संत कबीरांचे आध्यात्मिक सामर्थ्य !

 

१. कबीरांना पाहून देहलीच्या सम्राटाच्या अंगाचा दाह नाहीसा होणे

त्या वेळी सिकंदर लोदी हा देहलीच्या राजसिंहासनावर (तख्तावर) होता. त्याच्या अंगाची आग आग होत होती. वैद्य आणि हकीम यांच्या उपायांनी आग जाईना. तो प्रथम रामानंदस्वामींकडे गेला; पण ‘म्लेंच्छाचे मुख पहावयाचे नाही’, हा त्यांचा दंडक असल्याने सिकंदराची निराशा झाली. त्यानंतर तो कबीरांकडे गेला. तेथे गेल्यावर त्यांना पहाताच सिकंदराचा दाह नाहीसा झाला.

१ अ. कबीरांना ठार मारण्याचे प्रयत्न अयशस्वी होणे

‘कबीरांमुळे सिकंदर लोदीचा दाह नाहीसा झाला’, हे सहन न झाल्याने सिकंदराच्या गुरूने, म्हणजेच शेख तकीने कबीरांना साखळदंडाने बांधून गंगेत सोडले. त्यानंतर एकदा घरात बांधून ठेवून घराला आग लावली; पण कबीरांना काहीच झाले नाही. एकदा तर त्यांना मदोन्मत्त हत्तीसमोर बांधून ठेवण्यात आले. तेव्हा हत्ती उलट्या दिशेने धावत सुटला.

१ आ. प्रेताला जिवंत करणे

एकदा गंगा नदीतून एका ५-७ वर्षांच्या मुलाचे प्रेत वहात आले. तेव्हा शेख तकी कबीरांना म्हणाला, ‘‘या मुलाला जिवंत करून दाखव.’’ कबीरांनी दृष्टी टाकली आणि तो मुलगा जिवंत झाला. लोक म्हणाले, ‘‘कमाल आहे.’’ पुढे शेख तकी कबीरांच्या घरी राहून त्यांचा शिष्य झाला.

१ इ. कबरीतून मुलगी जिवंत होणे

शेख तकीची मुलगी मेली. तिला कबरीत पुरले. त्याने कबीरांना तिला जिवंत करण्यास सांगितले. तेव्हा कबीर म्हणाले, ‘‘शेख तकीच्या मुली ऊठ.’’ ती उठली नाही. नंतर म्हणाले, ‘‘कबीराच्या मुली ऊठ.’’ तेव्हा ती उठली. तिचे नाव ‘कमाली’ ठेवले.

१ ई. कमाल आणि कमाली यांचा परात्पर गुरु असणे

कबीरांनी सांगितले, ‘‘२५ वर्षांपूर्वी मी योगसाधनेच्या बळावर हिमालयात गेलो होतो. तेथे दोन भावंडे तपश्‍चर्या करत होती. त्यांनी माझ्याकडे ब्रह्मज्ञानाची मागणी केली. मी त्यांना सांगितले, ‘‘अद्याप अवकाश आहे.’’ अल्पवयात ते दोघेही मरण पावले. प्रारब्धानुसार परत जन्म घेऊन कमाल (नदीतून वहात आलेला) आणि कमाली (कबरीतून उठलेली) या रूपात आली. मी त्यांचा पालकपिताच नाही, तर परात्पर गुरुही आहे.’’

– सद्गुरु (डॉ.) वसंत बाळाजी आठवले
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment