श्री गणेशमूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ

१. संपूर्ण मूर्ती

ओंकार, निर्गुण.

१ अ. सोंड

१ अ १. उजवी सोंड

उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तीशाली असतो. तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही अर्थी उजव्या सोंडेचा गणपति जागृत आहे, असे म्हटले जाते. दक्षिणाभिमुखी मूर्तीची पूजा नेहमीसारखी केली जात नाही; कारण दक्षिणेकडून तिर्यक (रज-तम) लहरी येतात. अशा मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून केली जाते. त्यामुळे सात्त्विकता वाढते आणि दक्षिणेकडून येणार्‍या रज-तम लहरींचा त्रास होत नाही.

१ अ २. डावी सोंड

डाव्या सोंडेचा गणपति म्हणजे वाममुखी गणपति. वाम म्हणजे डावी बाजू किंवा उत्तर दिशा. डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे, ती शीतलता देते. तसेच उत्तर दिशा अध्यात्माला पूरक आहे, आनंददायी आहे; म्हणून बहुधा वाममुखी गणपति पूजेत ठेवतात. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.

१ आ. मोदक

१. ‘मोद’ म्हणजे आनंद आणि ‘क’ म्हणजे लहानसा भाग. मोदक म्हणजे आनंदाचा लहानसा भाग. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे ‘ख’ या ब्रह्मरंध्रातील पोकळीसारखा असतो. कुंडलिनी ‘ख’ पर्यंत पोहोचल्यावर आनंदाची अनुभूती येते. हाती धरलेला मोदक, म्हणजे आनंद प्रदान करणारी शक्ती.

२. ‘मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहे; म्हणून त्याला ‘ज्ञानमोदक’ असेही म्हणतात. ज्ञान प्रथम थोडे आहे असे वाटते (मोदकाचे टोक हे याचे प्रतीक आहे); पण अभ्यास करू लागल्यावर समजते की, ज्ञान हे फारच मोठे आहे. (मोदकाचा खालचा भाग हे त्याचे प्रतीक आहे.) मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो.’

३. मोदकाचा आकार नारळासारखा असतो. नारळाचे एक वैशिष्ट्य, म्हणजे तो त्रासदायक स्पंदने स्वतःमध्ये आकृष्ट करून घेतो. मोदकही भक्तांची विघ्ने आणि त्यांना होत असणारा वाईट शक्तींचा त्रास स्वतःमध्ये खेचून घेतो. गणपति मोदक खातो, म्हणजे विघ्ने अन् वाईट शक्ती यांचा नाश करतो.

१ इ. अंकुश

आनंद आणि विद्या यांच्या संपादनाच्या कार्यातील विघातक शक्तींचा नाश करणारा.

१ ई. पाश

श्री गणपति वाईट गोष्टींना पाश टाकून दूर नेणारा, असा आहे.

१ उ. कटीला (कमरेला) वेटोळे घातलेला नाग

विश्‍वकुंडलिनी

१ ऊ. वेटोळे घातलेल्या नागाचा फणा

जागृत कुंडलिनी

१ ए. उंदीर

उंदीर, म्हणजे रजोगुण गणपतीच्या नियंत्रणात आहे.

 

श्री गणेशाला करायच्या काही प्रार्थना

१. हे बुद्धीदाता श्री गणेशा, मला सद्बुद्धी दे. हे विघ्नहर्ता, माझ्या जीवनात येणार्‍या संकटांचे निवारण कर.

२. हे श्री गणेशा, तू प्राणशक्ती देणारा आहेस. दिवसभर उत्साहाने कार्य करता येण्यासाठी मला आवश्यक तेवढी शक्ती दे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गणपति’

Leave a Comment