आपत्काळात घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा ?

१. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने
हिंदु धर्मशास्त्रात सांगितलेला पर्याय अर्थात् ‘आपद्धर्म’ !

सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लोकांच्या दळणवळणावर अनेक बंधने आली आहेत. भारतातही विविध राज्यांमध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) आहे. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प असला, तरी तेथे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर अनेक बंधने आहेतच. यामुळे हिंदूंचे विविध सण, उत्सव, व्रते नेहमीप्रमाणे सामूहिकरित्या करण्यावर बंधने आली आहेत. कोरोनासारख्या आपत्काळाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु धर्माने धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात.

आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे ‘आपत्काळात धर्मशास्त्राला मान्य असलेली कृती.’

 

२. गणेशचतुर्थी व्रत कशा प्रकारे करावे ?

गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. या अनुषंगाने आपद्धर्म आणि धर्मशास्त्र यांची सांगड घालून देखावे, रोषणाई आदी न करता साध्या पद्धतीने हे पार्थिव सिद्धिविनायकाचे व्रत पुढील पद्धतीने करता येईल.

२ अ. सध्या कोरोना महामारी असल्याने गणेश चतुर्थीच्या
ऐवजी माघी गणेश जयंतीला मूर्ती प्रतिष्ठापना करावी का ?

श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजन हे भाद्रपद महिन्यात करावे, असे धर्मशास्त्र सांगते. चातुर्मासाच्या काळात म्हणजे आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत विनाशकारक आणि तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रता अधिक असते; म्हणूनच या काळात आपले हिंदूंचे अनेक सण-उत्सव येतात. जेणेकरून सण-उत्सव-व्रते यांच्या माध्यमातून व्यक्ती ईश्‍वराच्या अनुसंधानात राहील. भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी गणेशलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने यमलहरींचीही तीव्रता अल्प व्हायला साहाय्य होते. त्यामुळे या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

२ आ. बाजारात शाडूची मूर्ती मिळणे कठीण आहे. अशा वेळी काय करावे ?

सध्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्ती बाजारात मिळतात. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती धर्मशास्त्रसंमत नाही. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’मध्ये रज-तमप्रधान असल्याने त्यापासून बनवली मूर्तीमध्ये गणेशाची पवित्रके आकृष्ट होत नाही. याविषयी अधिक माहिती श्री गणेशमूर्ती कशी असावी ? या लेखात वाचावी.

श्री गणेशमूर्ती चिकणमाती किंवा शाडू माती यांपासून बनवावी, असा शास्त्रविधी आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त अन्य पदार्थांनी गणेशमूर्ती बनवणे योग्य नाही; मग अशा स्थितीत पर्याय आपल्याकडे पर्याय काय आहेत, हे आता पाहूया.

१. आपण घरीच चिकणमातीची ६-७ इंचाची गणेशमूर्ती बनवू शकतो.

२. मूर्ती बनवता येत नसेल किंवा कोरोनाच्या संसर्गामुळे आजूबाजूचा परिसर अथवा इमारत प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित झाले असेल, तेथील लोक गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, यासाठी आपल्या घरातील गणेशाची मूर्ती अथवा गणेशाच्या चित्राचे षोडशोपचार पूजन करू शकतात. हे पूजन करत असतांना पूजेतील ‘प्राणप्रतिष्ठा’ हा विधी करू नये. ‘प्राणप्रतिष्ठा’ केलेली मूर्ती नंतर विसर्जित करावी लागते. यासाठी ही दक्षता घ्यावी.

२ इ. शाडूची मूर्ती बनवतांना त्यात बी ठेवावे आणि
नंतर मूर्ती कुंडीत विसर्जित करावी हे शास्त्रसंमत आहे का ?

असे करणे धर्मशास्त्रसंमत नाही. खरे तर हा धर्म न मानणार्‍या पर्यावरणवाद्यांचा हा प्रचार आहे. तुम्हाला वृक्षारोपण करायचे असेल, तर वर्षातील ३६५ दिवस तुम्ही कधीही करू शकता. पर्यावरणप्रेमासाठी धर्माचरणात परिवर्तन करायची काहीही आवश्यकता नाही.

२ ई. बाजारातून आणलेली मूर्ती सॅनिटाईझ करावी का ?

बाजारातून मूर्ती आणतांना आदल्या दिवशीच घरी आणावी आणि १२ घंटे घरातील सात्त्विक ठिकाणी अलगीकरण करून ठेवावी. ती कोरोनामुक्त होईल. मूर्ती सॅनिटाईझ करू नये. सॅनिटायझर्स मधील रासायनिक द्रव्यांमुळे मूर्तीचा रंगभेद होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्राच्या नियमानुसार शब्द, रूप, रस, गंध आणि शक्ती एकत्रित असतात. या नियमानुसार जरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली नसेल, तरी तिच्यात ते देवतेचे तत्त्व असते. मूर्तीमध्ये रंगभेद झाल्याने त्यातील देवतेच्या तत्त्वाची हानी होऊ शकते.

२ उ. कोरोना महामारीमुळे गुरुजींना घरी
बोलवण्यास मर्यादा आहेत. अशा स्थितीत काही ठिकाणी गुरुजी ‘ऑनलाईन’
माध्यमातून पूजा सांगणार आहेत. अशी ‘ऑनलाईन’ पूजा योग्य कि अयोग्य आहे ?

सध्याच्या संकटकाळात एकमेकांकडे जाता येत नसल्याने ‘ऑनलाईन’ पूजा हा एक चांगला पर्याय आहे. कर्मकांडामध्ये मंत्रांच्या उच्चाराला आणि पूजकाच्या ईश्‍वराप्रतीच्या भावाला महत्त्व असते.

गुरुजींच्या अनुपस्थितीत गणेशपूजन शास्त्रोक्त पद्धतीने करता यावे, यासाठी सनातन संस्थेने ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ हे मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. त्यामध्ये श्री गणेशाची विधिवत् पूजा सांगण्यात आली आहे. ते ‘अ‍ॅप डाऊनलोड’ करून आपणही घरच्या घरी श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता.

२ ऊ. दीड दिवसच गणपति बसवा, असा सल्ला दिला जात आहे. असे करावे का ?

सिद्धिविनायक व्रतानुसार भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य उत्सवप्रिय असल्याने तेवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस गणपती बसवून त्याचा उत्सव करू लागले. एखाद्याच्या कुलाचारात गणपति ५ दिवस असेल आणि त्याला तो दीड किंवा ७ दिवसांचा करायचा असेल, तर तो तसे करू शकतो. त्यासाठी अधिकारी व्यक्तीला विचारण्याची आवश्यकता नाही. पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, दहाव्या, अकराव्या दिवशी किंवा घरातील रूढीप्रमाणे श्री गणेशमूर्ती विसर्जन करावे.

 

३. कोरोना महामारीच्या काळातील मूर्ती विसर्जनाची बंधने लक्षात घेऊन काय करावे ?

मूर्तीविसर्जनाच्या वेळी जलस्रोतांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सध्या कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टासिंगचे सरकारी नियम पाळणे आवश्यक आहे. यासाठी गणेशमूर्ती आणतांना तसेच विसर्जन करतांना घरातील मोजक्याच व्यक्तींनी जावे. मूर्ती विसर्जन करतांना आपल्या घराजवळील तलाव, विहीर यांमध्ये विसर्जन करावे. या काळात गर्दी होण्याचा धोका अधिक असल्याने शासनाने कोरोना संदर्भात सांगितलेल्या मार्गदर्शक सूत्रांचे तंतोतंत पालन करणे, हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे.

ज्या ठिकाणी कोरोना संसर्गामुळे अडचण निर्माण झाली असून गर्दीच्या ठिकाणी जाऊन मूर्तीविसर्जित करणे शक्य नाही. अशा वेळी काय करावे, असा आपल्या मनात प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

घरात ६-७ इंचाची लघु गणेशमूर्ती पूजन केली असल्यास दुष्काळ किंवा आपत्कालीन परिस्थितीत उत्तरपूजेनंतर गणेशमूर्ती घराबाहेर न्यावी. तुळशी वृंदावनाच्या जवळ किंवा अंगणात मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मूर्ती विसर्जित करावी. शहरात रहाणार्‍यांना तुळशी वृंदावन किंवा अंगण उपलब्ध नसल्यास त्यांनी घरातच मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मूर्तीचे विसर्जन करावे. मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळल्यानंतर ते पाणी आणि माती पायदळी येणार नाही, अशा रीतीने शमी, रुई, औदुंबर, आपटा, वड, पिंपळ यांसारख्या सात्त्विक वृक्षांना घालावी.

मोठी गणेशमूर्ती पूजन केली असल्यास ती देवघराजवळ किंवा अन्य सात्त्विक ठिकाणी ठेवावी. या मूर्तीची पूजा करण्याची आवश्यकता नाही. धूळ बसू नये; म्हणून ती खोक्यात किंवा आच्छादनाने झाकून ठेवावी. पुढे श्राद्धपक्ष पूर्ण झाल्यानंतर गर्दी नसतांना ती मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करावी.

संकटकाळाच्या दृष्टीने आम्ही गणेशभक्तांना सूचना करू इच्छितो की, या संकटकाळात शक्यतो छोटी गणेशमूर्तीच पुजावी. शक्यतो मोठी गणेशमूर्ती टाळावी.

३ अ. या वर्षी कोरोना महामारी असल्याने गणेशमूर्ती पुढील वर्षी विसर्जित करावी का ?

गणेशमूर्तीची उत्तरपूजा झाल्यानंतर तिच्यातील गणेशतत्त्व निघून जाते, असे शास्त्र आहे त्यामुळे कोरोना महामारीचे संकट अल्प झाल्यावर ती मूर्ती विसर्जित करावी. तोपर्यंत ती मूर्ती आपल्या घरी वस्त्राने झाकून ठेवावी. येथे महत्त्वाचे सूत्र म्हणजे गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पुढच्या वर्षीपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही

३ आ. धातूची मूर्ती प्रतिष्ठापना केल्यास विसर्जनाचे शास्त्र काय ?

सिद्धिविनायकाचे व्रत म्हणून सोने-रूपे या धातूंची मूर्ती प्रतिष्ठापना केल्यानंतर ती मातीच्या मूर्तीप्रमाणे विसर्जित करावी. जे नियम मातीच्या मूर्तीला आहेत, तेच नियम धातूच्या मूर्तीला आहेत.

३ इ. काही आध्यात्मिक संस्था निर्माल्य गोळा करतात आणि ते खाणीत टाकतात. असे शास्त्रसंमत आहे का ?

असे करणे शास्त्रसंमत नाही. आपल्या क्षेत्रात आध्यात्मिक संस्था अशा प्रकारची धर्मविरोधी कृती करत असतील, तर त्यांना थांबवायला हवे.
एरव्ही श्री गणेशमूर्तीच्या समवेत निर्माल्याचेही विसर्जन करायचे असते. निर्माल्यातील चैतन्य पाण्यात विसर्जित झाल्यामुळे पाण्याद्वारे त्या चैतन्याचा समष्टी स्तरावर लाभ होतो. परंतु सध्याच्या आपत्कालात बाहेर जाता येत नसल्याने वैयक्तिक स्तरावर तरी निर्माल्यातील चैतन्याचा लाभ मिळावा यासाठी निर्माल्य पाण्यात बुडवून काढावे आणि नंतर त्या पाण्याचा वापर स्नानासाठी करावा किंवा ते पाणी अंगणातील फुलझाडांना घालावे. नंतर त्या निर्माल्याचा वापर खत-निर्मितीसाठी करावा.

याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी भेट द्या गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा !

 

४. मुंबईच्या प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ या गणेशोत्सव
मंडळाने यंदा गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा न करता आरोग्योत्सव
साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य कि अयोग्य आहे ?

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचा आरोग्याविषयक उपक्रम राबवण्याचा निर्णय चांगला आहे. गणेशोत्सव मंडळे या सामाजिक कार्य करणार्‍या संघटना आहेत. गणपति देवता हे या कार्याचे ईश्‍वरीय अधिष्ठान आहे. कुठलेही कार्य सफल होण्यासाठी ईश्‍वरीय अधिष्ठानाची आवश्यकता असते. त्यामुळे श्रीगणेशपूजन रहित करणे, हे एक प्रकारे ईश्‍वरीय अधिष्ठान नाकारल्यासारखे होईल. मंडळात श्री गणेशाच्या छोट्या मूर्तीची पूजा करणे आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवणे, या दोन्हीही गोष्टी करता येणे गणेशमंडळाला शक्य आहे. गर्दी होऊ नये; म्हणून ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखले जाईल, अशा पद्धतीने व्यवस्था करणे किंवा ‘ऑनलाईन दर्शना’ची सोय करणे, अशा काही व्यवस्थाही करता येण्यासारखे आहेत.

टीप :  श्रीगणेशाची पूजा कशी करावी साहित्य कोणते असावे याबाबत ज्यांना अधिक माहीती खालील मार्गिकेवर उपलब्ध आहे.

श्री गणेश चतुर्थी

– श्री. दामोदर वझे, संचालक, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (१३.७.२०२०)

Leave a Comment