अनुक्रमणिका
- १. अन्नपचन नीट न झाल्याने बनणारी शरीरस्थिती हानीकारक विषाणू आणि जिवाणू यांच्या वाढीसाठी पोषक ठरणे
- २. केवळ बैठी कामे करणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून ४ वेळा न खाता २ वेळाच आहार घेणे योग्य असणे
- ३. पावसाळ्यातील आरोग्यदायी दिनक्रम
- ४. केवळ २ वेळा जेवण्याची सवय लावतांना त्रास होऊ नये, यासाठी हे करा !
- ५. ४ ऐवजी केवळ २ वेळा खाल्ल्यास अशक्तपणा येईल का ?
- ६. ऋतू पालटल्यावर आहारामध्ये पालट करणे आवश्यक !
- ७. दिवसातून ४ – ४ वेळा खाणे टाळा !
- ८. सकाळी अल्पाहाराच्या वेळेस लागणारी भूक ही ‘खोटी भूक’ !
- ९. ‘चहा-फराळ सोडतांना शरिराला पित्ताचा त्रास होऊ नये’, यासाठी पोटात जठराच्या हालचाली जाणवतील, तेव्हा चमचाभर तूप खा !
- १०. गृहिणींनो, दुपारच्या जेवणामध्ये विविधता आणा !
- ११. ‘भूक सहन करता येणे’ हे आरोग्याचे एक लक्षण !
वैद्य मेघराज पराडकर
१. अन्नपचन नीट न झाल्याने बनणारी शरीरस्थिती हानीकारक विषाणू आणि जिवाणू यांच्या वाढीसाठी पोषक ठरणे
‘पावसाळ्यात विशेषतः कोकणासारख्या भरपूर पाऊस पडणाऱ्या प्रदेशांमध्ये सततच्या पावसामुळे शरिरातील अग्नी (पचनशक्ती) मंद झालेला असतो. ज्याप्रमाणे चुलीमध्ये अग्नी नीट प्रज्वलित झालेला नसतांना त्यामध्ये सरपण सारले, तर ते नीट पेट घेत नाही, त्याप्रमाणे जठरातील अग्नी नीट प्रज्वलित झालेला नसतांना आहार घेतल्यास नीट पचत नाही. अग्नी मंद असतांना दिवसातून ४ – ४ वेळा खाल्ल्याने एकदा खाल्लेले पूर्ण पचन होण्याआधीच दुसरे अन्न जठरामध्ये येते. त्यामुळे सर्व अन्न नीट पचत नाही. अन्न नीट न पचल्याने दूषित अन्नरस निर्माण होतो. ज्याप्रमाणे ओलसरपणा असतांना जंतूंची वाढ झपाट्याने होते, त्याप्रमाणे दूषित अन्नरस शरिरात फिरत असतांना शरिरातील क्लेदामुळे (अतिरिक्त ओलाव्यामुळे) शरीर हानीकारक विषाणू आणि जिवाणू यांच्या वाढीसाठी पूरक ठरते. यामुळे सर्दी, खोकला, ताप इत्यादी विकार होण्याची शक्यता वाढते.
२. केवळ बैठी कामे करणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून ४ वेळा न खाता २ वेळाच आहार घेणे योग्य असणे
पावसाळ्यात दिवसातून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय अंगी बाणवल्यास एकदा घेतलेले अन्न पूर्ण पचल्यावरच दुसरे अन्न जठरात येते. त्यामुळे अन्नपचन नीट होते. शरिराला अधिकचे २ वेळा अन्न पचवण्याचे श्रम न झाल्याने शेष राहिलेली शक्ती पालटलेल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वापरता येते. यामुळे केवळ बैठी कामे करणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून ४ – ४ वेळा न खाता केवळ २ वेळा जेवण्याची सवय लावून घेतल्यास पावसाळ्यात होणारे सर्दी, खोकला, ताप इत्यादी विकारांचा प्रतिबंध होण्यास साहाय्य होते.
३. पावसाळ्यातील आरोग्यदायी दिनक्रम
सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पूर्वी थोडा व्यायाम आणि प्राणायाम करावा. यामुळे शरिरातील क्लेद (अतिरिक्त ओलावा) नाहीसा होण्यास साहाय्य होते. यानंतर भूक लागली, तरच चहा, कशाय किंवा गरम पाणी प्यावे. सकाळी ११ नंतर जेव्हा भूक लागेल, तेव्हा जेवावे. दुपारी ४ च्या सुमारास पुन्हा सकाळप्रमाणे चहा, कशाय किंवा गरम पाणी प्यायल्यास चालते; मात्र काही खाणे शक्यतो टाळावे. एखादे फळ खायचे असल्यास चहा न घेता त्या वेळेत फळ खावे. रात्री ८ वाजण्यापूर्वी जेवून रात्री ११ वाजेपर्यंत झोपावे. चहा इत्यादी न घेता केवळ २ वेळा जेवणे आदर्श आहे; परंतु असे शक्य न झाल्यास वर दिल्याप्रमाणे दिनक्रम ठेवावा. असा दिनक्रम पाळल्यास शरीर निरोगी रहाण्यास साहाय्य होते. शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींनी किंवा अशक्त व्यक्तींनी त्यांच्या भुकेनुसार सकाळी थोडा अल्पाहार करण्यास आडकाठी नाही; पण अल्पाहार केल्यास दुपारचे जेवण थोडे उशिरा चांगली भूक लागल्यावर (साधारण १ किंवा दीड वाजल्यानंतर) करावे. दिवसभरात काही खावेसे वाटल्यास ते अध्येमध्ये न खाता जेवणाच्या वेळेस खावे.
४. केवळ २ वेळा जेवण्याची सवय लावतांना त्रास होऊ नये, यासाठी हे करा !
दिवसातून ४ – ४ वेळा आहार घेण्याची सवय असतांना एकाएकी २ वेळाच आहार घेणे जमेल का ? असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. कोणत्याही परिवर्तनामध्ये थोडाफार त्रास होतोच; परंतु ‘हे होणारे परिवर्तन आरोग्यदायी आहे’, हे मनाला समजावून सांगितल्यास त्रासदायक वाटत नाही. काहींना सकाळी काही न खाता राहिल्यास डोके दुखू लागते. अशांनी त्यांच्या सकाळच्या खाण्याच्या वेळी गरम पाण्यामध्ये थोडा गूळ घालून ते पाणी प्यावे. असे केल्याने शरिराला आवश्यक ती ऊर्जा मिळते आणि डोकेदुखी टळते. असे काही दिवस केल्याने शरिराला दिवसातून २ वेळाच आहार घेण्याची सवय लागते.
५. ४ ऐवजी केवळ २ वेळा खाल्ल्यास अशक्तपणा येईल का ?
पावसाच्या दिवसांत याप्रमाणे आहार अल्प केल्याने थकवा येत नाही; कारण शरिराची शक्ती आपण किती खातो, यावर अवलंबून नसते, तर किती पचवतो, यावर अवलंबून असते. २ वेळा आहार घेतल्याने सर्व अन्न नीट पचल्याने थकवा येत नाही.
६. ऋतू पालटल्यावर आहारामध्ये पालट करणे आवश्यक !
पावसाळ्यानंतर काही दिवस शरद ऋतू असतो. पाऊस आणि थंडी यांच्यामधील हा संधीकाळ. अशा वेळेस आहार वरीलप्रमाणे अल्पच ठेवावा. शरद ऋतूनंतर हिवाळा चालू होतो. थंडीचे दिवस चालू झाले की, भूकही वाढते. त्या वेळी दिवसातून ४ वेळा आहार घेतला, तरी पचून जातो. साधारण मार्च मासामध्ये वसंत ऋतूमध्ये कफ वाढल्याने अग्नी मंद होतो. त्या वेळी पुन्हा वरीलप्रमाणे अल्प आहार ठेवावा. पुन्हा कडक उन्हाळ्यामध्ये भुकेनुसार आहार घ्यावा; मात्र त्या वेळी द्रव आहाराचे प्रमाणात अधिक असावे.’
७. दिवसातून ४ – ४ वेळा खाणे टाळा !
अ. आरोग्य चांगले रहाण्यासाठी दिवसभरात किती वेळा आहार घ्यावा ?
‘दिवसातून केवळ २ वेळा आहार घेणे’, हे आदर्श आहे. यामुळे शरीर निरोगी रहाते. हे शक्य नसल्यास जास्तीतजास्त ३ वेळा आहार घ्यावा. सकाळी शौचाला साफ झालेले असणे, शरीर हलके असणे आणि चांगली भूक लागलेली असणे, ही लक्षणे निर्माण झाल्यावरच सकाळचा अल्पाहार करावा. ही लक्षणे निर्माण झाली नाहीत, तर सकाळी १० वाजेपर्यंत काही खाऊ नये. तहान लागल्यास केवळ गरम पाणी प्यावे. सकाळी १० वाजल्यानंतर अल्पाहार (‘अल्प’ आहार) करावा. अशा वेळी दुपारचे जेवण साधारण १ ते २ वाजता घ्यावे. सायंकाळी ७ वाजता रात्रीचे जेवण घ्यावे. असे ३ वेळा आहार घेणेही आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे.
आ. खाण्याचे पदार्थ सहज उपलब्ध असले, तरी जास्त वेळा खाण्याचा मोह टाळा !
घरी डब्यांमध्ये खाऊ ठेवलेला असतो. काही वेळा नोकरीच्या ठिकाणी सकाळ-सायंकाळ चहा असतो. हॉटेलमध्ये कधीही खाण्याचे पदार्थ उपलब्ध असतात. पुष्कळ जण एका ठिकाणी रहातात, अशा ठिकाणी ४ – ४ वेळा आहार उपलब्ध असतो. असे असले, तरी ही केवळ सोय असते. ३ पेक्षा जास्त वेळा आहार घेणे किंवा दिवसभर खात रहाणे, हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. कधीतरी भूक लागली म्हणून किंवा वेगळेपणा म्हणून अतिरिक्त वेळी खाणे चालते; पण प्रतिदिन नेमाने जास्त वेळा खाणे टाळावे.’
इ. प्रतिदिन सायंकाळी चहा-फराळ करणे आवश्यक नसल्याने ते सोडा !
‘अनेकजण सायंकाळच्या वेळेत चहा आणि फराळ करतात. फराळामध्ये शेव, चिवडा, फरसाण यांसारखे तळलेले पदार्थ खातात. खरेतर या सायंकाळच्या चहा-फराळाची शरिराला थोडीसुद्धा आवश्यकता नसते, तरीही बहुतेक जण केवळ घरी हे पदार्थ आणून ठेवलेले आहेत किंवा उपलब्ध आहेत, म्हणून खातात. शेव, चिवडा यांसारखे पदार्थ वर्षातून एकदा खाण्यासारखे आहेत; पण आजकाल उपलब्ध आहेत, म्हणून हे पदार्थ प्रतिदिन खाल्ले जातात. मनावर थोडेसे नियंत्रण ठेवून प्रतिदिन सायंकाळी करण्यात येणारा चहा-फराळ सोडून तर पहा ! सायंकाळच्या वेळी चहा प्यायलात नाही, म्हणून फारतर २ – ३ दिवस डोकेदुखीच तेवढी काय ती होईल; परंतु प्रतिदिनचा चहा-फराळ सोडलात, तर तुम्ही निरोगी जीवनाच्या दिशेने निश्चितच एक पाऊल पुढे टाकलेले असेल. चहा-फराळ सोडल्याने होणारी डोकेदुखी किंवा पोटात पडणारी आग शमवण्यासाठीही सोपे उपाय आहेत.
जे कष्टाची कामे करतात, त्यांनी ३ वेळा आहार घेतला, तरी चालतो; परंतु जे बैठी कामे करतात, त्यांनी २ वेळाच आहार घ्यायला हवा. यापेक्षा जास्त वेळा खाल्ल्यास ते आरोग्य बिघडवण्यास कारण ठरते. ’
ई. ‘सायंकाळी वेळ झाल्यावर चहा-फराळाची इच्छा होणे’ हे खोट्या भुकेचे लक्षण
‘सायंकाळच्या चहा-फराळाची आरोग्याच्या दृष्टीने खरोखर काही आवश्यकता नसते. प्रतिदिन शेव, चिवडा इत्यादी तळलेले पदार्थ खाऊन आपण हृदयविकाराची शक्यता वाढवत असतो. नेहमी सायंकाळी चहा-फराळ करायची सवय झाली की, ती सवय मोडता येत नाही. वेळ झाली की, शरिराला आवश्यकता नसली, तरी भूक लागते आणि इथेच आपण फसतो. ‘ही खोटी भूक आहे’, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
८. सकाळी अल्पाहाराच्या वेळेस लागणारी भूक ही ‘खोटी भूक’ !
‘काहींना सकाळी उठल्या उठल्या पुष्कळ भूक लागते. काहींना सकाळी अल्पाहाराच्या वेळेस, म्हणजे सकाळी ८ ते ९ या वेळेत भूक लागते. ही भूक सवयीमुळे लागलेली ‘खोटी भूक’ असते. या वेळेत व्यायाम किंवा शारीरिक कामे केल्यास ही भूक नाहीशी होते. मग पुन्हा काही काळाने भूक लागते. व्यायाम झाल्यावर पुन्हा भूक लागते त्या वेळी तूप खावे. तूप खाल्ल्याने तात्पुरती भूक भागते. पित्ताचा त्रास होत नाही आणि दुपारी जेवणाच्या वेळेत चांगली भूक लागते. ‘दिवसातून २ वेळा आहार घेणे आणि अवेळी भूक लागल्यास तूप खाणे’, असे केल्यावर काही दिवसांनी आहारामध्ये योग्य प्रमाणात वाढ होते आणि अवेळी भूक लागणेही बंद होते. असे झाल्यावर जेवण सोडून अन्य वेळी तूप खाण्याची आवश्यकता रहात नाही.’
९. ‘चहा-फराळ सोडतांना शरिराला पित्ताचा त्रास होऊ नये’, यासाठी पोटात जठराच्या हालचाली जाणवतील, तेव्हा चमचाभर तूप खा !
सायंकाळचा चहा-फराळ सोडण्यासाठी मनाचा निश्चय करावा. नेहमीच्या सवयीनुसार सायंकाळच्या फराळाची वेळ झाली की, भूक लागेल. त्या वेळी शारीरिक सेवा कराव्यात, म्हणजे भुकेचे विचार निघून जातील. तरीही भूक लागली, तर थोडे पाणी प्यावे. याने भूक शमते. असे करूनही काही जणांची भूक शमत नाही. पोटामध्ये जठराच्या हालचाली जाणवतात आणि पुष्कळ भूक लागते. अशा वेळी चहाचे १ – २ चमचे (५ ते १० मिलि) तूप चघळून खावे आणि शक्य असल्यास वर थोडे गरम पाणी प्यावे. निवळ तूप खाणे कठीण जात असेल, तर तुपामध्ये थोडी साखर किंवा गूळ घालावा. तूप प्यायल्याने पोटामधील भगभग (आग) शमते. तुपावर गरम पाणी प्यायल्याने तूप पचायला साहाय्य होते. यासाठी स्वतःकडे तुपाची बरणी बाळगा आणि अवेळी पुष्कळ भूक लागून पोटात जठराच्या हालचाली जाणवतील, तेव्हा चमचाभर तूप खा !’
१०. गृहिणींनो, दुपारच्या जेवणामध्ये विविधता आणा !
माणूस हा चवीचा भोक्ता आहे. विविध प्रकारचे चवदार पदार्थ खाण्याची आवड प्रत्येकालाच असते. बर्याच वेळा असे होते की, आठवड्याभरात घरी अल्पाहारासाठी प्रतिदिन वेगळा पदार्थ बनतो; परंतु दुपारच्या जेवणात ‘तोच तोच’पणा असतो. असे झाल्याने घरच्या व्यक्तींना भूक नसतांना केवळ चवीसाठी अल्पाहार खाण्याची इच्छा होते. त्यामुळे सकाळचा किंवा सायंकाळचा अल्पाहार सोडवत नाही. घरच्यांना २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय लावायची असेल, तर दुपारच्या जेवणात विविधता आणावी.
११. ‘भूक सहन करता येणे’ हे आरोग्याचे एक लक्षण !
‘बर्याच जणांचे असे सांगणे असते की, त्यांना भूक सहन होत नाही. खाण्याची वेळ झाली की, खावेच लागते; परंतु हे शारीरिक क्षमता न्यून असल्याचे लक्षण आहे, हे लक्षात घ्यायला हवे. भूक सहन होण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी हळूहळू आहाराच्या एकूण वेळा न्यून करून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय लावायला हवी.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
केवळ २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवण्यासाठी हे करा !
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?
‘ऑनलाईन’च्या काळात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या !
लाकडी घाण्याचे आरोग्यदायी तेल !
आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण चिकित्सा असणारे पंचकर्म !
दुग्धजन्य पदार्थ कुणी आणि कधी खावेत ?