निरोगी शरिरासाठी परिहाराविरुद्ध आहार घेणे टाळा !

अनुक्रमणिका

१. परिहाराविरुद्ध आहार सेवन केल्यामुळे सूज येणे

जेवणानंतर काय करावे किंवा कुठल्या प्रकारच्या आहारानंतर काय प्यावे ? काय करावे ? याचेही काही नियम आहेत. ते नियम तोडण्याला ‘परिहार विरुद्ध आहार’ म्हणतात. भूमीवर मांडी घालून जेवायला बसावे आणि त्यानंतर पायाकडील रक्तपुरवठा सुरळीत चालू रहाण्यासाठी शतपावली करावी, असा नियम आहे; पण मुळातच ‘बफे’म्हणजे चरत चरत जेवल्यास पायाकडे रक्तप्रवाह होतच असतो. अशा वेळी पुन्हा शतपावलीची आवश्यकता काय ? तळलेले, भरपूर चीज किंवा बटरयुक्त स्निग्ध पदार्थ सेवन केल्यावर ते कुठेही चिकटून राहू नयेत; म्हणून गरम पाणी प्यायला हवे. आज बटर आणि चीजयुक्त पावभाजी, पिझ्झा, बर्गर अशा पदार्थांवर शीतपेय पिण्याची पद्धत आहे. हे परिहाराविरुद्ध आहे. त्यामुळे सूज येण्यासारखा कष्टसाध्य आजार होऊ शकतो.

 

२. अल्प किंवा कच्च्या पदार्थांमुळे पोटाचे
विकार उद्भवत असल्याने त्यांचे सेवन करणे टाळावे !

एका मुलाला मलेरिया झाला. मलेरिया या आजारात मुळातच भूक आणि पचनशक्ती अगदी न्यून होते. त्यात औषधांनी भुकेचा सत्यानाश होतो. प्रचंड अशक्तपणा असतांना यातून लवकर बाहेर पडण्यासाठी त्या मुलाने पौष्टिक आहार म्हणून कच्च्या भाज्या (सलाड) आणि मोड आलेली कच्ची कडधान्ये घेणे चालू केले. ८ दिवसांत त्याला पुन्हा ताप आला. याही वेळी सर्व चाचण्या झाल्या; पण तापाचे कारण कळत नव्हते. पचनशक्ती न्यून असतांना असे कच्चे किंवा अर्धकच्चे पदार्थ खाणे, हा विरुद्ध आहार आहे. ‘चायनीज’ पदार्थांमध्ये भाज्या आणि तांदूळ असे पदार्थ बहुतांश वेळा अर्धवट शिजवलेले असतात. उपाहारगृहातील तंदुरी रोटी, उत्तप्पा, डोसा असे पदार्थही बरेच वेळा बाहेरून जळलेले, तर आतून कच्चे असतात. अशा पदार्थांच्या सेवनाने पोटाचे असंख्य विकार उद्भवू शकतात.

 

३. संयोगविरुद्ध पदार्थ एकत्र सेवन केल्याने
त्वचाविकार किंवा रक्तक्षय होण्याची शक्यता बळावणे

आहारशास्त्रात काही पदार्थ एकत्र करणे निषिद्ध सांगितले आहेत. मद्य, खिचडी, खीर किंवा दूध, केळी, ताडगोळे, दही, ताक या गटातील कोणतेही २ पदार्थ एकत्र करून खाणे, हे संयोगविरुद्ध आहे. अशा प्रकारच्या आहाराने रस आणि रक्त धातू बिघडून त्वचाविकार किंवा रक्तक्षय यांसारखे आजार होण्याची शक्यता बळावते.

 

४. मनाविरुद्ध केलेल्या आहाराचे पोषण होत
नसल्याने त्याचा शरिरासाठीही उपयोग न होणे

८ वर्षांच्या एका मुलाला दूध आवडत नाही; पण विज्ञापने बघून बघून त्याच्या आईने ठाम समज करून घेतला होता की, दूध नाही घेतले, तर मुलाची वाढच होणार नाही. प्रतिदिन ती माता त्याला बळजोरीने दूध प्यायला लावते आणि तितक्याच वेळा तो १५ मिनिटांत ते ओकून बाहेर काढतो. ‘तो ओकतो, तर कशाला देतेस ?’, असे विचारल्यावर ती मला म्हणाली, ‘१५ मिनिटे पोटात रहाते ना त्याच्या, तेवढ्या वेळात त्यातील काही भाग तर शोषला जात असेल ? तेवढाच लाभ !’ असे न आवडणारे पदार्थ मनाविरुद्ध खायला लावणे याला ‘हृदयविरुद्ध’ म्हणतात.

मोठी माणसे स्वतः त्यांचे आवडते पदार्थ खाण्याचे आणि नावडते पदार्थ न खाण्याचे स्वातंत्र्य घेतात. सक्ती होते ती लहान मुलांवर ! दूध, पालेभाज्या, कारले, शेपू असे न आवडणारे पदार्थ त्यांना बळजोरीने खावे लागतात. पालकांनी त्यांच्या बालवयात ते खाल्लेले नसतात; पण मुलांची सुटका नाही. पदार्थ पौष्टिक असला, तरी तो मनाविरुद्ध ग्रहण केला, तर अंगी कसा लागेल ?

 

५. किडलेले, सडलेले, बुरशी लागलेले आणि सुकलेले पदार्थ
शरिरासाठी हानीकारक असल्याने संपतविरुद्ध आहार घेणे टाळावे !

एकदा मंडईत एक गृहिणी भाजीवाल्याशी ५ रुपयांसाठी वाद घालत होती, ‘फार महाग भाजी विकता तुम्ही, येथे मी नेहमीच भाजी घेते, दुसऱ्या भाजीवाल्याकडे स्वस्त आहे…’ भाजीवाला वैतागून म्हणाला, ‘‘अहो ताई, ही निवडलेली भाजी आहे बघा. यातील खराब भाजी आम्ही वेगळ्या पोत्यात काढून ठेवली आहे. येथील आजूबाजूचे उपाहारगृहवाले ही खराब भाजी घेऊन जातात. तिथे तुम्ही वाटेल ते पैसे मोजून ती खाता आणि गरिबाला ५ रुपयांसाठी नाडता होय ?’’ मला ती खराब भाजी बघूनच मळमळायला लागले. आहार पदार्थ गुणसंपन्न असणे आवश्यक असते. किडलेले, सडलेले, बुरशी लागलेले आणि सुकलेले पदार्थ उत्तम अन् शुद्ध शरीरघटक बनवूच शकत नाहीत. विकतच्या खाद्यपदार्थांच्या संदर्भात ‘दृष्टीआड सृष्टी’ अशी आपली अवस्था होते.

‘बिस्किटे बनवणारी कित्येक नामवंत आस्थापने पोरकिडे आणि अळ्या लागून खराब झालेली धान्ये वापरतात’, हे मला एका अन्न निरीक्षकाने सांगितले होते. ‘रेडी टू कुक’ (शिजवण्यासाठी सिद्ध) पदार्थांमध्ये तर सुकवलेल्या भाज्या मुद्दाम वापरतात. माझी एक मैत्रीण पैसे वाचवण्यासाठी रात्री उशिरा भाजी घ्यायला जायची. शिल्लक राहिलेली भाजी तिला अगदी निम्म्या भावाने मिळायची; पण ती भाजी म्हणजे लोकांनी मागे ठेवलेला कचराच असायचा. त्या भाजीत वाचणारे पैसे आणि त्यातून उद्भवणाऱ्या आजारपणात व्यय होणारे पैसे याचा ताळेबंद मी तिला एकदा करून दाखवला. असा गुणसंपन्न नसलेला आहार म्हणजे संपतविरुद्ध आहार होय.

 

६. अन्नपचन होण्यासाठी पदार्थ उष्ण, ताजे, स्निग्ध असणे
आवश्यक असून ते एकाग्रचित्ताने आणि पोटात थोडी जागा ठेवून घ्यावेत !

‘आयुर्वेदीय आहारमंत्र’ या माझ्या पुस्तकात भोजनविधीची सविस्तर माहिती दिली आहे. भूक लागल्यावर हात स्वच्छ धुऊन उष्ण, ताजे, स्निग्ध पदार्थ एकाग्रचित्ताने आणि पोटात थोडी जागा ठेवून जेवावे, असे काही नियम आहेत. ते धाब्यावर बसवून घेतलेला आहार म्हणजे ‘विधीविरुद्ध आहार’ होय.

‘एकाग्र चित्ताने जेवावे’, असा नियम आहे. त्यामुळे आपण काय खातो, याकडे आपले लक्ष रहाते. सुग्रास अन्नाचा आनंद मनालाही घेता येतो; पण सध्या दूरचित्रवाणीच्या समोर बसून त्यामध्ये एकाग्र होऊन जेवण्याची पद्धत आहे. तेव्हा समोर चालू असणाऱ्या मालिका, चित्रपट किंवा बातम्यांमधील तीव्र भावना आपल्या मनावर राज्य करतात. शास्त्र सांगते की, तुमचा आहार कितीही पोषक, हलका आणि उत्तम असला, तरी तो घेतांना मनात काम, क्रोध, मद, मत्सर अन् लोभ अशा भावना असल्या, तर त्यांचे योग्य पचन होत नाही.

 

७. ऋतूनुसार उपलब्ध फळे, भाज्या, धान्य, तसेच सणांना अनुसरून
करायच्या पाककृती यात विविधता असून ते आरोग्याला हितकारक असणे

आहाराचे असे निषेधवजा नियम सांगितलेले कुणालाच आवडत नाहीत. ‘इतके सर्व सांगण्यापेक्षा काय खायचे सांगा की ?’, असे म्हणून वैद्यांना वेड्यात काढण्यापर्यंत लोकांची मजल जाते. नको नको ते खाल्ल्यामुळे आजार होतात; म्हणून ‘अमुक पदार्थ खाऊ नका’, असेच आधी सांगावे लागते. ‘जे खाऊ नये, त्याच्या विरुद्ध खावे’, हा एक साधा नियम आहे, उदा. विधीविरुद्ध खाऊ नये, याचाच अर्थ आहार विधीप्रमाणे खावा. ‘अग्निविरुद्ध खाऊ नये’, याचाच अर्थ अग्निप्रमाणे किंवा भुकेप्रमाणे खावे, हे ओघानेच आले. ‘सवयीचे नसलेले पदार्थ खाऊ नयेत’, यात दडलेला अर्थ आहे, सवयीचे पदार्थ खावेत. तरीही ‘खाऊ नये’ ही सूची पाहून ‘आपल्या खाण्यावर भरमसाठ बंधने आली आहेत’, असे लोकांना उगीचच वाटते.

खरेतर आपण शहरातील माणसे पुष्कळ प्रकारचे पदार्थ खात असतो. ‘जगातील सगळ्या प्रकारचे पदार्थ मला खाता आले पाहिजेत’, हा अट्टाहास सोडायला हवा. सर्व प्राणी त्यांच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत निवडक पदार्थ खातात कि नाही, ते पहा. जंगलात एकमेकांचे पाहून ते स्वतःच्या आहारात विविधता आणण्याचा प्रयत्न करतात का ? आपले निरोगी पूर्वज आणि आजही जगात आढळणाऱ्या निरोगी जमाती यांच्या आहारात आपल्या आहाराइतके वैविध्य आढळत नाही. ऋतूनुसार उपलब्ध फळे, भाज्या, धान्य, तसेच सणांना अनुसरून करायच्या पाककृती यांत पुरेशी विविधता आहे. ती आरोग्याला हितकारकही आहे. इतर देशांमधील पदार्थ आणि कृत्रिम खाद्यपदार्थ यांची आवश्यकता भासणार नाही, इतके भारतीय पाकशास्त्र संपन्न आहे. म्हणून काय खावे ? याचे सोपे उत्तर म्हणजे आपल्या पणजी आणि पणजोबा यांनी खाल्लेले ऋतूंनुसारचे पदार्थ खावेत.

 

८. जिभेचे सर्व चोचले पुरवायचे असल्यास भरपूर
शारीरिक कष्ट करून आपली पचनशक्ती उत्तम करून घ्यावी !

‘मग हे सर्व पदार्थ आम्ही काय आयुष्यभर खायचेच नाहीत का ?’, असे विचारणाऱ्या व्यक्तींनी मनात पक्की खूणगाठ बांधावी की, नियमाविरुद्ध भोजन पचायला पचनशक्ती उत्तम असावी लागते. उत्तम पचनशक्ती एकतर प्रकृतीत असते, म्हणजे अनुवंशिकरित्या प्राप्त होते किंवा आपल्याला प्राप्त करावी लागते. ती प्राप्त करण्यासाठी शारीरिक कष्ट करणे, हा एकमेव मार्ग आहे. शहरी जीवनात आपण पुष्कळ यंत्रावलंबी झालेलो आहोत. ‘न्यूनतम कष्ट आणि अधिकाधिक आहार’, हे चुकीचे सूत्र आपण अंगीकारले आहे. ज्यांना जिभेचे सर्व चोचले पुरवायचे आहेत, त्यांनी स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी भरपूर शारीरिक कष्ट करून कडकडून भूक लागेल अन् दगडही पचतील, अशी व्यवस्था आधी करून घ्यावी. निसर्गाने खाण्याचा अधिकार केवळ कष्टकरी माणसाला दिला आहे. त्याच्या या नियमातून आपली सुटका नाही. तेव्हा आरोग्यसंपन्न भारतासाठी आता आपण ‘कष्टाळू भारत अभियान’ चालू करूया !

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (साभार : दैनिक ‘तरुण भारत’) (२९.१२.२०१९)

Leave a Comment