प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?

Article also available in :

‘सध्या प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) या संकल्पनेला भलतेच महत्त्व आले आहे. लोक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिसतील ती आणि मिळतील ती औषधे, काढे शोधत सैरावैरा पळत आहेत. काही चतुर लोकांनी याचा मोठा धंदा करून लाभ मिळवला आहे; पण प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे, याकरता अगदी साध्या, सोप्या आणि स्वस्त गोष्टी करता येऊ शकतात.

१. घशात खवखव वाटली किंवा अंगात कस कस वाटली की, तो संसर्गजन्य रोगांचा आरंभ असू शकतो. अशा वेळी व्हिटॅमिन ‘सी’च्या २ गोळ्या आणि एक ‘बी कॉम्प्लेक्स’ आणि ‘झिंक’ एकत्र असलेली गोळी लगेच घ्यावी. ही मात्रा ५ दिवस अन् नंतर व्हिटॅमिन ‘सी’ची १ गोळी १० दिवस चालू ठेवण्यास हरकत नाही. व्हिटॅमिनच्या या गोळ्या जेवणानंतर घ्याव्यात. मी हा प्रयोग वर्षानुवर्षे केला आहे. थोडीशी खवखव वाटली की, लगेच औषध घेतल्यास उत्तम लाभ होतो. या गोळ्या अतिशय स्वस्त आहेत.

कोरोनापासून प्रतिबंध होण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ही महत्त्वाचे आहे. Vit D ची ६०k ची गोळी प्रत्येक आठवड्याला १ अशी ८ आठवडे घ्यावी.

(येथे दिलेल्या कालावधीपेक्षा अधिक काळ या गोळ्या घ्यायच्या झाल्यास नेहमीच्या ‘फॅमिली डॉक्टर’चा सल्ला घ्यावा. – संकलक)

२. थोडाही अशक्तपणा असेल, बरे वाटत नसेल, अंगात कसकस असेल, घसा दुखत असेल, तर कधीही व्यायाम करू नये. अशा वेळी शरीर येणार्‍या संसर्गाला थोपवण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही जितकी विश्रांती घ्याल, तितके शरीराला त्यासाठी साहाय्य होत असते.

तसेच अशा वेळी अंगभर गरम कपडे घालणे आणि पूर्ण विश्रांती घेणे उत्तम ! अशा वेळी थंड पाण्याने अंघोळ टाळावी. बरे वाटत नसेल, तर अंघोळ पहाटे लवकर किंवा रात्री करू नये.

३. केस ओले असतांना भरपूर वारा असलेल्या ठिकाणी जाऊ नये. केस ओले असतांना मोकळ्या हवेत व्यायाम करू नये.

४. सतत गरम पाणी आणि काढे पिणे योग्य नाही. यामुळे अन्ननलिकेच्या आतल्या आवरणाला हानी पोचू शकते. परिणामी प्रतिकारशक्ती उणावू शकते.

(वैद्यांनी सांगितल्यानुसार प्रमाणात गरम पाणी आणि काढा घेण्यास आडकाठी नाही. – संकलक)

५. मसाल्यांच्या पदार्थांमुळे प्रतिकारशक्तीला उत्तम चालना मिळते. त्यामुळे हे पदार्थ घालून टोमॅटो किंवा आमसुलाचे सार घ्यायला हरकत नाही.

(हे पदार्थही प्रमाणातच घ्यावेत. – संकलक)

६. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रणात ठेवणे यांसारखे दुसरे परिणामकारक शस्त्र नाही. नियमित वैद्यकीय सल्ल्याने मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे.’

७. याचसमवेत आजारपणात रुग्णाने मन सकारात्मक आणि आनंदी ठेवणे आवश्यक आहे.

– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ, कोथरूड, पुणे.

Leave a Comment