संस्थापक आहेत अन् आजीवन कुलाधिपती आहेत. वर्ष २०१५ मध्ये भारत सरकारकडून त्यांना ‘पद्मविभूषण’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

(संदर्भ : सामाजिक माध्यमांवरून)

Leave a Comment