प.पू. दास महाराज यांनी बालपणापासून केलेली मारुतीची भक्ती आणि त्यांना ध्यानावस्थेतील मारुतिरायाचे झालेले सगुण दर्शन !

‘२३.४.२०२० या दिवशी प.पू. दास महाराज रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना साधक श्री. दिवाकर आगावणे यांना त्यांचा सत्संग लाभला. त्या वेळी प.पू. दास महाराज यांनी श्री. दिवाकर यांना त्यांचा साधनाप्रवास आणि त्यांना झालेले मारुतिरायाचे दर्शन यांविषयी अवगत केले.

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

 

१. लहानपणी नारळाच्या झाडावर चढल्यावर ३० – ३५
फुटांवरून खाली पडूनही काही इजा न होणे आणि त्या वेळी ‘मारुतिरायाने
शेपटीत गुंडाळून खाली पडून इजा होण्यापासून वाचवले’, असे सूक्ष्मातून दिसणे

‘मी लहानपणापासूनच खोडकर आणि मस्ती करणारा होतो. ‘कधी या झाडावर चढ, तर कधी त्या झाडावर चढ’, असे माझे नेहमीच चालू असे. मी बराच दंगा करत असे. मी ७ – ८ वर्षांचा असतांना एकदा एका नारळाच्या झाडावर चढलो आणि ३० – ३५ फुटांवरून खाली पडलो. खाली सर्वत्र खडक आणि दगड होते, तरीही मला काहीच लागले नाही. झाडावरून खाली पडतांना ‘हनुमंताने मला त्याच्या शेपटीने गुंडाळून खाली पडून इजा होण्यापासून वाचवले होते’, असे मला सूक्ष्मातून दिसले होते.

 

२. मारुतीवर विशेष प्रेम असल्यामुळे एका दगडाची मारुति म्हणून
पूजा करणे आणि ‘मला मारुति दाखवा’, असे म्हणून वडिलांच्या मागे लागणे

लहानपणापासूनच मला मारुतिरायाविषयी विशेष प्रेम होते. मला मारुति पुष्कळ आवडत असे. मी एक दगड घ्यायचो आणि त्या दगडाला मारुति म्हणून उसाच्या कांडाची पाती काढून शेपूट म्हणून लावायचो. नंतर त्याला फुले वाहून मी त्याची ‘मारुति’ या भावाने पूजा करायचो. एकदा मी माझ्या वडिलांना ‘मला मारुति दाखवा. ‘मारुति कसा असतो ?, हे मला बघायचे आहे’, असे म्हणू मी त्यांच्या मागेच लागलो.

 

३. वडिलांनी एका ज्योतिषाला प.पू. दास महाराज यांची
कुंडली दाखवणे आणि त्यांनी ‘या मुलाला वयाच्या १५ व्या वर्षी
महामृत्यूयोग असून तो संतकृपेविना टळणे अशक्य आहे’, असे सांगणे

माझ्या बाबांचे रत्नागिरीला प.प. श्रीधरस्वामींच्या काही भक्तमंडळींच्या समवेत येणे-जाणे होत असे. तेथे श्री. भांबुकाका नावाचे एक ज्योतिषी होते. माझ्या वडिलांनी त्या ज्योतिषांना माझी कुंडली दाखवली. माझे वडील त्यांना म्हणाले, ‘‘हा मुलगा ऐकत नाही. दंगा करतो. त्याने मास्तरांनाही दगड मारला आहे. त्याने चौथीत शाळा सोडली आहे आणि आता ‘मला मारुति दाखवा’, असे म्हणतो. याची कुंडली बघून काही सांगा.’’ श्री. भांबुकाकांनी माझी कुंडली पाहिली आणि म्हणाले, ‘‘याचे सगळे योग्यच आहे; पण याला वयाच्या पंधराव्या वर्षी महामृत्यूयोग आहे. हा मुलगा जगायचा नाही. संतकृपेविना हे गंडांतर टळायचे नाही. ते संतही त्या पात्रतेचे हवेत.’’

प.प. श्रीधरस्वामी

 

४. वडिलांनी सज्जनगडावर प.प.
श्रीधरस्वामींकडे नेणे,प.प. श्रीधरस्वामींनी ‘हा मुलगा
मारुतीचा अंशावतार असून तुम्ही त्याची काळजी करू नका, त्याला काहीही
होणार नाही’, असे वडिलांना सांगणे आणि त्यांच्या एका दृष्टीक्षेपाने मृत्यूयोग टळणे

त्यानंतर वडील मला सज्जनगडावर प.प. श्रीधरस्वामींकडे घेऊन गेले. ही वर्ष १९५३ मधली गोष्ट आहे. त्या वेळी प.प. श्रीधरस्वामी सज्जनगडावर होते आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांचे मौनव्रत सोडले होते. आम्ही तेथे गेलो, त्या वेळी प.प. श्रीधरस्वामी त्यांच्या नित्य पूजेत निमग्न होते. प.प. श्रीधरस्वामींच्या समवेत नेहमी असणारे त्यांचे शिष्य सच्चिदानंद स्वामी यांनी माझी कुंडली पाहून ‘ज्योतिषाने सांगितलेले सर्व योग्यच आहे’, असे माझ्या वडिलांना सांगितले. ‘वयाच्या १५ व्या वर्षी दुपारी १२ वाजता याचा मृत्यू आहे’, असेही त्यांनी सांगितले. हे ऐकून पूजेत निमग्न असलेले प.प. श्रीधरस्वामी माझ्या वडिलांना म्हणाले, ‘‘हो का ? बरं. तुमचा मुलगा मारुतीचा अंशावतार आहे. त्याला वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत तुम्ही काहीही बोलू नका. तो कुठे जातो, तिथे त्याला जाऊ दे. त्याला मारुति बघायचा आहे ना ? बघू दे. तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याला काहीही होणार नाही.’’

त्यानंतर प.प. श्रीधरस्वामी मला म्हणाले, ‘‘तुला मारुति बघायचा आहे ना ? दिसेल तुला तो ! काळजी करू नकोस.’’ त्याच वेळी माझ्यावर गुरुकृपा झाली आणि प.प. श्रीधरस्वामींच्या त्या एका दृष्टीक्षेपातच माझा मृत्यूयोग त्याच क्षणाला टळला !

 

५. श्री गुरूंच्या आज्ञेने वयाच्या १८ व्या वर्षी केलेली कैलास-मानससरोवरची
खडतर यात्रा आणि त्या वेळी ध्यानावस्थेतील मारुतिरायाचे झालेले दर्शन

५ अ. गुरूंच्या आज्ञेने कैलास-मानससरोवराला जाणे आणि वाटेत श्री विष्णुपादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळणे

वयाच्या १८ व्या वर्षी मी श्री गुरूंच्या आज्ञेने कैलास-मानससरोवराला गेलो होतो. त्या वेळी माझ्या समवेत महाराष्ट्र्रातील काही संतमंडळीही होती. तिथे जाऊन मी ५ – ६ मास साधना केली. त्यांतील बराच कालावधी मी मानससरोवरापाशीच राहिलो. मानससरोवरापासून थोड्या खालच्या भागात कुठेतरी आम्ही थांबलो होतो. कडाक्याची थंडी आणि बर्फ यांमुळे आम्हाला तेथेच थांबून रहावे लागले होते. बर्फ न्यून झाल्यावर आम्ही पुन्हा प्रवासाला आरंभ केला. तेव्हा वाटेत हिमालयाच्या त्या क्षेत्रात आम्हाला श्री विष्णुपादुकांच्या स्थानाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. त्यांचे दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. त्या वेळी आतासारख्या सुविधा नव्हत्या. पुष्कळ कष्ट होते. भूक लागली की, आम्ही कंदमुळे खायचो.

५ आ. पहाटेच्या वेळी तिबेटच्या भागातील एका जंगलात जाणे
आणि तेथे ध्यानाला बसल्यावर ध्यानमुद्रेतील मारुतिरायांचे दर्शन होणे

तिबेटच्या भागात असतांना एकदा समवेतची १ – २ संतमंडळी आणि मी पहाटेच्या वेळी चालत-चालत अकस्मात् एका जंगलात गेलो. तेथील वातावरण अद्भुत आणि दैवी होते. आम्हाला सूर्याच्या पहिल्या किरणांचे दर्शन झाल्यावर आम्ही तेथेच त्या दैवी वातावरणात ध्यानाला बसलो. थोड्या वेळात डोळे उघडल्यावर समोर पहातो, तर साक्षात् मारुतिराया ! आमच्यासमोर स्थुलातून प्रत्यक्ष मारुतिराया ध्यानमुद्रेत बसला होता.

५ इ. स्वतःला मारुतिरायाचे एका रूपात, तर त्याच वेळी समवेत असलेल्या संतमंडळींना दुसर्‍या रूपात दर्शन होणे

माझ्याकडे मारुतिरायाची २ चित्रे आहेत. त्यांपैकी ‘वृद्धावस्थेतील हनुमंत रामायण वाचत आहे’, असे एक चित्र असून माझ्या समवेतच्या अन्य संतांना प्रथम या रूपात मारुतिरायाचे दर्शन झाले आणि त्याच वेळी मला दुसर्‍या रूपात, म्हणजे ध्यानावस्थेत बसलेल्या मारुतिरायाचे दर्शन झाले होते. त्या संतांना आणि मला एकाच वेळी मारुतिरायाचे वेगवेगळ्या २ रूपांमध्ये स्थुलातून सगुण दर्शन झाले.

५ ई. समवेत असलेल्या एका शिष्यांनी त्याच वेळी ध्यानावस्थेतील हनुमंताचे सुंदर चित्र रेखाटणे

आमच्या समवेत असलेले एक शिष्य चांगले शिकले होते आणि ते कलाकारही होते. त्यांच्याजवळ चित्रे काढण्यासाठी कागद आणि पेन्सिल होते. त्यांनी त्याच वेळी ध्यानावस्थेतील हनुमंताचे सुंदर चित्र काढले. त्यांनी काढलेल्या ध्यानमुद्रेतील मारुतिरायाचे एक चित्र माझ्याकडे आहे. हे ध्यानावस्थेतील चित्र इतर कुठेही मिळणार नाही. यात मारुतिराया पद्मासनामध्ये ध्यानाच्या स्थितीत बसला आहे. यामध्ये त्याचे पाय, नखे आणि ध्यान, हे सगळे वेगळेच आहे. हे ‘हनुमान मुद्रे’तील अर्धोन्मीलित नेत्र असलेले ध्यान आहे.

५ उ. मारुतिरायाची ‘हनुमानमुद्रा’ !

मारुतिराया ‘हनुमान’मुद्रेत दोन्ही हात नाभीजवळ करून बोटे एकमेकांमध्ये घालून बसला आहे. यात दोन्ही हातांच्या दोन्ही अंगठ्यांची टोके एकत्र नाभीकडे यायला हवीत आणि हातांची शेवटची दोन बोटे (अनामिका आणि करंगळी) खालच्या दिशेने यायला हवीत. ही मुद्रा करून जप केला, तर ‘ॐ’काराचा आवाज बेंबीपासून येतो आणि ध्यानही बेंबीपासूनच लागते. ब्रह्मकुंडलिनीची नाडीही बेंबीपासूनच जाते. ७२ सहस्र नाड्यांपैकी मुख्य आणि भगवंताचे ब्रह्मकमळ हे नाभीकमळातूनच बाहेर पडले आहे. त्याच्यावर लक्ष्मी आहे. वल्कले परिधान केलेला असा तो स्वयंभू हनुमान आहे. त्याला कपडे इत्यादी नाहीत.

५ ऊ. बाहुबली हनुमंताच्या त्या दिव्य दर्शनाने सर्वांनाच
कडाक्याच्या थंडीतही घाम फुटणे, बेशुद्धावस्था येणे आणि सर्वांगावर रोमांच येणे

मारुतिरायाच्या या दिव्य दर्शनाने मी भारावून गेलो. मी उभा राहिलो. आम्हाला केवळ २ मिनिटांसाठीच हे दर्शन झाले होते; पण मारुतिरायाची शक्ती एवढी होती की, आम्हा सर्वांना त्या बाहुबली हनुमंताच्या शक्तीने तेवढ्या कडाक्याच्या थंडीतही घाम फुटला, बेशुद्धावस्था आली आणि सर्वांगावर रोमांच आले. चीन-तिबेटच्या सीमाभागात आम्हाला हे दर्शन झाले होते. ते सर्व क्षेत्रच दैवी आहे. माझ्या श्री गुरूंच्या आशीर्वादाने मला मारुतिरायाचे दर्शन झाले.’

 

६. प.प. श्रीधरस्वामींच्या सहस्राराच्या ठिकाणी
अंतिमसमयी भोक दिसणे आणि त्यांनी तेथून प्राण सोडणे

‘प.प. श्रीधरस्वामींची निर्विकल्प समाधीची अवस्था होती. निर्विकल्प समाधीत अवरोह करतांना प्राण वर खेचले जाऊन ते सहस्रारातून जातात. त्याप्रमाणे त्यांनी निर्विकल्प समाधी लावून देह सोडला आहे. स्वामींच्या सहस्राराच्या ठिकाणी अंतिमसमयी भोक दिसले होते. त्यांनी तेथून प्राण सोडला.’

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment