जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !

Article also available in :

निरोगी जीवनासाठी आपण काय आणि किती खातो, यापेक्षा खाल्लेले व्यवस्थित पचवतो कि नाही ?, याला जास्त महत्त्व आहे. एकसारखे अधेमधे खात रहाणे चांगले नव्हे. एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !

 

१. जेवणाच्या वेळा कोणत्या असाव्यात ?

१ अ. प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांतील उल्लेख

सर्वच प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये प्रातराश (सकाळचे जेवण) आणि सायमाश (सायंकाळचे जेवण) असे शब्द आढळतात. कोठेही माध्याह्नाश (दुपारचे जेवण) आणि रात्र्याश (रात्रीचे जेवण) असे शब्द आढळत नाहीत.

१ आ. रात्री उशिरा जेवण्याचे मूळ कारण

घराघरांमध्ये वीज पोहोचल्यावर रात्रीचे जेवण जेवण्याची पद्धत चालू झाली. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम पहाण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागणे आणि त्यासाठी उशिरा जेवणे चालू झाले अन् हळूहळू पचनाशी संबंधित समस्या फोफावू लागल्या.

१ इ. आयुर्वेदानुसार जेवणाच्या आदर्श वेळा

आयुर्वेदानुसार जेवणाच्या आदर्श वेळा म्हणजे सकाळी ९ ते १० आणि सायंकाळी ५ ते ६ (म्हणजे सूर्यास्ताच्या पूर्वी). या वेळी जेवत असल्यामुळे पूर्वीच्या काळातील लोक निरोगी असत. आजही अधिक श्रमाची कामे करणारी कामगार मंडळी याच वेळांमध्ये भोजन करतांना आढळतात. ज्यांना या वेळा पाळणे शक्य आहे, त्यांनी अवश्य या वेळांतच भोजन करावे; परंतु आपले जीवन समष्टीशीही निगडित असल्याने या वेळा पाळणे बर्‍याच वेळा अडचणीचे जाते. यासाठी पर्यायी वेळा पुढे दिल्या आहेत.

१ ई. आदर्श वेळांचे पर्याय

मुख्य जेवणाच्या वेळा सकाळी ११.३० आणि सायंकाळी ७ अशा ठेवाव्यात. या वेळा आजच्या पालटलेल्या जीवनशैलीला अधिक पूरक आणि सर्वसमावेशक आहेत.

 

 

२. जेवणाच्या वेळा ठरवण्यामागील मूलभूत सिद्धांत

२ अ. पचनशक्ती सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असणे

आपण जे अन्न ग्रहण करतो त्याचे नीट पचन करण्याचे दायित्व शरिरात असलेल्या जठराग्नीवर असते. हा जठराग्नी, म्हणजेच आपल्या शरिरातील पचनशक्ती ही सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असते. आकाशात सूर्य असेल, त्या वेळी आपण जे जेवतो, ते चांगल्या रितीने पचते. पावसाळ्यातील ऋतूचर्या सांगतांना आयुर्वेदामध्ये ज्या दिवशी पावसाळी ढगांच्या दाटीमुळे सूर्य बराच काळ दिसत नाही, त्या दिवशी अगदी अल्प जेवावे किंवा उपवास करावा, असे सांगितले आहे. यावरूनच सूर्य आणि पचनशक्ती यांमधील घनिष्ठ संबंध लक्षात येतो.

२ आ. सूर्यास्तानंतर दीड ते दोन घंट्यांपर्यंत पचनशक्ती चांगली असणे

सकाळचे जेवण सूर्योदयानंतर ३ ते ३.३० घंट्यांत करणे, तसेच सायंकाळचे जेवण सूर्यास्ताच्या अर्धा घंटा पूर्वी करणे, हे आदर्श आहे. वर दिलेल्या आदर्श वेळांमागील तत्त्वही हेच आहे. हे जमतच नसेल, तर पर्याय म्हणून या वेळा प्रत्येकी आणखी दोन ते अडीच घंट्यांनी लांबवता येतात; कारण तेवढ्या वेळेपर्यंत पचनशक्ती चांगली असते.

२ इ. रात्रीचे जेवण पचण्यास तुलनेने अधिक काळ लागत असणे

झोपेमध्ये शरीर विश्रांती घेत असल्याने पचनासह शरिराच्या सर्वच क्रिया काही प्रमाणात मंदावतात. यामुळे रात्रीचे जेवण पूर्ण पचण्यासाठी १२ ते १४ घंटे लागतात. सकाळचे जेवण त्या वेळेत आकाशात सूर्य असल्याने ८ घंट्यांमध्ये पूर्ण पचते. यासाठी सकाळच्या जेवणानंतर साधारणपणे ८ घंट्यांनी, तर सायंकाळच्या जेवणानंतर साधारणपणे १२ ते १४ घंट्यांनी सकाळचे जेवण घ्यावे.

२ ई. झोपण्यापूर्वी पचनाचा अधिकतम भाग पूर्ण होणे आवश्यक असणे

रात्री झोपण्यापूर्वी पचनाचा अधिकतम भाग पूर्ण झालेला असावा. यासाठीही सूर्यास्तानंतर दीड ते दोन घंट्यांमध्ये जेवण पूर्ण झालेले असावे.

 

 

३. अल्पाहाराच्या वेळा

धर्मशास्त्रात, तसेच आयुर्वेदात दिवसातून दोनच वेळा पोटभर जेवावे, तसेच अधेमधे काही खाऊ नये, असे सांगितले आहे; परंतु आज प्रत्येकालाच हे शक्य होते, असे नाही. भूक लागली असतांना ती बळाने रोखून धरू नये. असे केल्यास अंगदुखी, जेवणाची चव न समजणे, ग्लानी येणे, शरीर कृश होणे, पोटात दुखणे, चक्कर येणे यांसारखे विकार उद्भवतात. यासाठी दोन्ही वेळच्या जेवणाच्या तीन ते साडेतीन घंटे आधी अल्पाहार घ्यावा. सकाळी ९ वाजता जेवायचे असल्यास वेगळा अल्पाहार घेऊ नये. सकाळी ९ वाजता थेट भोजनच करावे आणि दुपारी २ वाजता अल्पाहार घ्यावा. पर्यायी वेळांमध्ये भोजन केल्यास सकाळी ८ किंवा ८.३० वाजता आणि दुपारी साधारणपणे ४ वाजता अल्पाहार करावा.

 

४. अल्पाहार किती करावा ?

याचे उत्तर अल्पाहार या शब्दातच आलेले आहे. अल्पाहार हा अल्पच असावा. त्यानंतर ३ घंट्यांनी जेव्हा आपण जेवणार असू, त्या वेळी सडकून भूक लागेल, एवढ्या मित प्रमाणात अल्पाहार असावा. प्रत्येकाने स्वतःची पचनशक्ती पारखून किंचित भूक राखूनच अल्पाहार करावा. अल्पाहार अधिक केल्यास मुख्य जेवणाच्या वेळी भूक लागत नाही. त्या वेळी केवळ वेळ झाली आहे, म्हणून भूक नसतांनाही जेवले जाते. भूक नसतांना जेवण्याने जेवलेले अन्न पचत नाही. अन्न नीट पचले नाही, तर ते शरिराला उपकारक न ठरता मारकच ठरते आणि विविध रोग उत्पन्न होतात.

 

५. जेवणाचे वेळापत्रक

वरील नियमांचा विचार करून समजण्यास सोयीचे जावे, यासाठी जेवणाची दोन्ही वेळापत्रके येथे दिली आहेत.

 

आदर्श वेळ पर्यायी वेळ
अल्पाहार (सकाळी) ८ किंवा ८.३०
जेवण (सकाळी) ११.३०
अल्पाहार (दुपारी)
जेवण (सायंकाळी)

 

६. आरोग्याची हेळसांड नको !

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।

म्हणजे धर्माचरणासाठी शरीर हे प्रथम साधन आहे, असे एक वचन आहे. ईश्‍वराने हा देह साधना करण्यासाठी दिला आहे. या देहाकडून अधिकाधिक साधना व्हावी, यासाठी देहाचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. यामुळे प्रत्येकानेच शक्य होईल त्याप्रमाणे जेवणाच्या वेळा पाळाव्यात. शिक्षण, नोकरी, सेवा यांमुळे ज्यांना या वेळा पाळणे शक्य होत नसेल, त्यांनी समवेत जेवणाचा डबा नेणे यांसारख्या उपाययोजना काढाव्यात किंवा वर दिलेल्या सिद्धांतांनुसार स्वतःला सोयीच्या अशा पर्यायी वेळा ठरवाव्यात.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.

Leave a Comment