गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करा !

अनुक्रमणिका

१. थर्मोकोलचा वापर टाळावा !

श्री गणेशाच्या मूर्तीसाठी मखर बनवतांना थर्मोकोलचा वापर करू नये. थर्मोकोल हा अविघटनशील घटक असून त्याच्या वापराने पर्यावरणाचा र्‍हास होतो. तसेच थर्मोकोल रासायनिक प्रक्रियेतून निर्माण झालेला असल्यामुळे तो रज-तमोगुणी आहे.

 

२. केळीच्या खोडाचा वापर करा !

केळीच्या खोडापासून बनवलेले मखर अधिक सात्त्विक असते.

 

अनु. क्र. गणेशोत्सवात हे नसावे !

गणेशोत्सवात हे असावे !

१. वर्गणी बळाने वसूल करणे ऐच्छिक वर्गणी स्वीकारणे
२. ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’पासून बनवलेली अशास्त्रीय अन् अवाढव्य मूर्ती मातीपासून बनवलेली अन् नैसर्गिक रंगांत रंगवलेली लहान मूर्ती
३. थर्माकोलची सजावट, भव्य मंडप आणि विद्युत लखलखाट (रोषणाई) नैसर्गिक पाना-फुलांची सजावट, लहान मंडप आणि दिव्यांची आरास
४. फटाके, वाद्यवृंद आणि चित्रपटगीते यांमुळे होणारे ध्वनी अन् वायू प्रदूषण तालबद्ध आरत्या आणि भावपूर्ण नामजप, तसेच पोवाडे, व्याख्याने आदींचे आयोजन
५. विसर्जन मिरवणुकीत गुलाल, हिडीस नाच, स्त्रियांशी असभ्य वर्तन अन् मद्यपान विसर्जन मिरवणुकीत श्री गणपतीचा नामजप अन् रात्री १० पूर्वी तिची सांगता

३. गणेशोत्सव आदर्श होण्यासाठी हे करा !

१. उत्सवस्थळी चित्रपटगीते, ‘रेकॉर्ड डान्स’, जुगार, मद्यपान, गुटख्यांची विज्ञापने टाळा !

२. उत्सवस्थळी स्तोत्रपठण, राष्ट्र व धर्म या विषयांवरील व्याख्याने आदी ठेवा !

३. रांगेतील भक्तांना गप्पागोष्टी टाळून नामजप/स्तोत्रपठण करण्यासाठी उद्युक्त करा !

४. राष्ट्रप्रेम आणि धर्मनिष्ठा वाढवणार्‍या विषयांवरील देखाव्यांचे सादरीकरण करा !

 

४. गणेशोत्सव मंडळांनो, लोककल्याणासाठी गणेशोत्सव साजरा करा !

आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि सवंग लोकप्रियतेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे प्रतिवर्षी चित्रविचित्र रूपांतील आणि अवाढव्य आकारांतील श्री गणेशमूर्ती बसवतात. श्री गणेशाची मूर्ती धर्मशास्त्रानुसार बनवावी आणि तिची उंची एक ते दीड फूट एवढीच का ठेवावी, असे शास्त्र असले तरी, श्री गणेशाच्या रूपात काही नाविन्य वा आकर्षकता नसेल आणि मूर्ती लहान असेल, तर गणेशोत्सवाला गर्दी कशी होणार ?, असा प्रश्‍न मंडळांच्या पदाधिकार्‍यांना पडू शकतो. यासंदर्भात मंडळांनी काय करायला हवे, हे पुढे दिले आहे.

अ. समाजाला गणेशोत्सवाकडे पहाण्याची आध्यात्मिक दृष्टी देणे

आपण समाजापुढे जे ठेवू, त्यानुसार समाजाला पहाण्याची सवय लागते. गणेशोत्सव मंडळांनी श्री गणपति अथर्वशीर्षाच्या सामुदायिक पठणासारखे कार्यक्रम आयोजित केले, तरीही लोकांची दाटी होऊ शकते. लोकांची तशी मानसिकता सिद्ध करणे, हे मंडळांचे कर्तव्य आहे. पुणे येथील श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपति संस्थान अथर्वशीर्षाचे सामुदायिक पठण आयोजित करते अन् त्या कार्यक्रमास प्रचंड दाटी होते.

आ. राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम वृद्धींगत करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करणे

सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ सामाजिक सोहळा नसून, हिंदूंची संस्कृती अन् संघटन वर्धिष्णू करण्याची, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची ती एक पर्वणीच आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळांनी राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम वृद्धींगत करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करावे. याची काही उदाहरणे –

अ. श्री गणेशाची उपासना वाढवणारे धर्मशिक्षण फलक अन् ग्रंथ यांचे प्रदर्शन

आ. संतांनी लिहिलेली भजने, दासबोधाचे निरूपण, राष्ट्रपुरुषांवरील पोवाडे इत्यादी कार्यक्रम

इ. हिंदु धर्मियांवरील अत्याचार, तसेच राष्ट्र अन् धर्म यांची होत असलेली हानी यांच्या विरोधात जागृती करणारी भाषणे

ई. स्वसंरक्षण प्रशिक्षण, उदा. कराटे, दंडसाखळी यांचे वर्ग

उ. क्रांतीकारकांच्या जीवनावरील प्रदर्शने

ऊ. सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीचा दर्शनसोहळा

या कार्यक्रमांना होणारी दाटी खर्‍याखुर्‍या राष्ट्रप्रेमी किंवा धर्मप्रेमी लोकांची असेल आणि अशा लोकांच्या प्रयत्नांतूनच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याचे सुराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन होईल.

 

गणेशोत्सव मंडळांनो, असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सनातन संस्था तुम्हाला साहाय्य करतील.

 

५. हिंदूंमध्ये श्रद्धा, राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करण्याची सुवर्णसंधी !

अ. स्वातंत्र्यानंतरही प्रतिदिन हिंदु धर्मीय अधोगतीकडे मार्गक्रमण करत असणे

‘गणेशोत्सवात होणार्‍या धर्महानीविषयी अत्यंत गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य मिळण्याआधी परकियांकडून हिंदु धर्माचा नाश होण्याच्या भीतीची छाया पसरलेली असायची. ‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदु धर्माच्या नाशाचे भय न्यून होईल’, असे वाटणार्‍यांना ‘हा आपला भ्रम होता’, हे आता लक्षात येत आहे. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊनही प्रतिदिन हिंदु धर्मीय अधोगतीकडे मार्गक्रमण करत आहेत. त्यामागील कारणे आहेत पाश्‍चात्त्यांचे अनुकरण, मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून हिंदूंचे धर्मांतर, लव्ह जिहाद, अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण, पुरोगाम्यांचा नास्तिकवाद, देवतांचे विडंबन, विदेशी आक्रमणाचे भय इत्यादी.

आ. उत्सवात धर्महानी करून भगवंताची अवकृपा ओढवून घेणारे हिंदू !

अशावेळी हिंंदूंनीच धर्महानी रोखण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक असतांना ते मात्र तसे करत नाहीत. हे संकट दूर करून भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी सण, उत्सव हे श्रद्धेने शास्त्रोक्त पद्धतीने आचरण्याचा प्रयत्न करायला हवा होता; परंतु दुर्दैवाने हल्लीच्या उत्सवांचे पावित्र्य हिंदूंनी घालवल्याने ते भगवंताच्या अवकृपेला पात्र होत आहेत. या संकटातून केवळ भगवंतच हिंदूंना वाचवू शकतो; परंतु हिंदू भगवंताची कृपा प्राप्त करण्याऐवजी धार्मिक आचरण, सण, व्रते अशास्त्रीय पद्धतीने साजरे करून अवकृपेला पात्र होण्यासारखे वर्तन करत आहेत.

 

६. गणेशोत्सव अशास्त्रीय पद्धतीने साजरा होण्यामागील काही कारणे

अ. काही संस्थांनी अशास्त्रीय पद्धतीने गणेशमूर्ती आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उद्युक्त करणे

काही संस्था अयोग्य पद्धतीने आणि अशास्त्रीय रितीने गणेशमूर्ती सिद्ध करण्यास अन् उत्सव साजरा करण्यास उद्युक्त करतात. हिंदु धर्मातील शास्त्रीय पद्धतींचा अभ्यास न करता ‘मनाप्रमाणे गणपतीच्या मूर्ती सिद्ध करून आणि त्यांची प्रतिष्ठापना (स्थापना) करून पूजा करा’, असा त्या संस्था प्रसार करतात, उदा. कागदाचा गणपति, शेणाचा गणपति. या संस्था ‘झाडाचे बी मूर्तीत ठेवून झाड वाढवा’, असे सांगतात. अशा प्रकारे या संस्था ‘हिंदूंचा उत्सव भगवंताच्या अवकृपेला पात्र होईल’, अशा रितीने साजरा करण्यास सांगत आहेत. अशा रितीने त्यांनी सांगणे, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील किंचित्ही ज्ञान नसलेल्या व्यक्तीने स्वतःच्या मनाने रुग्णाची रोगचिकित्सा करण्यासारखे आहे.

हिंदूंनो, मनाला येईल तशी गणेशमूर्ती सिद्ध न करता मातीची गणेशमूर्ती सिद्ध करून तिची प्रतिष्ठापना करा आणि ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करा !

आ. प्रशासनाची दायित्वशून्यता !

पूर्वीचे राजे प्रत्येक सण, उत्सव भक्तीने आणि पावित्र्याने साजरा होण्यासाठी काळजी घेत; परंतु आता प्रशासन अशी कोणतीही काळजी न घेता उत्सव साजरे करायचे म्हणून करते. कोणतीही समस्या उद्भवू नये; म्हणून उपाय शोधतांना ‘तो धर्माच्या विरोधात आहे का ?’, हे ते पहात नाहीत. उदा. काही राज्यांत ‘गणेशमूर्ती विसर्जन पाण्याच्या टाकीमध्ये करावे’, असा उपाय काढला. प्रत्यक्षात (शास्त्राप्रमाणे) नैसर्गिक जलस्रोतात गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करायला हवी होती; परंतु शासनाने त्याची काळजी न घेतल्याने टाकीमध्ये विसर्जित केलेल्या गणपतीच्या मूर्ती गटारासारख्या घाणेरड्या पाण्याच्या खाणीत, अस्वच्छ ठिकाणी टाकण्यात आल्याचे ऐकिवात आले. अशा रितीने मोठ्या प्रमाणात झालेल्या धर्महानीला प्रशासन कारणीभूत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचे शासनाने कठोर पाऊल न उचलल्याने अशा विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नाहीत अन् मूर्तीचे अवयव छिन्नविछिन्न होऊन इतस्ततः पडलेले आढळतात. अशा रितीने प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उत्सवाचा घोर अपमान होत आहे.

इ. हिंदूंमध्ये असलेला धर्मशिक्षणाचा अभाव

मद्यपान करून उत्सवात भाग घेणे, चित्रपटाची गाणी लावणे, मोठ्या आकाराच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणे, विनोदी कार्यक्रमांचे आयोजन करून त्यात देवतांचे विडंबन करणे, गणेशोत्सवाच्या नावाने गोळा केलेल्या पैशांचा मद्यपान, अशा अनेक चुका उत्सव साजरा करतांना होतात. यास हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव कारणीभूत आहे !

 

७. हिंदु राष्ट्राची आवश्यकता

इतक्या मोठ्या प्रमाणात धर्महानी होतांना पाहून ‘प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण दिले पाहिजे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे म्हणणे किती सत्य आहे’, याची जाणीव होते. ‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात धर्माभिमानी हिंदू सिद्ध होतील’, हे असत्य ठरले आहे आणि धर्माभिमानशून्य अन् धर्माला हानी पोहोचवणारे हिंदू सर्वत्र झाले आहेत. यावर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, हा एकमेव उपाय आहे. हिंदु राष्ट्रात सर्व सण आणि उत्सव शास्त्रीय पद्धतीने साजरे होतील. हिंदूंचे सण, उत्सव आदी शास्त्रोक्त पद्धतीने साजरे करण्यासाठी आणि भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे.

८. हिंदु युवकांना आवाहन !

गणेशोत्सव मंडळांनो, हिंदु युवकांनो, हिंदूंमध्ये भगवंताविषयी श्रद्धा, भक्ती, राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करण्यासाठी गणेशोत्सव ही ईश्‍वराने दिलेली अमूल्य अशी सुवर्णसंधी आहे. गणेशोत्सवात मनोरंजन आणि मौज-मस्ती करून भगवंताची अवकृपा ओढवून घेऊ नका. हिंदूंमध्ये श्रद्धा, भक्ती, राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करण्यासाठी उत्सवाचे नियोजन करा. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी या उत्सवाचा एक मोठे माध्यम म्हणून उपयोग करून ईश्‍वराच्या कृपेला पात्र व्हा.

Leave a Comment