चतुर्विध आहार (आयुर्वेदाचा पाकमंत्र) !

 

१. भोजनातील लोणच्याचे महत्त्व !

लहानपण हे मनुष्याच्या आयुष्यातील सर्वांत ‘श्रीमंत’ वय असते. या वयातील आठवणी अतिशय रम्य आणि गमतीशीर असतात. सर्वांच्या आयुष्यात असणारी अशीच एक चटपटीत आठवण ‘लोणचं’ या पदार्थाशी संबंधित असते.

आमच्या पिढीची लोणच्याशी संबंधित आठवण थोडी वेगळी आहे. जेवतांना आम्ही पानात लोणच्याची फोड (विशेषतः कैरीची) अगदी मागून घ्यायचो. स्वतःच्या पानात सगळ्यात मोठी फोड आहे ना ? हे पहायचो. जेवतांना त्याचा खार मटकवायचो. फोड मात्र शेवटपर्यंत तशीच ठेवायचो. जेवण झाले की, मग ती फोड तोंडात ठेवून पुढे पुष्कळ वेळ चोखत बसायचो. कुणाची फोड किती टिकते ? अशी स्पर्धा असायची. लोणच्याच्या या मुरलेल्या फोडीची स्वर्गीय चव आठवली की, आजही तोंडाला पाणी सुटते.

आमच्या लहानपणी लिमलेटच्या आंबट-गोड गोळ्या मिळायच्या. आम्हाला त्या क्वचित्च कुणीतरी द्यायचे. ती गोळीही चोखत चोखत तिचा आस्वाद घेत खाल्ली जायची. आताची मुले च्युईंगम व्यतिरिक्त असे चोखायचे पदार्थ खातांना दिसत नाहीत. मुख्य म्हणजे पुष्कळ जणांचे दात इतके संवेदनशील (सेन्सिटिव्ह) असतात की, त्यांना हे आंबूस पदार्थ खाताच येत नाहीत. त्यामुळे हा प्रकार जेवणातून हद्दपार होत आहे.

अहं वैश्‍वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १५, श्‍लोक १४

अर्थ : मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात रहाणारा, प्राण आणि अपान यांनी संयुक्त वैश्‍वानर अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो.

त्यामुळे ‘अन्नाचे चार प्रकार कोणते ?’, असा प्रश्न नवीन पिढीला पडल्याविना रहात नाही. पेय, चोष्य किंवा लेह्य (चाटणे किंवा चोखणे), भोज्य आणि भक्ष्य असे ते ४ प्रकार होत.

 

२. आहारात पेयाची असणारी आवश्यकता !

पेय म्हणजे पिण्याचा पदार्थ ! हा अर्थातच द्रव किंवा सांद्र (‘सेमिसॉलिड’) असू शकतो. यात पाणी, दूध, सूप, विविध खिरी, आमटी, ताक, मठ्ठा, कढी, सोलकढी इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. या विषयावर एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकेल, इतका हा विषय मोठा आहे. तूर्त इतकेच की, जेवणात मधे मधे थोडी थोडी पेये घ्यावीत.

थंडीत किंवा पावसाळ्यात वात/कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी भूक मंद असतांना सूप, कढी, आमटी अशी गरम पेये घ्यावीत. पावसाळ्यात तर द्रव पदार्थांची इच्छा अल्पच होते. उन्हाळ्यात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी दूध, खीर, सोलकढी अशी थंड पेये घ्यावीत. जेवणात जड पदार्थ असतील, तर पचनाला साहाय्य करणारे ताक, मठ्ठा अशी पेये घ्यावीत. २०० ते ३०० मि.ली. इतक्या प्रमाणात आपण हे पेय घेऊ शकतो.

सध्या लोक मोठ्या प्रमाणात उपाहारगृहात भोजन करतात. तेथे सर्वांत सुरक्षित आणि जंतूविरहित पेय म्हणून थंड बाटलीबंद पाण्याची निवड केली जाते. घरी शीतकपाटामध्ये (फ्रीजमध्ये) मोठ्या बाटल्या ठेवून जेवणासमवेत शीतपेय घेणारे महाभागही आहेत. थोडे कष्ट घेऊन संगणकीय ज्ञानजालावर (इंटरनेटवर) शोध घेतला, तर ही पेये घेणे किती अयोग्य आहे, याविषयी आपल्याला सहज समजेल.

जेवणापूर्वी कुठलाही द्रवपदार्थ अधिक प्रमाणात पिऊ नये. त्यामुळे भूक मंदावते. जेवणानंतरही मोठ्या प्रमाणात द्रवपान करू नये. तसे केल्यास अन्नपचन व्यवस्थित होत नाही; म्हणून जेवतांनाच आहारात द्रवपदार्थांचा समावेश करावा. आजच्या सामान्य प्रचलित पद्धतीप्रमाणे सकाळी उपमा किंवा पोहे असा अल्पाहार आणि दुपारी पोळी-भाजीचा डबा या दोन्ही भोजनांत द्रव पदार्थांना मुळीच स्थान नाही. त्यामुळे पोटात गेल्यावर अन्नाचा व्यवस्थित (नीट) गोळा निर्माण होत नाही आणि पचन बिघडते. आतड्यांना आणि मलाला रूक्षता येऊ शकते. हीच रूक्षता पुढे त्वचा, केस, डोळे, यांच्यापर्यंत पोचते. तात्पर्य आहारात एकतरी द्रव पदार्थ हवा !

 

३. लेह्य आणि चोष्य (चाटून किंवा चोखून खाण्याचे पदार्थ)

चाटून किंवा चोखून खाण्याचे पदार्थ या वर्गात येतात, उदाहरणार्थ विविध लोणची, पंचामृत, मोरांबा, गुळांबा, फळांचे गोड अवलेह, विविध ओल्या चटण्या, श्रीखंड, छुंदा, तक्कू इत्यादी. या वर्गातील सगळे पदार्थ पानात डाव्या हाताला वाढले जातात. याचा अर्थ त्याचे प्रमाण जेवणात मर्यादित असावे. हे पदार्थ चवीला प्रायः तिखट, आंबट, गोडसर असे असतात. जेवणात मधे मधे हे चाखल्याने भोजनाची रूची वाढते. पाचकस्राव मोठ्या प्रमाणात स्रवतात आणि त्याचे पचनाला साहाय्य होते.

उन्हाळ्यात आपल्याला भूक अल्प असते, तर पावसाळ्यात आपली पचनशक्ती अल्प झालेली असते. विविध आजारांमध्ये, आजारातून उठल्यावर तोंडाला चव नसते किंवा खाल्लेले पचत नाही. अशा वेळी हे चोष्य पदार्थ जेवणात अवश्य असावेत. कफ प्रवृतीच्या व्यक्तींचा अग्नी स्वभावतः मंद असतो, म्हणजे त्यांना भूक अल्प लागते आणि एकदा खाल्ल्यावर ते पचायलाही वेळ लागतो. त्यांनी पचनासाठी या पदार्थांचे साहाय्य घ्यायला हरकत नाही; मात्र त्यांनी तिखट लेह आणि चटण्या यांचा वापर करावा. पित्त प्रकृतीच्या लोकांनी गोड, तर वात प्रकृतीच्या लोकांनी आंबट, गोड, तोंडी लावणी वापरावी.

 

४. भोज्य (भात, उपमा, पोहे इत्यादी)

शिजवलेले जे अन्न आपण घास घेऊन खाऊ शकतो आणि ज्यांना काही प्रमाणात चावायची आवश्यकता असते, त्याला भोज्य म्हणतात, उदाहरणार्थ भाताचे विविध प्रकार, उपमा, पोहे इत्यादी. या पदार्थांनी पोट भरल्याची जाणीव किंवा तृप्ती येते. (ती आली नाही, तर मनुष्य अधिक खात बसेल.) यातील बहुतांशी पदार्थ शरिराचे उत्तम पोषण करतात; म्हणून त्यांनाही आहारात महत्त्वाचे स्थान आहे. आजच्या ‘डबा’ पद्धतीत हे पदार्थ अल्प असतात. काही भाज्याही या प्रकारात मोडतात.

 

५. भक्ष्य (सुळे आणि दाढा यांचा वापर करून सेवन होणारे पदार्थ)

सुळे आणि दाढा यांचा वापर करून जे पदार्थ तोडून अन् चावून खावे लागतात, ते भक्ष्य या सदरात मोडतात. पोळी, भाकरी, मांसाहार, थालीपीठ, नान, रोटी, पाव, सलाड हे त्यातील पदार्थ होत. शरिरातील अस्थीसारख्या कठीण धातूसहित अन्य धातूंचे पोषण करण्याचे काम हे पदार्थ करतात; मात्र हे प्रायः कोरडे असतात; म्हणून उन्हाळ्यात आपल्यालाच ते खाण्याची विशेष इच्छा नसते. वात प्रकृतीच्या लोकांनाही कच्चे पोहे, दडपे पोहे असे कोरडे पदार्थ फार आवडत नाहीत. त्यांना जेवणातही रसभाजी किंवा आमटी लागते. त्या त्या ऋतूतील आपापल्या आवश्यकतेप्रमाणे प्रत्येकाच्या आहारातील भक्ष्य पदार्थाचे प्रमाण पालटते.

पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवणात पानातील डावी बाजू म्हणजे लेह्य पदार्थ, उजवी बाजू म्हणजे भोज्य पदार्थ, तर मधले पदार्थ भोज्य आणि भक्ष्य पदार्थ असतात. आमटी, वरण, ताक हे द्रव पदार्थ प्रतिदिनच्या जेवणात असावेत, असा संकेत आहे. अशा रितीने आहारात चारही प्रकारचे अन्नपदार्थ समाविष्ट झालेला आपला आहार म्हणजेच ‘चारीठाव’ जेवण होय. यात रूचीपासून पचनापर्यंत सर्व गोष्टींचा विचार आहे. व्यक्तीची प्रकृती, देश, काल आणि आवड यांप्रमाणे या पदार्थाचे प्रमाण अल्प-अधिक करता येते. असे चारीठाव जेवण असेल, तर भाजी, द्रवपदार्थ, कोशिंबीर यांनीही पोट भरायला साहाय्य होते. अशा वेळी भोज्य आणि भक्ष्य पदार्थ अल्प खाल्ले जातात. यामुळे आहार संतुलित राहून वजन नियंत्रित रहायला साहाय्य होते. अतिपोषणजन्य आजार टाळता येतात. प्रतिदिनचा किमान दुपारचा आहार तरी असा चारीठाव असायला हवा. (वेळेअभावी लोक रात्री असा आहार घेतात; परंतु सूर्यास्तानंतर खरेतर आहार घेऊच नये. घेतला तरी हलका आहार घ्यावा.)

 

६. आवडते पदार्थ प्रतिदिनपेक्षा अधिक प्रमाणात घेणे टाळावे !

आपल्याकडे सणावारी गोड पदार्थ केले जातात. उन्हाळ्यात आमरस असतो. मांसाहार करणाऱ्या लोकांकडे सप्ताहातून एखाद्या वेळी ती मेजवानी असते. हे सगळे पदार्थ भोज्य किंवा भक्ष्य या प्रकारात मोडतात. हे पचायला जड असतात; म्हणून असे पदार्थ खातांना डाव्या आणि उजव्या बाजूचे पदार्थ अल्प खावेत किंवा मुख्य पदार्थ अल्प खावा. केवळ दोन वाट्या आमरस खाल्ला, असा हिशोब न करता दोन वाट्या आमरस, चार पोळ्या, अर्धी वाटी भाजी, पाव वाटी कोशिंबीर, अर्धी वाटी भात असे सगळे पदार्थ हिशोबात धरावेत, म्हणजे आपल्याला जेवण कुठे थांबवावे, हे कळते. कितीही आवडते पदार्थ असले, तरी त्यांचा प्रतिदिनपेक्षा अधिक प्रमाणात आहार घेणे टाळावे हे उत्तम !’

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी

साभार : दैनिक ‘तरुण भारत’

Leave a Comment