जप आणि तप यांपेक्षाही कर्तव्यधर्मपालनाचे फळ श्रेष्ठ !

१. गंगास्नानापेक्षा स्वकर्तव्याला श्रेष्ठ समजणारे संत रोहिदास !

‘संत रोहिदास चांभारकाम करत होते. ते आपले काम भगवंताची पूजा समजून मनःपूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होते. त्यांनी एकदा एका साधूला सोमवती अमावास्येच्या दिवशी समवेत गंगास्नान करण्याचे आश्‍वासन दिले होते. तो दिवस जवळ आला होता. साधू रोहिदासांकडे गेले आणि त्यांनी त्यांना गंगास्नानाची आठवण करून दिली. तेव्हा रोहिदास लोकांची पादत्राणे करण्यात गुंतले होते आणि ती पादत्राणे त्यांना नियोजित वेळेत द्यायची होती. त्यामुळे गंगास्नानाला येण्यासाठीची आपली असमर्थता व्यक्त करून ते म्हणाले, ‘‘हे महात्मा ! तुम्ही मला क्षमा करा. माझ्या भाग्यात गंगास्नानाचा योग नाही. तुम्ही हा एक पैसा घेऊन जा आणि तो गंगामातेला अर्पण करा.’’

 

२. कर्तव्यधर्माचे पालन करणार्‍या रोहिदासांनी दिलेला पैसा गंगामातेने स्वीकारणे

ते साधू गंगास्नानासाठी वेळेत पोेचले. त्यांना स्नान केल्यानंतर रोहिदासांनी दिलेला पैसा अर्पण करण्याची आठवण झाली आणि ते मनातल्या मनातच गंगामातेला म्हणाले, ‘हे माते, रोहिदासांनी हा पैसा तुला अर्पण करण्यासाठी दिला आहे. त्याचा तू स्वीकार कर !’ त्यांनी एवढे म्हणताच गंगेच्या त्या अथांग जलप्रवाहातून २ विशाल हात बाहेर आले आणि त्या हातांनी त्या पैशाचा स्वीकार केला. साधू हे दृश्य पाहून स्तिमित झाले आणि हा विचार करू लागले, ‘मी एवढे जप-तप केले, गंगेत स्नान केले, तरीही माझ्यावर गंगामातेची कृपा होऊ शकली नाही आणि गंगास्नान न करतासुद्धा रोहिदासांना तिची कृपा मिळाली.’

 

३. कर्तव्यधर्मपालनाचे फळ

त्यांनी रोहिदासांकडे येऊन घडलेला वृत्तांत सांगितला. तेव्हा रोहिदास म्हणाले, ‘‘हे महात्मा ! हे सर्व कर्तव्यधर्मपालनाचे फळ आहे. मी निर्धन (अकिंचन) असल्याने यामध्ये तप आणि पुरुषार्थ यांचा कोणताही वाटा नाही.’

(संदर्भ : मासिक ‘अखंड ज्योति’, मे २०००)

Leave a Comment